pmp bus sakal
पिंपरी-चिंचवड

PMP Bus : मेट्रो प्रवाशांच्या सेवेला ‘पीएमपी’ची धाव

पिंपरीसह नाशिक फाटा आणि दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी पीएमपी बससेवा सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी महापालिका भवनापासून (पीसीएमसी) पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक असेल वा कोथरूड, वनाजपर्यंतचा प्रवास मेट्रोमुळे सुखकर झाला आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) धाव घेतली आहे.

पिंपरीसह नाशिक फाटा आणि दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठीही पीएमपी बससेवा सुरू केली आहे. मात्र, त्याची वारंवारिता साधारण एक तासाने असल्याने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. किमान अर्ध्या तासाने बस सुविधा असावी, अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फुगेवाडी ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक या दोन स्थानकांपर्यंत मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते सिव्हिल कोर्ट आणि तेथून रूबी हॉल क्लिनिक किंवा वनाजपर्यंत जाणे सोईचे झाले आहे.

सकाळ व सायंकाळी गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी आणि अन्य वेळेस दर पंधरा मिनिटांनी मेट्रो धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. या मार्गाच्या पूर्व व पश्चिमेकडील भागातील गावांतील नागरिकांना मेट्रो स्थानकांपर्यंत येण्यासाठी सुविधा वाढवायला हव्यात. त्यामुळे मेट्रोची प्रवासी संख्या आणखी वाढेल.

शहरात पिंपरी (महापालिका भवन), संत तुकारामनगर (वल्लभनगर), भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी ही मेट्रो स्थानके शहरात आहेत. सध्या दररोज सरासरी ५० हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असल्याचे मेट्रोचे जनसंपर्क विभाग कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

पीएमपीअभावी रिक्षाने प्रवास

मी शिवाजीनगरहून मेट्रोने आलोय. मुलांनाही मेट्रो दाखवायची होती. आता पिंपरी कॅम्पातील वैष्णव देवी मंदिरात दर्शनासाठी जायचे आहे. मी खूप वर्षांपूर्वी गेलो होतो. आता बरेचसे बदलेले दिसतेय. त्यामुळे समजत नाही, कसे जायचे. सोबत पत्नी व मुलेही आहेत. त्यांनाही देवीचे दर्शन घ्यायचे आहे.

कॅम्पात काही खरेदी करायची आहे. तिथे जाण्यासाठी पीएमपी बस आहे का? रिक्षावाले भाडे किती घेतील?, असे प्रश्न आहेत, शिवाजीनगरहून आलेल्या अभिजित देसाई यांचे. मेट्रोने ते अवघ्या २५ मिनिटांत आले होते. पण, पिंपरी कॅम्पातील वैष्णव देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास पीएमपी बसची वाट पाहिली. अखेर, रिक्षाने प्रवास केला.

मेट्रोने पिंपरी- कोथरूड- पिंपरी असा प्रवास केला. तिकीट काढणे, प्रवेश प्रक्रिया, तिकीट स्कॅनर हे सर्व अनुभवताना एअरपोर्टला आल्यासारखे वाटले. स्वच्छताही जाणवली. गुटखा खाऊन मेट्रो फलाटाकडे जाणाऱ्या तरुणाला सुरक्षारक्षकाने हटकले. तोंड स्वच्छ करून आल्यानंतर सोडले, हे स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे. गाडीचे दार उघडणे व लावण्याची स्वयंचलित यंत्रणेतून खरी सुरक्षा जाणवली. उंचीवरून शहर पाहताना खूपच कुतूहल वाटले.

प्रवासी केंद्रस्थानी ठेवून केलेले नियोजन उत्तम वाटले. मेट्रोचे जाळे आणखी विणणे गरजेचे आहे. निगडीपर्यंत मार्ग वाढवून पुढे निगडी ते किवळे, मुकाई चौक मार्गे सहारा स्टेडियम गहुंजे आणि मुकाई चौक ते हिंजवडी मार्ग बनविल्यास उत्तम सार्वजनिक सुविधा निर्माण होईल व प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल.

- कुंडलिक आमले, किवळे

‘पीएमपी’चे वर्तुळ मार्ग

  • डांगे चौक- चिंचवडगाव- लिंक रस्ता- पिंपरी-चिंचवड महापालिका भवन मेट्रो स्थानक- डीलक्स चौक- काळेवाडी तापकीर चौक- थेरगाव गावठाण- डांगे चौक

  • दापोडी मेट्रो स्थानक- सीएमई गेट- शिवाजी महाराज पुतळा- वसंत दादा पुतळा सांगवी- पीडब्ल्यूडी मैदान- नवी सांगवी- काटे पूरम चौक- पिंपळे गुरव- रामकृष्ण मंगल कार्यालय- गणेशनगर दापोडी- सीएनजी पंप फुगेवाडी- दापोडी मेट्रो स्थानक

‘पीएमपी’चे सरळ मार्ग

  • महापालिका भवन मेट्रो स्थानक- शगून चौक- डीलक्स चौक- काळेवाडी- काळेवाडी फाटा

  • महापालिका भवन मेट्रो स्थानक- मोरवाडी- केएसबी चौक- थरमॅक्स चौक- संभाजीनगर- घरकुल

  • भोसरी (नाशिक फाटा) मेट्रो स्थानक - वायसीएम रुग्णालय- नेहरूनगर- गवळीमाथा- इंद्रायणीनगर

या मार्गांचीही अपेक्षा...

  • पिंपरी स्थानक- शगून चौक- पिंपरीगाव- पिंपळे सौदागर- रहाटणी- काळेवाडी फाटा- काळेवाडी- डीलक्स चौक- भाटनगर- पिंपरी स्थानक

  • पिंपरी स्थानक- नेहरूनगर- बालाजीनगर- गवळी माथा- यशवंतनगर- नेहरूनगर- अजमेरा कॉलनी- मासुळकर कॉलनी- मोरवाडी- पिंपरी स्थानक

  • संत तुकारामनगर- वल्लभनगर- वायसीएम- महेशनगर- नेहरूनगर- यशवंतनगर- जाधववाडी- चिखली

  • नाशिक फाटा- कासारवाडी- सुदर्शनगर- पिंपळे सौदागर- जगताप डेअरी- मानकर चौक- कस्पटे वस्ती- काळेवाडी फाटा- रहाटणी- पिंपळे सौदागर- नाशिक फाटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT