WhatsApp Scams done by using fake photos What to do to take care Sakal
प्रीमियम अर्थ

Cyber Fraud: व्हॉट्सॲपवर खोटे फोटो लावून होतेय फसवणूक; काळजी घेण्यासाठी काय कराल?

Cyber Fraud: आजकाल कोणत्याही कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ऑफीसचा एक स्वतंत्र अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप असलेला दिसून येतो. काही कार्यक्रम असेल किंवा एखादी तातडीची बैठक असेल, तर सर्व कर्मचाऱ्यांना एकाचवेळी व्हॉट्सॲपवर त्याबाबतचा संदेश देणे सोयीचे जाते.

सकाळ डिजिटल टीम

- शिरीष देशपांडे

आजकाल कोणत्याही कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ऑफीसचा एक स्वतंत्र अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप असलेला दिसून येतो. काही कार्यक्रम असेल किंवा एखादी तातडीची बैठक असेल, तर सर्व कर्मचाऱ्यांना एकाचवेळी व्हॉट्सॲपवर त्याबाबतचा संदेश देणे सोयीचे जाते.

त्यामुळे ही पद्धत आता चांगलीच रुजली आहे. या सोयीचा उपयोग बॉस ऑनलाइन आहे का, कर्मचारी ऑनलाईन आहे का, आपला संदेश वाचला आहे का? ऑफिसच्या अधिकृत ग्रुपवर सध्या काय सुरू आहे? अशा अनेक गोष्टी सर्वजण सातत्याने पाहात असतात.

यामुळे ऑफिसमधील एखादे महत्त्वाचे काम तातडीने पूर्णत्वासही जाऊ शकते. मात्र, या सोयीचा चोरटे लोक गैरवापर करून फसवणूक करत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून, अशा गुन्हेगारीबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. काही उदाहरणांच्या आधारे अशा प्रकारची फसवणूक कशी केली जाते, ते जाणून घेऊ या.

व्हॉट्सॲपच्या ‘डीपी’वर खोटा फोटो

नुकत्याच एका व्यावसायिकाच्या कार्यालयात घडलेला हा किस्सा आहे. हा व्यावसायिक काही कामानिमित्त परगावी गेले होते. त्या दरम्यान, त्यांनी त्यांचा स्वतःचा फोटो असलेल्या (डीपी) व्हॉट्सॲपवरून आपल्या अकाउंटंटला त्यांनी सांगितलेल्या खात्यात ४० लाख रुपये जमा करण्याचा संदेश पाठवला. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असून, कंपनीला मिळणाऱ्या टेंडरसाठी पैसे पाठविण्याची सूचना त्यांनी केली होती.

पैसे ‘आरटीजीएस’ (RTGS) करावेत. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याने फोन करू नका, असेही त्यांनी संदेशात लिहिले होते. पैसे पाठविल्याचा स्क्रीन शॉट त्वरित पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. (‘आरटीजीएस’ ही सध्या त्वरित ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची बँकिंग सुविधा आहे.) हा संदेश मिळताच ऑफिसमधील अकाउंटंटने मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून लगेच ४० लाख रुपयांचा धनादेश तयार केला, त्यावर मालकाच्या मुलाची सही घेतली आणि त्वरित बँकेत जाऊन सांगितलेल्या खात्यावर पैसे पाठवून दिले.

तिथूनच स्क्रीन शॉटही मालकांना त्यांच्या मूळच्या व्हॉट्सॲपवर पाठवला, तो बघताच खऱ्या व्हॉट्सॲपवर असलेल्या मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. कारण चोरट्याने मालकाचा फोटो लावून खोटा व्हॉट्सॲप अकाउंट तयार केला होता; तसेच चोरट्याने ऑफिसमधील नेहमीचे लोक आणि त्यांचे नंबरही चोरले होते. अकाउंटंटने कोणतीही शहानिशा न करता रक्कम ट्रान्‍सफर केली होती.

परदेशातील फोन क्रमांकाचा गैरफायदा

वरील घटनेप्रमाणेच, एका कंपनीचे मालक परदेशी गेलेले असताना, त्यांचा फोटो, बनावट व्हॉट्सॲपचा ‘डीपी’ म्हणून लावला होता. ते परदेशात असल्याने परदेशातील फोन नंबर वापरण्यात आला होता. चोरट्यांनी त्यांच्या नावाने व्हॉट्सॲपद्वारे तब्बल ८५ लाख रुपयांची रक्कम ताबडतोब एक मोठी रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्याचा गणवेशातील फोटो वापरून फसवणूक

पुण्यातील एका कॉन्ट्रॅक्टरला चोरट्यांनी उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याच्या खोट्या व्हॉट्सॲपवर त्या अधिकाऱ्याचा गणवेशातील फोटो वापरून फसवणूक केल्याची घटनाही उजेडात आली आहे.

काय काळजी घ्यावी?

- पूर्णपणे खातरजमा केल्याशिवाय नुसत्या व्हॉट्सॲप मेसेजच्या आधारे पैसे ट्रान्स्फर करू नका.

- व्हॉट्सॲप ‘डीपी’ला कंपन्यांचा लोगो किंवा कोणाचाही फोटो लावणे अगदी सोपे असते, हे ध्यानात असू द्या.

- वेगळ्या फोन नंबरवरून आलेल्या व्हॉट्सॲप मेसेजला खात्री पटल्याशिवाय उत्तर देऊ नका.

- ‘उलटा फोन करू नका’ असा मेसेज म्हणजे धोका आहे, हे लक्षात असू द्या. तशी सूचना आलेल्या मेसेजमध्ये असली तरीसुद्धा, आपल्याकडील मूळच्या नंबरवर फोन करा आणि संबंधित व्यक्तीकडे चौकशी करा. तो फोन लागला नाही, तर अन्य संबंधित व्यक्ती किंवा कार्यालयात फोन करून खात्री करून घ्या.

- आपण बाहेरगावी किंवा परदेशी जाणार असाल, तर सर्व पर्यायी नंबर आपल्या घरातल्यांना आणि ऑफिसमधील संबंधितांना आपत्कालीन योजना म्हणून देऊन ठेवा.

- आपण व्यवसाय करत असाल, तर आपल्या कंपनीतील ऑनलाइन व्यवहारांसंबंधी चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने कठोर नियम बनवून त्याची अंमलबजावणी करा. उदा. ठराविक रकमेवरील सर्व व्यवहार स्वतंत्र व्यक्ती किंवा हिशोब तपासनीसाने मान्यता दिल्याशिवाय करू नयेत.

- बँकेशी बोलून आपल्या बँक खात्याला ऑनलाइन पेमेंटची दिवसभरातील मर्यादा निश्‍चित करून ठेवावी. यामुळे ठराविक रकमेची मर्यादा संपल्यानंतर त्या खात्यातून व्यवहार होणार नाहीत.

- काही धूर्त चोरटे खोटे ॲप किंवा फाईल (apk file) डाउनलोड करा सांगतात. ते अजिबात करू नका. त्याद्वारे आपल्या संगणकातील किंवा मोबाईलमधील माहिती चोरली जाते.

- आणखी एक धोक्याची खूण लक्षात ठेवा, ती म्हणजे, समोरची व्यक्ती पैसे कोठे ट्रान्स्फर करायला सांगते, ते खाते कोणाचे आहे, पैसे कोठे जात आहेत यावरून ते अधिकृत आहे का, हे तपासावे. त्या नावाचा शोध घ्यावा.

- गुगल रिव्हर्स इमेज सर्च (Google Reverse Image search) तंत्र वापरून मूळ इमेज किंवा फोटो कोठून घेतला आहे, तो खरा आहे की नाही, हे तपासता येते.

- आपल्या खात्यावर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीचे किंवा इतर कोणाचेही व्यवहार अजिबात करू नका. तो ‘ट्रॅप’ असू शकतो.

- कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांचा पैशांच्या बाबतीत असा मेसेज आला, तर त्यांच्या कार्यालयात जाऊन खात्री करून घ्यावी.

- आपल्या माहितीतील व्यक्तीने अशा मेसेजद्वारे पैशाची मागणी केल्यास भावनेच्या भरात घाईघाईने पैसे पाठवू नका.

- चोरटे व्हॉट्सॲपप्रमाणेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, एक्स (X), ई-मेल याचाही वापर करून फसवू शकतात, हे लक्षात असू द्या.

फसवले गेला असाल, तर काय कराल?

१) ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

२) यूपीआय, जीपे, पेटीएम, भीमपे या माध्यमातून पैसे देताना काही घोटाळा झाल्यास ‘यूपीआय’ची मुख्य संस्था नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism येथे आणि संबंधित बँकेतच तक्रार नोंदवावी.

३) १९३० किंवा १५५२६० या नंबरवर संपर्क साधावा आणि संपूर्ण तपशील द्यावा. ही यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले असतील, ते गोठवण्याचे तातडीने प्रयत्न करतात.

४) ऑनलाइन तक्रारींचे कागद घेऊन नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.

५) आपले सर्व ठिकाणचे पासवर्ड तातडीने बदलावेत.

६) आपला फोन ‘हॅक’ (compromise) झाला आहे, अशी शंका आल्यास ताबडतोब सिमकार्ड बदलावे.

७) तुमच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत, ते मला परत द्या असा कोणाचाही फोन आला, तर त्याला पैसे परत करू नका. हा एक ट्रॅप असू शकतो. अशा वेळी त्याला जवळच्या पोलिसचौकीत बोलवा आणि तेथे पैसे परत करतो, असे सांगा.

८) आपल्या फोनवर किंवा संगणकावर असलेले या संदर्भातील काही पुरावे असतील, तर ते जपून ठेवावेत. त्याच्या प्रिंट काढाव्यात, यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्यावी. पुढे जाऊन आपल्याला हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील आणि संपूर्ण तपशील आपल्याकडे उपलब्ध असेल.

९) शक्य असेल आणि आवश्यक असेल, तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

(लेखक सीए असून, संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत. मोबाईल ८४८४४९६१२२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT