Marathi Entertainment News : आज 20 ऑगस्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन. समाजातील वाढत्या बुवाबाजीवर, अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी हत्या केली. याबाबत बरीच आंदोलन झाली पण अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाहीये. अभिनेते किरण माने यांनी आज नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली.
किरण यांनी त्यांच्या इंडस्ट्रीमधील सहकलाकाराचं उदाहरण देत समाजात अजूनही अंधश्रद्धा असल्याचं त्यांनी सांगितलं आणि नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःचे प्राणी गमावले पण अजूनही समाजात बुवाबाजी, जातीयवाद, अंधश्रद्धा यांचं वर्चस्व आहे असे खडेबोल सुनावले.
"छे छे... अरे किरण, मित्रा दोन हजार चोवीस साल आहे हे. आता कुठं राहिलीय बुवाबाजी? हवेतून अंगारा काढणं वगैरे थोतांड आहे हे कळलंय लोकांना. लोक हुशार झालेत. विज्ञान शिकलेत." तर्जनीतल्या अंगठीशी चाळा करत एक अभिनेता मित्र म्हणाला.
मी विषय बदलत त्याला विचारलं, "तुझ्या अंगठीत खडा आहे तो माणिक आहे का?" तो खळखळून हसला. "पुष्करा."असं म्हणत त्यानं तो खडा कपाळाला लावला, "को ऊं बृं बृ नमः" असं कायतरी पुटपुटला आणि म्हणाला, "गुरूजींनी घालायला सांगीतला. मनासारखं कामच मिळत नाही रे. पैसा मिळाला तर टिकत नाही. पुष्कराजमुळे फरक पडेल असं म्हणालेत गुरूजी.वडिलांच्या पेन्शनचे पैसे उसने घेऊन घेतली अंगठी. बघू." पुन्हा तो खडा त्यानं कपाळाला लावला.
"हीच ती बुवाबाजी." असं त्याला मनापास्नं सांगावं वाटलं. आपल्या अख्ख्या लाईफची सगळी झंझट मिटवायला एखाद्या ज्योतिषानं चमत्कार करावा... कुणीतरी बुवाबापू आपले सगळे प्राॅब्लेम्स मिटवेल, या आशेपोटी माणूस कशावरही विश्वास ठेवायला लागलाय...
"रोज चमचाभर शेण खा तुम्हाला मुलगा होईल." ठेवला विश्वास. "रोज गोमुत्र प्या कॅन्सर होणार नाही.", "अमकीकडं गुप्त खजिना आहे. पाच लाख रूपये खर्चून विधी करावा लागेल." ठेवला विश्वास.
लोक रहात्या घराची भिताडं पाडून किचन हिकडं आन् पलंग तिकडं करायला लागलीत. कमोडवर बसल्यावर आपलं तोंड कुठल्या दिशेला पाहिजे हे बी गुर्जी सांगायला लागलेत.
सगळं कुठपर्यन्त पोहोचतं माहीतीये?
"ही क्रिम वापरा, सात दिवसात गोरा रंग !"
"हा साबण वापरून अंग धुवा, दिवसभर फ्रेश !"
...आरं भावा, कुठलाबी परफ्युम अंगावर फसाफसा मारल्यावर पोरी तुझ्यामागं दणादणा पळायला आयाभैनी उघड्यावर पडल्यात का??
मला सांगा, दोन हजार चोवीस सालीबी असल्या खोट्या स्वप्नांना भुलणारी माणसं आहेत की नाहीत??? म्हणजेच इथं अंधश्रद्धा आहे. विज्ञानानं दिलेल्या मोबाईलपासून चष्म्यापर्यन्त सगळं रोज आपण वापरतो... पण दिवसेंदिवस तर्कशुद्ध आणि विवेकी विचारांपासून आपला मेंदू कित्येक मैल दूर चालला आहे.
आज डाॅ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन. आपला समाज या अशा फसवणुकीतनं बाहेर पडावा. समाजात विज्ञानदृष्टी यावी, विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, यासाठी दाभोलकरांनी प्राणांची आहुती दिली...
आपण कधी जागे होणार?
आवो, समाजाला कर्मकांडातनं, अंधश्रद्धेतनं बाहेर काढू पहाणार्या तुकोबारायालाबी असंच वैकुंठाला धाडलं मारेकर्यांनी... जाता-जाता तुका कळकळीनं सांगून गेला :
"आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करू नाश आयुष्याचा !
सकळांच्या पाया माझे दंडवत.. आपुलाले चित्त शुद्ध करा !!
तुका म्हणे हित होय तो व्यापार.. करा, फार काय शिकवावे ???" अशी पोस्ट किरण यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सहमतीदर्शक प्रतिक्रिया दिल्या. समाजातील वाढत्या अंधश्रद्धेवर जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे अशी मागणीही अनेकांनी केली. तर अनेकांनी किरण यांनी खूप तर्कशुद्ध विचार मांडला असं स्पष्टीकरण दिलं.
या आधीही किरण यांनी अशा अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी नुकतीच शेअर केलेली ब्राह्मण्यवादावरील पोस्टही चर्चेत राहिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.