Mahavikas Aghadi sakal
पिंपरी-चिंचवड

PCMC Politics : उद्योगनगरीतील स्थिती! महाविकास आघाडी सक्रिय; ‘इंडिया’ दिसेना

औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत.

पीतांबर लोहार

पिंपरी - औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत. दैनंदिन व्यवहार सांभाळून कोणी सामाजिक कार्यात, तर कोणी धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. काहींनी विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून राजकारणात ठसा उमटवला आहे.

राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांचे कार्यकर्तेही मोर्चे, आंदोलने, सामाजिक कार्य करीत आहेत. मात्र, त्यांचे अस्तित्व नाममात्र दिसते. सध्या देशपातळीवर चर्चेत असलेल्या ‘एनडीए’चा मोठा प्रभाव शहरात आहे.

तुलनेने ‘इंडिया’ची ताकद कमी दिसत असली तरी प्रादेशिक पातळीवरील घटक असलेल्या ‘महाविकास आघाडी’तील पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे उद्योगनगरीत महाविकास आघाडी आहे, पण, ‘इंडिया’ प्रभावीपणे दिसत नाही, असे चित्र आहे.

सद्यःस्थितीत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए : नॅशनल डेव्हलपमेंट अलायन्स) आणि कॉंग्रेसप्रणित ‘इंडिया’ (आयएनडीआयए : इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्ल्युसिव्ह अलायन्स) असे राजकीय वातावरण आहे. दोन्ही आघाड्यांतील काही घटक पक्षांचे अस्तित्व शहरात आहे.

मात्र, काहींचे सक्रीयत्व कमी आहे. एनडीएमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), प्रहार जनशक्ती पक्ष आदींचा समावेश आहे. ‘इंडिया’मध्ये कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), रिपब्लिकन पक्ष (गवई गट), आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त), समाजवादी पक्ष आदींचा समावेश आहे.

सद्यःस्थिती...

एनडीएतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय हे पक्ष स्वतंत्र आणि एकत्रितपणेही कार्यक्रम घेत आहेत. त्यांना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पाठबळ आहे. शहरातील तीनही आमदार त्यांचे आहेत. यात भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे एक आमदार आहेत. एनडीएचेच सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत. कार्यकर्त्यांची संख्याही अधिक आहे.

‘इंडिया’च्या स्थापने पूर्वीपासून महाविकास आघाडी कार्यरत आहे. मात्र, त्यातील शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात फूट पडली आहे. दोघांची ताकद विभागली आहे. ‘एनडीए’ला टक्कर देण्यासाठी पुन्हा उभारी घेऊन अधिक जोर लावावा लागेल. सध्या शहरात त्यांचे आमदार नाहीत. शिवसेनेचे केवळ बोटावर मोजण्याइतके माजी नगरसेवक आहेत.

भविष्यात...

‘इंडिया’ला आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागेल. त्यांचे सहयोगी ‘महाविकास आघाडी’ला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. एकत्रित सभा, बैठकी घ्याव्या लागतील.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (धर्मनिरपेक्ष), वंचित बहुजन आघाडी, एमआयआम यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या विचारसरणीचा मोठा वर्ग शहरात आहे. त्यावरही राजकीय प्रभावक्षेत्र स्पष्ट होईल.

‘इंडिया’तील पदाधिकारी म्हणतात..

कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. ती दहा दिवस चालेल. कोपरा सभा घेतल्या जात आहेत. कालच्या यात्रेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सहभागी होणार आहेत. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी आयोजित ‘शहर बंद’मध्ये आम्ही सहभागी होणार आहेत.

- कैलास कदम, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे एकत्रितपणे काम सुरू आहे. ‘इंडिया’ आघाडीशी समन्वय ठेऊन काम करा, असे पक्षाने सांगितले आहे. कालच आमची एकत्र बैठक झाली. पक्ष नेतृत्वाकडून आलेल्या सूचनांनुसार शहरात काम सुरू आहे. बैठकी घेतल्या जात आहेत. शनिवारच्या ‘शहर बंद’मध्ये आम्ही सहभागी होणार आहोत.

- ॲड. सचिन भोसले, शहराध्यक्ष, शिवसेना (ठाकरे गट)

महाविकास आघाडी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) आणि कॉंग्रेस पक्षासोबत काम सुरू आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. सद्यस्थितीत ‘इंडिया’ आघाडीबाबत काहीही भूमिका नाही. त्यासंदर्भात शहर पातळीवर अद्याप बैठक झालेली नाही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करणार आहोत. ‘इंडिया’ म्हणून काही पक्षांशी संपर्क साधायचा आहे.

- माधव पाटील, प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट)

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील आमच्या पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पुण्यात ११ सप्टेंबर रोजी सभा आहे. देश व राज्य पातळीवरील मुद्द्यांसंदर्भात खासदार संजय सिंग मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक पातळीवरील नियोजनाबाबत अद्याप आदेश नाहीत. त्यांनी सांगितल्यास, त्यानुसार नियोजन करणार आहोत.

- चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष, आप

भाकपच्या माध्यमातून जनजागर यात्रा निघणार आहे. त्यात आम्ही सहभागी होणार आहोत. कोल्हापूर येथून यात्रेला प्रारंभ होईल. नागपूरला समारोप होईल. ‘भाजप हटाव, देश बचाव’ आंदोलन शहरात केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुण्यात बैठक होणार आहे. त्यात पुढील नियोजन ठरणार आहे.

- अनिल रोहम, जिल्हा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

प्रादेशिक पातळीवर १३ पक्षांची एकत्र आघाडी तयार होत आहे. १४ सप्टेंबर रोजी एकत्रित कार्यक्रम होणार आहे. त्यात महापालिकेसह शहरातील विधानसभा व लोकसभा मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीतील भूमिकेबाबत फॉर्म्युला ठरवला जाणार आहे. कॉंग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे.

- गणेश दराडे, शहराध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT