- प्रदीप लोखंडे, हरिदास कड, गणेश फलके
पिंपरी - भोसरी ते चाकणदरम्यान रिक्षा चालवणे अवघड झाले आहे. स्टँडवर रिक्षा थांबविल्यापासून वादाला सुरवात होते, ते प्रवासी घेईपर्यंत वाद सुरूच असतो. त्यातच रिक्षा उभ्या करण्यासाठी संबंधित जागामालक पैशांची मागणी करतो. दिवसभर कमवायचे आणि दुसऱ्यांनाच हप्त्यापोटी द्यायचे, अशी खदखद भोसरी ते चाकण रस्त्यादरम्यान व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी व्यक्त केली.
रिक्षा व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत रिक्षा चालकांशी भोसरी ते चाकणपर्यंत दै. ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी प्रवास करून चर्चा केली. यावेळी रिक्षाचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील रिक्षा थांबा जवळून सकाळी साडे दहाला रिक्षा पकडली. या वेळी अनेक रिक्षा चालक प्रवासी मिळविण्यासाठी धडपड करत होते. प्रत्येक प्रवासी आपल्या रिक्षात यावा, यासाठी त्यांची चढाओढ सुरू होती. प्रवाशांनी रिक्षा भरल्यानंतर रिक्षा पुढे घेण्यासाठी दुसऱ्या चालकांची दमदाटी सुरू झाली. त्यामुळे पुणे- नाशिक महामार्गावरून मोशीच्या दिशेने आम्ही रवाना झालो.
प्रवासी मिळविण्यासाठी वाद का घालावा लागतो, असा प्रश्न विचारला असता, आमच्यासाठी हे नेहमीच असल्याचे चालकाने सांगितले. दररोज किती रुपये मिळतात, या प्रश्नावर सगळा खर्च भागून दीड ते दोन हजार मिळतात, असे त्याने सांगितले. मात्र, जागामालकाला पाच पन्नास रुपये द्यावे लागतात. तसेच काही गुंडप्रवृत्तीचे लोकदेखील पैशांची मागणी करतात.
कोणाचा वरदहस्त, कोणाची हप्तेगिरी
पुणे- नाशिक महामार्गावर तळेगाव, आंबेठाण, माणिक चौक, एमआयडीसी चौकात अगदी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. ‘दे हप्ता आणि चालव रिक्षा’ या तत्त्वावर पोलिस, काही राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या वरदहस्ताने रिक्षा चालतात, असाही आरोप नागरिकांचा आहे.
रिक्षावर बनावट क्रमांक
पुणे प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या नोंदी असलेल्या काही रिक्षा या भागात आहेत तर काही बनावट नोंदी असलेल्या मराठवाडा, विदर्भातील ही रिक्षा आहेत. काही रिक्षावर बनावट क्रमांक आहेत. काही रिक्षा चालकांकडे कागदपत्रेही नाहीत. परंतु पोलिस, राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे त्या रस्त्यावर धावतात.
हप्तेगिरीचा सुळसुळाट
हप्ता गोळा करण्याचे काम काही रिक्षा चालक, पोलिसांचे काही लोक करतात. काही संघटनांचे लोकही बळजबरी, दमदाटी करून हप्ता गोळा करतात. यामध्ये काही झिरो पोलिसही असतात. नाणेकरवाडी येथील काही तरुण दादागिरी करतात. रिक्षा लावायची असेल तर पाच हजार, दहा हजार रुपये डिपॉझिट द्या, असेही बोलतात.
हप्तेगिरीचा सुळसुळाट झाल्यामुळे रिक्षा चालकालाही ती चालवणे परवडत नाही. काही पोलिस, काही नेते, कार्यकर्ते यांच्याही अनेक रिक्षा आहेत. काहींनी रिक्षा भाड्याने लावून पैसा कमावण्याचा धंदा सुरू केला आहे.
कुरुळी परिसरात धोकादायक वाहतूक
चाकण वाहतूक विभाग आणि भोसरी वाहतूक विभाग यांच्या आशीर्वादाने रिक्षा मालक- चालक तीन आसनी परवाना असताना सहा प्रवासी बसवून त्यांचा जीव धोक्यात घालतात. पुणे-नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
आळंदी फाटा, स्पायसर फाटा, कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, मोई फाटा, चिंबळी फाटा, भारत माताचौक, मोशी या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीने या रिक्षा अचानकपणे उभे केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार कोणताही रिक्षाचालक नियमानुसार रिक्षा चालवत नसल्याची बाब यावेळी दिसून आली.
रिक्षाचालकांसमोरील समस्या...
प्रवासी मिळवण्यासाठी एकमेकांत स्पर्धा. त्यामधून वादविवाद.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पैशांसाठी दमदाटी
रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा मालकांकडून पैशांची मागणी
स्थानिक गुंडांसोबत भांडण नको म्हणून तक्रारी देण्यासाठी रिक्षा चालकांची नकारघंटा.
चाकणला चौका- चौकात
अवैध रिक्षांचा सुळसुळाट
पोलिस, गुंड यांच्याकडून हप्ते वसुली
बनावट क्रमांकामुळे खऱ्या रिक्षाचालकावर अन्याय
‘दे हप्ता आणि चालव रिक्षा’ तत्वाचा अंगीकार
कुरळी परिसरात वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने तीन आसन क्षमता असलेल्या रिक्षामध्ये पाच ते सात प्रवासी असतात. पोलिसांना आम्ही महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ते देतो, असे अनेक रिक्षाचालक उघडपणे सांगतात.
- हेमंत काळडोके, सामाजिक कार्यकर्ते, कुरुळी
चाकण ते भोसरी या मार्गावर खूप रिक्षा उपलब्ध आहेत. परंतु पिंपरी - चिंचवड परिवहन अधिकारी व चाकण वाहतूक विभाग रिक्षाचालकांना खूप त्रास देतात. हप्त्यासाठी आमची अडवणूक करतात.
- एक रिक्षाचालक
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आम्ही सातत्याने कारवाई करतो. काही रिक्षाचालकांना समज दिली जाते. बऱ्याच रिक्षा या परमीट संपलेल्या आहेत. तसेच बँकेचे कर्ज फेडले नाही म्हणून बँकेने ओढून नेलेल्या रिक्षा परत चालवण्यासाठी दिलेल्या आहेत. या रिक्षांवर बनावट नंबर टाकला जातो. कोण हप्ता घेतात, याबाबत आम्हाला काही माहिती नाही. प्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही अथवा रिक्षा जप्त केल्या जात नाहीत.
- वर्षाराणी पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण वाहतूक विभाग
भोसरी ते मोशी, भोसरी ते आळंदी, भोसरी ते चाकण आदी मार्गावर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांना अनेक अडचणी येत आहेत. रिक्षा उभ्या करण्यासाठी दररोज पन्नास, शंभर रुपये अशी मागणी होत आहे. संघटनेकडे त्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यानुसार आम्ही आंदोलन अथवा निवेदन देऊन कायदेशीर मार्ग काढत आहोत.
- बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी, रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस फेडरेशन
भोसरी-चाकण मार्ग
१५.४ किलोमीटर - ४० मिनिटांचा प्रवास
१५०० - एकूण रिक्षा
वार - शुक्रवार
सकाळी १०. ३० ते दुपारी ३ पाहणीची वेळ
मुख्य रिक्षा स्टँड
भोसरी, पीएमटी चौक
चाकण-तळेगाव चौक
५०० रुपये - पोलिसांना हप्ता
५००-१००० रुपये - स्थानिक गुंडांना हप्ता
५० ते १०० रुपये - जागामालकांना रोजचे पैसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.