Wrong Side Driving sakal
पिंपरी-चिंचवड

Pune Nashik Highway : ‘राँग साइड’ तरीही सुसाट! पुणे-नाशिक महामार्गावरील स्थिती

पीतांबर लोहार

पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे विरुद्ध दिशेने (राँग साइड) भरधाव आलेल्या मोटारीची धडक बसून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २२) रात्री घडली. त्यातून वाहनचालक काहीच धडा घ्यायला तयार नसल्याचे महामार्गावर दिसून आले.

भोसरीतील शीतलबाग सोसायटीपासून मोशीतील इंद्रायणी नदीवरील पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्रासपणे विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक आढळून आले. त्यातील काही जण मोबाईलवर बोलत वाहन चालवत होते; तर काही जण ‘रॉँग साइड’ने असूनही सुसाट होते.

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. नाशिक फाटा ते चाकणपर्यंत एलिव्हेटेड मार्ग निर्मितीचे नियोजन आहे. या मार्गाच्या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कंपन्या, कार्यालये, दुकाने, व्यापारी संकुले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांची नेहमी ये-जा सुरू असते.

महामार्गाला दुभाजक असल्याने अनेक जण तो ओलांडून ये-जा करतात. वाहनचालकही छेद मार्गापर्यंत जाण्याऐवजी ‘राँग साइड’ने वाहने दामटतात. त्यामुळे, स्वतःसह इतरांचा जीवही धोक्यात घालतात. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. अपघातांना निमंत्रण मिळते.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होते. मात्र, ती केवळ मोठ्या चौकांपर्यंतच मर्यादित असते. अन्य छोटे चौक वा छेद मार्गाच्या ठिकाणी कोणीही नसते. त्यामुळे, ‘राँग साइड’ने सुसाट वाहने चालविली जातात. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

‘रॉँग साईड’ कारवाईतील अडथळे

  • कारवाई टाळण्यासाठी वाहन वेगात चालवून चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही

  • पुरेशा मनुष्यबळाअभावी पोलिसांकडून कारवाईवर मर्यादा येतात. केवळ मोठ्या चौकांमध्येच कारवाई होताना दिसते. मधल्या टप्प्यात नाही.

  • भारतीय दंड विधान कलम २७९ नुसार खटला दाखल होऊ शकतो, मात्र ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असल्याने कारवाईवर मर्यादा येतात.

  • गुन्हा दाखल करण्यासाठी चालकाला ताब्यात घेणे, साक्षीदारांसमक्ष पंचनामा करणे, रुग्णालयात वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया करावी लागते.

  • दोषी चालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची कारवाई करेपर्यंत संबंधित चौकात अथवा ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी होऊ शकते.

सद्यःस्थिती

1) नाशिक फाटा ते भोसरी शीतलबाग सोसायटीपर्यंत चारपदरी रस्ता आहे. दोन्ही बाजूस रुंदीकरणासाठी जागा असूनही झालेले नाही. एका बाजूस महापालिकेने मातीचा जॉगिंग ट्रॅक बनविला आहे. परंतु, त्याचा वापर होताना दिसत नाही. त्यावर गवत व झुडपे उगवली आहेत. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमाभिंतीच्या बाजूस राडारोडा टाकला जातो. काही ठिकाणी दाट झाडी आहे. त्यामुळे, मुख्य रस्त्यावरूनच रहदारी सुरू असते.

2) भोसरीतील शीतलबाग सोसायटीपासून धावडे वस्तीपर्यंत राजमाता जिजाऊ उड्डाणपूल आहे. त्यामुळे, मोशीकडे जाणाऱ्या वा पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची सोय झाली आहे. भोसरी गावठाण, आळंदी, दिघी भागात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी दोन्ही बाजूस सेवा रस्ता आहे. त्यावरील अतिक्रमणे, हातगाड्या, पथारीवाले, कडेला उभ्या वाहनांचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे, चांदणी चौक, पीएमटी चौक, दिघी रस्ता कॉर्नर भागांत वारंवार कोंडी होते.

3) धावडे वस्तीपासून मोशी येथील इंद्रायणी नदीवरील पुलापर्यंत रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी बांधकामे दोन वर्षांपूर्वी पाडली आहेत. अद्याप रुंदीकरण झालेले नाही. काहींनी पुन्हा अतिक्रमण केलेले आहे. इंद्रायणीनगरच्या बाजूने काही प्रमाणात सेवा रस्ता तयार आहे. मात्र, तो अरुंद असल्याने व त्यावरही अतिक्रमणे, वाहने उभी असल्याने रहदारीस अडथळा ठरत आहेत. अनेक ठिकाणी पावसामुळे चिखल होतो. डबकी साचतात, ती देखील रहदारीस धोकादायक ठरतात.

राँग साइड ड्राईव्हची ठिकाणे

नाशिककडे जाताना...

  • शीतलबाग सोसायटी ते चांदणी चौक सेवा रस्ता

  • भोसरी पीएमपी बसस्थानक ते धावडे वस्ती

  • पेठ क्रमांक चार कॉर्नर ते आरटीओ कॉर्नर

  • आरटीओ कॉर्नर ते कचरा डेपो कॉर्नर

  • मोशी बनकर वस्ती ते गावठाण चौक

  • भारतमाता चौक ते नवीन डीपी रस्ता कॉर्नर

  • नवीन डीपी रस्ता कॉर्नर ते मोशी टोलनाका

पुण्याकडे जाताना...

  • मोशी टोलनाका ते भारतमाता चौक

  • भारतमाता चौक ते मोशी गावठाण चौक

  • मोशी गावठाण चौक ते बनकर वस्ती

  • बनकर वस्ती ते उपबाजार चौक

  • कचरा डेपो कॉर्नर ते राजा शिवछत्रपती चौक

  • सद्‍गुरूनगर कॉर्नर ते चक्रपाणी वसाहत कॉर्नर

  • चांदणी चौक ते शीतलबाग सोसायटी सेवा रस्ता

‘रॉँग साइड’ने वाहन चालविणे भारतीय दंड विधान कलम २७९ नुसार गुन्हा ठरतो. त्याला एक हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे, सरकारने कायदा करून ‘ऑन दि स्पॉट’ कारवाईच्या वेळी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केल्यास किंवा ती रक्कम अधिक ठेवल्यास ‘रॉँग साइड’ प्रकारांना आळा बसू शकेल.

- भास्कर डेरे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

‘रॉँग साइड’ असा उल्लेख मोटार वाहन कायद्यात नाही. मात्र, सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक ठिकाणी ‘वन-वे’ किंवा एकेरी मार्ग केलेले असतात. त्यातून वाहन चालविणेच ‘रॉँग साइड’ म्हटले जाते. अशा वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते. पाचशे रुपये दंड व वाहनचालक परवाना रद्दची तरतूद आहे. स्वतःसह इतरांच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चलाख, Rishabh Pant! वर्ल्ड कप फायनलमध्ये लढवलेली शक्कल रोहित शर्माने सांगून टाकली Video

Youtube Shorts Update : आता तुम्हीही बनू शकता यूट्यूबर; शॉर्ट्समध्ये भन्नाट अपडेट; आता तब्बल 3 मिनिटांचे व्हिडिओ बनवता येणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना, पण हरमनप्रीत कौरची टीम आज हरली तर काय होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार

काँग्रेसकडेही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी झुंबड; पक्षनिरीक्षक १० ऑक्टोबरपर्यंत प्रदेश कमिटीकडे अहवाल देणार

Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan Awards: गट-तट विसरून, राजकारण न करता गावे आदर्श करा : डॉ. प्रवीण गेडाम

SCROLL FOR NEXT