पिंपरी : महापालिकेचे कर्मचारी व स्थायी सभापती यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. १८) लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले. त्यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल प्राप्त होताच, त्यांच्यावर सेवा निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत ‘त्या’ चार कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेतून निलंबित केले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. (PCMC news)
काय आहे प्रकरण
मंजूर वर्क ऑर्डर देण्यासाठी एका जाहिरात एजन्सी चालकाकडून एक लाख २८ हजार रुपयांची लाच घेताना स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहायक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना शिवाजीनगर विशेष न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
का केली कारवाई?
लाच स्वीकारणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५४ नुसार शिस्तभंग केल्यास किंवा इतर गैरवर्तन केल्यास त्यांचे निलंबन केले जाते. त्या नियमानुसार या चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवता लोकसेवक म्हणून स्वत:च्या पदाचा, अधिकाराचा दुरुपयोग, गैरवापर करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले. महापालिका कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या गैरवर्तनामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा भंग झाली. ४८ तासापेक्षा जास्त कालावधीकरिता ते अटकेत आहेत. त्यामुळे महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहायक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांना अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच बुधवार (ता. १८) सेवानिलंबित करण्यात आले. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.
ही केली कारवाई
या चौघांना निलंबन काळात पहिल्या तीन महिने कालावधीसाठी अर्धवेतनी रजा वेतनाइतका निर्वाहभत्ता मिळणार आहे.
तीन महिन्यानंतर मूळ पगाराच्या तीन चतुर्थांश अधिक अर्जित रकमेएवढी उपजीविका भत्ता मिळणार.
सेवानिलंबन काळात कोणत्याही ठिकाणी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही.
नोकरी, व्यवसाय केला नसल्याचा दाखला दरमहिन्याच्या देणे.
सेवानिलंबन काळात गैरवर्तन आढळल्यास पुन्हा शिस्तभंगाची कारवाई .
वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.