pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

PCMC Election : ‘निकाल’ लोकसभेचा; ‘परीक्षा’ पालिकेची! परंपरागत विरोधक एकत्र आल्याने पेच

बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे लोकसभा निवडणूक शहरासाठी चर्चेचा विषय ठरली. अनेक परंपरागत विरोधक एकाच व्यासपीठावर आढळले.

पीतांबर लोहार

पिंपरी - बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे लोकसभा निवडणूक शहरासाठी चर्चेचा विषय ठरली. अनेक परंपरागत विरोधक एकाच व्यासपीठावर आढळले. पण, ते मनापासून एकत्र होते, की केवळ पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे तनाने उपस्थित राहायचे. खरोखरच त्यांनी ‘आपल्या’ उमेदवाराचे काम केले, की ‘काम’ दाखवले, हे चार जूनला मतमोजणीनंतर अर्थात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

मात्र, त्याचा परिणाम आगामी वर्षभरात येऊ घातलेल्या विधानसभेपेक्षाही महापालिका निवडणुकीतील समीकरणांवर होऊ शकतो. कारण कोणत्या मतदान केंद्रावर आपल्या उमेदवाराला किती मते मिळाली, या कामगिरीवरच अनेकांची महापालिकेची उमेदवारी ठरणार, ही सद्यःस्थिती आहे.

आगामी काळात महायुती वा महाविकास आघाडी टिकून राहिल्यास वा बिनसल्यास महापालिका उमेदवारीची राजकीय रंगत आणखी वाढणार व उमेदवारी देण्याबाबत गुंतागुंतीची होणार, यात शंका नाही.

महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यापूर्वी निवडणूक होऊन १४ मार्चपासून नवीन कारभारी महापालिकेत कार्यरत असायला हवे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, मराठा व ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा, अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक सव्वादोन वर्षांपासून लांबणीवर पडली आहे. ती आता फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.

कारण, त्यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये मुदत संपणार असल्याने विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या अगोदर अर्थात जून ते सप्टेंबर, पावसाळा असल्याने निवडणूक होणे अशक्य आहे. शिवाय, सहा जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. याच निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील पर्यायाने शहरातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. तीच समीकरणे महापालिकेच्या निवडणुकीचे गणित बिघडवणार, अशी स्थिती आहे.

महापालिकेत मार्च २०२२ पर्यंत महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत १२८ पैकी ७७ जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने सत्ता ताब्यात घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कारभाराला सुरुंग लागला. राष्ट्रवादीचे ३६, शिवसेनेचे नऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक आणि अपक्ष पाच नगरसेवक होते. यातील चार अपक्षांनी भाजपला साथ दिली होती.

महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यापासून अर्थात मुदत संपण्याच्या एक वर्ष अगोदरपासून अनेकांनी निवडणुकीची तयारी केली होती. पण, भाजपमध्ये काहींची अस्वस्थताही दिसत होती. अखेर टप्प्याटप्प्याने पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. त्यातील काही आता अजित पवार यांच्या सोबत पर्यायाने भाजपसोबत आहेत. शिवाय, महापालिकेत पाच वर्षे भाजपवर तुटून पडणाऱ्या व अजित पवार यांना साथ दिलेल्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांचीही भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती दिसली.

मार्च २०२२ नंतरची स्थिती

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे पक्ष निर्माण झाले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली आणि महायुती अस्तित्वात आली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे काँग्रेससोबत एकत्र येऊन महाविकास आघाडी झाली आहे.

लोकसभेची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढली गेली. शरद पवार यांच्याऐवजी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या व निवडणुकीपूर्वी ठाकरे यांच्या गोटात शिरलेल्या माजी महापौराला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली. त्यांच्या प्रचारात शरद पवार समर्थक दिसले. त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकानेही ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. तेही गळ्यात गळे घालून प्रचारात दिसले.

संभाव्य राजकीय पेच आणि समीकरणे

  • महापालिकेची आगामी निवडणूक महायुती वा महाविकास आघाडी अशी लढली गेल्यास नगरसेवकपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धा तीव्र होणार

  • बदलत्या राजकीय समीकरणात लोकसभा निवडणुकीत शहरातील कोणत्या मतदान केंद्रावर ‘आपल्या’ (महायुती किंवा महाविकास आघाडी) उमेदवाराला किती मताधिक्य मिळाले, याचा विचार केला जाणार.

  • गेल्या वेळी कोण नगरसेवक होते, त्याची कामगिरी कशी होती? यावरही विचार होऊ शकतो, अशी कुजबूज ऐकायला येत आहे.

  • महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप विजयी झालेल्या ७७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३, शिवसेनेचे १८, काँग्रेसचे दोन व अपक्ष चार उमेदवार द्वितीय स्थानी होते.

  • राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालेल्या ३६ जागांवर भाजपचे ३०, शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे एका जागेवरील उमेदवार द्वितीय स्थानी होते.

  • शिवसेना विजयी झालेल्या नऊ जागांवर भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे तीन जागांवरील उमेदवार द्वितीय स्थानी होते.

  • अपक्ष उमेदवार विजयी झालेल्या पाच जागांवर भाजपचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व शिवसेनेचे एक उमेदवार द्वितीय स्थानी होते.

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकच जागा जिंकली होती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार द्वितीय स्थानी होता.

  • २०१७ मधील द्वितीय स्थानांमुळे भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात सर्वाधिक पेच निर्माण होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT