सुदृढ आरोग्यासाठी जागरूक व नियमित जिममध्ये जाणाऱ्या काही मित्रांचा व्हॉटसॲप ग्रुप झाला. सोशल मिडीयावरील अदान-प्रदानामुळे या व्हॉटसॲप ग्रुपचे ‘मॉर्निंग जॉगर’ ग्रुपमध्ये रूपांतर झाले आणि सुरु झाला सुदृढ आरोग्य संपन्नतेचा प्रवास. यातील बहुतेकजण नामांकित डॉक्टर आहेत. सर्वजण प्राधिकरण आणि आसपासच्या परिसरात राहतात. मागील बारा वर्षांपासून या ग्रुपच्या सहकाऱ्यांसोबत नरेंद्र आगरवाल कसून मेहनत घेत आहेत. रोज सकाळी साडे पाच वाजता उठून दोन तास स्वतः च्या शरीरासाठी देतात. वॉर्मअप करून जिम, सायकलिंग, रनिंग करतात. या सर्व ऍक्टिव्हिटी आलटून-पालटून केल्या जातात. कधीही ते व्यायाम चुकवत नाहीत. त्यामुळे, तरुण पिढीसाठी ते ‘फिटनेस आयकॉन’ ठरले आहेत.
आजची तरुण पिढी फिटनेसपासून दूर चालली आहे. रात्रभर मोबाईलवर राहणे, जंक फूड खाणे, शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष न देणे यामुळे आपली संस्कृती बदलत चालली असून लठ्ठपणाचा आजार उदभवत आहे. अमेरिकेसह अन्य राष्ट्रांना भेडसावणारी लठ्ठपणाची गंभीर समस्या आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, वेळीच सावध होणे गरजेचे असून दिवसातील केवळ दोन तास स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी देणे आवश्यक बनले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व ‘फिटनेस आयकॉन’ नरेंद्र अगरवाल यांनी स्वकृतीमधून तरुण पिढीसमोर त्याचा आदर्श उभा केला आहे.
बांधकाम क्षेत्रातील अत्यंत व्यस्त आणि ताण-तणावाच्या दैनंदिन जीवनाला त्यांनी व्यायामाच्या जोरावर अत्यंत प्रभावीपणे आल्हाददायक जीवनशैलीत बदललेले आहे. दररोज ताजेतवाने, प्रसन्न व तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी त्यांना तब्बल एक तप (बारा वर्षे) कठोर मेहनत घ्यावी लागली. सकाळी दोन तास व्यायामासाठी दिल्याने ते दोन तास ‘ट्रेस बस्टर’ म्हणून दिवसभरासाठी काम करतात. मन प्रफुल्लित राहते. संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभरातील थकवा, तणाव घालवण्यासाठी व्यायाम सर्वोत्तम उपाय असल्याचे ते सांगतात. मात्र, हे सर्व करताना त्यांना खूप सारे त्यागही करावे लागलेत.
मॉर्निंग जॉगर ग्रुपच्या माध्यमातून दररोजचा नित्य व्यायाम असतोच. त्याशिवाय भक्ती-शक्ती ते लोणावळा रिटर्न या १०० किमी सायक्लोथॉनमध्ये दरवर्षी आगरवाल यांच्यासह ग्रुपच्या इतर सदस्यांचा सहभाग असतो. वर्षभरात अनेक मॅरेथॉन यशस्वी केल्या जातात. पुणे, पिंपरी-चिंचवड, हैदराबाद, सातारा, गुजरात, मुंबई यासारख्या मोठ्या मॅरेथॉनमध्ये सातत्याने हे सर्वजण यशस्वी दौड लावतात. या ग्रुपमधील बऱ्याच सदस्यांनी ‘आयर्न मॅन’ची ही अत्यंत कठीण, खडतर व आव्हानात्मक अशी स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यामुळे, ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळविण्याच्या दृष्टीने आगरवाल हे कठोर मेहनत घेत आहेत. सायकलिंग आणि रनिंगमध्ये ते तरबेज झाले आहेत. आता फक्त जलतरणात थोडे मागे राहिले असून त्याचा कसून सराव सुरू आहे.
आहारावर कमालीचे नियंत्रण
नियमित व्यायाम करण्याबरोबर आहार नियंत्रण देखील तेवढ्याच कठोरपणे पाळले जाते. त्यांचा आहार खूप शिस्तबद्ध आहे. सकाळी दहाच्या सुमारास उकडलेली अंडी, सॅलेड आणि एक भाकरी खातात. संध्याकाळी सहा ते सातच्यामध्ये सॅलेड, तव्यावर भाजलेल्या फळभाज्या व ताकाचा समावेश असतो. याव्यतिरिक्त दुसरा आहारच नाही. बाहेरचे अन्न पदार्थ आणि जंक फूड त्यांनी वर्ज्य केले आहेत.
क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न
भविष्यात शहरातील सर्व नागरिकांसाठी पुणे क्लबच्या धर्तीवर सर्वात मोठे क्रीडा संकुल म्हणजचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे आगरवाल यांचे स्वप्न आहे. ज्या ठिकाणी आंतरखेळासह सर्वच खेळ आपापल्या आवडीप्रमाणे सर्वांना खेळता येतील, असे सर्वांसाठी खुले राहील, असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तंदुरुस्तीसाठी कायम दक्ष राहावे
आपण जितके आरोग्याला जपू, तितकेच आरोग्य आपल्याला जपते. आपण फिटनेसबाबत कायमच काळजीपूर्वक दक्ष राहिले पाहिजे. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माणसाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वतःकडे दुर्लक्ष करून कमविलेला
पैसानंतर उपचारांच्या भरमसाठ खर्चामध्ये मातीमोल होतो. अन शरीरही साथ देत नाही; पैसाही वाया जातो. त्यामुळे, तो व्यक्ती सर्वच बाजूने खचतो. ही वेळ येण्याआधी सावध होणे गरजेचे आहे.
वॉकिंग, सायकलिंग करण्याने फक्त शारीरिक व्यायामच नव्हे; तर मानसिक व्यायामही होतो. ताणतणाव निघून जातो. त्यामुळे, माझे मानसिक स्वास्थ्य छान राहते. मानसिक आरोग्यासाठी मी ध्यानधारणाही करतो. आजची मुले रात्रभर जागतात. मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात. सकाळी व्यायामाकडेही दुर्लक्ष करतात किंवा करत नाहीत. अशा सर्व तरुण पिढीला मी सांगेन की, सर्व काही करा. पण, दररोज सकाळी उठून स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी दोन तास द्या. परत येऊन झोपलेले चालेल; पण व्यायाम महत्त्वाचा.
- नरेंद्र आगरवाल, ‘फिटनेस आयकॉन’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.