cyber crime E sakal
प्रीमियम आर्टिकल

Cyber Crime:‘सायबर स्मार्ट’ होण्याचे भान देणारे ‘सायबर ॲटॅक’

सकाळ डिजिटल टीम

नेहा लिमये

अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सर्वसामान्य माणूस अगदी सहजपणे सायबर गुन्हेगारांच्या फसव्या क्लृप्त्यांना बळी पडत आहे.

त्यांना अशा गुन्हेगारांपासून वाचवण्याच्या उद्देशाने, जागरूक करण्याच्या हेतूने डॉ. संजय तुंगार आणि सुधीर साबळे या लेखकद्वयीने ‘सायबर ॲटॅक’ (‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा’) हे पुस्तक लिहिले आहे.

राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. मोह-मायेची परिसीमा गाठणाऱ्या आभासी जगतात स्व-भान सतत जागृत ठेवणे हे पुढल्या काळातले सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी असे मार्गदर्शक पुस्तक प्रत्येकाने वाचणे गरजेचे आहे.

‘ये मोह मोह के धागे, तेरी उंगलियोंसे जा उलझे..’ हे गाणे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आहे. ‘सायबर’ नावाच्या आपल्या प्रिय सख्याच्या ‘मोहा’तही आपली बोटे अशीच गुंतलेली असतात.

हे धागे आपल्याला बँकिंग, शॉपिंग, डेटिंग, मनोरंजन अशा वेगवेगळ्या दालनात सतत घेऊन जात असतात. ‘पासवर्ड’ आणि ‘ओटीपी’नामक मंत्र आधुनिक ‘खुल जा सीम सीम’चे काम करतात.

त्यांच्यामुळे ही दालने चुटकीसरशी उघडतात आणि आपण त्यात अधिकाधिक रमू लागतो. आपले ‘डिजिटल फूटप्रिंट्स’ सगळीकडे खुशाल सोडत राहतो. हे बिनचेहऱ्याचे मोहजाल म्हणजे जणू मयसभाच हे विसरतो.

जरा दुर्लक्ष झाले, कोठे थांबायचे किंवा कोणत्या गल्लीत वळायचे नाही, हे माहिती नसेल, तर त्याच धाग्यांचा होतो गुंता आणि आपला होतो दुर्योधन.

मग हा ‘सायबर’ नावाचा सखा राक्षस होतो आणि आपल्या पैशावर, प्रतिष्ठेवर, अगदी अस्तित्वावरच ‘ॲटॅक’ करतो.

आभासी जगतात वावरताना अशा अनेक प्रकारच्या लढाया आपल्या उंबऱ्यावर येऊन कधी ठेपतील, आपल्यावर कधी, कोठून, कसा हल्ला होईल सांगता येत नाही.

हा हल्ला वेळीच परतवून लावता आला तर? किंवा टाळायचा असेल तर? आणि झालाच तर पुढे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर डॉ. संजय तुंगार आणि सुधीर साबळे या लेखकद्वयीने लिहिलेले, राजहंसने प्रकाशित केलेले ‘सायबर ॲटॅक’ (‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा’) हे पुस्तक वाचायलाच हवे.

डॉ. संजय तुंगार पुणे पोलिसांच्या सायबर शाखेतले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तर सुधीर साबळे हे अनुभवी पत्रकार. आपापल्या क्षेत्रात मुरलेल्या या लेखकद्वयींच्या अनुभवातून, प्रयत्नातून हे पुस्तक आकाराला आले आहे.

त्यामुळे सायबर स्पेसशी ‘छत्तीस गुण’ जुळावे वाटत असतील, तर या पुस्तकातली छोटी-छोटी ३६ प्रकरणे पुन्हा पुन्हा वाचावीत. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड (इनव्हॉइस, करन्सी, डेबिट कार्ड क्लोनिंग, सीम बॉक्स, वेबसाइट वगैरे) तसेच फिशिंग, गेमिंग, धर्मांतराच्या नावाखाली होणारी फसवणूक, सायबर दहशतवाद यावर हे पुस्तक नेमकेपणानं बोट ठेवते.

हनी ट्रॅप, सेक्सटॉर्शन, टिंडर ट्रॅपसारखे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणायच्या उद्देशाने केले जाणारे प्रयत्न हे ही सविस्तरपणे येते. खरंतर या लेखांना प्रकरण (!) न म्हणता छोट्या-छोट्या गोष्टीच म्हणायला हवे.

अतिशय सोप्या भाषेत, रोजच्या व्यवहारातले शब्द वापरून, रंजकपणे या गोष्टी लिहिल्यामुळे पुस्तक कोठेही बोजड, कंटाळवाणे होत नाही.

शाळेच्या पाठ्यपुस्तकात असते त्याप्रमाणे प्रस्तुत गोष्ट कुठल्या ‘ॲटॅक’विषयी आहे, हे सुरुवातीला थोडक्यात सांगितले आहे.

त्यानंतर घडलेला प्रसंग, किस्से, कहाणी, अनुभव मांडला आहे. त्यामुळे वाचताना आपणही स्वतःला नकळत त्याजागी ठेवून बघतो.

अरे, हे तर आपल्या बाबतीतही घडू शकते किंवा जवळच्या कुणाच्यातरी बाबतीत अगदी असेच घडले होते, आपण थोडक्यात वाचलो बरे असे वाटून जातेच.

तत्क्षणी आपण मनाला एक इशारा देऊन टाकतो ‘जागते रहो’. नीलेश जाधव यांचे मुखपृष्ठही हेच ‘सांगते आहे’ असे वाटते. पुस्तकाची बांधणी, मांडणी यावर ‘राजहंसी’ मोहोर असल्यामुळे सुटसुटीतपणा, नेटकेपणा जाणवतो.

मला या पुस्तकाचे विशेष यासाठी वाटले, की फक्त गुन्हे मांडून, काय करा-काय नको एवढ्यावरच लेखक थांबलेले नाहीत.पुस्तकाच्या शेवटी तीन परिशिष्टे आहेत, पहिल्या परिशिष्टात सायबर गुन्ह्यांची आकडेवारी आहे.

दुसऱ्या परिशिष्टात डिजिटल आर्थिक व्यवहारात फसवणूक झाली, तर पैसे कसे परत मिळवायचे याबद्दल मार्गदर्शन आहे, तर तिसऱ्या परिशिष्टात माहिती तंत्रज्ञान कायद्यातल्या तरतुदीनुसार पोलिस तक्रार कशी करावी याचे नमुने, नुकसानभरपाई किती क्लेम करावी, याचा तक्ता असे उपयुक्त मार्गदर्शनही आहे.

सायबर ॲटॅक होतो तेव्हा तो आभासी जगातून झालेला असतो. समोरच्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला दिसतो तो फसवा असतो किंवा बरेचदा, तर चेहराच नसतो. तसा फक्त भास निर्माण करण्यात येतो.

आजकाल बोकाळलेले व्हॉटसॲप व्हिडिओ हॅकिंग किंवा झूम मीटिंगमध्ये तिसऱ्याच व्यक्तीने येऊन आक्षेपार्ह कृती, संदेशवहन करणे ही त्याचीच उदाहरणे. तंत्रज्ञान जितके पुढे जाईल, तितकेच गुन्ह्यांचेही नवनवे प्रकार समोर येत राहणार.

त्यासाठी आपल्याला ‘ॲटॅक’ची सवय करून घ्यायला लागणार आहे आणि म्हणूनच ‘सायबर स्मार्ट’ होणे अत्यावश्यक आहे.

समाजमाध्यमांवर वावरताना, लिहिताना, फोटो किंवा व्हिडिओ, लोकेशन टाकताना, एवढेच काय कमेंट करताना, दुजोरा देताना काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

याला म्हणतात ‘नेटिकेट्स’. याचाही ऊहापोह लेखकांनी ‘सायबर स्मार्ट व्हा’ या प्रकरणात केला आहे.

नुकतेच ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणे गाजत आहेत. पोलिस कमिशनरची (नकली) मोहर असलेले, सरकारी अधिकारी, खात्यांचे सील असलेले ई-मेल येते.

त्यात तुमच्यावर बाललैंगिक शोषणाचे आरोप लावलेले असतात. तुम्ही घाबरून जाऊन संपर्क साधलात, की अमुक लाख द्या, म्हणजे पुढची कारवाई टळेल सांगण्यात येते आणि तुम्ही फसता. याच्या कितीतरी केसेस अजूनही चालू आहेत.

सरकारकडून खास परिपत्रक काढून नागरिकांना या ‘फेक’ ई-मेल संदर्भात जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशा पार्श्वभूमीवर मराठीत या विषयावरचे पुस्तक यावे ही फार चांगली गोष्ट आहे. त्यातही पुस्तकाचे लेखक आपले संरक्षक आणि दुसरे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी काम करणारे असावेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. ॉ

आपल्या अनुभवाचा, कार्यक्षेत्राचा पुरेपूर उपयोग वाचकांना व्हावा, त्यांनी अधिक सजग असावे, सायबर युद्धासाठी सज्ज असावे यासाठीची त्यांची तळमळ आपल्यापर्यंत पुस्तकातून पोहोचतेच.

पुस्तकाची अर्पणपत्रिकाच मुळी ‘अनाम सायबर योद्ध्यांना’ समर्पित केलेली आहे. परंतु, हे पुस्तक नुसते वाचून सोडून देण्याचे नाही, तर त्यातून धडे घेऊन प्रत्यक्षात अमलात आणायचे आहे.

मोह-मायेची परिसीमा गाठणाऱ्या आभासी जगतात स्व-भान सतत जागृत ठेवणे हे पुढल्या काळातले सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे.

त्यासाठी अशी मार्गदर्शक पुस्तके यायला हवीत. त्यांचे पुढे ऑडिओ बुक, पॉडकास्टही व्हावे, जेणेकरून हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. बोरसे म्हणतात तसे ‘या सर्वभक्षी तक्षकाविरुद्धचे सायबर युद्ध तुम्हा-आम्हा, सगळ्यांना मिळून लढायचे आहे’. त्याची सुरुवात हे पुस्तक वाचून नक्कीच करता येईल!

(लेखिका कंपनी सेक्रेटरी- सीएस आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: विधानसभेआधी शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, अजितदादांचं टेन्शन वाढणार!

मजुराच्या पोटी जन्म, मेहनतीने राजकारणात नाव कमावलं, आता बनले श्रीलंकेचे राष्ट्रपती, कोण आहेत अनुरा कुमारा दिसानायके?

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

Latest Maharashtra News Live Updates: वेस्टर्न रेल्वेवर 23 आणि 24 सप्टेंबरला ब्लॉक

Buldhana Accident : सिमेंटचे खांब घेऊन जाताना काळाचा घाला! ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; दोन मजूर ठार,तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT