nitin vaidya  esakal
Premier

'लई अवघड हाय रे गड्या शिनेमा काढणं', मराठी निर्मात्याने सांगितला सिनेसृष्टीतील अवघड प्रवास

Santosh Bhingarde

मराठी चित्रपटसृष्टीतील सातत्याने चित्रपट निर्मिती करणारं एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीन प्रकाश वैद्य. नितीनने 'वळू' या चित्रपटापासून कार्यकारी निर्माता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 'नाळ' या चित्रपटापासून तो निर्मात्याच्या भूमिकेत शिरला. आतापर्यत त्याने पस्तीसहून अधिक चित्रपट कार्यकारी निर्माता ते निर्माता म्हणून केले आहेत. या वाटचालीमध्ये अनेक अडथळे त्याला आले. त्यावर संयम राखून शांतपणे तोडगा काढून त्याने आपली इनिंग सुरूच ठेवली आहे. या क्षेत्रामध्ये भक्कमपणे पाय रोवायचे असतील तर संयम आणि शिस्त खूप महत्त्वाची असते असे त्याचे मत आहे. आता त्याची निर्मिती असलेला लाईक आणि सबक्राईब हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकूणच कार्यकारी निर्माता ते निर्माता अशा त्याच्या वाटचालीबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत...

चित्रपटसृष्टीत तुझी वाटचाल कशी काय सुरू झाली?

-माझं एमबीएपर्यंत शिक्षण झालेलं आहे. एमबीए करीत असताना पिंपरी - चिंचवडमध्ये एक नाट्यगृह होतं. पिंपरी - चिंचवड म्हणूनच ते नाट्यगृह ओळखलं जायचं. आता रामकृष्ण मोरे असं त्या नाट्यगृहाचं नाव आहे. तिथे नाटकांचे प्रयोग फारसे व्हायचे नाहीत. मी एक गणपती मंडळातील कार्यकर्ता असल्यामुळे तिथल्या अनेक लोकांची विचारणा व्हायची की आम्हाला नाटक बघायला पुण्याला जावं लागतं तर तुम्ही इथे नाटकांचे प्रयोग का नाही सुरू करत? त्यानंतर आम्ही आमची नाटकाची टीम तयार केली आणि आम्ही नाटकांचे प्रयोग आणू लागलो. प्रशांत दामले आणि सुधीर भट यांना भेटून आम्ही नाटकांचे प्रयोग आणू लागलो. हे सगळं करत असताना मी माझं एमबीए पूर्ण केलं आणि ते करून मी नोकरी करत होतो. हे करत असताना माझा भाऊ उमेश कुलकर्णी ज्याने वळू, देऊळ वगैरे चित्रपट दिग्दर्शित केले. तो एफटीआयमध्ये डिप्लोमा करत होता तेव्हा त्याने दिग्दर्शक म्हणून गिरणी नावाची शॉर्ट फिल्म केली होती. त्याने आणि गिरीश कुलकर्णीने वळू नावाचा चित्रपट लिहिला होता आणि त्याला माहीत होतं की माझी चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याने मला नोकरी सोडायला लावली आणि हा चित्रपट करायला सांगितला. आपण दोघे मिळून चित्रपट करू असं तो मला तेव्हा म्हणाला. आम्ही लहानपणापासून एकत्र असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही वळू नावाचा चित्रपट केला. सुदैवाने या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच पुरस्कारही मिळाले. या चित्रपटामुळे माझा आत्मविश्वास वाढला.

nitin vaidya

या वाटचालीमध्ये किती आणि कसे अडथळे आले आणि त्यावर तू कशी मात केलीस?

- खरं तर अडथळ्यांशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. त्यावेळी या क्षेत्रात मी नवीन होतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून समजून घ्याव्या लागल्या. फिल्चाम कॅमेरा काय असतो , स्पॉटबॉय काय काम असतो हे मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आधी समजून घ्याव्या लागल्या. या सगळ्यात मला खूप जणांनी मदत सुद्धा केली. सुधीर बलसाने सारखा इतका चांगला सिनेमॅटोग्राफर त्याच्याकडूनही मी खूप काही शिकलो. वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने तडजोड करणं असे अडथळे खूप आले. पण सुदैवाने ते अडथळे दूर लोटले गेले. आणि कोणालाही न दुखावता समोरच्या व्यक्तीचा पहिला विचार करून काम करणे आणि शांतपणे सगळ्या गोष्टीसोबत तडजोड करणे हे मी उमेशकडून शिकलो. या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर संयम खूप महत्वाचा आहे. कार्यकारी निर्माता ते निर्माता हा प्रवास काही सोपा नाही. खूप अववघड आणि कठीण काम असतं. त्यामध्ये डोकं शांत ठेवून संयम राखला तर काम करणे अधिक सोपे होते.

आतापर्यंतच्या वाटचालीत तुला आवडलेला चित्रपट कोणता?

- खरं तर हे सांगणं अवघड आहे कारण सगळेच चित्रपट माझ्या खूप जवळचे आहेत. पण त्यातील वळू, देऊळ, नाळ, एकदा काय झालं! हे माझ्या खूप जवळचे चित्रपट आहेत जे मी अतिशय चांगल्या प्रकारे करू शकलो. गाभ्रीचा पाऊस हा सुद्धा माझा खूप आवडीचा चित्रपट आहे जो मी केला. त्याशिवाय अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, विहीर, होम स्वीट होम, वेडिंगचा शिनेमा असे काही चित्रपटदेखील आवडीचे आहेतच.

आत्तापर्यंत माधुरी दीक्षितपासून अनेक कलाकारांसोबत तू काम केले आहेस. यातील प्रत्येक कलाकाराची काम करण्याची पद्धत निराळी असते. मग निर्माता म्हणून तुला त्यावेळी कशा प्रकारे ॲडजस्ट करावे लागते?

- मला सुरुवातीच्याच चित्रपटात अतुल कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, डाॅ. मोहन आगाशे यांच्यापासून ते देऊळमध्ये नाना पाटेकर, त्यानंतर पंचक मध्ये माधुरी दीक्षित अशा खूप चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्यांसोबत काम करणं हे एक चॅलेंज असल्यासारखं आपल्याला वाटतं. पण खरं तर तसं काहीच नाहीये. कारण ती जेवढी मोठी मंडळी आहेत तेवढीच ती साधी- सरळ देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं खूप सोपं होतं. त्यांची प्रत्येकाची एक ठराविक पद्धत आहे काम करण्याची. त्यांचे नियम काही असतात आणि त्याप्रमाणे ते काम करीत असतात. त्यांच्यानुसार मी सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करीत गेलो. प्रत्येकाकडून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून पुढे जावं असं मला वाटलं. हे सगळे कलाकार खूप प्रोफेशनल असल्यामुळे त्यांना काम करताना एक पोषक वातावरण मिळेल याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत गेलो. आपले मराठी कलाकार खूप सरळ व साध्या स्वभावाचे. त्या्ंनी मला नेहमीच सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना ॲडजस्टमेंट जास्त काही करावी लागली नाही.

कलाकारांची निवड आणि लोकेशन्स वगैरे गोष्टीमध्ये तुझा किती सहभाग असतो.

- कलाकारांची निवड आणि लोकेशन्स वगैरे माझ्या सक्रिय सहभागाशिवाय होतच नाही. स्क्रिप्टपासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतःहून सहभागी असतो. सगळ्या गोष्टींमध्ये माझं मत असतं आणि सुदैवाने सगळे दिग्दर्शक त्याचा विचार करतात आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र मिळून करतो. हे सगळं करायला मला खूप आवडतं. फक्त प्राॅडक्शन करणं यासाठी मी या क्षेत्रात आलेलो नाहीये असं मला वाटतं. माझ्या शिक्षणाचा,माझ्या वाचनाचा आणि मी जे काही आतापर्यंत बघितलं आहे किंवा शिकलो आहे त्याचा उपयोग व्हावा आणि त्यातून काही तरी चांगलं करता यावं म्हणून मी नेहमीच प्रयत्न करत असतो.

तुझ्या आगामी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाबाबत तू काय सांगशील?

- लाईक आणि सबस्क्राईब हा आजच्या सोशल मीडियाच्या काळातील चित्रपट आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही जीवन जगतोय त्यात अचानक अनपेक्षित घटना घडल्यानंतर काय होतं आणि या सोशल मीडियामध्ये गुंतलेली लोक कशा पद्धतीने या परिस्थितीला सामोरं जातात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. याची कथा खूप छान लिहिली गेली आहे. अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, श्रीकांत यादव यांच्यासारखे उत्तम कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत. इतर भाषांमध्ये आपण खूप मर्डर मिस्ट्रीचे चित्रपट पाहतो. पण मराठीमध्ये असे चित्रपट फार कमी प्रमाणात येतात. हा चित्रपट ओरिजनल आहे म्हणजे कुठल्याही चित्रपटाच्या कथेच्या आधारावर हा चित्रपट केलेला नाहीये. मराठीमध्ये वेगळ्या धाटणीचं काही पाहायला मिळत नाही अशी काही जणांची तक्रार असते. त्यांच्यासाठी हा चित्रपट मेजवानी असणार आहे असं मला वाटतं.

मराठीमध्ये एक प्रकारचे कॅम्प निर्माण झाले आहेत. एखाद्या विशिष्ट संगीतकार वा गायक आणि कलाकार यांच्याबरोबरच काम केले जाते असे चित्र दिसते. याबाबतीत तुझे मत काय?

- कुठलीही कलाकृती करताना टीम महत्त्वाची असते. जेव्हा ती टीम एकत्र येते आणि मेहनत घेऊन एकमेकांच्या सल्ला व सहमतीने कलाकृती तयार करते तेव्हा ती कलाकृती निश्चितच चांगली होते. त्यामुळे त्या संपूर्ण टीममध्ये एक प्रकारचं बाॅण्डिग तयार होते आणि तीच टीम जेव्हा दुसऱ्या प्रोजेक्टला पुन्हा एकत्र येते तेव्हा काही जण त्याला कॅम्प म्हणतात. परंतु ते चुकीचे आहे. कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कम्फर्ट झोन तयार झालेला असतो आणि त्यामुळे काम करताना अधिक सोपे होते. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक कॅम्प नसून ते एक कुटुंब तयार होतं आणि आपल्याच कुटुंबासोबत काम करणं ही काही वाईट गोष्ट नाही. त्याचा अर्थ असा नाही की आपण इतर कोणासोबतही काम करू नये किंवा जे काम इतर कोणासोबत केलेलं आहे ते यशस्वी होत नाही. पण आपल्या माणसाला माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे. त्यांच्यासोबत आपण कंफर्टेबल असतो म्हणून पुन्हा पुन्हा त्याचं मंडळीसोबत काम केलं जातं असं मला वाटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Case: ''त्या' ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप झाला नव्हता'', CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर

Latest Maharashtra News Updates : आम्ही लेहहून पायी आलो तरीही अद्याप नेत्यांसोबत बैठक निश्चित नाही : सोनम वांगचुक

Navratri 2024: नवरात्रीत 9 दिवस उपवास करणाऱ्यांना मिळतात ढिगभर फायदे, वाचाल तर तुम्हीही कराल उपास

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी खेळाडूंची काय ही दशा! १९७१ नंतर इंग्लंडविरुद्ध कसोटीत करता आला नव्हता ‘हा’ पराक्रम, पण आज...

Share Market Closing: शेअर बाजारात विक्री सुरुच; सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण, मिडकॅप निर्देशांक 1100 अंकांनी खाली

SCROLL FOR NEXT