शब्दांकन : मयूरी महेंद्र गावडे
पॅनोरमा आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित या चित्रपटात मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. याच निमित्ताने भूषणशी केलेली खास बातचीत...
हा एक कोकणातील ‘गौरी गणपती’ सणावर आधारित चित्रपट आहे. पुणे-मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो, पण कोकणात गौरी गणपती असतात. पुण्यात मानाचे गणपती असतात, तर कोकणात लोकांना मान दिला जातो. आज पूजन हे घर करेल, आरतीचा मान अमुक व्यक्तीला, अशी एक खूप जुनी परंपरा आहे. संस्कृती आहे. गणपतीनिमित्त आपण आपल्या घरी जातो, जिथे आपलं मोठं कुटुंब असतं. अशीच कथा आहे घरत कुटुंबाची. जिथे घरातली सगळी माणसं एकत्र येतात. त्यातूनच त्यांची नाती उलगडत जातात. त्यांच्यात असणारे प्रॉब्लेम्स पुढे येत जातात. म्हणजे यामध्ये तुम्हाला गौरी गणपती संस्कृती आणि सध्याच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धती, त्यामध्ये असणारे वाद आणि त्यापलीकडे जाऊन त्यांचे नातेसंबंध याची एक अनुभूती मिळणार आहे.
घरत कुटुंबाचा लाडोबा म्हणजे त्यांचा मुलगा केतन घरत जे पात्र मी साकारत आहे, त्याची दिल्लीतील मैत्रीणदेखील यावर्षी गणपतीमध्ये त्यांच्या घरी आली आहे. त्यातील एक वेगळी मज्जादेखील या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. केतन अतिशय हळवा आहे. सर्वांचाच लाडका असल्याने त्याच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यावर त्यांची मतं असतात. त्याचं त्याच्या आईबरोबर खूप स्ट्रॉँग बॉन्डींग आहे. तो मम्माज् बॉय आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आई दुखावली नाही पाहिजे, हा त्याचा अट्टाहास असतो. त्यासोबतच त्याचा मॅजिकवर अतिशय विश्वास आहे. म्हणजे पुढे आपलं सगळंच चांगलं होणार आहे, असा त्याला विश्वास आहे, परंतु सगळं चांगलं व्हावं यासाठी काही प्रयत्नदेखील करावे लागतात, ते कुठेतरी तो मिस करतो. एकूणच एक वेगळं सकारात्मक पात्र आहे.
यातील अनेक दिग्गजांसोबत मी यापूर्वीही काम केलं होतं. संजय मोने, शुभांगी गोखले, शुभांगी लाटकर आहेत. या चित्रपटात अश्विनी भावे माझी आई आणि अजिंक्य देव माझे बाबा आहेत. अजिंक्यदादासोबत मी यापूर्वी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका केली होती. त्यामुळे त्यांच्याशी माझी खूप चांगली ओळख झाली होती. त्याला मी नेहमी अरे तुरे करतो, तो माझा हक्काचा दादा आहे. अगदीच काही कलाकार होते, जसे की डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे आणि विशेष म्हणजे अश्विनी भावे यांच्यासोबत कामही केले नव्हते आणि त्यांना भेटलो पण नव्हतो. या चित्रपटादरम्यान आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यात गंमत म्हणजे अश्विनीताईसोबत पहिल्यांदाच काम केलं. सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. अश्विनीताईसोबत काम करायला खरंच खूप मज्जा आली. आता आमची खूप चांगली मैत्रीदेखील झाली आहे. मी हे नक्कीच म्हणू शकतो की, या चित्रपटादरम्यान मला कायमस्वरूपी नातं मिळालं असेल, तर ते अश्विनीताईची मैत्री आहे. त्याचबरोबर जे तरुण कलाकार आहेत, ते देखील कमालीचे आहेत. एकूणच या चित्रपटादरम्यान खूप भारी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटात आमचं जे घर दाखवलं आहे, ते कोकणातलं आहे. त्यामुळे ७० टक्के शूट कोकणात गुहागर इथे केलं आहे. म्हणजे घराबाहेरचे सीन, गणपती घेऊन येतो ते सीन्स, त्यासोबतच गाणी जी शूट केली आहेत, ती सगळी कोकणात झाली आहेत, पण घराच्या आतमधील सीन्ससाठी आम्ही केरळमध्ये गेलेलो. म्हणजे केरळमधलं एक घर होतं, जिथे घराच्या आतले सीन्स शूट झाले आहेत. त्याचं कारण असं की आमचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, त्याला जसं घर हवं होतं ते कोकणात होतं, पण आमचा क्राऊड खूप मोठा होता. घर लहान असल्यामुळे त्या घरांमध्ये ते कम्फर्टेबली काम होत नव्हते. तशी जागा त्याला केरळमध्ये सापडली. त्यामुळे घरातले सीन आम्ही केरळमध्ये केले, पण बाकी सगळं कोकणातच झालं आहे. खूप मज्जा आली. सगळा प्रवास आम्ही बाय रोड केला. त्यामुळे एक कोकण सौंदर्याचा आस्वादही आम्हाला घेता आला.
उत्सुकता तर भयंकर आहे. ती प्रत्येकवेळीच असते, याचं मला कौतुक वाटतं. छान वाटतं, कारण जेवढी एक्साइटमेंट आहे, तेवढंच नर्व्हसनेससुद्धा आहे. काय होईल, लोकांना आवडेल ना आपला चित्रपट, तो पोहोचेल ना लोकांपर्यंत, प्रतिसाद काय असेल त्यांचा... असे खूप प्रश्न असतात मनात, आताही आहेत, पण मला आशा आहे, लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. त्यात या वर्षातला हा माझा चौथा चित्रपट रिलीज होत आहे. त्यातच अलीकडे रिलीज झालेला ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतक्यातच ‘घरत गणपती’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हे वर्ष तर माझ्यासाठी खुपच खास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.