सुवर्णा गवारे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ : शहरात पार्किंगचा प्रश्न तीव्र बनला असून, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईसाठी ‘टोइंग व्हॅन’चा वापर होत आहे. मात्र, हा उपायच वाहनधारकांच्या डोकेदुखीचे कारण ठरू लागला आहे. वाहतूक पोलिसांचे नियमबाह्य कारवाईकडे दुर्लक्ष होत असून, केवळ ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्यात पोलिस आणि ‘टोइंग व्हॅन’चे कर्मचारी धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. हे कर्मचारी मुजोरगिरीने वागत असल्याचा अनुभवही वाहनचालकांना येत आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनधारकांना मनस्ताप होत असून, पोलिस व ‘टोइंग व्हॅन’धारक शिस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरत असल्याचे समोर आले आहे.
मुख्य चौकातील रस्ते ‘टार्गेट’
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर या भागातील मुख्य चौकातील रस्ते ‘टोइंग व्हॅन’ चालक व कर्मचाऱ्यांनी ‘टार्गेट’ केले आहेत. रस्ते खोदलेल्या ठिकाणी वाहने लावण्यास जागा नाही. त्या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. मात्र, सरसकट वाहने उचलली जात आहेत. त्यामुळे, नागरिक संताप व्यक्त करीत आहे. मुख्यत्वे दुचाकी वाहने उचलून वाहनांमध्ये टाकणे सोपे असल्याने वाहने भराभर उचलली जात आहेत.
वाहनांच्या नुकसानीला जबाबदार कोण
जास्तीत जास्त वाहने उचलणे एवढेच लक्ष्य असल्याने घाईत वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वाहनांचे आरसे तुटणे, गाडी घासून रंग उडणे, वाहने चेमटण्याचे प्रकार घडत आहेत. वाहनचालकांनी कारवाईचे छायाचित्र किंवा चित्रिकरण मागितल्यास त्यांना ते देण्यास टाळाटाळ केली जाते. जागेवर दंडाची पावती न देता वाहतूक शाखेत येण्यास सांगितले जाते. ऑनलाइन पैसे स्वीकारले जात नाहीत. रोख स्वरूपातच पैसे स्वीकारले जातात.
ही आहे वस्तुस्थिती
काही ‘टोइंग व्हॅन’च्या कर्मचाऱ्यांकडे गणवेश नाही. शर्टवर ‘ऑन पोलिस ड्यूटी फॉर टोइंग व्हॅन’ असा मजकूर व नेमप्लेटही लावलेली नाही. वाहनांवर केवळ उल्लेख आहे. त्यांच्याकडे ओळखपत्रदेखील नाही. फोटो काढून वाहनांवर टोइंग कारवाई केली जात आहे. दुसरीकडे, संबंधित वाहतूक पोलिसांनी ‘टोइंग व्हॅन’मधून खाली उतरणे आवश्यक असताना, ते वाहनात बसून राहतात. पूर्वकल्पना माईकवरुन देवून केवळ घोषणा काही ठिकाणी देतात. वाहन उचलल्यानंतर त्या ठिकाणी ठळकरित्या पोलिस ठाण्याचा पत्ता व मोबाईल नंबर दिसत नाही. ‘वाहतूक शाखेच्या कार्यालयात या,’ असे वाहनचालकांना सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र, असे वाहन जागेवर सोडण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
एवढा आहे दंड -
चारचाकी वाहनांसाठी ः ४७२ रुपये दंड
दुचाकी वाहनांसाठी ः २३६ रुपये दंड
महापालिका प्रशासनाने ‘पार्किंग’ची पुरेशी सुविधा उपलब्ध करून न देता नियम दाखवून वाहने टोइंग करणे हे अन्यायकारक आहे. वाहने उचलण्यात दाखवलेली तत्परता ही रहदारीमधील अडथळे दूर करणे, अतिक्रमण काढून पार्किंगसाठी जागा देण्यात दाखवावी. तरच, नक्कीच वाहतुकीला शिस्त लागेल. कधी कधी रस्ते खोदलेले असतात. अशा वेळी वाहने लावायची कुठे असा प्रश्न निर्माण होतो.
- धीरज मैलस्वार, वाकड
महापालिकेने योग्य प्रमाणात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली की समस्या संपेल. परंतु; इमारत परवाना देताना ‘पार्किंग’ बघितले जात नाही. लोक जागा दिसेल तिथे वाहने लावत आहेत. ‘टोइंग’ शुल्क ‘ऑफलाइन’ असल्यास फायदा कुणाचा आहे. हे सर्वांना समजते. काही वेळा मुले असतात सोबत. काही तातडीची कामे असतात. अशा वेळी पोलिसांमुळे नाहक त्रास होत आहे.
- आरती पिंगळे, पिंपळे सौदागर
वाहनांचे नुकसान झाल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. एखाद्या कामासाठी आल्यावर ते काम तातडीने व्हावे, यासाठी मुख्य चौकात वाहने लावून निघून जाणे चुकीचे आहे. ‘टोइंग’ शिवाय वाहनधारकांना शिस्त लागणार नाही. नागरिक ‘पार्किंग’चा कर भरत नाही. रस्त्यावर हक्क दाखवितात. यासाठी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.
- दीपक साळुंके, वाहतूक पोलिस निरीक्षक, पिंपरी चिंचवड
टोइंगसाठीचे मनुष्यबळ -
- टोइंग वाहने : ६
- चारचाकी क्रेन : १
- कर्मचारी उचलणारे : चार व एक पोलिस अंमलदार
फोटोः 41500
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.