मुलाखतकार- मनाली सागवेकर
लेखक व दिग्दर्शक तसेच अभिनेता आणि नि्र्माता सुमितचा 'विषय हार्ड' हा हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (५ जुलै) प्रदर्शित होत आहे. ही नेहमीची प्रेमकथा नसून त्यातील नायक- नायिकेसमोर कोणती एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांना विचित्र संकटांचा सामना आणि आपले प्रेम यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारचा संघर्ष करावा लागतो याचे चित्रण या चित्रपटात आहे. अभिनेत्री पर्ण पेठे या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारीत आहे. आतापर्यंत रंगभूमीपासून तिचा सुरू झालेला प्रवास आता मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्त तिच्याशी संवाद साधला..
अभिनय क्षेत्रातील माझ्या करिअरची सुरुवात पुण्यातून झाली. मराठी चित्रपटसृष्टीतले बरेच कलाकार हे पुण्याच्याच मातीतून शिकून, तयार होऊन इथपर्यंत पोहोचले आहेत. पुण्यात इंटर कॉलेजेस स्पर्धांची मोठी परंपरा आहे. तेथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना मी बऱ्याच नाटकांमध्ये काम केले. शिवाय पुण्यात प्रायोगिक नाटकांचे वेगवेगळे समूह, संस्था कार्यरत आहेत जे इंटर कॉलेजेस स्पर्धांच्या पलीकडे जाऊन देखील काम करतात. अशाच वेगवेगळ्या समूहांसह आणि संस्थांच्या नाटकांमध्ये काम करता करता मी अभिनय क्षेत्रातले माझे पाऊल पुढे टाकले.
मी गेले ९-१० वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे आणि इतके वर्ष काम करून सुद्धा अजूनही आपण काहीच काम केलेले नाही असे मला वाटते. आणखीन खूप काही करावेसे वाटते. माझं करिअर आता अशा टप्प्यावर आहे जिथे मला स्वतःला आणि माझ्या अभिनयाच्या क्षमतेला सिद्ध करणाऱ्या भूमिका करायच्या आहेत. मला प्रत्येक चित्रपटात एक वेगळी भूमिका करायची इच्छा आहे तसेच नाटकात देखील नवीन अनोळखी प्रयोग करायला मिळावेत असे वाटते. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात नवीन म्हणून काम करत असतो तेव्हा सुरुवातीला आपल्या प्रत्येक कामाचे कौतुक केले जाते. पण मी आता नवोदित अभिनेत्री नाही. आता लोक माझ्या कामाकडे गांभीर्याने पाहात आहेत. कौतुकासह बऱ्याच चांगल्या - वाईट, टीका करणाऱ्या प्रतिक्रिया मला मिळत राहतील. चित्रपटसृष्टी तसेच प्रेक्षक माझ्या कामातील गंभीरता, मेहनत आणि बारकावे याकडे लक्ष देतील. आता माझ्या कामाच्या बाबतीत असलेली जबाबदारी आणखीन वाढली आहे. त्यामुळे मला अधिकाधिक नवीन प्रयोग करून बघायचे आहेत. स्वतःच्या कम्फर्टझोन पलीकडे जाऊन चॅलेंज करणाऱ्या भूमिका करायच्या आहेत.
चित्रपटात मी 'डॉली' नावाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका महाराष्ट्रातल्या सर्व धडाकेबाज मुलींचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका आहे. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ती तुम्हाला तुमच्या सगळ्या कक्षा, क्षमता रुंदावण्याची शक्ती देते आणि स्त्रिया देखील एखादी गोष्ट करण्याचा ठाम निर्णय करतात तेव्हा ती पूर्णत्वास नेल्याशिवाय राहत नाहीत. त्यातही ती स्त्री जर प्रेयसी असेल तर तिच्या प्रेमासाठी ती प्रत्येक अडचणीचा बेधडकपणे तसेच नीडरपणे सामना करते. डॉली देखील अशीच मुलगी आहे जिचं गावातल्या संदीप नावाच्या एका मुलावर जीवापाड प्रेम असते. ती त्याला संद्या असं म्हणते आणि त्यांच्या या प्रेमाला तिच्या घरच्यांचा विरोध असतो. अशा वेळी ती तिच्या प्रेमाला वाचविण्यासाठी खंबीरपणे उभी राहते.
कलाकार हा त्याच्या प्रत्येक भूमिकेला समान जीव लावत असतो. त्यामुळे एखाद्याची निवड करणे हे खूप कठीण आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटात तसेच नाटकात मी जी भूमिका केलीय तिची आठवण म्हणून मी त्याच्या संबंधित असलेले प्रॉप्स माझ्यासह ठेवते. मी "टेक, केअर, गुड नाईट" नावाचा चित्रपट केला होता. त्यातील माझी भूमिका खूपच वेगळी होती. माझ्या मूळ स्वभावाच्या पलीकडे असणारी ती भूमिका होती. जी साकारताना मला एक वेगळा अनुभव मिळाला. शिवाय मला तितकीच मजासुद्धा आली. सध्या माझी "चार चौघी", "अडलंय का" आणि "लव्ह यु" अशी तिन प्रायोगिक नाटके सुरु आहेत. प्रत्येक नाटकात माझ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. गेल्या दीड वर्षापासून मी या नाटकांमध्ये काम करतेय. या तिन्ही नाटकांमधल्या माझ्या भूमिका मला खूप आव्हानात्मक वाटतात आणि एकाच काळात तीन वेगवेगळ्या भूमिका करताना मला खूप आनंद होतो.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मराठी भाषा बोलली जाते. म्हणजे त्यातील लहेजा थोडा वेगळा असतो. हा चित्रपट कोल्हापुरातील एका गावातला आहे. त्यामुळे यात कोल्हापुरी मराठी भाषेचा वापर आहे. कोल्हापुरी भाषेचा लहेजा मला आत्मसात करायला थोडा वेळ गेला. पण आमच्या टीममधील सगळेच जण कोल्हापुरचे असल्यामुळे त्यांची मला खूप मदत झाली. मी त्यांच्याकडून शब्दाचे उच्चार तपासून घेत होते. शिवाय काही वेळा त्यांना माझे डायलॉग्स म्हणायला सांगून त्यांच्यामागून मी ते पुन्हा म्हणत होते आणि अभ्यास करत होते. मुख्यत्वे मला माझ्या भाषेवरच काम करायचे होते. तसेच सगळेच जण कोल्हपूरच्याच कोणत्या ना कोणत्या भागातून होते आणि मी एकटीच पुण्याची मुलगी होते. त्यामुळे मला त्या सगळ्यांमध्ये वेगळं असं वाटू द्यायचं नव्हतं म्हणून मी भाषेवर तसेच हालचालींवर खूप कष्ट घेतले. मी आणि सुमित सोडून बाकीचे कलाकार देखील कोल्हापुरातलेच होते. काही राज्य नाट्यस्पर्धेत काम करणारे, काही गणपतीच्या देखाव्यात तर काही रिल्समध्ये काम करणारे कलाकार होते आणि ते खूप सहज काम करतायत हे पाहून मला माझ्याही कामात तशीच सहजता यावी असे मला वाटत होते.
बऱ्याच लोकांनी चित्रपटातल्या गाण्यांवर रिल्स बनवले आहेत आणि अजूनही बनवत आहेत. काही जण गाणी ऐकल्यावर गाणं लगेच जिभेवर बसतंय असं म्हणत आहेत. सगळी गाणी ऐकायला खूप मज्जा येतेय. सगळ्या गाण्यांची व्हिडीओग्राफीही खूप छान आहे अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत. कोल्हापूरमधील शेती, टेकड्या अशा निसर्गरम्य वातावरणात सगळी गाणी शूट केली आहेत. शिवाय गावातील बाकीचा भाग देखील गाण्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्या ठिकाणी काम करताना आम्हाला देखील खूप मज्जा आली आणि आता प्रेक्षकांनाही ते खूप आवडतंय हे ऐकून फारच आनंद होतो.
सुमितसह मी पहिल्यांदाच काम केले. तो चित्रपटातील मुख्य पात्रासह चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. मला त्याचं खूप कौतुक वाटलं, त्याने खूप नेटाने आणि मन लावून हा चित्रपट केलाय. मला असं वाटतं की कधी कधी चित्रपट बनवणं खूप सोपं असतं. पण ती पूर्णत्वास नेऊन रिलीज करणं हे तितकंच अवघड असतं आणि सुमितने ते आव्हान पेललंय याबाबत देखील मला त्याचं खूप कौतुक वाटतं. बाकीचे जे कलाकार आहेत त्यांच्यासह देखील हे माझे पहिले सहकार्य होते. त्यांच्यासह काम करताना खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक वेगळा अनुभव मिळाला.
प्रेक्षकांमध्ये माझी ओळख एक गोड, सालस आणि समंजस अभिनेत्री अशी आहे. माझी ही ओळख मला छानच वाटते. असं नाही की मला आता ही ओळख नको आहे आणि एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणूनच लोकांनी माझ्याकडे पाहायला हवं किंवा मला आता ग्लॅमरस भूमिकाच करायच्या आहेत. मला गोड भूमिकांसह ग्लॅमरस भूमिकाही करायला आवडतील. कारण अशा भूमिकांची आव्हानेही खूप वेगवेगळी असतात आणि प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री प्रमाणे मला देखील नवनवीन अनुभव घ्यायला आवडतात. मला गोड भूमिकेसह एखादी राकट आणि रांगडी भूमिका तसेच खलनायक किंवा उत्तम नर्तिकेची भूमिकाही करायची इच्छा आहे. त्यामुळे कोणतीही ओळख मला अडकवून ठेवतेय असं मला वाटत नाही. आत्ता सुद्धा मी ज्या ज्या भूमिका करतेय त्या एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. एक उत्तम अभिनेत्री होण्यासाठी मी नेहमीच स्वतः नवनवीन आव्हाने घेत राहीन आणि त्यांना सामोरे जाऊन पूढे जाईन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.