लोणावळा पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
लोणावळा (ता. मावळ) : येथील प्रसिद्ध डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी (ता. १७) पहाटे सशस्त्र दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. दहा ते बारा दरोडेखोरांनी धारदार शस्त्राच्या धाकाने डॉ. खंडेलवाल (वय ७३) व त्यांच्या पत्नी विजया यांचे हातपाय बांधत ५० लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने, असा एकूण ६६ लाख ७७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लुटत पोबारा केला. लोणावळा पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. (robbery at doctor's house in lonavla)
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खंडेलवाल यांचा एक मुलगा सुरत येथे डॉक्टर व दुसरा अमेरिकेत अभियंता आहे. खंडेलवाल हे घरी दवाखानाही चालवितात. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून धारदार शस्त्रांसह घरात प्रवेश केला. खंडेलवाल व त्यांच्या पत्नी विजया यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत डोळ्यांवर पट्टी, हातपाय बांधत धमकावले. बेडरूममधील कपाटे उचकटत पन्नास लाख रुपयांची रोकड, सुमारे सतरा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण सुमारे ६७ लाखांचा ऐवज लंपास केला. बाल्कनीतून चादर बांधत चोरट्यांनी खाली उतरत पलायन केले. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, सहायक अधिक्षक नवनीत काँवत, निरीक्षक दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.
सर्व चोरटे पंचवीशीतील
सर्व चोरटे हे पंचवीशीतील तरुण, उंचपुरे व हिंदी बोलणारे असल्याची माहिती फिर्यादी डॉ. खंडेलवाल यांनी दिली. पद्धतशीरपणे रेकी करत हा दरोड्याचा प्रकार घडला असून चोरट्यांचे वर्णन, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केल्याची माहिती पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली.
परिसरात भीतीचे वातावरण
पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर दरोड्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त कमी झाली असून, चोरीच्या घटना वाढत आहेत. लोणावळा पोलिस ठाण्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडे गुरुवारी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.