Prasad Oak: मराठी सिनेइंडस्ट्रीमधील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक असलेला प्रसाद ओकची आघाडीचा कलाकार म्हणून ओळख आहे. प्रसादने स्वतःच्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
नुकतंच एका मुलाखतीत प्रसादने त्याची भावनिक आठवण शेअर केली. तो प्रसंग त्याच्या आयुष्यातील सगळ्यात अवघड प्रसंग होता असं म्हणाला.
प्रसादने नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या आयुष्यातील अवघड प्रसंगाविषयी विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना प्रसाद म्हणाला,"कोविडचा काळ खूप भयंकर होता. थोडी त्याची झळ कमी झाल्यावर सरकारने बायो-बबलमध्ये काम करण्याची परवानगी दिली. त्यामुळे हास्यजत्रेमध्ये काम करणाऱ्या आम्हाला मुंबईबाहेर जाऊन शूट करायचं होतं. एक संपूर्ण युनिट तिथे राहणार होतं त्यामुळे आम्ही दमणला गेलो. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हास्यजत्रेचा सेट लावण्यात आला होता."
पुढे प्रसाद म्हणाला, "आम्ही ३० तारखेला पोहोचलो आणि १ तारखेला सकाळी शूट सुरु होणार होतो. सकाळी ९ वाजता मी उठलो आणि आवरत होतो. काही वेळाने माझा फोन मी पहिला तर माझ्या बायकोचे जवळपास ८-१० मिस्डकॉल्स मला आले होते. मी तिला फोन केला तेव्हा तिने मला माझे बाबा वारल्याची बातमी दिली. मी मूळचा पुण्याचा असल्याने माझ्या मित्रांच्या मदतीने मी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं, माझे वडील आहेत. तर आपण काय करू शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती भयंकर वाईट आहे. अर्धा तास, पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला फोन करताय, विनंती करताय म्हणून १५ मिनिट किंवा अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो .मला दमणवरून पुण्याला पोहोचायलाच ३ ते ६ तास लागले असते त्यामुळे तो पर्याय रद्द केला. मी त्यांना म्हंटलं कि, तुम्ही माझ्या भावाला मला व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी देऊन माझ्या वडिलांना दाखवू शकता का? तर ते म्हणाले नाही साहेब. इथे मोबाइल आणण्याची परवानगी नाहीये. तुमचे भाऊ मोबाइल बाहेर ठेऊन आलेत. त्यामुळे तेही शक्य नाही. मी म्हटलं, तुमच्याकडे असेल, तुमच्या फोनवरून व्हिडीओ कॉल लावता का? ते म्हणाले, मला परवानगी नाहीये. मी नाही करू शकत. त्यामुळे मी माझ्या वडिलांना शेवटचं पाहूच शकलो नाही. जेव्हा माझा भाऊ माझ्या वडिलांना अग्नी देत होता तेव्हा मी हास्यजत्रेच्या सेटवर परीक्षकाच्या खुर्चीत बसून स्किट पाहत होतो. " हा अवघड प्रसंग सांगताना प्रसाद भावूक झाला.
प्रसादचे लवकरच धर्मवीर २, महापरिनिर्वाण, जिलेबी यांसारखे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मवीर २ मध्ये प्रसाद पुन्हा एकदा दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.