अंदाधुंद गोळीबार केलेल्या घटनेचा व्हिडिओ, एखाद्याला संपविण्याची भाईगिरीची भाषा, हत्यारांचे प्रदर्शन, सिनेमांचे डायलॉग वापरून धमकी, असे रील्स वारंवार व्हायरल होत आहेत.
पिंपरी - अंदाधुंद गोळीबार केलेल्या घटनेचा व्हिडिओ, एखाद्याला संपविण्याची भाईगिरीची भाषा, हत्यारांचे प्रदर्शन, सिनेमांचे डायलॉग वापरून धमकी, असे रील्स वारंवार व्हायरल होत आहेत. यातून गुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुंडांचे धाडस इतके वाढले आहे की, रील्स तयार करून पोलिसांना आव्हान दिले जात असल्याचे दिसून येते. अशा गुंडांच्या नांग्या ठेचून कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
घटना 1
चांदखेड येथील यात्रेत दहशत माजविणाऱ्या टोळक्याने रस्त्यात आरडाओरडा करीत यात्रेसाठी आलेल्या नागरिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. कोयते मारले, फ्लेक्स फाडले, एवढ्यावरच न थांबता गर्दीत पिस्तूल काढून गोळीबार केला. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. यानंतर हे टोळके बिनधास्तपणे तेथून निघून गेले. काही कालावधी उलटत नाही, तोच या घटनेचा रील व्हायरल झाला. त्यामध्ये एक जण अंदाधुंद गोळीबार करीत असल्याचे दिसत असून त्या व्हिडिओमध्ये ‘किंग ऑफ चांदखेड, मिस यु भाऊ’, असे म्हटले आहे. भरयात्रेत दहशत माजवून पुन्हा असा व्हिडिओ व्हायरल केल्याने सामान्य नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
घटना 2
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये वर्तमानपत्रातील वृत्ताप्रमाणे मजकूर तयार करून त्यामध्ये दहशतीची भाषा वापरली आहे. याचाच व्हिडिओ तयार केला असून ‘मारायचे तर सगळ्यात टॉपच्याला मारायचे तरच पेपरमध्ये हेडलाईन होते. ती हेडलाईन आपली दहशत बसवते’, असे त्यामध्ये म्हटले आहे.
अशा घडताहेत घटना
1) शहरात वाढतेय टोळक्यांची दहशत
2) खून, प्राणघातक हल्ला, तोडफोड अशा घटना वाढताहेत
3) गोळीबारही होताहेत राजरोसपणे
4) आयुक्तालयाच्या हद्दीत महिनाभरात गोळीबाराच्या तीन घटना
5) गुन्हेगारांकडून दहशतीचे व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओ, पोस्ट यावर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मॉनिटरिंग स्कॉड स्थापन केले आहे. या पथकामार्फत अद्यापपर्यंत चाळीस जणांवर कारवाई झाली आहे. अशाप्रकारे व्हिडिओ, पोस्ट आढळल्यास अथवा इतर काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे. संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
गुंडांकडून आव्हान
टोळके दहशत माजवण्यासाठी वाहनांना टार्गेट करीत आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री शहरात ठिकाठिकाणी नाकाबंदी असताना पोलिसांना आव्हान देत आलेल्या टोळक्याने वाकड आणि सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राडा घातला. सुमारे तासभर बिनधास्तपणे हा राडा सुरू होता. जागोजागी नाकाबंदी असल्याचे सांगितले जात असतानाही घटनेनंतर एकही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दरम्यान, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.