Lata Mangeshkar Award 2024 : मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए. आर. रेहमान यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी सायंकाळी ६:३० वाजता विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नाट्य चित्रपट संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवर मंडळींना हे पुरस्कार दिले जातात. यांपैकी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन वर्षांपासून देण्यात येत आहे. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. दुसरा पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देण्यात आला. तर या वर्षी हा पुरस्कार बच्चन यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची आज घोषणा पेडर रोड येथील प्रभुकुंज येथे करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, संगीतकार आदिनाथ मंगेशकर, प्रसिद्ध सूत्रसंचालक हरीश भिमाणी, रूपकुमार राठोड, हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर आदी मंडळी उपस्थित होती.
यावेळी हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “मा. दीनानाथ यांचे गायक, संगीतकार आणि रंगमंच कलाकार म्हणून अतुलनीय योगदान असून महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ मंगेशकर परिवार दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते. या पुरस्कारांसाठी आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याचा आनंद आहे.’’
उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी देण्यात येणारा पुरस्कार या वर्षी गालिब या नाटकाला देण्यात येणार आहे. तसेच नाट्य- चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी अशोक सराफ यांची मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्र पट निर्मिती), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा), पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा), रूपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा), भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता), यांना देखील दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर वाग्विलासिनी पुरस्कार मंजिरी फडके यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी प्रदान करण्यात येणार आहे. यासोबतच दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल यांना समाजसेवेसाठी आनंदमयी पुरस्कार देण्यात येणार आहे. अशाप्रकारे हे पुरस्कार देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.