- बेलाजी पात्रे
वाकड - भाषा केवळ अरबी, सर्वत्र डोंगराळ आणि वाळवंटी प्रदेश, प्रखर उष्ण वातावरण अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या कष्टाने मुस्लिम बांधव खडतर हज यात्रा करतात. ह्या भर वाळवंटात जणू मृगजळ दिसावा तसाच काहिसा एक तरुण यात्रींच्या प्रत्येक समस्येत धावून जात आहे.
भारतीय हज यात्रेकरुंची सौदीत खिदमद (सेवा) करणारा हा मृगजळ म्हणजे खादिमुल हुज्जाज (सेवेकरी), पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील हवालदार मोहम्मदगौस नदाफ होय. शहरातून केवळ नदाफ यांना खिदमद करण्याची संधी मिळाली. त्यांनी 'अल्लाहला' समर्पित होऊन आपल्या सर्वोत्तम सेवेद्वारे सेवा आणि पुण्य करणारा महाराष्ट्र पोलीस अशी खास ओळख निर्माण करून साता समुद्रापार शहर पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत (युनिट चार) कार्यरत असणारे नदाफ हे गेल्या ३४ दिवसांपासून मक्कामध्ये भारतीय भावीकांची खिदमद करत आहेत. त्यांच्या नि:स्वार्थी सेववर प्रभावित होऊन सांगलीतील मुन्नाभाई पटेकरी ह्या साप्ताहिकाच्या पत्रकाराने थेट हजमधून लिहिलेला एक लेख सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सौदी सरकार, भारत सरकार आणि हज कमिटी यांच्यातील दुवा म्हणजे मुअल्लीम आणि खादिमुल हुज्जाज होय. परदेशात राहून कमी वेळेत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हुज्जाज तत्पर असतात. सब दुनियादारी छोडके सिर्फ अल्लाह की राहपर मेहनत करना म्हणजेच हज यात्रा करणे होय.
हजला भारतातून दरवर्षी दीड लाखांहून अधिक भाविक जातात. त्यांची सेवा-मदत करण्यासाठी भारतीय हज कमिटी विविध शासकीय विभागातील दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांची निवड करते. यंदा महाराष्ट्रातील ३५ सेवेकऱ्यांपैकी दोन पुण्यातील तर पिंपरी-चिंचवडमधून एकमेव नदाफ यांची निवड झाली आहे.
नदाफ यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्व हज यात्रेकरुंच्या विविध समस्या सोडविण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. उदा- कोणाची बॅग हरवली, कोणी रस्ता चुकला, रुग्णाला औषधोपचार, गरजवंतास स्वखर्चाने टॅक्सी करणे, जेवू घालणे. अकाली मृत्यू होणाऱ्यावर सर्व सोपस्कार करणे, कागदोपत्री अडचणी सोडविणे, पैसे हरविल्यास सौदी सरकारची मदत मिळवून देणे, हरवलेला व्यक्ती शोधणे या सेवांमुळे त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
आमच्या सोबतच्या सांगलीतील निवृत्त शिक्षिका मरहुम शहेनाज बेगम यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे शव काही केल्या सापडत नव्हते. ते शोधण्यापासून दफन विधीपर्यंत व मृत्यू दाखला इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी खादिमुल हूज्जाज मोहम्मदगौस नदाफ व मक्कात स्थायिक झालेले मिरजेचे सुपुत्र इरफान शेख यांनी प्रचंड मेहनत घेतली. ते सर्वांसाठी अगदी देवदूतासारखे धावतात अडचण कुठलीही असो केवळ एकच नाव सर्वांच्या मुखात येते. सर्व हाजींमधून त्यांचे कौतुक होत आहे.
- हाजी मुन्नाभाई पटेकरी, हज यात्रेकरू (मक्का-मदिना)
यंदा हज यात्रा इस्लामिक जिल-हज महिन्यात म्हणजेच २४ ते २८ जून दरम्यान झाली. यावेळी जगभरातील तब्बल ६० ते ७० लाख भाविक मक्का शहरात दाखल झाले होते. जिल-हजची ८ ते १२ तारीखेचे पाच दिवस इस्लाम धर्मात अतिशय पवित्र व महत्वाची असतात त्यास आरकान म्हणतात. ते पाच दिवस व त्याची महती खालील प्रमाणे
८ : मक्काहून भाविक मीनाकडे रवाना होतात
९ : मीनातून अराफत मैदानात सर्वजण जमतात. या ठिकाणी जाणे अत्यंत अनिवार्य आहे. मुस्लिम बांधव आपल्या चुकांचे प्रायश्चित या मैदानात अल्लाहच्या प्रार्थनेने करतात. एखादा भाविक आजारी किंवा येथे येण्यास असमर्थ असला तर सौदी सरकार हेलिकॉप्टर, रुग्णवाहिकेद्वारे त्याला येथे पोहचवते.
९ : ला रात्री मुजदल्फा येथे मुक्काम
१० : सकाळी फजेरचा नमाज अदा करून शेंगदाण्याच्या आकाराएवढे ७० ते ८० दगडे (कंकर) गोळा करून पुन्हा मीनाकडे परत येतात.
१० : बकरी ईदनिमित्त कुर्बानी झाली.
१०, ११, १२, १३ : चार दिवस मीनातील जमरातला (शैतान) कंकर मारण्याचा विधी पूर्ण केला जातो. हे कंकर मारल्याने मनातील शैतानरुपी वाईट प्रवृत्तींचा वीनाश होतो अशी भावना यामागे आहे. मक्कातील ही सर्व स्थळे १५-२० किमीच्या अंतरावर असतात. येथे ३०-३२ दिवसांच्या मुक्कामानंतर आठ दिवसांसाठी भाविक मदिनाकडे जातात. येथे प्रेषित महुंमद पैगंबर यांची समाधी आहे. येथील रियाजुल-जन्ना (स्वर्गातील जमिनीचा तुकडा), प्रेषित महुंमद पैगंबर यांची तत्कालीन युद्धस्थळे, त्यांंनी भेटी दिलेली स्थळे, विविध जन्मस्थळे, प्रवचनांची स्थळे, प्रार्थना स्थळे इत्यादी स्थळांना भेटी देणे, नमाज पठण, कुराण पठण, प्रार्थना इत्यादी करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.