Investment plan for future esakal
प्रीमियम अर्थ

२०५० पर्यंत देशातील एवढी टक्के जनता होणार वृद्ध.. तुम्ही सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन केले का?

सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन गरजेचे

सकाळ डिजिटल टीम

सेक्शन : आर्थिक नियोजन
लेखिका : भावना वर्मा

सध्या आपला देश जगातील सर्वांधिक तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक बाबतीत आपल्याला त्याचा लाभ घेता येत आहे, मात्र, त्याचवेळी कालांतराने वृद्धांची संख्याही वाढणार आहे, हेदेखील लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

आणखी काही वर्षांनी जेव्हा ही तरुणाई वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर पोचेल, तेव्हा महागाई, वाढते खर्च लक्षात घेऊन, त्यांनी आतापासूनच त्यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. नि‍वृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्टया सुदृढ राखण्यासाठी लवकरात लवकर आर्थिक नियोजन करणे आवश्‍यक आहे.

आपल्या देशाची लोकसंख्या अफाट आहे. या अवाढव्य लोकसंख्येमुळे होणारा लाभदेखील सर्वांना माहित आहे. देशातील सुमारे ६७ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वर्षे वयोगटातील असून, देशाच्या नागरिकांचे सरासरी वय २८.४ वर्षे आहे.

(संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या आकडेवारीनुसार) या संभाव्य कार्यबलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आपल्याला स्पर्धात्मक फायदा मिळतो आणि देशांतर्गत एक मोठी ग्राहक बाजारपेठदेखील उपलब्ध होते. परंतु, या आकडेवारीतून एक तितकीच महत्त्वपूर्ण बाब पुढे येते, ती म्हणजे नजीकच्या भविष्यात भारतातील लोकसंख्येचा हाच मोठा भाग वृद्ध होणार आहे.

वर्ष २०५० पर्यंत, देशातील २० टक्के लोकसंख्या वृद्ध असेल. ही संख्या आजच्या लोकसंख्येमध्ये, जो वाटा आहे तिच्या दुप्पट आहे; तसेच भविष्यात अधिक लोक आरोग्यसेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. आज लोकांचे सरासरी आयुर्मान ७०.८ वर्षे आहे.

या आयुर्मानात सुधारणा होणे निश्चित आहे. शिवाय, आजार वेगाने वाढत आहेत. विशेषत: जीवनशैलीशी संबंधित गैर-संसर्गजन्य आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. मधुमेहाची राजधानी म्हणून भारताची जगभरात ओळख आहे.

या पार्श्‍वभूमीवर, विमातज्ज्ञ म्हणून, मला वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या वाटते, की विम्याची गरज सर्वांनाच आहे. वरील आकडेवारीवरून हा विश्वास दृढ होतो. परंतु, यातून आर्थिकदृष्ट्या सशक्त भविष्य उभारण्यासाठी आणि ते सुरक्षित करण्यासाठी सेवानिवृत्तीच्या नियोजनाचे महत्त्वदेखील स्पष्ट होते.

भविष्याचा विचार करा!
सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन गरजेचे आहे. येथेच अर्थशास्त्र आणि वैयक्तिक आर्थिक उत्पन्नाचा मेळ घातला जातो.

सेवानिवृत्ती नियोजनाचे फायदे केवळ पैशापुरते मर्यादित नाहीत, तर लवकर निवृत्त होणे, आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि आपल्या प्रियजनांचे कल्याण सुनिश्चित करणे हेदेखील याचे काही लाभ आहेत.

लवकर निवृत्त होणे : सेवानिवृत्ती नियोजनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लवकर निवृत्तीची संधी. विचार करा, की लवकर निवृत्त झाल्यास तुम्ही ५८-६० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला दैनंदिन कामाचे रूटीन फॉलो करण्याची गरज नाही.

तुम्हाला दैनंदिन कामाच्या पलीकडे तुमच्या वेळेचा आनंद घेण्यासाठीदेखील वयाची ६० वर्षे गाठण्याची गरज नाही. योग्य सेवानिवृत्ती योजना असल्यास तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीचे वय निवडू शकता. तुम्हाला तुमची आवड जोपासण्याचे स्वातंत्र्य मिळते.

प्रवास करणे असो, व्यवसाय सुरू करणे असो किंवा छंद जोपासणे असो, योग्य योजना असल्यास तुम्ही तुमच्या आकांक्षा साध्य करू शकता. त्यासोबतच तुमच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण होते.

आर्थिक स्वातंत्र्य : सेवानिवृत्ती योजना विचारपूर्वक तयार केल्यास तुम्ही स्वतंत्र राहू शकता. तुम्ही काम करणे बंद केल्यानंतर तुमच्या कुटुंबावर, विशेषत: तुमच्या मुलांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. हे विशेष महत्त्वाचे आहे; कारण कुटुंबाचा आकार लहान होत आहे.

जीवनशैली सांभाळणे : सेवानिवृत्तीचा जीवनशैलीवर होणारा परिणाम अनेकदा विचारात घेतला जात नाही. सेवानिवृत्तीनंतरच्या उत्पन्नामध्ये आणि तुमच्या पगारामध्ये खूप फरक असतो.

वाढत्या महागाईमुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो; ती कमी होत जाईल आणि राहणीमानाचा खर्च वाढतच जाईल.

माझ्या निरीक्षणानुसार, उत्तम सेवानिवृत्ती योजना तयार करताना महागाईचा प्रभाव अनेकदा कमी गृहीत धरला जातो.

त्यामुळे तुम्हाला ज्या जीवनशैलीची सवय असते, ती नंतरच्या वर्षांत तुम्हाला टिकवून ठेवता येत नाही; पण तुमची जीवनशैली टिकवून ठेवणारी सेवानिवृत्ती योजना असल्यास तुम्हाला त्याचा लाभ मिळेल.

वैद्यकीय आणि संबंधित खर्च : तुमचे वय वाढत जाते, तसा तुमचा वैद्यकीय खर्च वाढण्याची शक्यता असते. भक्कम सेवानिवृत्ती योजना असल्यास या संभाव्य आरोग्यसेवा खर्चांना तोंड देण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक साधन असल्याचे सुनिश्चित होते.

त्यासोबतच अशा योजनेत तुमच्याकडे समर्पित साह्याची (डेडिकेटेड असिस्टन्स) गरज पूर्ण करण्याचेदेखील आर्थिक बळ असल्याचे सुनिश्चित होते.

वैविध्यपूर्ण उत्पन्न स्रोत : सेवानिवृत्ती नियोजनामुळे उत्पन्नाचे विविधीकरण (डायव्हर्सिफिकेशन) होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी नियोजन करू शकता; तसेच तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा निधी उपलब्ध असल्याचे सुनिश्चित होते. सशक्त उत्त्पन्नासाठी नियोजन लवकर करणे.

सेवानिवृत्तीच्या उद्दिष्टांबाबत लवकर निर्णय घ्यावा. योग्य आर्थिक निर्णयांसाठी ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे बचत अधिक सोपी बनते आणि ती व्यवस्थापित करता येते. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकी तुमची निवृत्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल.

तुमच्या सेवानिवृत्तीची योजना करण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी काही निवडू शकता. ती पेन्शन योजना असू शकते किंवा वार्षिकी (अॅन्युइटी) योजना असू शकते. या योजना तुम्हाला तुम्ही निवृत्त झाल्यानंतर हमी उत्पन्न देतील.

आयुर्विमा कंपन्यांद्वारे दोन प्रमुख प्रकारच्या वार्षिकी योजना दिल्या जातात.

१. तत्काळ वार्षिकी योजना (इमिजिएट अॅन्युइटी प्लॅन) ः या योजनेत सेवानिवृत्ती होते तेव्हा निधी उपलब्ध असतो. भविष्यनिर्वाह निधीसारख्या पर्यायांद्वारे यात गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेत एकरकमी रक्कम परिवर्तित केली जाते आणि आजीवन उत्पन्न म्हणून दिली जाते.
२. स्थगित वार्षिकी योजना (डिफर्ड अॅन्युइटी प्लॅन) ः या योजनेत तुम्ही ठराविक वर्षांसाठी प्रीमियम भरता आणि उत्पन्नाचे फायदे नंतर सुरू होतात. हे लाभ सामान्यपणे सेवानिवृत्तीच्या वयाच्या जवळपास मिळणे सुरू होतात.
इतर गुंतवणूक पर्यायही उपलब्ध

दोन्ही प्रकारच्या वार्षिकी योजना आजीवन उत्पन्नासाठी दिल्या जातात. त्यात अनेक प्रकार असतात; तसेच त्या प्रीमियमच्या रिटर्नसह किंवा रिटर्नविना असतात. त्या एकल किंवा संयुक्त (जॉइंट) असतात. आजचे युग हे वाढत्या दीर्घायुष्याचे युग आहे.

अशा युगात या खात्रीशीर उत्पनाच्या प्रवाहाचे मूल्य खूप जास्त आहे. सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) सेवानिवृत्तीचे नियोजन सोपे करते. याचे कारण म्हणजे ती १८ ते ७० वर्षे वयोगटातील पगारदार आणि पगार नसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी खुली आहे; तसेच आपण ती रक्कम कुठेही गुंतवू शकतो.

अशा प्रकारे ती गुंतवणूक पर्यायांमध्ये लवचिकता देते. निवृत्तीनंतर, ‘एनपीएस’ गुंतवणूकदार त्यांच्या जमा झालेल्या निधीपैकी ६० टक्के रक्कम एकरकमी म्हणून काढू शकतो आणि उर्वरित रक्कम वार्षिक उत्पन्नासाठी वापरली जाऊ शकते.

भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला इतर गुंतवणूक पर्यायही उपलब्ध आहेत. त्यात बँक ठेवी, शेअर, म्युच्युअल फंड, सुवर्ण रोखे आणि रिअल इस्टेट यांचा समावेश होतो.

तुम्ही कोणताही मार्ग निवडला, तरी त्याची सखोल माहिती घ्या, त्याची इतर पर्यायांशी व्यवस्थित तुलना करा आणि मगच निर्णय घ्या.

अधिक सुरक्षित आणि परिपूर्ण सेवानिवृत्तीसाठी आताच नियोजन सुरू करा, कारण वर्तमान वेळ हीच सर्वांत उत्तम वेळ असते.

तुम्ही पुढे भविष्यात जेव्हा मागे वळून पाहाल; तेव्हा तुम्ही आता दाखवलेल्या तुमच्या आर्थिक शहाणपणाबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल तुमचे स्वतःचे आभार मानाल.

(लेखिका इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनीतील विमातज्ज्ञ आहेत.)
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT