siddhi women self help group sakal
पिंपरी-चिंचवड

Motivation News : आले, लसूण पॅकेजिंगच्या उद्योगामधून ‘सिद्धी’

सिद्धी महिला बचत गटातील सदस्या बनल्या उद्योजिका; हॉटेलांमध्ये पुरवठा

सकाळ वृत्तसेवा

- अश्र्विनी पवार

पिंपरी - नोकरदार महिला आणि हॉटेल व्यावसायिकांकडील मागणी लक्षात घेऊन चिंचवड येथील सिद्धी महिला बचत गटातील महिलांनी तयार आले-लसूण पेस्ट, सोललेला लसूण, लसूण पेस्ट याचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या वर्षभरातच शेकडो नोकरदार महिला त्यांच्या ग्राहक झाल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटदेखील या महिलांकडून उत्पादने विकत घेत आहेत.

स्वयंपाक मग तो घरातला असो अथवा हॉटेलमधला... लसूण सोलणे, आले-लसणाची पेस्ट करणे, आले साफ करणे याबाबी अत्यंत वेळखाऊ असतात. सध्या कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार महिलाही तयार आले-लसूण पेस्ट, सोललेले लसूण, आले विकत घेण्याकडे वळल्या आहेत. दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांकडूनही स्वयंपाकासाठी लागणाऱ्या या कच्च्या मालाची मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन सिद्धी महिला बचत गटातील सदस्यांनी त्यासंदर्भातील व्यवसायाला प्रारंभ केला.

हाताने पॅकेजिंगने काम सुरू

सिद्धी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली मिसाळ यांनी आपल्या एका ओळखीतल्या महिलेकडे लसूण सोलण्याचे मशीन पाहिले आणि त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मशीन विकत घेणे अतिशय आवश्‍यक होते. त्यामुळे, त्यांनी आपल्याकडील काही बचत व बचत गटातून कर्ज घेऊन दहा लाखांचे भांडवल उभारले. या व्यवसायासाठी सिद्धी एंटरप्राइजेस नावाने नवीन फर्मही सुरू केले.

मात्र, घरातील वीजजोडावर लसूण सोलण्याचे हे मशिन चालवणे शक्य नसल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. मग, थ्री-फेज मीटरचा जोड घेण्यासाठी ‘महावितरण’च्या कार्यालयात हेलपाटे घालणे सुरू झाले. पण, दुसरीकडे घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुरू झाले होते. व्यवसायासाठी घेतलेल्या दुकानाचे भाडेही सुरू झाले होते. मग, रूपाली यांनी गटातील इतर महिला सदस्यांच्या मदतीने हातानेच लसूण सोलून त्याचे पॅकेजिंग करून ते विकण्यास सुरवात केली.

उत्पादनांचे सॅम्पल वाटप

मशिनच्या साहाय्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांचे उत्पादन वाढले. रूपाली यांनी आपल्या बचत गटातीलच इतर महिलांना या व्यवसायात सहभागी करून घेतले. त्यासाठी सुरुवातीला हे मशिन कसे चालवायचे? याचेही ट्रेनिंग त्यांनी महिलांना दिले. मग, या महिलांनी आले लसूण पेस्ट, लसूण पेस्ट, स्वच्छ केलेले आले या उत्पादनांच्या विक्रीस सुरवात केली.

एवढ्यावर न थांबता या महिलांनी शहरातील लहान मोठ्या हॉटेल व्यावसायिकांकडे जाऊन आपल्या उत्पादनांचे सॅम्पल वाटले. हे सॅम्पल अनेकांच्या पसंतीस उतरल्यानंतर तिकडूनही त्यांची मागणी वाढली. सध्याच्या घडीला दिवसाला सरासरी २०० किलो तयार लसणाच्या त्यांच्याकडे ऑर्डर्स आहेत. हंगामानुसार किंवा भाज्यांचे दर वाढल्यावर त्याचे प्रमाण कमी जास्त होत असल्याचेही महिलांनी सांगितले.

महापालिकेकडून सन्मान

अनेक अडचणींचा सामना करून सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायात महिला आता स्थिरावल्या आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी व कष्ट लक्षात घेऊन या महिलांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीनेही गौरव करण्यात आला. नुकत्याच झालेल्या महिला दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात या बचत गटाला आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वर्षभरापासून आम्ही या व्यवसायात आहोत. अत्याधुनिक मशिनमुळे लसूण सोलण्याचे कष्ट कमी होतात. मात्र, त्याचे पॅकेजिंग करणे हे महत्त्वाचे असते. या सगळ्याचे ट्रेनिंग आम्ही घेतले. या उत्पादनांच्या ग्राहकांकडूनही ऑर्डर जशा येतात तसे काम चालू असते. त्यामुळे घर सांभाळून आम्ही हे काम करू शकतो.

- सोनाली लोकरे, सदस्या, सिद्धी महिला बचत गट, चिंचवड

मी गेल्या काही महिन्यांपासून रूपाली यांच्यासोबत काम करत आहे. ऑर्डरनुसार काम करत असल्याने व त्याचा मोबदला लगेचच मिळत असल्याने आम्हाला आर्थिक फायदा होतो. घराला आर्थिक हातभार लावल्याचेही समाधान मिळते.

- सुधा लोंढे, सदस्या, सिद्धी महिला बचत गट, चिंचवड

सुरुवातीला मला व्यवसायातील गणिते माहिती नव्हती. अगदी मशिन विकत घेणे, वीजजोड घेणे या गोष्टींसाठीही आम्हाला खूप अडचणी आल्या. आता हळू हळू व्यवसायाची घडी बसत आहे. त्याची दखल महापालिकेनेही घेतली.

- रूपाली मिसाळ, अध्यक्षा, सिद्धी महिला बचत गट ,चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT