Bopodi Sangavi River Area sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad Flood : रात्रंदिन आम्हा पुराचीच भीती! मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांना पूर

अतिवृष्टी आणि धरणांतून होणारा विसर्ग यामुळे शहरातील मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांनी शनिवारची (ता. ३) रात्र जागून काढली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - अतिवृष्टी आणि धरणांतून होणारा विसर्ग यामुळे शहरातील मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांनी शनिवारची (ता. ३) रात्र जागून काढली. अनेकांनी नातेवाइकांकडे आश्रय घेतला, तर सुमारे एक हजार नागरिकांना महापालिकेने निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित केले.

रविवारीही पाऊस सुरूच राहिल्याने आणि धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविल्याने नद्यांची पाणीपातळी वाढल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह अधिकारी ‘ऑनफिल्ड’ होते. त्यामुळे ‘रात्रंदिन आम्हा पुराची भीती’ अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.

मुळशी धरणातून मुळा नदीत; पवना व कासारसाई धरणातून पवना नदीत आणि आंद्रा व वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू आहे. शिवाय या तीनही नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नदी पात्रांमध्ये पाण्याचा येवा वाढल्याने पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

महापालिका प्रशासन सतर्क

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह नदी काठच्या मावळ, मुळशी, खेड व हवेली तालुक्यांतील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. नद्यांच्या पूररेषेलगतची आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचा आदेश सरकारकडून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना आला होता.

नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शनिवारी केले होते. त्यानुसार महापालिका यंत्रणेकडून शनिवारी रात्रीपासूनच बचाव व मदत कार्य करत आहे.

शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मदत व बचावकार्यासाठी महापालिका आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) पथक शहरात दाखल झाले आहे. बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड या यंत्रणाही सज्ज आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवल्या आहेत.

सर्व प्रभाग व सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरू आहे. महापालिका भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सखल भागांची पाहणी केली. यामध्ये मुख्यत्वे पिंपरीतील सुभाषनगर घाट, संजय गांधीनगर; पिंपळे गुरव व सांगवी भागातील परिसराचा समावेश होता.

उपायुक्त रवीकिरण घोडके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार, सहायक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त शितल वाकडे, राजेश आगळे यांनी आपापल्या कार्यकक्षेतील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशाला दिला.

आंद्रा धरण १०० टक्के, इंद्रायणीच्या पातळीत वाढ

आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. धरण द्वारविरहित असल्यामुळे त्याच्या सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग चालू आहे. त्यामुळे पाऊस व धरणातील येवा वाढत गेल्यास त्यानुसार धरणाच्या सांडव्यावरून आंद्रा नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग वाढू शकतो. ही नदी पुढे इंद्रायणी नदीस मिळत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सतर्क रहा, सूचना पाळा : आमदार लांडगे

चिखली येथील मोई फाटा, रिव्हर रेसिडेन्सी येथे आमदार महेश लांडगे यांच्यासमवेत आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त अण्णा बोदडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सखल भागांची पाहणी केली. यावेळी आमदार लांडगे यांनी महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. ‘शहरात सातत्याने पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. तसेच महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालीन यंत्रणा दक्ष ठेवून नागरिकांना सर्वोतोपरी मदत करावी, अशी सूचना केली.

महापालिका-पोलिस बैठक

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेऊन पूरस्थितीबाबत संवाद साधला. सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार, स्वप्ना गोरे यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी त्या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले. पूरबाधितांसाठी क्षेत्रीय कार्यालये निहाय तयार केलेली निवारा केंद्रे व तेथील सोयी-सुविधांचा आढावा सिंह यांनी घेतला. आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

- नदीपात्राकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्सने बंद करावेत

- वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याकडे लक्ष द्यावे

- रात्रपाळीमध्ये शीघ्र कृती दलाने दक्ष राहावे

- नजीकच्या रुग्णालयांतील खाटा आरक्षित ठेवाव्यात

- कोठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्यावी

- कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी

- किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करावी

- रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, तुंबलेले चेंबर्स वेळोवेळी दुरूस्त करावेत

सामाजिक संस्थांचे सहकार्य

सीझन ग्रुप व सोशल वेल्फेअर ट्रस्ट सांगवी, शितोळेनगर मित्र मंडळ सांगवी, बालाजी प्रतिष्ठान सांगवी, शिवदुर्ग मित्र, सह्याद्री ऑफरोड ॲडव्हेंचर्स ॲण्ड रेस्क्यू ट्रस्ट, आपत्ती व्यवस्थापन संघ भोसरी, पुणे ऑफरोडर्स, पीसीएमसी योद्धा आपदा मित्र, महाराणा प्रताप मित्र मंडळ पिंपरी आदी स्वंयसेवी संस्था सहकार्य करत आहेत, अशी माहिती मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली.

महापालिका रुग्णालयांमध्ये आपत्कालीन कक्ष स्थापन केले आहेत. तसेच पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि थेरगाव रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड स्थापन केले आहेत. यासह महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांत खाटा आरक्षित केल्या आहेत.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

महापालिकेकडून कार्यवाही

  • पूरबाधितांचे निवारा केंद्रात स्थलांतर

  • ‘एनडीआरएफ’चे पथक शहरात दाखल

  • आवश्यक ठिकाणी तत्काळ प्रतिसाद पथकांची नियुक्ती

  • निवारा केंद्रात पूरबाधितांना भोजनासह आवश्यक सोयीसुविधा

  • वैद्यकीय पथक कार्यरत असून नागरिकांची आरोग्य तपासणी

  • शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात, बचावकार्य सुरू

  • संपूर्ण परिस्थितीवर मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे बारकाईने लक्ष

शहरातील पूरस्थिती

  • जुनी सांगवीतील मुळानगर, संगमनगर, ममतानगर, दत्त आश्रम, मधुबन सोसायटी, अभिनवनगर बाधित

  • मोशी, चऱ्होली स्मशानघाट इंद्रायणी नदीच्या पाण्याखाली

  • दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी स्मशानभूमीत पवनेचे पाणी

  • पिंपरीतील सुभाषनगर, संजय गांधीनगर, बौद्धनगर, झुलेलाल घाट, इंदिरानगरमध्ये पाणी

  • फुगेवाडीतील जय भारतनगरमध्ये पाणी

नागरिकांना सावधनतेचा इशारा

नदी काठांसह धोकादायक स्थळांच्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरीत करण्यात येत असून तेथे भोजनासह आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून ,नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. स्थानिक नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनीही सहकार्य करण्याचे आयुक्तांनी आवाहन केले. पोलिस आणि महापालिका आपत्कालीन यंत्रणांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी, असा आदेश दिला.

पूरग्रस्तांचे स्थलांतर

  • रावेतच्या जाधव घाट परिसरातील २९ नागरिक वाल्हेकरवाडीतील चिंतामणी चौकाजवळील शाळेत

  • रामनगर बोपखेल येथील सुमारे १०० नागरिक महापालिका शाळेतील निवारा केंद्रात

  • चिखली-मोशी रिव्हर रेसिडन्सीजवळ महापालिका एसटीपी प्रकल्प कामगार वसाहतीतील ८० जणांचे कॅान्ट्रॅक्टर डब्ल्यूटीईकडून भोसरीत स्थलांतर

  • पिंपळे निलख येथील चोंदे चाळ, चौंदे घाट परिसरातील ५० नागरिक इंगोवले शाळा व पिंपळे निलख शाळेत

  • पिंपरीतील बौद्धनगर, आंबेडकर कॉलनीतील सुमारे ३० नागरिक भाटनगर शाळेत

  • संजय गांधीनगर, जगतापनगर परिसरातील २७ नागरिक यशवंतराव चव्हाण शाळा व कमला नेहरू शाळेत

  • जुनी सांगवी मुळानगर, मधुबन सोसायटीतील ११८ नागरिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत

  • डुडुळगावमधील ७५ जणांचे सेक्टर तीनमध्ये स्थलांतर

मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग सद्यस्थितीत स्थिर आहे. तसेच, पावसाच्या प्रमाणानुसार आणि जलप्रवाहाच्या स्थितीनुसार विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो.

- बसवराज मुन्नोळी, प्रमुख, मुळशी धरण

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठच्या शेतीतील अवजारे, साहित्य व जनावरे तत्काळ अन्यत्र हलवावीत. सर्वांनी योग्य खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास सहकार्य करावे.

- रजनीश बारिया, अभियंता, पवना धरण

इंद्रायणी नदीची पाणी पातळी सध्या कमी आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेस संपर्क साधावा. धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे एक हजार नागरिकांना निवारा केंद्र व नातेवाइकांकडे स्थलांतरित केले आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

पवना धरणातून रविवारचा विसर्ग

सकाळी : ८.१५ - ५०००

सकाळी : १०.०० - ७०७०

दुपारी : १२.३० - ८९६०

दुपारी : ३.३० - ९०००

सायंकाळी : ७.०० - ७२२०

असा आहे विसर्ग (क्युसेक) (सायं. ५ वाजता)

मुळशी - ३०,०००

पवना - ९,०००

आंद्रा - ४०५६

हेल्पलाइन विभाग व संपर्क क्रमांक

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष - ०२०-२८३३११११, ६७३३११११

मुख्य अग्निशमन केंद्र - ०२०-२७४२३३३३, ०२०-२७४२२४०५, ९९२२५०१४७५

भोसरी उपअग्निशमन केंद्र - ८६६९६९२१०१, ९९२२५०१४७६

प्राधिकरण उपअग्निशमन केंद्र - ०२०-२७६५२०६६, ९९२२५०१४७७

रहाटणी उपअग्निशमन केंद्र - ८६६९६९३१०१, ९९२२५०१४७८

तळवडे उपअग्निशमन केंद्र - ०२०-२७६९०१०१, ९५५२५२३१०१

चिखली उपअग्निशमन केंद्र - ०२०-२७४९४८४९, ८६६९६९४१०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT