पिंपरी : कुठल्यातरी घरात साप घुसला, परिसरात दुर्मिळ जातीचा साप दिसला अशी वार्ता कळली की, त्याला पकडण्यासाठी धाव घ्यायची. नंतर उगीचच थरार निर्माण करत साप पकडतानाचे चित्रीकरण करायचे. मग स्वतः जवळ साप घेऊन फोटाशूट करायचे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो व्हायरल करायचे, असे विचित्र प्रकार स्वयंघोषित सर्पमित्रांकडून वाढले आहेत. यामुळे सापाविषयीची चुकीची माहिती नागरिकांमध्ये पसरत आहेच, शिवाय आपणही असा स्टंट करूया अशी भावना युवा वर्गात रुजत आहे. यातून एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशी भीती वन्यजीव अभ्यासकांना वाटत आहे.
कोणताही सर्पमित्र प्राण्यांना हाताळू शकत नाही असे, निर्देश वनविभागचे आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील तथाकथित सर्पमित्रांना प्रशिक्षणाची गरज आहे. यासाठी मार्गदर्शक नियमावलीचे पालन अत्यावश्यक आहे. प्राण्यांना हाताळणी करताना नेमकी कशी काळजी घ्यावी? सापांचे वर्तन व त्यांच्या शरिरात होणारे बदल अभ्यासता यायला हवे. नवीन जातीचे साप चटकन ओळखता यायला हवेत. साप पाहून नागरिकांची गर्दी झाल्यास भीती न बाळगता काय करायला हवे? याविषयी जनजागृती समाजात नाही. लहान मुलांना देखील साप व नाग हाताळण्यासाठी बरेचदा प्रवृत्त केले जात आहे. केवळ फोटोसाठी लहान मुलांच्या हातात किंवा गळ्यात साप अडकविले जात आहेत.
सर्पमित्रांचे इन्स्टाग्राम व फेसबुकवर चुकीच्या पद्धतीने फोटो अपलोड होत आहेत. काहींनी यामध्ये गाणी टाकून व्हिडिओ तयार केले आहेत. बऱ्याच युवतींचा देखील यामध्ये समावेश आहे. बरेचजण गळ्यात साप टाकून कसाही फिरवतात. त्यामुळे तो अधिकच घाबरतो याची जाणीव त्यांना नसते. तसेच विषारी सापाचा दंश होवू शकतो याचे भानही त्यांना उरत नाही. यामुळे साप आक्रमक होऊन चावा घेण्याची शक्यता वाढते. बरेच जण लाइक व कंमेंटसच्या हव्यासापोटी असे करीत आहेत.
काय आहे आवश्यक -
सापांना पकडण्यासाठी काठी, गम शूज, चामडी शूज, स्नेक टाँग, हॅंडग्लोव्हज, बॅग, बॉक्स चा योग्य पद्धतीने वापर होणे आवश्यक आहे.
पकडले जाणारे साप-
विषारी - मण्यार, फुरसे, घोणस, नाग
बिनविषारी- अजगर, धामण, गवत्या, तस्कर, नानेटी, पुकरी, पानदिवड, कवड्या
महाड, रायगड येथे वन विभाग आणि वन्यजीव अभ्यास संघटना (OWLS) द्वारे परिषद आणि कार्यशाळेचे आयोजन केले होते. साप बचाव नियमन, साप बचावकर्ते आणि वन विभाग यांच्यामध्ये नेटवर्क तयार करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी करण्यात आली होती. ती पुढीलप्रमाणे...
साप शो दाखविणे व त्यांना प्रतिबंधित ठेवणे गुन्हा आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०१७ मध्ये सर्वाधिक सर्पदंशाची आपत्कालीन २४,४३७ सर्पदंश प्रकरणे नोंदली गेली आहेत. जे भारतभरातील १.१४ लाख प्रकरणांपैकी २१ टक्के आहेत.
साप हाताळण्याचे प्रशिक्षण आणि वैज्ञानिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
स्वयंसेवकांनी इतर गोष्टींबरोबरच पकडलेल्या सर्व सर्पांची माहिती जमा करणे आवश्यक आहे.
सापांचा बचाव करण्यापूर्वी वनविभागाला कळविणे गरजेचे आहे.
एसओपी राज्याला पाठवण्यात आला आहे. परंतु, सरकारचा ठराव अपेक्षित आहे.
साप पकडला तर द्या पैसे
साप पकडतो पण पेट्रोलसह जायचा व यायचा खर्च द्यावा लागेल. असा चुकीचा मोबदला सर्पमित्रांकडून मागितला जात आहे. ३०० ते १५०० रुपये मागितले जात आहेत. पेट्रोलच्या खर्चापोटी काही नागरिक स्वखुशीने मदत करतात. ते मानधन म्हणून घेता येते. परंतु, पैसे द्या नाहीतर, साप पुन्हा तुमच्या परिसरात सोडतो अशा धमक्याही दिल्या जात आहेत.
"शहरातील जैववैविध्य जपणे गरजेचे आहे. सापांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. वारुळे लुप्त होत चालली आहेत. साप पकडताना निरीक्षण करून पकडणे गरजेचे आहे. अशा वेळी सर्पमित्रांकडे स्वत:चे साहित्य असायला हवे. सध्या सर्पमित्रांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, हे मान्य आहे. परंतु, यांना प्रशिक्षणाची गरज आहे. हजारो सर्प शिष्य आणि गुरू यामध्ये येत आहेत. साप कमी आणि सर्पमित्र जास्त असे झाले आहे. यावर नियंत्रण असायला हवे."
- अभिजित पाटील, वन्यजीव अभ्यासक, रावेत
"मानवी वस्तीपासून बचाव करून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी विविध संघटना व सर्पमित्र काम करीत आहेत. वनविभागाला यामुळे मोलाची मदत हेाते. सापाला इजा होवू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. १९७२ वन्यजीव कायद्यानुसार या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होवू शकते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी वन्यविभागाकडे तक्रारी केल्यास स्टंटबाजी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई होते."
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.