Learn investment planning from Chhatrapati Shivaji Maharaj  Sakal
प्रीमियम अर्थ

Investment Planning: छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका गुंतवणूकीचे अर्थशास्त्र; असे करा जमा खर्चाचे नियोजन

Investment Planning: छत्रपती शिवाजी महाराज बहुतेकांना माहिती असतात ते त्यांच्या युद्धकौशल्यामुळे. त्यामुळे साहजिकच बहुतेकांची मजल अफजलखान आणि शाहिस्तेखान यांच्यापलीकडे जात नाही. परंतु, याच्यापलीकडे महाराजांकडे विविध इतर गुण सुद्धा होते.

सकाळ डिजिटल टीम

- सुहास राजदेरकर

छत्रपती शिवाजी महाराज बहुतेकांना माहिती असतात ते त्यांच्या युद्धकौशल्यामुळे. त्यामुळे साहजिकच बहुतेकांची मजल अफजलखान आणि शाहिस्तेखान यांच्यापलीकडे जात नाही. परंतु, याच्यापलीकडे महाराजांकडे विविध इतर गुण सुद्धा होते. धर्म, जात, भाषा यामध्ये भेदभाव न करता सर्वांसाठी एकच न्याय करण्याची वृत्ती, प्रशासकीय; तसेच सेना कौशल्य. याचबरोबर त्यांना उत्तम जाण होती ती वित्त आणि अर्थशास्त्राची.

मर्यादित साधनसंपत्तीचा सुयोग्य विनियोग करणे हिताचे ठरेल याचे त्यांना भान होते. प्रजेच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या भरभराटीची आणि उत्कर्षाची सुद्धा महाराजांना काळजी होती. आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी अर्थात मुघलांचा बिमोड करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरिता पैसे लागणार हे त्यांनी खूप आधीच ओळखले होते.

परंतु, पैसे गोळा करण्याच्या बरोबरीने सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आलेले पैसे प्रजेच्या सुखासाठी खर्च करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. कर आणि इतर मार्गांनी जमा होत असलेले पैसे कशासाठी खर्च केले पाहिजेत आणि ते कोठे खर्च केले म्हणजे ती एक चांगली गुंतवणूक होऊन राज्याची भरभराट होईल हे त्यांना माहिती होते.

म्हणूनच, जमा होत असलेले पैसे त्यांनी रस्ते, बंदरे, गड-किल्ले यांवर खर्च केले; ज्यामुळे व्यापार आणि दळणवळण वाढले व सोपे झाले. ज्या गोष्टींचे बीज महाराजांनी त्याकाळी रोवली, त्या सर्व गोष्टींचे महत्त्व आजही आपण चांगलेच जाणतो.

आम्ही केलेले १००० गुंतवणूकदारांचे सर्वेक्षण; तसेच आमचा मागील २५ वर्षांचा अनुभव असे सांगतो, की गुंतवणूकदारांना फक्त सल्ला दिला, की गुंतवणुकीला सुरुवात लवकर करा, आर्थिक नियोजन करा किंवा एका उद्दिष्टसाठी साठलेले पैसे दुसरीकडे वापरू नका, तर ते तसे पाळतीलच असे नाही. परंतु त्यांना तीच गोष्ट जर गणपती, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले देऊन (कोरिलेट करून) सांगितले तर त्यांना ते पटते, त्यांच्या ते लक्षात राहते आणि त्याची ते व्यवस्थित अंमलबजावणी करतात.

म्हणूनच आपण ‘सकाळ मनी’ मासिकातून या आधी, गणपती आणि श्रीकृष्ण यांचे दाखले देऊन ते आपल्याला गुंतवणुकीसाठी काय शिकवितात ते पाहिले. येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महारांजांची जयंती आहे. महाराष्ट्रात, शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या एका थोर व्यक्तिमत्वाची आपल्याला गुंतवणुकीसाठी काय मदत होऊ शकते ते पाहू या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत, की महाराजांची राज्य करण्याची पद्धत, प्रजेप्रती असलेली आस्था आणि गुंतवणूक यांचा कसा मेळ आहे आणि त्यातून आपण आपली गुंतवणूक अधिकच कशी समृद्ध करू शकतो.

चतुर, विद्वान, पराक्रमी, धाडसी असलेले आपले लाडके राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आपल्याला फक्त धर्म, राजकारण, युद्धकला, गनिमी कावा आणि व्यवस्थापन यामध्येच पारंगत करीत नाही, तर गुंतागुंतीचा गुंतवणूक विषयसुद्धा अतिशय सोपा करून सांगते. कसे ते पाहू या.

१. लहान वयात मोठी स्वप्ने अर्थात गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा: प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफेट यांनी त्यांच्या गुंतवणुकीची सुरुवात त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षांपासून केली. त्याचप्रमाणे महाराजांना लहान वयात मोठी स्वप्न पाहण्यासाठी त्यांच्या आईने, जिजाऊ मातेने त्यांना प्रेरित केले. मुघलांच्या अत्याचाराला चिडून आणि कंटाळून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न महाराजांनी लहान वयातच पहिले.

शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी १६४६ मध्ये, रोहिडेश्वरावर स्वराज्याची शप्पथ घेऊन, सर्वप्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांची सुरुवात केली. त्यावेळी महाराजांचे वय होते अवघे १६ वर्षे. ‘तू अजून लहान आहेस, मोठा होशील तेव्हा गड, किल्ले, युद्ध आणि स्वराज्य यांचा विचार कर,’ असे जर का त्यांच्या आईने त्यांना शिकविले असते तर कदाचित इतिहास वेगळा दिसला असता.

त्याचप्रमाणे मुलांना त्यांच्या लहान वयातच गुंतवणूक म्हणजे काय, ती कशासाठी आवश्यक असते ते सविस्तर समजावणे हे प्रत्येक सुजाण पालकांचे; तसेच शिक्षकांचे कर्तव्यच आहे. ‘तू कमवायला लागशील तेव्हा विचार कर’, असे मुलांना सांगितले तर फार उशीर झालेला असेल.

त्यामुळेच कदाचित, आजही बहुतेक मुलांना ‘उत्पन्न वजा गुंतवणूक म्हणजे खर्च’ हे माहिती नसते आणि त्यांचे बहुतेक पैसे हे अनाठायी गोष्टींसाठी खर्च होतांना दिसतात. आर्थिक नियोजन लवकर करून गुंतवणूक जितकी लवकर सुरु कराल तेवढा अधिक फायदा. पुढील दोन उदाहरणे हा मुद्दा व्यवस्थित समजावून देतील.

२. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’, अर्थात लक्ष्य ठरवा आणि बदलू नका : महाराजांनी जेव्हा अफजलखानाला भेटायला जायचे ठरविले तेव्हा त्यांना त्यांच्याबरोबर एक सहकारी आणायला परवानगी होती. त्यांनी जिवा महाला या अत्यंत आज्ञाधारक, विश्वासू आणि धाडसी सहकाऱ्याची निवड केली.

याचे कारण म्हणजे त्यांना माहिती होते की महाराज जे सांगतील ते जिवा तंतोतंत पाळेल आणि झालेही तसेच. जसे महाराजांनी आपल्याबरोबर जिवा या साथीदाराला घेतले; तसेच अफजलखानाने सुद्धा सय्यद बंडा या त्याच्या क्रूर सहकाऱ्याची निवड केली.

जेव्हा अफजलखान आणि महाराजांची झटापट झाली, तेव्हा सय्यद बंडाने महारांजांवर तलवारीने वार केला, परंतु महाराजांनी बजावल्याप्रमाणे जिवा महालाचे संपूर्ण लक्ष सय्यदकडेच असल्याने त्याने चपळाईने त्याचा हात आपल्याकडील दांडपट्याने वरच्यावर कापून महाराजांचे प्राण वाचविले.

महाराजांनी भेटीला निघताना जिवा महाला याला सांगितले होते, की तुझे काम आहे की फक्त अफजलखानाच्या सहकाऱ्यावर लक्ष ठेवणे. त्याला बजावले होते की काहीही झाले तरी सय्यद बंडावरची नजर हलू द्यायची नाही. मला काहीही झाले तरीसुद्धा तू सय्यद बंडाकडेच पाहायचे आहेस.

अगदी याचप्रमाणे, आपल्या आर्थिक नियोजनामध्ये आपण आपली विविध उद्दिष्ट्ये ठरवितो. जसे, की मुलीचे शिक्षण. या लक्ष्याकडे बारीक नजर ठेऊन त्यावरील नजर हलू द्यायची नाही. म्हणजेच, या उद्दिष्टाकरिता जी गुंतवणूक केली आहे किंवा करीत आहात, त्याचे साठलेले पैसे दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरायचे नाहीत.

आमचा अनुभव असे सांगतो, की मुलीच्या शिक्षणाचे लक्ष्य ठेऊन गुंतवणुकीची सुरुवात तर केली जाते, परंतु, काही काळाने त्यातील साठलेले पैसे हे चारचाकी गाडी घेणे, घर घेणे, सहलीला जाणे आदींसाठी सर्रास वापरले जातात. त्याने पुढील शिक्षणासाठी पुरेसे पैसे साठत नाहीत आणि मुलगी हुशार असूनसुद्धा तिला पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

३. काळाची पावले ओळखा, दूरदृष्टी ठेवाः एखाद्या गोष्टीचे महत्त्व वेळीच अर्थात काळाच्या आधी ओळखणे हे महाराजांना चांगलेच जमले होते. शत्रू समुद्रमार्गे शिरकाव करून हल्ला चढवू शकतो हे त्यांनी वेळीच ओळखून, सागरी किल्ले आणि आरमाराची चोख व्यवस्था केली होती. मुरुड-जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कोळबा दुर्ग, अंधेरी दुर्ग, पदमदुर्ग ही त्याची काही उदाहरणे आहेत. सर्जा कोट, मदन दुर्ग, राजकोट, खांदेरी-उंदेरी ही जलदुर्ग त्यांनी बांधून घेतली.

त्यामुळे त्यांना ‘द फादर ऑफ इंडियन नेव्ही’ असे म्हटले जायचे. एखाद्या गोष्टीचे महत्त्व वेळीच ओळखणे जसे राज्यकर्त्यांना महत्त्वाचे आहे; तसेच ते गुंतवणुकीमध्येसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी ज्यांनी म्युच्युअल फंड आणि त्यातील ‘एसआयपी’ पद्धतीचे महत्त्व ओळखले, त्यांची आज चांदी झालेली दिसून येते. अर्थात त्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळाला आणि मिळतो आहे.

४. बहिर्जी नाईक आणि मार्केट इंटेलिजन्स अर्थात बाजारातील माहितीः महाराजांनी बहिर्जी नाईक यांच्यासारखे अनेक गुप्तहेर तयार केले. ज्यांचे काम होते की शत्रूच्या गोटातील माहिती काढणे, तसेच आपल्या प्रजेला नक्की काय खुपते आहे ते माहिती करून घेणे; ज्यामुळे सुधारणा करता येईल. यामुळेच, अनेक वेळा महाराजांचा आणि रयतेचा फायदाच झाला. गुंतवणुकीमध्ये सुद्धा तुमची चाणाक्ष नजर बाजारातील प्रत्येक हालचालीवर तसेच कंपन्यांवर पाहिजे.

‘बाय ऑन रुमर्स अँड सेल ऑन न्यूज’ अर्थात ऐकीव माहितीच्या आधारे खरेदी करा आणि पक्की बातमी आल्यावर विका. इतरांपेक्षा आधी मिळालेली अशी माहिती तुम्हाला त्या कंपनीचे शेअरभाव वाढण्यापूर्वी चांगल्या भावात खरेदी करायला मदत करेल. जसे, की कंपन्यांना मिळणाऱ्या ऑर्डर, होणारे विलीनीकरण, रेटिंगमध्ये होणारी सुधारणा, आदी. अर्थात तुमची खरेदी ही अंतर्गत-गुप्त माहिती (इन्साईड इन्फर्मेशन) कायद्याचा भंग करणारी नसावी.

५. हिरकणी आणि स्मॉल कॅप शेअरः प्रसिद्ध हिरकणीची गोष्ट आपल्याला गुंतवणुकीतील मोठा धडा देते. हिरा नावाची एक दूध विकणारी साधी बाई, जी रायगडावर दूध विकायला आलेली असताना उशीर होऊन गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे खाली असलेल्या तिच्या घराकडे जाऊ शकत नाही. परंतु, तिच्या लहान बाळाच्या ओढीने ती जिद्दीने जीवाची पर्वा न करता तो कठीण गड उतरून घरी जाते. शिवाजी महाराज तिला शिक्षा न करता तिच्या धाडसाचे कौतुक करतात आणि हिराची होते हिरकणी.

अनेक छोट्या माणसांमधील मोठे गुण वेळीच ओळखून महाराजांनी अनेका सर्वसामान्य लोकांना भालदार, चोपदार, किल्लेदार आणि प्रधान बनविले होते. त्याचप्रमाणे अनेक छोटे, स्मॉल कॅप शेअर आपल्याला कालांतराने मिड कॅप आणि लार्ज कॅप होताना दिसतात.

असे स्मॉल आणि मिड कॅप शेअर वेळीच ओळखून खरेदी केले तर कालांतराने त्यात मोठा फायदा होतो. परंतु, हे बोलणे जितके सोपे आहे तितके करणे कठीण. त्यामुळे अतिशय चांगला उपाय म्हणजे म्युच्युअल फंडांच्या स्मॉल कॅप; तसेच मिड कॅप योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे.

६. ‘तह’ आणि तोटा सहन करून शेअर विकणेः असे काही वेळा झाले, की महाराजांची ताकद औरंगजेबाच्या मोठ्या सैन्यापुढे कमी पडली. अशावेळी प्रजेचे नुकसान होऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून महाराजांनी ‘तह’ करणे पसंत केले आणि युद्ध थांबविले. त्याचप्रमाणे गुंतवणुकीत सुद्धा असे होऊ शकते, की एखाद्यावेळी तुमचा निर्णय चुकतो आणि घेतलेला शेअर किंवा योजना तोट्यात जाते.

अशावेळी चुकलेला निर्णय मान्य करून, ते शेअर विकणे योग्य ठरते. ज्यामुळे आलेले पैसे इतर चांगल्या शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवून आधी झालेला तोटा लवकर भरून काढता येतो.

७. अष्टप्रधान आणि गुंतवणूक सल्लागारः शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ‘अष्टप्रधान मंडळा’ची स्थापना केली. कारण त्यांनी हे जाणले की एक हाती कारभार आणि हुकूमशाही करण्यापेक्षा वेगवेगळ्या कामांकरिता हुशार आणि योग्य व्यक्तींची नेमणूक करून त्यांनी दिलेला निर्णय अमलात आणला तर प्रजेचे भले होईल.

गुंतवणुकीत तरी वेगळे काय अपेक्षित आहे? कोणालाही सर्वच गोष्टींचे ज्ञान असणे कठीण असते. तुमचा नोकरी धंदा आणि व्यवसाय वेगळा असतो किंवा तुम्हाला गुंतवणूक कोठे करावी, त्याचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी तज्ज्ञ आणि अनुभवी गुंतवणूक सल्लागाराची अर्थात मध्यस्थांची मदत घेणे केव्हाही योग्य ठरते.

तेव्हा मंडळी, वरील सात गोष्टी म्हणजेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, याप्रमाणे लक्षात ठेवाल आणि अमलात सुद्धा आणाल, याची खात्री बाळगतो.

(लेखक ए३एस फायनान्शिअल सोल्युशन्सचे प्रवर्तक आणि ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत. मोबाईल ९८२३६६६९१३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT