Kiran Mane Esakal
Premier

Kiran Mane : "त्यांच्या आठवणीत वारीत नाचून बेभान होतो"; किरण माने यांनी सांगितली वारीची भावूक आठवण

Kiran Mane Post : अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या आजोबांची आणि पंढरपूरच्या वारीची आठवण सोशल मीडियावर शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Kiran Mane Post On Pandharpur Wari : अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड राजकीय मतांबरोबर शेअर करत असलेल्या सामाजिक पोस्ट किंवा त्यांच्या आठवणी त्यांच्या चाहत्यांना वाचायला आवडतात. नुकतंच किरण यांनी सोशल मीडियावर त्यांची आषाढीच्या पंढरपूर वारीविषयीची एक खास आठवण शेअर केली. ही आठवण त्यांच्या आजोबांशी जोडलेली आहे.

किरण यांची पोस्ट

किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आजोबांची आठवण शेअर केली. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या वारीशी त्यांच्या आजोबांचं असलेलं नातंही सांगितलं. ते म्हणाले," "नाना, तुमचं हात किती खडबडीत हायत. दगडावानी !" ल्हानपनी माज्या आज्ज्याचा हात हातात घेऊन मी म्हनायचो..."आरं किरन, मेहनतीचा हात हाय ह्यो. हिरी खनल्याती म्या... तांबडं फुटायला हातात पार घेतली का फकस्त भाकर खायालाच झाडाखाली बसायचू. दिस मावळंपात्तूर खांदायचू."

माझा आज्जा-नाना-विहीरी खननारा शेतमजूर. पोरका. दूधपितं बाळ आस्तानाच आई मेली. जवान झाल्याव बाप मेला. ना जमीनजुमला , ना घर...दोन येळच्या जेवनाची भ्रांत. पन आंगापिंडानं मजबूत. रांगडा. पैलवान ! कुस्तीचा नाद. "कुस्ती जितल्याव चार आनं आन 'खोबर्‍याच्या वाट्या' बक्षिस मिळायच्या. मला खोबरं लै आवडायचं. म्हनून 'लै खवुन' खेळायचू आन् जितायचू." मला शिक्रेट सांगीतलंवतं नानानी. गावोगावचं नामांकित पैलवान चितपट केल्याव मारूतीनाना माने 'गावाचा लाडका' झाला.

...पन गरीब-बेवारशी. कोन पोरगी दीना. अशातच मामाच्या पोरीवर जीव जडला. मामा शेजारच्या गावातला, अंबकमधला 'जमीनदार'. भाच्याकडं दाताव मारायला गिन्नी नाय, हे त्याला ठावं व्हतं. त्यो पैसंवाला जावाय शोधाय लागला. मंग मात्तूर आज्ज्याची सटाकली ! सरळ आमच्या आज्जीला पळवून आनली आन् गुपचूप लगीन केलं ! त्या काळात राजेहो !!

मामा वर्षभर दारू पिऊन खांद्यावर कुर्‍हाड घिवून हिंडत होता, "वाघाचं पिल्लू पळवून आन्लंय मारत्यानं. घावू दे मला , खापलूनच काडतो." आख्ख्या गावानं नाना आन् आज्जीची राखन केली. हळूहळू 'सुखाचा संसार' सुरू झाला ! दिनकर,वसंत,मोहन,भास्कर अशी चार मुलं झाली.

...आपल्यासारखी आपल्या लेकरांची आबाळ हुयाला नगं म्हनून नानांनी मुंबई गाठली. गिरनी कामगार ! दनकट शरीरामुळं मिलमध्ये 'हमाल' म्हनून ओझी उचलन्याचं काम लागलं.. एकच ध्यास-कायबी करू पन पोरं शिकवू !

याच काळात 'विठूरायाच्या भक्ती'ची गोडी लागली. दादरला नानांच्या खोलीपुढं एक दवाखाना होता. तिथल्या डाॅ. नामदेव फडतरेंशी 'जिगरी दोस्ती' झाली. 'एक कामगार आणि डाॅक्टर' या जगावेगळ्या दोस्तीच्या किस्स्यांवर एक सिनेमा निघंल. भजन-किर्तन सुरू झालं. 'वारी' सुरू झाली. अंगठेबहाद्दर असून अख्खी 'तुकाराम गाथा' तोंडपाठ असनार्‍या नानांची 'हरीभक्ती' काय जबराट आसंल !

नानांनी मुंबैत लै कष्ट केले...गावाकडं पैसे पाठवत र्‍हायले. मुलं शिकवली. माझे वडील दिनकर'दादा' पी.डब्ल्यू.डी.मध्ये अधिकारी झाले. वसंत'अण्णा' शिक्षकी पेशा करत भारती विद्यापीठात उच्चपदावर पोचले. नानांनी गावाकडं चिंचणीला एक-दोन-दीड असं करत सोळा एकर शेती घेतली ! धाकटे दोन्ही चुलते मोहनबापू आणि भास्करकाका शेतीत रमले ! भास्करकाका-माझा लाडका चुलता-भोळाभाबडा देवमाणूस ! बापूंकडं रांगडेपणा आला होता.नाना रिटायर होउन गावाकडं आले आणि शेतीत रमले. दादा-आईच्या लग्नानंतर थोड्या दिवसांत आज्जी गेली. मला नाय बघायला मिळाली आज्जी.

दादांची फिरती नोकरी. जास्त काळ, माझ्या बालपणीचा मायणीतच गेला. मूळ गांव चिंचणी. कृष्णाच्या दोन आयांसारखी मला दोन गावं लाभली-मायणी आणि चिंचणी !

म्हातारपणी नाना आमच्यासोबतच र्‍हायले,शेवटपर्यन्त ! त्यामुळं मला खूप लळा लागला नानांचा.लै गप्पा मारायचो आमी. नाना मला कायम हसून म्हनायचे , "बग किरन, पोरं शिकीवली म्हनून आज पलंगावं मऊमऊ गादीवं झोपतूय." नाना कधी आजारी पडले तर 'सुई टोचनारा डाक्टर' लै बेक्कार शिव्या खायचा ! जवानीत कधी इंजेक्शन-गोळ्यांशी संबंध आलाच नव्हता तर !

आईदादांनी नानांची खूप खूप सेवा केली... शेवटची पाच-सहा वर्ष अंथ्रुणात पडून असलेल्या नानांचं सगळं-सगळं आईनं केलं. अगदी मनापासून ! शेवटी 'भ्रमिष्ट' अवस्थेत नाना काहीही बोलायचे. एकदा आपण सगळे 'पायी वारी' करतोय असा त्यांना 'भास' झाला. दोन दिवस घरात 'माऊली-ग्यानबा तुकाराम'चा जयघोष सुरू होता ! हवेत कुठंतरी बघून, 'एS दिनकर, किरन गर्दीत चुकंल.हात धर त्येचा.' असं ओरडत होते. तुकोबाचे अभंग म्हणत होते. रात्रंदिवस,सलग ! शेवटी घसा बसला. बेशुद्ध झाले.

नानांवर खूप जीव आईदादांचा ! शेवटची सहा वर्ष आई कुठेही परगावी मुक्कामी गेली नाही. आमच्याबरोबर 'सिनेमा-नाटक-लग्न-जत्रे'ला आली नाही. 'नानांचं कोण करणार?' हा एकच प्रश्न ! माझ्या आईचा हा 'ग्रेटनेस' त्यावेळी कळत नव्हता, आज 'भावतोय' !!

नाना गेले तेव्हा मी , दादा आणि बापू त्यांच्याजवळ होतो. मला नानांची काहीतरी हालचाल जाणवली. मी नानांकडे पाहिले. निपचित पडून होते ते. मी दादांना सांगीतले. दादांनी नानांचा हात हातात घेतला आणि सोडला. नानांचा निर्जिव हात खाली काॅटवर पडला...एक अध्याय संपला होता. वादळ शमले होते. आम्ही एकमेकांकडे पाहिले...

माझ्या उभ्या आयुष्यात मी दादांना एवढं हतबल पाहिलं नव्हतं...'पोरकं' होणं काय असतं ते त्या दिवशी दादांच्या डोळ्यांत पाहिलं मी...

दादांनी नंतर वारी सुरू ठेवली. आताशा त्यांना नाही जमत. भास्करकाका करतात. आम्हा नातवंडांच्या हातून ही परंपरा सूरू राहिल की नाही सांगता येत नाही. पण दरवर्षी वारी निघाली की आषाढी एकादशीपर्यन्त रोज नाना माझ्या डोळ्यापुढे येतात...डोळे पाणावतात. कधी जमलं तर मी गळ्यात नानांचा टाळ अडकवतो आणि माऊलीच्या पालखीसोबत लोणंद ते तरडगांव नानांना सोबत करतो... नाचून बेभान होतो..एकच नाद-ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल...

- किरण माने."

आजोबांशी किरण यांचं असलेलं नातं, आजोबानी केलेली पंढरीची वारी आणि आजोबांच्या आठवणीत किरण त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत करत असलेली वारी याच्या आठवणी त्यांचं चाहत्यांना खूप आवडल्या. अनेकांनी कमेंट करत किरण यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं.

किरण सध्या तिकळी या सन मराठीवरील मालिकेत काम करत आहेत. त्यांची ही मालिका चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT