मुंबई : तुम्ही काय खाता याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोच पण जर शरीर निरोगी नसेल तर मनही निरोगी राहील असे नाही. त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात की तुमच्या आहाराविषयी तुम्ही जर सहा गोष्टी नियमित पाळल्या तर तुमचे शरीर निरोगी राहण्यासोबत तुमचे मनही निरोगी राहण्यास मदत होईल.
तुम्ही खात असलेल्या 'अन्नाची गुणवत्ता आणि निराशा यांच्यातील संबंध शोधण्याबाबत नुकताच एक अभ्यास 'सायन्स डायरेक्ट' या जर्नलमध्ये झाला आहे. तुमच्या मनाचा समतोल साधायचा असेल तर शरीराची साथ हवी आहे आहे.
याविषयी या क्षेत्रात गेली २५ वर्ष काम करणाऱ्या आहारतज्ज्ञ आणि होमिओपॅथिक डॉक्टर वैशाली जोशी यांनी आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश केल्याने शरीराचा आणि पर्यायाने मनाचा समतोल साधला जातो त्याबाबत सांगितले आहे.
१) परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्या
संतुलित आहार म्हणजे पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे (carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals.) हे सर्व अन्नघटकांचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीच्या गरजेप्रमाणे असायला हवे.
ही गरज वय, लिंग काम आणि प्रकृतीनुसार बदलते. पण संतुलित आहार ज्यामध्ये दररोज एकाच प्रकारचा आहार घेणे टाळा. जेवणात विविधता असू द्या. कुठलाही एकच पदार्थ शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण देऊ शकत नाही. आहारातला समतोल तुमचे आयुष्य निरोगी राखेल.
२) पाचही 'फूड ग्रुप' मधील अन्न खा
अन्न हे सर्वसाधारणपणे पाच प्रकारात विभागले आहे, ते पाचही ग्रुप मधील अन्न तुमच्या पोटात जायला हवं.
यामध्ये धान्य आणि कडधान्य यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भरड अशी सर्व प्रकारची धान्य आणि मटकी, हरभरा, मूग, मसूर यांसारखी कडधान्य येतात.
दुसरा गट हा मांसाहाराचा आहे. यामध्ये मांस, अंडी, मासे आदी पदार्थ येतील.
तिसऱ्या प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थ ज्यामध्ये दूध, तूप, लोणी, पनीर असे दुधाचे सर्व पदार्थ.
चौथा प्रकार हा सर्व प्रकारच्या भाज्या ज्यामध्ये सर्व पालेभाजी, फळभाजी, शेंगभाजी असे सगळे येईल.
तर पाचव्या गटात सर्व फळांचा समावेश होते. या पाचही ग्रुपमधील अन्न हे तुमच्या रोजच्या जेवणात असायला हवं ज्यामुळे शरीराला सर्व प्रकारची पोषणमूल्य मिळतात.
३) ऋतूंप्रमाणे आहार ठेवा
एखादे फळ महाग म्हणजे ते अधिक पौष्टिक आणि दुसरे नाही असे अनेकांना वाटते. पण भारतात प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फळे मिळतात.
त्यानुसार त्या फळांचा आहारात समावेश असावा. उन्हाळ्यात जास्त पाणी प्यायला हवे व घामा वाटे शरीराबाहेर टाकल्या गेलेल्या क्षारांची भरपाई सुद्धा करायला हवी. त्यासाठी लिंबू पाणी किंवा नारळाचे पाणी प्यावे.
हिवाळ्यात थोड्या प्रमाणात जास्त कर्बोदके व स्निग्ध पदार्थांचा वापर करून शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळवून घ्यायला हवी. हिवाळ्यात भूक वाढते त्यामुळे 'लो कॅलरी फूड' खावं. पावसाळ्यात ज्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात त्या खाव्यात.
४) चांगले फॅट असणारे पदार्थ खा
सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे फॅट असतात. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण करतात. यामुळे शरीरातील चरबी वाढते. बटर, क्रीम, मेओनीज आणि नॉन व्हेज फूड या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात.
त्याउलट अनसॅच्युरेटेड फॅट्स हे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या ज्यामध्ये तेल असते असे शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, ऑलिव्ह, बदाम, अक्रोड यामध्ये आढळून येते. हे शरीरासाठी प्रमाणात घेणे चांगले असते.
५) 'प्रोसेस फुड' ऐवजी नैसर्गिक अन्न खा
आपण तीन प्रकारांमधील अन्न खातो. यामध्ये कच्चे अन्न म्हणजे रॉ फूड, सेमी प्रोसेस फूड आणि प्रोसेस फूड या तीन प्रकारांचा समावेश आहे. शिजवण्याच्या प्रक्रियेत सूक्ष्म जिवाणू नष्ट होतात. अन्न मऊ व पचायला सुलभ बनते व काही हानिकारक द्रव्यांच्या नाश होतो.
म्हणून जास्त प्रमाणात अन्न शिजवू नये आणि कच्चे अन्न खाण्यावर भर हवा. कृत्रिम प्रक्रिया केलेले नुडल्स, पिझ्झा, पास्ता असे अन्नपदार्थ टाळावे. नैसर्गिक अन्न कृत्रिम प्रक्रिया केलेल्या अन्ना पेक्षा जास्त सकस असते. फळे आणि काही कच्च्या भाज्या सोडून इतर सर्व प्रकारचे नैसर्गिक अन्न शिजवावे लागते.
६) नियमित व्यायाम आवश्यकच
शरीराचा मनाशी, मनाचा शरीराशी असा परस्पर संबंध आहेच. त्यामुळेच निरोगी शरीरासाठी आहारासोबत नियमित व्यायाम तितकाच गरजेचा आहे.
एक तास चालणे किंवा जॉगिंग, पोहणे, सायकल चालवणे यासारखा इतर व्यायाम हा हवाच आणि तोही आठवड्याचे सातही दिवस. व्यायाम आणि श्रम हे दोन पूर्णत: वेगवेगळे असतात.
नियमित व्यायामामुळे शरीर बळकट होते तर श्रमामुळे शरीराची झीज होते. त्यामुळे व्यायाम करणे आवश्यक आहे जो तुमच्या शरीराला ऊर्जा आणि गती मिळवून देतो.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.