आपल्याकडे सनी देओलच्या चित्रपटातील गाजलेला डायलॉग आहे की ये 'ढाई किलो का हाथ उठ जाता है तो, आदमी उठता नहीं, उठ जाता है'.
पण तुमचा हात वजनदार असण्यापेक्षा देखील त्याच्या मनगटात ताकद जास्त महत्वाचे आहे. भारतात आणि परदेशात असे काही अभ्यास झालेत ज्यातून स्पष्ट झाले आहे की, तुमच्या मनगटातील ताकद ही तुमच्या एकूणच निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी फायदेशीर आहे.
याविषयी 'द न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत न्यूयॉर्क शहरातील हाताच्या सर्जन डॉ. एरिन नॅन्स म्हणाल्या, "आपण जे स्मार्ट फोन आणि टच स्कीन गॅजेट वापरतो त्यामुळे देखील लोकांचे हात कमकुवत होत असावेत.
यासाठी आपण छोटे छोटे हाताचे व्यायाम तर करावेच पण त्यासोबतच जे त्या हाताशी संलग्न आहे अशा संपूर्ण हाताचे, खांद्याचे आणि मानेचे देखील व्यायाम करणे गरजेचे आहे."
दरम्यान कॉम्पुटर माऊस हातात धरून अनेकांचे हात दुखून येत असल्याने आता बाजारात नव्या पद्धतीचे माउस देखील आले आहेत, ज्यात तुमचा हात दुखणार नाही असाही दावा केला गेला आहे.
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.आरती नगरकर आणि त्यांच्या विद्यार्थिनी अमृता कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी यांनी याबाबत संशोधन केले आहे. "तुमच्या मनगटाची ताकद वाढविणे नक्कीच तुमच्या एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Grip strength हे साधन स्नायूंमधील शक्ती मोजण्याचे मापक आहे. हे मापक वापरून व्यक्तींमधील शक्तीचे मोजमाप केले. पुण्यात जवळ जवळ ३००० लोकांमध्ये ५० वर्षावरील नागरिकांच्या मनगटातील शक्ती 'जमार हॅन्ड ग्रीप डायनॅमोमीटर' च्या साहाय्याने मोजली होती.
यातून असे दिसून आले की, माध्यम वयातील मनगटातील शक्ती तुमच्या म्हातारपणातील आरोग्याचा अंदाज सांगू शकते. एकुणातच तुमच्या पुढील काही वर्षातील स्नायूंच्या शक्तीचा अंदाज बांधू शकते" असे डॉ.नगरकर यांनी सांगितले.
या अभ्यासात स्त्री आणि पुरुष यांच्या हाताची पकड यातही वैविध्य आढळून आले. स्त्रियांच्या हाताची किंवा मनगटाची पकड ही पुरुषांच्या तुलनेत कमी आढळून आली. पुरुषांची साधारण १८.८२ किलो (६.८१ किलो पुढे किंवा मागे) तर स्त्रियांची पकड ही १३.७० आढळून आली.
वयानुसार हाताची पकड कमी होणे ही बाबही या अभ्यासातून समोर आली. केवळ पुण्यातच नाही तर आशियामधील ज्येष्ठ नागरिक महिलांचा जो अभ्यास झाला त्यामध्ये देखील चांगली पकड असणाऱ्या महिलांना हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित मृत्यूचे प्रमाण कमी आढळून आले असल्याचे अभ्यासातून दिसून आले.
वयानुसार हाताची पकड कमी होणे ही गोष्ट पुरुषांमध्ये अधिक ठळकपणे जाणवली. कमी हॅन्ड ग्रीप असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तोल जाणे, एकापेक्षा अधिक आजार असणे, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे प्रमाण, रोजची कामे करताना येणाऱ्या अडचणी अधिक असल्याचे आम्हाला अभ्यासाअंती जाणवले.
हाताच्या हालचालींचा परिणाम हा संपूर्ण हात, खांदे आणि पाठीशी यांच्यावर देखील होताना दिसतो. त्यामुळे हातांचे व्यायाम तुमच्या अन्य स्नायूंची ताकद वाढविण्यास देखील अप्रत्यक्षरित्या मदत करत असतात.
'स्क्वीझ अँड रिलीज' चाचणी: हातात एक मऊ, लवचिक चेंडू घेऊन, ठराविक कालावधीसाठी दाबा आणि सोडा. सलग मिनिटभर तुम्ही तो चेंडू दाबून धरू शकता का, त्यावरून तुमच्या मनगटातील शक्तीचा तुम्ही अभ्यास बांधू शकता.
मात्र कोणत्याही चाचण्या घरच्या घरी करताना प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असल्याने ही साधने सावधगिरीने वापरणे गरजेचे आहे. कारण ती वय, लिंग आणि शारीरिक क्रिया, पकड शक्ती, वांशिक आणि भौगोलिक प्रदेशानुसार बदलू शकते असे डॉ.नगरकर यांनी सांगितले.
⦁ न्यूज पेपर क्रंचिंग: कागदाचे चुरगाळून बॉल बनविणे
⦁ लॉन्ग टेनिस बॉल जो थोडासा सॉफ्ट असतो असा बॉल हातात ५ सेकंद ठेवून दाब देणे. सलग दहा वेळा असे तीन सेट करणे.
⦁ टॉवेल पिळणे, टॉवेल हातात जाड घडी करून घट्ट पिळण्याची कृती करणे
⦁ पाण्याने भरलेली बादली एका हातात १५ सेकंद आणि दुसऱ्या हातात १५ सेकंद धरा
⦁ हँडग्रिपची ताकद वाढवण्यासाठी किमान ३ ते ४ सेट करणे अवशक्यक आहे
⦁ अस्वल ज्या प्रकारे चालते त्या प्रकारे हात आणि पाय जमिनीवर टेकवून चालल्याने जास्तीत जास्त स्नायूंचे व्यायाम होतात त्यामुळे असा व्यायाम करणे फायदेशीर ठरत असल्याचे फिटनेस तज्ज्ञ सांगतात.
हा लेख संबंधित विषयाबाबत जागृती करण्यासाठी आहे. वर सुचविलेल्या चाचण्या आणि व्यायाम हे तज्ज्ञांच्या मदतीनेच करावेत.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.