पिंपरी : ''कार्यक्षम अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त का केले?’ असे फ्लेक्स शहरात लागले आणि २४ तासात उतरविले गेले. आज दिवसभर चर्चेचा हा विषय. महापालिकेत अनेकांना नकोसे झालेले आणि काही वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आलेले पवार फ्लेक्समुळे पुन्हा चर्चेत आले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गेल्याच आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केले असल्याने फ्लेक्स कोणी आणि का लावले?'' या विषयी चर्चा रंगली आहे. अतिरिक्त आयुक्त (दोन) पदाचा पदभार पवार यांच्याकडे दिला होता. नियुक्ती होताच पवार यांनी कामाचा धडाका लावला होता. कोविड १९ च्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग आणि आरोग्य या सततच्या दोन वादग्रस्त विभागांची जबाबदारी सोपविली होती. त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम केले.
तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा व जल:निस्सारण, पर्यावरण विभाग, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, असे महत्त्वाचे विभाग सोपविले होते. परंतु, या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्याकडील खर्चाच्या निर्णयामुळे ते लोकप्रतिनिधींच्या टीकेची धनी झाले. स्पर्श हॉस्पिटलच्या वादग्रस्त बिलांच्या प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा शिक्का लागला. तसेच, काही नगरसेवकांच्या चुकीच्या निर्णयाला हस्तक्षेप केल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी महासभेत निशाना साधला. अखेर सर्वसाधारण सभेत चुकीच्या कामाचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यास लोकप्रतिनिधींनी आयुक्तांवर दबाव वाढविला होता. त्यामुळे आयुक्त पाटील यांनी तातडीने त्यांना कार्यमुक्त केले, अशी चर्चा पालिकेत वारंवार केली जाते.
या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरा जुना मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड स्टेशन, मोरवाडी चौक, डॉ. आंबेडकर चौक अशा काही मोक्याच्या ठिकाणी पवार यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लागले. ‘महापालिकेचे तत्कालीन सक्षम अधिकारी पवार यांना कार्यमुक्त का केले?’ असा प्रश्न उपस्थित करून त्याखाली ‘परिवार आणि पिंपरी-चिंचवडकर असे लिहिले होते. ही वार्ता समजतात सर्वत्र चर्चा सुरू झाली. अनेकांनी फ्लेक्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर मंगळवारी रात्री फ्लेक्स काढण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.