Pimpri News: मावळ लोकसभा मतदार संघातून ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक म्हणजे ७४ हजार ७६५ मते केवळ चिंचवड विधानसभा मतदार संघातून मिळालेली आहेत.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचवडमधील मतदारांचा बारणे यांना कौल मिळाला. मात्र, २०१९ च्या तुलनेत चिंचवडला मतदान वाढूनही एकूणच मावळ लोकसभा मतदार संघातून मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले हे देखील अधोरेखित करावे लागेल.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघाची मतदारसंख्या २०१९ मध्ये पाच लाख होती. यामध्ये तब्बल ९५ हजार मतदारांची भर पडल्याने ही संख्या ५ लाख ९५ हजारांवर पोचली.
मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारीही घसरली होती. २०१९ च्या तुलनेत चार टक्क्यांनी मतदान घटल्याने या घसरलेल्या मतदानाचा फायदा बारणे यांना होणार की वाघेरे आघाडी घेणार याचीही चर्चा यावेळी रंगली होती. मात्र, चिंचवड येथे बारणे स्थानिक असल्याचा तसेच भाजपच्या मतदारांची संख्या जास्त असल्याचा फायदा श्रीरंग बारणे यांना झाला.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा भाजपला मिळावा, अशी भाजपमधील नेत्यांची इच्छा होती. मात्र श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती. याचा परिणाम प्रचारावरही झाल्याची चर्चा रंगली होती. चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व बारणे यांच्यातील पूर्वीचा संघर्ष पाहता जगताप यांचे समर्थक बारणे यांचा प्रचार करणार नाहीत, असाही अंदाज बांधला जात होता. या दरम्यान बारणे यांच्या विरोधात नवी सांगवी, पिंपळे गुरव भागात फ्लेक्सबाजीही झालेली दिसली.
मात्र, भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळत बारणे यांचा प्रचार केला व त्यामुळे सर्व अंदाज खोटे ठरत बारणे यांना चिंचवडमधून मोठी आघाडी घेतली. तुलेनेने राष्ट्रवादीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले संजोग वाघेरे यांचा या मतदार संघात प्रचार कमी पडल्याचेही त्याच्या अपयशामागील कारण असल्याचे बोलले जात आहे.
भाजपची पूर्ण साथ
चिंचवड विधानसभा मतदार संघातील बहुतांश मतदार हा नोकरदार वर्ग आहे. राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरी व व्यवसायानिमित्त ते आलेले आहेत. यामध्ये आयटी कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या मतदारांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे अगदीच नवीन चेहरा होते.
बारणे यांनी पहिल्यापासूनच आपला प्रचाराचा फोकस घाटाखालच्या मावळ, उरण, कर्जत, पनवेल या भागांकडे ठेवला. चिंचवड विधानसभा मतदारांपर्यंत पोचण्यास दोन्हीही उमेदवार कमी पडले होते. मात्र, त्याचा परिणाम मतांवर झालेला दिसला नाही. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपच्या मतदारांनी पूर्ण साथ दिली.
चिंचवडला ‘राष्ट्रवादी’चीही ताकद
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार यांना मानणारा वर्गही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होता. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतदान झाले. एकत्रित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना सुमारे ९९ हजार ४३५ मतदान होते. तर; अपक्ष राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मतदान होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपवादात्मक माजी नगरसेवक वगळता नाना काटे आदी बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बारणे यांचे काम केले. तर; राहुल कलाटे यांनी संजोग वाघेरे यांना मदत केल्याची चर्चा आहे. बारणे यांना चिंचवडमध्ये १ लाख ८६ हजार २३५ मते मिळाली. पोटनिवडणुकीतील अश्विनी जगताप व नाना काटे यांच्या मतांची बेरीज केली तर; ती २ लाख ३५ हजार ३८ होते. त्यामुळे बारणे यांना अपेक्षेपेक्षा कमीच मतदान झाले असेच म्हणावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.