Indian Tea Esakal
प्रीमियम अर्थ

हो, चक्क १२,००० चवींचा चहा..! २०५१ कोटींच्या उद्योगात रूपांतर झालेले स्टार्टअप; ‘चायोस’ची स्फूर्तिदायी कहाणी

सकाळ डिजिटल टीम


डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com

नोकरीत रुळलेले, कंटाळलेले व असंतुष्ट असलेले अनेक तरुण, तरुणी, विशेष करून तरुण, ‘बस झाले, मला माझे स्वतःचे काहीतरी करायचे आहे.’ अशा घोषणा बरेचदा करत असतात.

मात्र अनेकदा हे ‘काहीतरी’ करायचे असे वाटणे इतके जोरदार नसते आणि असले तरी ‘काहीतरी’ म्हणजे नेमके काय, हेच समजत नसल्यामुळे किंवा सुचत नसल्यामुळे आणि अनेकांकडे सल्ल्यासाठी जाऊनसुद्धा सुचवले जात नसल्यामुळे, हे ‘काहीतरी’ केवळ मनातच राहाते. ज्याला त्या ‘काहीतरी’ची व्याख्या सुचते, समजते तो स्टार्ट-अप चालू करतो व उद्योजक बनतो. अशा ‘काहीतरी वेगळे’ करण्याच्या उर्मीतून निर्माण झालेल्या स्टार्ट-अपची ही यशोगाथा...


पीटर अन्द्रेयास थिल एक जर्मन-अमेरिकी अब्जाधीश, व्हेंचर कॅपिटॅलिस्ट, सुमारे ५५,५०० कोटी अमेरिकी डॉलर संपत्ती असलेला स्टार्ट-अपमधील जगातील एक सर्वोत्तम अधिकारीवाणीचा उद्योजक, सल्लागार म्हणून प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त आहे.

पीटर अन्द्रेयास थिलच्या मते, कोणतीही कंपनी सुरू करण्यासाठी विशिष्ट योग्य वेळ नाही, तर आपल्याकडे चांगल्या उद्योग कल्पनांचा ‘मगज’ म्हणजे इंग्रजीत ज्याला ‘कर्नल’ असे म्हणतात, तो महत्त्वाचा असतो.

एका आपल्या मुलाखतीत तो म्हणतो, ‘ट्विटर’ हे स्टार्ट-अप अॅप सुरूवातीला एक चक्क नशेचा पदार्थ होता, त्याचे सुरुवातीचे व्यवस्थापन वाईट असले, तरी मूलभूत कल्पना अप्रतिम होती आणि म्हणूनच या कल्पनेने त्या स्टार्ट-आपला तारले एवढेच नव्हे, तर प्रगतीपथावर नेले.

असा कल्पनांचा मधूर गर आपल्यात कसा उत्पन्न होणार, हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांनाच पडतो. अशा यशस्वी उद्योगांपर्यंत घेऊन जाणाऱ्या कल्पना सुचणे म्हणजे खूप कठीण असे सर्वांनाच वाटत असते आणि योग्य विचाराअभावी तसे ते कठीणच असते.

उद्योजकता, उद्योग, स्टार्ट-अप करता काहीतरी संशोधन, इनोव्हेशन, हटके अशी उद्योग कल्पना पाहिजे आणि ती सुचणे फारच कठीण असे सर्वांनाच वाटते आणि हे असे वाटणे हेच आपल्याला ‘काहीतरी’ करायचे आहे, यापासून परावृत्त करते.

खरेतर, इनोव्हेशन, नावीन्यपूर्ण, यशस्वी अशी उद्योगकल्पना आणि उद्योग सहज सुरू करता येतो. ‘इनोव्हेशन’ म्हणजे काहीतरी भयंकर, कठीण असेच आपल्या सर्वांना वाटते आणि म्हणूनच आपण काहीतरी नावीन्यपूर्ण करत नाही.

नावीन्य हे आपल्या विचारात, नजरेत असते. त्याकरिता गरज आहे, ती चौफेर लक्ष देण्याची, दिसणाऱ्या गोष्टींवर विचार करण्याची आणि नेमके तेच आपण करत नाही.


आपल्याला रस्त्यावर, चौकाचौकात अनेक चहा-कॉफीची अमृततुल्य दुकाने, टपऱ्या दिसतात. यात आपण काही इनोव्हेशन, नावीन्य आणू शकतो का? याचा आपण उद्योग सुरू करु शकतो का? असा विचार केला, तर बहुतेकांचे उत्तर नाही असेच येईल.

कारण चहाची टपरीच ती, ती काय उत्पन्न देणार? आणि त्यातून मोठा उद्योग कसा उभा राहणार? शक्यच नाही, असा विचार केल्याने पुढील विचार इथेच खुंटतात.

मात्र, जे आपल्या कल्पनांना मुक्त अवकाश देतात, प्रयत्नांना खतपाणी घालतात, ते नक्कीच वेगळे काहीतरी करून दाखवतात. याचेच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘चायोस’ची स्थापना करणारा स्टार्ट-अप उद्योजक नितीन सलुजा.

‘चायोस’ची मुहूर्तमेढ

व्यवसाय, उद्योगनेतृत्वाच्या गतिशील जगात अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्ती दृढनिश्चय आणि उद्योजकतेच्या अतिउत्कट भावनेने यशाचा मार्ग कोरत आहेत. ‘चायोस’ या स्टार्ट-अपची आणि त्याचा सह-संस्थापक नितीन सलुजा, याच्या प्रवासाची कहाणी याचे एक ज्वलंत उदाहरण आहे.

एका साध्या कल्पनेचे रूपांतर २०५१ कोटी रुपयांच्या मूल्याच्या, भरभराटीच्या उद्योगात करणे नक्कीच सर्वांसाठीच स्फूर्तिदायक आहे. हा आहे एक चहावर आधारित उद्योग आणि म्हणूनच याचे नाव आहे ‘चायोस’.

दिल्लीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या नितीनने आयआयटी, मुंबई येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले. यशस्वी कॉर्पोरेट कारकीर्द चांगली चाललेली असूनही, नितीनने उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले.

त्याच्या चहाच्या आवडीने आणि ‘थिंक लॅब्स’ या रोबोटिक्सवर आधारित शिक्षण कंपनीचा सह-संस्थापक म्हणून पूर्वानुभवामुळे ‘काहीतरी वेगळे’ करण्याच्या त्याच्या इच्छेला चालना मिळाली. त्याच्या उद्योगात उतरण्याच्या कल्पनेला त्याच्या वडिलांचा विरोध होता, त्यांच्या विरोधाला तोंड देत, नितीनने कॉलेजमधील वर्गमित्र राघव वर्मा याच्यासह एका नव्या उद्योगाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतला.

उद्योजकतेची बिनभरवशाची खेळी अगदी आत्मविश्वासाने, पूर्ण विचारपूर्वक खेळायची ठरवले. अयशस्वी झालो, तर हा विचारच त्याच्या मनाला स्पर्श करत नव्हता. नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांनी गुरुग्राममध्ये पहिले ‘चायोस’ कॅफे उघडले, म्हणजे चक्क अमृततुल्य भवन! आता ‘चायोस’चे २०० कॅफे आहेत.

जरा ‘हटके’ चहाने जिंकले मन...

‘चायोस’ची कल्पना अगदी साधी होती. चहाप्रेमींसाठी एक निवांत स्थान, जिथे त्यांच्या चहाच्या चवींचे चोचले पुरवले जातील. ‘चायोस’मध्ये सुमारे १२ हजारांहून अधिक विविध प्रकारच्या चवींचे चोचले पुरवले जातात.

हो, चक्क १२,००० चवी! हेच होते नवनिर्माण! आले, मसाला, गूळ याच्या पलीकडे त्याची कल्पकता भरारी घेत होती. ‘एक्सपरिमेंट्स विथ टी’ ही त्याची टॅगलाइन, म्हणजे त्याच्या उद्योगाला जोडले गेलेले वाक्य.

हे स्वीकारत ‘चायोस’ने पारंपरिक चहा अनुभवाची पुन्हा व्याख्या नव्याने केली. नितीनचे ध्येय नावीन्यपूर्णतेसह ऐतिहासिक चहा लोकांपर्यंत घेऊन जाणे हेच होते.

काहीतरी वेगळे, जरा हटके!
‘चायोस’चे जवळजवळ सर्व गंध, चवी खूप प्रसिद्ध झाल्या. ग्राहकांच्या अपेक्षा आणि व्यवस्थेची आव्हाने स्वीकारून सुरुवातीच्या अडथळ्यांसह, नितीनच्या चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने ‘चायोस’ला केवळ टिकवूनच ठेवले नाही, तर वाढविले.

खरेतर, इतक्या मोठ्या कठीण स्पर्धात्मक बाजारपेठेतदेखील उत्कृष्टता प्राप्त करणे म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार! ही खासीयत आहे ती नितीन आणि राघव यांच्या भट्टीत तयार झालेल्या चहाला चवीची सोबत देणारे अनोखे खाद्यपदार्थ.

इतर ठिकाणी चहाबरोबर क्रीम रोल किंवा नानकटाई मिळते; पण ‘चायोस’मध्ये मिळणारे थेपला टॅको आणि पालक पट्टा क्रिस्पीजसारखे नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ चहाची खुमारी वाढवतात.

नितीन सलुजा यांचा कॉर्पोरेट ते चायोसच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास उत्कटतेने, धडाडीने, नावीन्यपूर्णतेने मिळवता येणारे यश प्रतिबिंबित करतो.

‘मेरीवाली चाय’

मूळ कल्पना साधी असली, तरी एक अद्वितीय ग्राहक अनुभव प्रदान करण्याची वचनबद्धता हेच ‘चायोस’च्या यशाचे गमक आहे. स्टार्ट-अपच्या सतत बदलत असलेल्या वातावरणात पारंपरिक चहाच्या साध्या अनुभवाची नवी व्याख्या करून ‘चायोस’ या क्षेत्रात एक अद्वितीय स्पर्धक म्हणून उभा आहे.

२०१२ मध्ये सुरू झालेल्या ‘चायोस’ने चहाशौकिनांच्या वैविध्यपूर्ण रसनांची जाणीव ठेवून त्याची पूर्तता करण्यावर भर दिला आणि अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. नितिन सलुजाच्या मते, ग्राहकांचा अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे.

‘चायोस’ही तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार, प्राधान्यांनुसार चहाचे योग्य मिश्रण बनवून देते. ‘चायोस’च्या उल्लेखनीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ‘मेरीवाली चाय’ (माय टी) संकल्पना, जी ग्राहकांना चहाचा अर्क, गोडी आणि अतिरिक्त घटक निवडून त्यांचा चहा तयार करून देते.

गुणवत्तेशी बांधिलकी

स्टार्ट-अपचे यश त्याच्या गुणवत्तेशी असलेल्या बांधिलकीमध्येदेखील आहे. ‘चायोस’ उच्च-गुणवत्तेची चहाची पाने मिळवण्यावर आणि चहाच्या प्रादेशिक विविधतांचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण मेन्यू तयार करण्यावर भर देते.

क्लासिक मसाला चहापासून ते काश्मिरी कहावासारख्या मिश्रणापर्यंत वैविध्यपूर्ण मेन्यू ग्राहकांना दिला जातो. पारंपरिक चहाचे जतन आणि नावीन्यपूर्णतचे उत्कट दर्शन ‘चायोस’मध्ये घडते.

‘टायगर ग्लोबल’ या परदेशी गुंतवणूक कंपनीने जून २०२३ मध्ये ‘चायोस’मध्ये सुमारे ४५०० कोटी रुपये गुंतवले.

‘चायोस’ने २०२२ मध्ये १३५ कोटी रुपयांची उलाढाल केली, तर २०२३ मध्ये त्यात तब्बल ८५ टक्के वाढ नोंदवत, २५३ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल केली. अद्याप, नफ्यात नसलेल्या या उद्योगाची ही आकडेवारी आशादायक आहे. लवकरच हा उद्योग नफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

बदलत्या ग्राहकांच्या पसंतीशी जुळवून घेण्याची क्षमता ‘चायोस’च्या धोरणात्मक विस्तारामध्ये दिसून येते. भारतातील अनेक शहरांपर्यंत पोहोचून या साखळीने सर्वत्र आपला ठसा उमटविला आहे. हा विस्तार केवळ चहाच्या प्रेमामुळेच नव्हे, तर ‘चायोस’ आउटलेट्सच्या काळजीपूर्वक बनवलेल्या वातावरणामुळेदेखील झाला आहे.

चहाच्या आस्वादासाठी एक आरामदायक, समकालीन वातावरण उपलब्ध करून देते. कॉफीची फॅशन व वर्चस्व असलेल्या बाजारपेठेत, ‘चायोस’ने यशस्वीरित्या एक ब्रँड तयार केला आहे, जो भारताच्या चहा संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतो.

नितीन सलुजा यांची उद्योजकीय बुद्धिमत्ता आणि चहाचा अनोखा अनुभव देण्याची बांधिलकी यांनी ‘चायोस’च्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तुम्ही कॉफीप्रेमी असाल, तर तुमच्याकरता अशीच एका कॉफीच्या टपरीची यशस्वी कहाणीदेखील आहे!


(लेखक व्यवस्थापन, उद्योग, स्टार्ट-अप मार्गदर्शक आहेत. मोबाईल ९८२२४३६१३०)
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solar Storm: गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

SCROLL FOR NEXT