Kalki 2898AD : अमिताभ बच्चन यांचा ८१ व्या वर्षीदेखील असलेला उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. या वयातही ते चित्रपटांमधील आपल्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेताना दिसतात. सध्या त्यांचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. अशातच त्यांच्या फिटनेसची खूप चर्चा होताना दिसतेय. बिग बींचे फिटनेस ट्रेनर वृंदा भट्ट व शिवोहम यांनी अमिताभ बच्चन यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचं कौतुक केलं आहे. वृंदा भट्ट आणि शिवोहम हे लोकप्रिय सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर जोडपं आहे. त्यांनी ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
खरं तर वृंदा मागच्या २४ वर्षांहून जास्त काळापासून बिग बींना फिटनेस ट्रेनिंग देत आहे. निरोगी राहण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे प्रयत्न आणि इतक्या वर्षांत त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, याबाबत वृंदाने सांगितलं आहे. आपल्या आरोग्यासाठी व्यायाम किती चांगला आहे, याची अमिताभ बच्चन यांना चांगली जाणीव आहे आणि म्हणूनच ते व्यायामासाठी वेळ काढतात, असं शिवोहमने सांगितलं. वृंदाने अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या फिटनेस सेशन्सबद्दल माहिती दिली. यामध्ये श्वासोच्छवासाशी संबंधित व्यायाम, प्राणायाम आणि योगासनांचा समावेश आहे, असं तिने सांगितलं.
अमिताभ बच्चन खूप शिस्तप्रिय आहेत. सकाळी सहा वाजताच्या सेशनला त्यांना क्वचितच उशीर होतो. कधी उशीर झाला तर त्यासाठी ते माफी मागतात. अमिताभ यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला पाच-सात मिनिटांसाठी माफी मागण्याची गरज नाही. वेळेचं महत्त्व काय ते मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं, असं वृंदा सांगते. अमिताभ बच्चन सध्या ‘कल्की २८९८ एडी’च्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ‘अश्वत्थामा’ची भूमिका साकारली आहे.
यात बिग बींसह प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण, ब्रह्मानंद यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाशिवाय ते सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर एका सिनेमात झळकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.