पुणे - 'बेरियम ऑक्साईड' आणि 'बेरियम मोनोक्साईड' हे रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातल्यानंतर देखील बाजारात या रासायनिक घटकाचा वापर करून केलेले ६४ टक्के फटाके आढळून आले आहेत.
मुंबईतील ध्वनी प्रदूषणाविरोधात काम करणाऱ्या आवाज फाउंडेशनने याबाबत एक सर्व्हेक्षण केले आहे. याबाबत आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमायरा यांनी माहिती दिली.
माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बाजारातून २२ वेगवेगळ्या ठिकाणाहून फटाक्यांचे नमुने घेतले असता त्यापैकी १४ फटाक्यांमध्ये आम्हाला न्यायालयाने बंदी घातलेले रासायनिक घटक आढळून आले आहेत. इतकेच नाही तर हे सर्व्हेक्षण २०१८ सालापासून करत असून दरवर्षी फटाक्यांमध्ये अनेक हानिकारक घटक आढळून आले आहे.
दिल्ली पाठोपाठ मुंबई शहरातही हवेची गुणवत्ता पातळी खालावली असल्याचे अभ्यासातून समोर आले. तसेच गेल्या काही दिवसांत दिल्लीत दम्याचे, श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील आढळून आली होती.
यावर सुप्रीम कोर्टाने अत्यंत कडक शब्दांत दिल्ली आणि अन्य राज्यांना लोकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांबाबत समज दिली. तसेच राज्यातील काही घातक रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांवर देशभरात बंदी घातली आणि फटाके वाजविण्यासंदर्भात नियमावली घालून दिली.
फटाक्यांमध्ये मानवी शरिराला हानीकारक असणारे अनेक घटक कारणीभूत आहेत. जे केवळ तात्पुरत्या नव्हे तर दीर्घ काळासाठी परिणाम करणारे ठरतात त्यामुळेच या फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी याविषयीची याचिका यापुर्वीच काही पर्यावरण संवर्धक संस्थांनी दाखल केली होती.
याबाबत न्यायालयाने यापुर्वीच अशा फटाक्यांवर बंदी घातली होती. मात्र तरीही बाजारात आरोग्यासाठी हानिकारक असणारे घटक असणारे फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
फाउंडेशनने 2018 वर्षापासून याबाबत काही नमुन्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये संस्थेला 2018 मध्ये 36, 2020 मध्ये 12, 2021 मध्ये 30, 2022 मध्ये 6, तर 2023 मध्ये 14 फटाक्यांच्या नमुन्यांमध्ये बंदी घातलेले रासायनिक घटक आणि मेटल आढळून आले.
या फटाक्यांमध्ये बेरियम, आर्सेनिक, सल्फर, क्लोरिन, ॲल्युमिनियम, सल्फर पोटॅशियम, सिलिकॉन, लोह, टायटॅनियम हे आरोग्यास घातक असे रासायनिक घटक आढळून आले आहेत. फटाक्यांमध्ये आढळून आलेले हे घटक पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार देखील घातक आहेत.
यामुळे त्वचेची जळजळ, नाक आणि घश्यात खवखव, फुफ्फुसांचे या आरोग्यविषयक समस्या नागरिकांना होताना दिसत आहेत. यामुळे डोळ्यांना देखील त्रास होऊन दृष्टी कमजोर होण्याचा धोका आहे.
पर्यावरण स्नेही म्हणजेच ग्रीन फटाके विकताना त्यात असलेल्या रासायनिक घटकांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून दिली जावी असे नियम आहेत. मात्र आवाज फाउंडेशनच्या पाहणीत आढळून आले की, काही फटाक्यांमध्ये खोटे क्युआर कोड आहेत.
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात तीन कोटी रुपयांचे फटाके फेक 'क्यूआर कोड' मुळे नष्ट केले असल्याचा दाखला देखील संस्थेने दिला आहे.
आवाज फाउंडेशनने मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असल्याचे सांगितले आहे. यामध्ये तुमच्याकडे असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही स्वतः तपासणी करा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी नागपूर येथे काही फटाक्यांचे नमुने घेतले व त्याची तपासणी केली असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे . त्यात आम्हाला कोणतेही बंदी घातलेले रासायनिक घटक आढळून आले नसल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
तसेच आम्ही ध्वनी प्रदूषणाची देखील चाचणी करत असून त्यातही आम्हाला नियमांचे उल्लंघन होणारे पदार्थ आढळून आले नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
१) पाच वर्षाखालील मुले, गरोदर महिला, दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती, प्रदूषित वातावरणात काम करणारे व्यक्ती यांनी खराब हवामानाच्या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. ऐच्छिक उपाययोजना म्हणून एन ९५ किंवा एन ९९ मास्क वापरावे.
२) नियमितपणे वाहत्या पाण्याने डोळे धुवत राहा तसेच कोमट पाण्याने गुळण्या करत राहा
३) श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा डोळ्यांत जळजळ असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
४) निरोगी आहार, फळे, भाज्या आणि पाणी पिऊन शरीरात पुरेश्या प्रमाणात पाणी राहील याची काळजी घ्या.
५) हवेची पातळी ज्या दिवशी खराब असेल त्या दिवशी बाहेर पडणे, कष्टाची कामे करणे टाळा.
____________
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.