Premier

Movie Review: विनोदाला भावनिक दृश्यांची उत्तम झालर असलेला हिंदी चित्रपट 'खेल खेल में'

सकाळ वृत्तसेवा

Akshay Kumar : लेखक व दिग्दर्शक मुदस्सर अजीजने पती पत्नी और वो, हॅपी भाग जायेगी, दुल्हा मिल गया असे काही चित्रपट बनविलेले आहेत. हलकेफुलके विनोदी चित्रपट बनविण्यात तो माहीर आहे. त्याचा पती पत्नी और वो हा चित्रपट सन २०१९ मध्ये आला होता.

या चित्रपटात कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या कलाकारांनी काम केले होते. आता त्याने अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क, फरदीन खान, आदित्य सील, प्रज्ञा जयस्वाल या कलाकारांना घेऊन खेल खेल में हा चित्रपट आणलेला आहे. हलकीफुलकी काॅमेडी असलेला हा चित्रपट चांगलाच खिळवून ठेवणारा झाला आहे.

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. मोबाईल तर आज सर्रास सगळ्यांच्याच हातात असतो आणि याच मोबाईलमध्ये सगळ्यांची अनेक गुपिते दडलेली असतात. पण तीच एके दिवशी उघड झाली तर...नेमक्या याच संकल्पनेभोवती या चित्रपटाची कथा फिरणारी आहे. ही तीन जोडप्याची कथा आहे.

ही जोडपी एक वेगळाच खेळ खेळण्याचे ठरवितात आणि त्यातून गमतीजमती, वादविवाद, रुसवेफुगवे कसे निर्माण होतात हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. रिषभ मलिक (अक्षय कुमार) आणि वर्तिका खन्ना( वाणी कपूर), हरप्रीत सिंग (एमी विर्क) आणि हरप्रीत कौर ( तापसी पन्नू), समर तंवर(आदित्य सील) आणि नयना मेहरा तंवर (प्रज्ञा जयस्वाल) अशी त्या तीन जोडप्यांची नावे. त्यांचा एक जवळचा मित्र असतो कबीर (फरदीन खान). ही सगळी मित्रमंडळी वर्तिकाच्या लहान बहिणीच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. खूप दिवसांनी ते एकत्र भेटल्याने मौजमस्ती करीत असतात.

संगीत समारंभ वगैरे झाल्यानंतर रिषभच्या खोलीत गप्पा मारण्यासाठी सगळे जण एकत्र जमतात. त्यावेळी वर्तिका टाईमपास म्हणून सगळ्यांना एक गेम खेळण्याबाबत सूचना करते. तो गेम असा असतो की सगळ्यांनी आपापले मोबाईल एका टेबलवर ठेवायचे आणि आपल्याला येणारे फोन व मॅसेज सगळ्यांनी उघडपणे वाचायचे. सुरुवातीला काही जणांना हा गेम मान्य नसतो. परंतु त्यानंतर सगळे जण हा गेम खेळण्यास तयार होतात. त्यानंतर कशा गमतीजमती घडतात. भांडण-तंटा कसा निर्माण होतो. एकमेकांची गुपिते ऐकल्यानंतर कसे वादविवाद निर्माण होतात हे या चित्रपटात पाहायला मिळते. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी ही कथा मांडताना त्याला भावनिक ओलावा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

गमतीशीर आणि मजेशीर चित्रपट देताना त्याला भावनिक दृश्यांची झालर छान चढविली आहे. अभिनेता अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क, फरदीन खान, प्रज्ञा जयस्वाल, आदित्य सिल या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेले आहेत. फरदीन खानचे या चित्रपटाद्वारे हिंदीच्या मोठ्या पडद्यावर कमबॅक होत आहे. कबीरच्या भूमिकेद्वारे त्याचे पदार्पण यशस्वी झाले आहे असेच म्हणावे लागेल. एमी विर्कचा हा दुसराच चित्रपट आहे आणि त्याने धमाल उडविली आहे.

हरप्रित सिंगच्या भूमिकेतील हावभाव त्याने आपल्या चेहऱ्यावरून उत्तम दर्शविले आहेत. वाणी कपूर आणि तापसी पन्नू यांनीही आपापली भूमिका समरसून साकारली आहे.

तनिष्क बागचीचे संगीतही छान झाले आहे. चित्रपटातील संवाद दमदार आहेत. मात्र चित्रपटामध्ये काही उणिवा आहेत. चित्रपटाची कथा अधिकतर एकाच खोलीमध्ये घडते. त्यामुळे आपण एखादे नाटक पाहात आहोत की काय असा भास निर्माण होतो. चित्रपटाचा पूर्वार्ध गमतीशीर असला तरी उत्तरार्धात चित्रपट काहीसा कंटाळवाणा झाला आहे. तरीही एक हलकाफुलका चित्रपट देण्यात दिग्दर्शक व लेखक यशस्वी ठरला आहे.

-तीन स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT