पिंपरी - मावळातील पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. सध्या उन्हाचा तडाखा आणि लांबलेल्या पावसामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी होत आहे. सोमवारपर्यंत (ता. १९) केवळ १९.४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, तो जुलैअखेरपर्यंत अर्थात अवघा ४० दिवस पुरेल इतकाच आहे. आणखी आठ दिवस पाऊस लांबल्यास पाणी कपातीचे संकट शहरावर ओढवू शकते, अशी स्थिती आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून प्रतिदिन ५१० दशलक्ष लिटर पाण्याचा विसर्ग वीजनिर्मिती केंद्रातून केला जातो. तेथून नदी पात्रात पाणी येते. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा केला जातो. भूमिगत वाहिन्यांद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते आणि तेथून शहराच्या वेगवेगळ्या भागात वितरित केले जाते.
शिवाय, गेल्या दोन महिन्यांपासून आंद्रा धरणातून प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे. ते निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून पंपिंग केले जाते आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रायोगिक स्वरूपात पुरवले जात आहे. शिवाय, एमआयडीसीकडून ३० दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे. मात्र, २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यासाठी शहराची विभागणी केली असून, सर्व पाणी संपूर्ण शहरात प्रतिदिन देण्याऐवजी निम्म्या भागात पुरवले जात आहे. त्यामुळे कमी दाबाने, अपुरे व अनियमित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. सद्यःस्थितीत उन्हामुळे पवना धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि लांबलेला पावसाळा यामुळे पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, शहरासाठी ही चिंतेची बाब आहे.
पुढील काळात चांगला पाऊस होऊन धरणातील पाणीसाठा वाढेल, अशी अपेक्षा आहे. पण, आणखी आठ दिवस पाऊस लांबल्यास पाण्याचे नियोजन महापालिका व जलसंपदा विभागालाही करावे लागणार आहे.
असे आहे गणित
१९ दिवसांत ४.१७ टक्के घट - पवना धरणात एक जून रोजी २३.६२ टक्के पाणीसाठा होता. तो १९ जून रोजी १९.४५ टक्के राहिला आहे. म्हणजेच गेल्या १९ दिवसांत तब्बल ४.१७ टक्के पाणी कमी झाले आहे.
२० दिवसच मिळेल पाणी - शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत अर्थात पुढील ४० दिवसांचा विचार केल्यास पवना धरणातील पाणी केवळ २० दिवसच मिळेल अशी स्थिती आहे.
पवना धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १.६५ घनमीटर आहे. गेल्या वर्षी १९ जून रोजी १.८० घनमीटर पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. मात्र, पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणी कपातीबाबतचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे.
- समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण, जलसंपदा
दृष्टिक्षेपात पवना धरण १९ जूनचा पाणीसाठा
वर्ष घनमीटर टक्के
२०२२ १.८० २१.२३
२०२३ १.६५ १९.४५ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.