चिखली - चिखली परिसरात आज गुरुवारी पहाटे आढळून आलेला बिबट्या चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला जेरबंद करण्यात अखेर यश आले. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर चिखलीकरांनी सुटकेचा श्वास सोडला.
गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास काकड आरतीसाठी निघालेल्या आप्पा साने यांना चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावर हा बिबट्या फिरताना दिसला. या रस्त्यावरील बंद असलेल्या बेकरीत बिबट्या घुसण्याचा प्रयत्न करत होता. आप्पा साने यांनी लगेच सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांच्या कानावर हा प्रकार घातला.
विकास साने यांनी वनविभाग, चिखली पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार कळविला. काही वेळातच कुदळवाडी पोलीस चौकीतील कर्मचारी हजर झाले. मात्र कुत्रे भुंकत असल्याने तोपर्यंत त्या ठिकाणाहून बिबट्या गायब झाला होता. तो सरळ सोनवणे वस्ती, आश्रम रोडवरील सुदाम मोरे यांच्या बंगल्याच्या सीमा भिंतीवरून उडी मारून बंगल्यात शिरला आणि त्यानंतर जनावराच्या गोठ्यात दबा धरून बसला.
घराच्या आजूबाजूला एवढी कुत्री का भुंकतात? हे पहिले असता मोरे व त्यांचा सुरक्षा रक्षकाला जनावराच्या गोट्यात दबा धरून बसलेला बिबट्या दिसून आला. तोपर्यंत वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीम आणि पोलीस पायाच्या खुणानुसार बिबट्याचा माग शोधत मोरे यांच्या बंगलाजवळ आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडायला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट फायर केले.
मात्र डार्ट फायर होण्यापूर्वीच बिबट्याने सीमा भिंतीवरून झेप घेतली आणि तो शेजारच्या ज्वारीच्या शेतात दडून बसला. बिबट्या पळून जाऊ नये यासाठी चारही बाजूने वाहने लावून त्याला वेडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो ज्वारीच्या शेतात इकडून तिकडे फिरत असला तरी वाढलेल्या पिकामुळे डार्ट फायर करता येत नव्हते.
सकाळची नऊ वाजले तरीही बिबट्या बाहेर येत नसल्याने अखेर महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून शेताच्या मधोमध रस्ता करण्यात आला. बिबट्याला शेताच्या एका बाजूला कोपऱ्यात घातल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा अचूक डार्ट फायर केला. त्यानंतर बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर त्याला लगेचच कपड्यामध्ये गुंडाळून पकडण्यात आले.
मुख्य वनरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनरक्षक महादेव भोईटे, वनक्षेत्रपाल प्रवीण सपकाळ, बावधन येथील रेस्क्यू टीम महापालिका अग्निशामक विभाग, चिखली पोलीस आणि चिखली परिसरातील अनेक उत्साही नागरिक यांच्या प्रयत्नातून बिबट्याला पकडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.