आम्हां विठ्ठल एकचि देव
पंढरीचा देव भेटावा, यासाठी वारकरी जात नाही. ते देवालाच सोबत घेऊन जातात. चालताना अखंड स्मरण आणि भजन करतात. वारकरी विठुरायाच्या सावळ्या सगुण रूपाचा भुकेला असतो. कितीही व्यापक असलातरी तो सगुण साकार पाहिल्याशिवाय वारकऱ्याचे समाधान होत नाही.
- ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, मुंबई
पंढरीच्या वारीला भक्ती करण्यासाठी वारकरी जातो. प्रत्येक वर्षी ती वृद्धिंगत व्हावी, म्हणून तो दरवर्षी वारी करतो. ‘अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते.’ नदीचे पाणी येते आणि ओसरते. भक्ती कधीच ओसरत नाही. वारीत प्रत्येक क्षणी ती वाढतच राहते. देवावर गुणरहित, कामनारहित भक्ती वारकरी करीत असतो. प्रेम एकलंबनात्मक आहे. त्याला विकेंद्रीकरण चालत नाही. त्यामुळे ज्यामध्ये विकेंद्रीकरण असेल, तो वारकरी असू शकत नाही. देव नाही, असे कोणते ठिकाण आहे सांगा ना? ‘जाता दुरी इथेच आमचे पंढरपूर’, अशी म्हण आहे. पण वारकरी संतांच्या संगतीत देवाचे नाव घेऊन ‘त्या’ नावाची गोडी वाढावी, म्हणून जातो. घरात बसून एकटे भजन करण्यापेक्षा लाखो वारकऱ्यांच्या सहवासात भजन केलेले निराळे. घरी चित्त विचलित होते. वारीत ते होत नाही. दिंडीत चालताना टाळ गळ्यात घातला की बस्स. त्याचे अखंड भजन. दुसरे काही नाही. जागृती, स्वप्नी देवाचा ध्यास. चालताना ‘अरे माउली थांबली- थांबली- थांबली रे’, ‘अरे माउली निघाली, निघाली, निघाली रे’, असे संवाद ऐकायला मिळतात. म्हणजे नित्य संतांचा आणि संतांचाच ध्यास. वाढते प्रेम भोगण्यासाठी वारकरी वारीला जातो. वारीत शरीर थकते; पण मन तरुण होते. वारकऱ्यांच्या घरी गडगंज असते. पण ऊन, वाऱ्यात चालतो. तंबूत झोपतो. गैरसोयीत सोय मानण्यात वारकऱ्याला खरा आनंद मिळतो. वारी वारकऱ्याची आवड आहे. वारीला पुन्हा-पुन्हा जावे वाटते. पुन्हा-पुन्हा त्याचे दर्शन घ्यावे वाटते. दर्शन घेतले तरी पुन्हा-पुन्हा त्याच्याकडे मागे वळून पाहावेसे वाटते, असे त्याचे सावळे रूप आहे.
भाव, भक्ती, प्रेम कमी होत नाही. कमी होते ते प्रेमच असू शकत नाही. त्याचे माझ्यावर प्रेम आहे, की नाही, हे माहीत नाही. पण, माझे त्यांच्यावर प्रेम आहे. तो माझ्याकडे पाहतो की नाही हे माहीत नाही. पण मी त्याच्याकडे पाहतो, अशी वारकऱ्यांची भावना असते. भक्तीत आठवण, विसरणे हा शब्दच नसतो. जे कधी विसरले नाही ती भक्ती. भक्ती ही आस्था आहे. प्रेम आहे तिथे व्यथा आहे. पण जिथे प्रेमच नाही, तिथे व्यथाही नसते. वेगवेगळ्या दैवतांची पूजा माणसे करतात. वारकरी म्हणतात, ‘‘आम्हा विठ्ठल एकचि देव, येर अवघेची वाव’. वारकरी पांडुरंगाला देव म्हणून नव्हे, तर तो देवाचाही देव म्हणून बघतो. विठ्ठल कलियुगातील अवतार आहे. तो विठ्ठल माय-बाप, आई सर्वस्व मानतो.
वारकऱ्याचे नाते माउली-तुकारामांशी असते. माझ्या विठ्ठलासारखा दुसरा देव नाही, हे दुसऱ्या देवाला कमी लेखण्यासाठी नसते. तर त्या बोलण्यातून निष्ठा, निर्धार व्यक्त होतो. त्यात एकविधभक्ती आहे. सर्व ठिकाणी देव आहे, अशी व्यापकता अनेक जण मानतात. मात्र, या व्यापकतेला पंढरीच्या एका पांडुरंगाच्या चरणावर दर्शन घेऊन कृतार्थ होतो तो वारकरी.
या रे या रे लहान थोर।
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपली मूळ परंपरा सोडून सर्व समाज एकत्र करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. त्यांची परंपरा योग मार्गाची. ती आदिनाथापासून चालत आली होती. एका परंपरेतून दुसऱ्या परंपरेत नेणे इतके सोपे नाही. योगामध्ये ‘एक गुरू एक शिष्य’ ही परंपरा असते. एकाने एकालाच सांगायचे. तेथे एक शिष्य केला त्याचाच उद्धार होतो. परंतु संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपली परंपरा संपूर्ण बाजूला ठेवली. एवढी मोठी परंपरा सोडून संत ज्ञानदेवांनी आपल्यापर्यंत आलेले सार सर्वांना वाटण्याचे, त्यांच्यापर्यंत पोचण्याचे कार्य केले. पैसे असले म्हणजे दिले जातात, असे समजण्याचा गैरसमज कोणी करू नये. पैसे असले तरी ते देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. ज्ञान जरी असले तरी ते देण्याची प्रवृत्ती पाहिजे. ज्ञानाचा प्रचार करायचा असेल तर ते लोकांना सांगितले पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची आहे. ज्याला समाजाबद्दल काही वाटते, तोच काही तरी वाटत असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी योगमार्ग सोडून ज्ञान वाटण्यासाठी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला.
समाजाबद्दल कळकळ, प्रेम हे मुळात वाटावे लागते. ते वाटले तरच ते दुसऱ्याला वाटता येते. म्हणून ‘या रे या रे लहान थोर’ असे आवाहन केले. ही क्रांती संत ज्ञानोबारायांनी केली. तो काळ असा होता, पैसा देऊ पण ज्ञान नाही. ज्ञान देण्याला बंधने होती. पण ही प्रवृत्ती आणि बंधने झुगारून हे ज्ञान त्यांनी गणिकेपर्यंत पोचवले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेली ही फार मोठी क्रांती आहे. त्यांनी दिलेले ज्ञान सर्वसामान्यांना वाचता येऊ लागले. लहान मुलाशी बोलताना त्यांच्या भाषेत बोलावे लागते. तसे देवभाषा जरी संस्कृत असली तरी समाजाला कळेल अशा भाषेत करून संत ज्ञानोबारायांनी सर्वसामान्यांना ज्ञानाचे भंडार खुले करून दिले. त्यामुळेच आज लाखो भाविक वारीत सहभागी होत आहेत. हा अधिकार संत ज्ञानोबारायांनी दिला. त्यामुळे सध्याच्या काळात सर्वच समाजात वारकरी तयार झाले. महिलाही कीर्तन करू लागल्या. जरी वारकरी संप्रदायात काही गट महिलांना कीर्तनकार मानत नसले तरी काही मानणे न मानण्यावर काही नसते. संत कान्होपात्रेला संतांनी मान्य केले, मग तुमच्या आमच्या मतांना काय किंमत आहे. संतांनी त्या काळात महिलांना सन्मानाचे स्थान दिले आहे. इतकेच नाही तर संत कान्होपात्रेची समाधी श्री पांडुरंगाच्या मंदिरात आहे. ही फार मोठी क्रांती आहे. त्या संत मांदियाळीचा पाया ज्ञानोबाराया आहेत. म्हणून एवढी माणसे वारीत येतात. लग्नाला, तसेच कार्यक्रमाला पैसे देऊन येत नाहीत, असा सध्याचा काळ असताना न बोलविता स्वतःचे पैसे खर्च करून येतात. हे केवळ संत ज्ञानोबांवरील प्रेमामुळे येतात. संत ज्ञानोबारायांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. त्यामुळेच लाखो लोक वारीत संत ज्ञानोबारायांवरील प्रेमामुळे येतात. सागरात मीठ घातल्यानंतर जसे ते एकरूप होते, तसे या संप्रदायात आलेले सर्व त्यात एकरूप होतात. ही सामाजिक क्रांती कुठेच नाही. संत ज्ञानोबारायांनी दिलेल्या विचारांप्रमाणे वागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महिलांनी कीर्तन करू नये, असे काहीजण म्हणतात. पण संत ज्ञानोबारायांनी संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांना सातशे वर्षांपूर्वी संतपद दिले. सध्याच्या काळात कोणत्या क्षेत्रात महिला नाहीत. शोधून तरी सापडेल का असे क्षेत्र? त्यामुळे संप्रदायातही संत ज्ञानोबारायांनी महिलांना दिलेला अधिकार आता कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
ज्ञानोबाराय, नामदेवराव, एकनाथ महाराज, निळोबाराय या संतांनंतर सध्याचे सर्व वारकरी, फडकरी आहेत. म्हणजे संप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरूच आहे. आध्यात्मिक सत्तेचे विकेंद्रीकरण हाच वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. विकेंद्रीकरण म्हणजेच समाजवाद. सर्वांना अधिकार दिले. संत ज्ञानोबारायांनंतर संत नामदेव महाराज यांनी पंजाबपर्यंत संप्रदाय पोचविला. नाम हेच श्रेष्ठ आहे, हे समाजाला सांगितले. नामस्मरणाचा अधिकार सर्वांना दिला.
पंढरीच्या वारीची उपासना ही अगदी साधी आणि सोपी आहे. त्यातून मिळणारे आत्मिक समाधानाचे फळ जीवनाला तारून नेणारे असते. वारीत चालताना जो आनंद मिळतो, तो स्वर्गातील देवांनाही मिळत नाही. वारकऱ्यांची वाट प्रत्यक्ष पांडुरंग पाहत असतो. या वारीत वारकऱ्यांच्या कायिक, वाचिक, मानसिक अशा तिन्ही उपासना पूर्ण होतात. पंढरीच्या वारीत वारकरी परमानंद अनुभवतात. जो मनोभावे वारी करतो, त्या प्रत्येकाला परमानंद भरभरून मिळतो. त्याच आत्मिक आनंदाच्या ऊर्जेवर वारकरी पुढच्या वारीपर्यंतची वाटचाल करतात. म्हणूनच वारी हा परमोच्च आनंदाचा भक्तिप्रवाह आहे.
लाखो वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. नामस्मरण करीत भगवंताचे गुणगान गात पंढरीला पायी चालत जाऊन देवाला भेटण्यात मनाला वेगळाच आनंद असतो.
‘नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया । सुख देईल विसावा रे।।... या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याची पावले पंढरीत दाखल झाली. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच वारकऱ्यांची अवस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.