Budget 2024 Expert Opinion esakal
प्रीमियम अर्थ

अर्थसंकल्प २०२४: खिरापती नाही तर वर्षभराचे प्रिस्क्रिप्शन..?

अर्थसंकल्प ऐकल्यानंतर ‘एक चतुर नार...’ हेच विशेषण...

सकाळ डिजिटल टीम


भूषण महाजन
kreatwealth@gmail.com


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. तो ऐकल्यानंतर ‘एक चतुर नार...’ हेच विशेषण शोभून दिसेल, असे शेअर बाजाराचे ठाम मत आहे.

अर्थसंकल्पाच्या दिवशी गोंधळून किंचित खाली आलेला बाजार दुसऱ्याच दिवशी उसळला. पण दिवसअखेर नफावसुलीमुळे माफक प्रमाणात खालीही आला. २०२३-२४ च्या डिसेंबर तिमाहीचे ‘निफ्टी’मधील अनेक कंपन्यांचे निकाल हाती आले आहेत.

ते उत्साहवर्धक आहेत. पुढील वर्षाचा ‘निफ्टी’च्या ‘इपीएस’चा अंदाज १०३५ होता. (सर्व ५० शेअरची एकत्रित मिळकत) तो प्रत्यक्षात १०५० ते १०६० रुपये असू शकतो. आजच्या गुणोत्तरात (पीई २१.५ ते २२) ‘निफ्टी’ची चाल २२,५०० ते २३,००० अंशांपर्यंत जाऊ शकते.


एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचा हा अर्थसंकल्प असल्यामुळे त्यात भरपूर लोकानुनय करणाऱ्या खिरापती वाटल्या जातील, अशी सर्वसाधारण अपेक्षा व्यक्त केली जात होती.

त्यानुरूप टीकाकार सरसावलेच होते, पण त्यांची घोर निराशा करत अत्यंत चतुराईने हा अंतरिम किंवा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला गेला.

विश्वासार्ह अर्थसंकल्प

वजन कमी करण्यासाठी एखाद्याला हाय-प्रोटीन आहार द्यावा व त्याचबरोबर वर्षभराचा व्यायामही लिहून द्यावा, तसे प्रिस्क्रिप्शन अर्थमंत्र्यांनी लिहिले आहे. या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची विश्वासार्हता.

पायाभूत सुविधांवरील खर्च दरवर्षी वाढता आहे व त्याची तरतूद आता रु. अकरा लाख कोटींवर ठेवली आहे. २०२० च्या आधी, भांडवली खर्च जीडीपीच्या १.६ टक्के होता. गेल्या चार वर्षांत तो वाढीव जीडीपीच्या ३.४ टक्के दिसत आहे.

वित्तीय तुटीचा अंदाज पुढील वर्षीसाठी केवळ ५.१ टक्के आहे. (प्रत्यक्षात तो त्याहून कमी यावा.) चालू वर्षीची तूट अपेक्षेपेक्षा कमी येणार, असे दिसतेच आहे. अत्यंत कंबर कसून केलेला उत्पन्नाचा अंदाज व गेल्या तीन वर्षांचा प्रत्यक्ष इतिहास यामुळे अर्थसंकल्प अत्यंत विश्वासार्ह झाला आहे.

मजबूत करसंकलन
या वर्षीचे करसंकलन जोरदार झाले आहे व मागील वर्षाच्या तुलनेत पहिल्या नऊ महिन्यांत प्राप्तिकर संकलन २१ टक्क्यांनी वाढले आहे, जीएसटी संकलन १२ टक्के, तर इतर अप्रत्यक्ष कर संकलन ६ टक्क्यांवर गेले आहे.

या सर्व संकलनाचा पुढील वर्षीचा अंदाज फक्त ११ टक्के वाढवला आहे. गेली तीन वर्षे जीएसटीचा आकडा वाढतोच आहे, पण या वाढीव रकमेवर कदाचित पुन्हा १२ टक्के अधिक संकलन होणार नाही, असे गृहीतक असावे. म्हणजेच हा अंदाज अत्यंत हात राखून केलेला दिसतो. त्याचबरोबर खर्चही कमी होण्याचा अंदाज आहे.

खतावरील अंशदान कमी केलेले आहे; तसेच ‘मनरेगा’ची तरतूदही वाढवली नाही. पीएम किसान योजनेतील अनुदान ६००० रुपयांवरून किमान ८००० ते ९००० रुपये होईल, अशी अपेक्षा होती.

तिला पूर्ण चाट दिली आहे व ते ६००० रुपयांवर कायम ठेवले आहे. गेल्या तीन वर्षांत उत्पन्न वाढवणे व खर्च कमी करणे हे उद्दिष्ट सरकारने सतत साध्य केले आहे.

अनेक करदाते शून्य कर भरत असले तरी हे करजाळे विस्तृत होत चालले आहे. त्यातून नवे करसंकलन होईल, अशी अपेक्षा आहे. अतिरिक्त भरलेल्या कराचा परतावा अत्यंत जलद मिळत असल्यामुळे व करदायित्वाचे मूल्यांकन जलद होत असल्यामुळे कर भरणे सुलभ होत आहे. (सनदी लेखापालांचे काम जरी वाढत असले तरी...)

‘जीडीपी’वृद्धी साध्य होईल
या अर्थसंकल्पातील अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे कमी झालेला सरकारचा प्रस्तावित कर्ज उभारणीचा अंदाज. सरकारी रोख्यांच्या भांडवली बाजारात होणाऱ्या व्यवहारात तर व्याजदर किंचित कमी झालेले दिसतात.

महागाईदर व चलनवाढ आटोक्यात आली व सरकारने कर्जउभारणी कमी केल्यास बँकांना उद्योग/व्यवसायाच्या वाढत्या कर्जमागणीचा सामना करता येईल. गेल्या दहा वर्षांत उद्योगांच्या ताळेबंदात कर्जाचा वाटा या आर्थिक वर्षी सर्वांत कमी झाला आहे.

देशांतर्गत वाढत्या मागणीसाठी उद्योगांना कर्ज काढून उत्पादनक्षमता वाढवता येईल. हे ‘लिव्हरेज’ कंपन्यांची नफाक्षमता वाढवेल व ताळेबंद सशक्त असल्यामुळे बँकाही त्रासात येणार नाहीत. रोजगारनिर्मिती तर वाढेलच व त्याबरोबर ‘जीडीपी’वृद्धी साध्य होईल.

‘निफ्टी’ची चाल कशी असेल?
आता शेअर बाजाराकडे वळू. अर्थसंकल्पाच्या दिवशी गोंधळून किंचित खाली आलेला बाजार दुसऱ्याच दिवशी उसळला. पण दिवसअखेर नफावसुलीमुळे माफक प्रमाणात खालीही आला. २०२३-२४ च्या डिसेंबर तिमाहीचे ‘निफ्टी’मधील अनेक कंपन्यांचे निकाल हाती आले आहेत.

ते उत्साहवर्धक आहेत. पुढील वर्षाचा ‘निफ्टी’च्या ‘इपीएस’चा अंदाज १०३५ होता. (सर्व ५० शेअरची एकत्रित मिळकत) तो प्रत्यक्षात १०५० ते १०६० रुपये असू शकतो.

आजच्या गुणोत्तरात (पीई २१.५ ते २२) ‘निफ्टी’ची चाल २२,५०० ते २३,००० अंशांपर्यंत जाऊ शकते. त्या पुढील वर्षात उत्पन्नात किमान दहा टक्के जरी वाढ झाली, तर ‘इपीएस’ ११५० ते ११७५ असू शकेल.

चालू वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत शेअर बाजार २५-२६ चे अंदाज करू लागेल व ‘निफ्टी’ २४,५०० ते २५,५०० पर्यंत जाईल, असा निष्कर्ष काढेल. सर्व चाली मनासारख्या झाल्या तर हे आकडे गाठणे अवघड नाही. काही अघटीत घडले नाही तर हा अंदाज फारसा चुकू नये.

कदाचित कालावधी वाढेल; पण आता अर्थव्यवस्था मागे वळून पाहणार नाही.
लार्ज कॅप शेअरमध्ये खासगी बँका या शेवटच्या तेजीत सहभागी झालेल्या नाहीत. ‘फोटोफिनिश’मध्ये कदाचित सरकारी बँका त्यांच्यावर बाजी मारतील. एकूणच चालू वर्ष सरकारी बँका, सरकारी उद्योग यांना चांगले जावे.

सरकारी बँका अजूनही लक्ष वेधून घेतात. त्यांचा निर्देशांक पुस्तकी किमतीच्या १.४ पट भावात मिळतो. या निर्देशांकात स्टेट बँकेचा वाटा मोठा आहे.

स्टेट बँकेचा भाव पुस्तकी किंमतीच्या १.६ पट असल्यामुळे तो शेअर बाजूला ठेवू. (तसे असण्याची वेगळी कारणे आहेत.) बाकी राहिलेल्या बँकांमध्ये युनियन बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक अजूनही पुस्तकी किमतीच्या किंचित वर मिळतात.

‘मार्केट प्राईस टू बुक रेशो’ पुढीलप्रमाणे-
युनियन बँक १.२.
पंजाब नॅशनल बँक १.१४
कॅनरा बँक १.१०
बँक ऑफ इंडिया ०.९३

खासगी बँका जर पुस्तकी किमतीच्या २.५ ते ३ पट भावाला मिळत आहेत, तर सरकारी बँकांनी का मागे राहावे? त्यांना पुस्तकी किमतीच्या निदान दीडपट तरी भाव मिळायला हवा. असो.
त्याखेरीस सरकारचा ‘ग्रीन एनर्जी’वरील भर लक्षात घेता ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा अभ्यास करता येईल.

अधूनमधून सरकार ‘विंड फॉल टॅक्स’ वाढवून या शेअरच्या भावाला टाचणी लावत असते; पण तिच्या पोटात असलेल्या आणि पुढे सूचीबद्ध होणाऱ्या उपकंपन्यांचा अभ्यास केल्यास पुढील भविष्य चांगले दिसते.

खासगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक व ॲक्सिस बँकेचा अभ्यास करावा. आरबीएल बँकेवर देखील नजर असू द्यावी. वीजनिर्मिती व वितरण याबद्दल वेळोवेळी मी सांगत असतो. तेथे अजूनही तेजीला जागा आहे.

चढ-उतारांचा फायदा घ्यावा!
शेअर बाजार आधीच वाढला आहे. त्यामुळे आपल्या हाती चढ-उतारांचा फायदा घेऊन अल्प मुदतीचे सौदे करणे किंवा संयम ठेवून लार्ज कॅप शेअरची खरेदी करणे व किमान तीन वर्षांचा दृष्टीकोन ठेवणे, हेच आहे.

हा गतीवेग चालू राहिला व जूनपासून रोखे बाजारात किमान दोन लाख कोटी रुपयांचे भांडवल आले, तर रुपया सशक्त होईल व ‘निफ्टी’ची वरील सर्व टार्गेट गाठली जाऊ शकतील.

भारतावर भिस्त ठेवा, किमान तीन वर्षांचा विचार करा! बघा, ‘निफ्टी’चा पुढील उच्चांक नक्कीच आपले स्वप्न पुरे करणारा असेल.

(लेखक ‘अर्थबोध शेअर्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.चे संचालक आणि भांडवली बाजाराचे ज्येष्ठ विश्लेषक आहेत. मोबाईल ९८५०५६६३१०)
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT