पुणे - माझी बायको माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. पण मी जेव्हा तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा खूप चुकीच्या पद्धतीने चर्चा करण्यात आल्या. ज्या इकडून तिकडून माझ्या कानावर आल्याच. कोणी आडून आडून तर कोणी थेट प्रश्न केले.
अर्थात सातत्याने त्याच त्याच प्रश्नांना उत्तरे देऊन वैताग आलेला. मुळात मला असं होत होतं की, यांना काहीही माहित नसताना माझ्या पत्नीला आणि मला हे चुकीच्या पद्धतीने कसे बोलू शकतात.
अनेकांनी आर्थिक कारणासाठी हे लग्न केले असा प्रसारही केला. यामुळे अर्थातच त्रास झाला. पण त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं त्यामुळे नंतर हे असे बोलले जाणार हे आम्ही मान्य केले होते.
अनेकदा लग्नकार्यात आम्ही गेलो की अवघडलेली शांतता असायची. नातेवाईक निरीक्षण करत राहायचे, ते जाणवायचं पण आम्हाला त्याची सवय झालेली आणि आम्ही नेहमीप्रमाणे वागत राहिलो. कालांतराने नातेवाईक देखील नॉर्मल वागायला लागले असल्याचे नितीन सोनावणे (नाव बदलले आहे) यांनी सांगितले.
लग्न ही खरे तर प्रत्येकाच्या आयुष्यातील वैयक्तिक बाब. पण जेव्हा ती सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चिली जाते आणि त्यातून यावर प्रतिक्रिया देणारा, एखाद्या कृतीला विरोध करणारा आभासी गट तयार होतो.
त्यावेळी असे प्रश्न वैयक्तिक पातळीपर्यंत मर्यादित न राहता ते सामाजिक प्रश्न बनतात. आणि मानवी भावभावना, संस्कृती, कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते.
एखाद्या जोडप्याच्या वयातील अंतर ही खासगी बाब अनेक जोडप्यांबाबत सार्वजनिकरित्या चर्चिली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर नक्कीच काही प्रमाणात याचा परिणाम झाला आहे. (Marathi article about marriage )
रणदीप हुडा ने वयाच्या ४७ व्या वर्षी १० वर्षे लहान महिलेसोबत लग्नगाठ बांधली
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा याने त्याची मैत्रीण लिन लैश्राम सोबत २९ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाह केला. यानंतर त्यांच्या त्या जोडप्यामधील वयाची बरीच चर्चा झाली.
कारण वयाच्या ४६ व्या वर्षी लग्न करणाऱ्या रणदीपने आपल्यापेक्षा जवळपास दहा वर्ष लहान असलेल्या लिन लैश्राम सोबत विवाह केला आहे. त्याने वयाच्या पन्नाशीजवळ असताना लग्न केल्याने अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आणि त्यातही दहा वर्ष लहान जोडीदाराची निवड केल्याने तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
बॉलीवूड, क्रिकेट, मराठी चित्रपट सर्वांमध्येच वयाचे अंतर असलेली जोडपी
जोडीदाराच्या वयात अंतर असणारे रणदीप आणि लिन लैश्राम नाही तर अनेक जण आहेत. करिना आणि सैफ अली खान, प्रियांका चोप्रा आणि निक जोहन, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर, मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर, मराठीत अशोक आणि निवेदिता सराफ तर क्रिकेट विश्वात सचिन आणि अंजली तेंडुलकर अशी अनेक जोडपी आहे.
मिलिंद सोमणची पत्नी एका मुलाखतीत काय म्हणाली होती?
एका मुलाखतीदरम्यान बोलताना मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवर म्हणाल्या, माझ्या आणि मिलिंदमध्ये वयाचे अंतर २६ वर्षांचं आहे. याबाबत सुरवातीच्या काळात खूप उलट सुलट छापून यायचं, त्यावर काही कमेंट यायच्या ज्यामुळे सुरुवातीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास झाला होता. पण मग मी ही गोष्ट शिकून घेतली की या सगळ्याशी कसा सामना करावा.
तर इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे 'लहानपणी गैरवर्तणुकीला सामोरी गेले, हॉस्टेलमध्ये लहानाची मोठी झाले, परदेशात एकटे राहिले, ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास केला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. भावाला, आधीच्या प्रियकराला, वडिलांना गमावलं. माझ्या दिसण्यावरून मला चिडवलं गेलं आणि ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच्यासोबत राहिल्याने टीका झाली. एवढं सर्व घडल्यानंतरही जर तुम्ही मला सकारात्मक व्यक्ती म्हणून पाहत असाल, तर होय, मी सकारात्मक आहे. स्वत:वर प्रेम करा',
लोकांच्या अनावश्यक चर्चेचा आणि प्रश्नांचा त्रास होतो
अनुरूप विवाह संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. गौरी कानिटकर , आमच्याकडे वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक जोडपी समुपदेशनासाठी येतात तेव्हा काहींनी अशा प्रकारच्या नाकारात्मकतेचा सामना केलेला असतो.
वैयक्तिक पातळीवर अनेकदा दोघांचं चांगलं जमत असतं. पण जेव्हा ही जोडपी नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये जातात तेव्हा त्यांना अनावश्यक प्रश्न, काहीशी वेगळी वागणूक मिळणं अश्या समस्यांचा सामना करावा लागतो.
त्याचा त्यांना त्रास होतो हे नक्की. जी जोडपी आपल्या विचारांबद्दल ठाम असतात त्यांना लोक काय म्हणू शकतील याचा अंदाज असतो आणि आपल्या नात्यावर ते याचा फारसा परिणाम होऊ देत नाहीत.
मात्र काही जण असेही असतात की जे प्रेमाच्या बहरात आणि कमी वयात जास्त अंतर असणाऱ्या जोडीदाराची निवड करतात पण जेव्हा त्यांना समाजात स्वीकारलं जात नाही त्यावेळी त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होताना दिसतो.
समाजमाध्यमांवर खालच्या पातळीवर जात टीका
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्यामध्येही १० वर्षाचं अंतर आहे. प्रियांका मोठी व निक लहान आहे. मात्र ज्यावेळी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता त्यावेळी देखील समाजमाध्यमांवर अनेक मिम्स व्हायरल झाले होते.
त्यांच्यामधील वयामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. काहींनी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका देखील केली होती.
हेच नाही तर ज्यावेळी करिना आणि सैफ यांचे लग्न ठरले होते त्यावेळी देखील सेफच्या पहिल्या लग्नावेळी करिनाचे वय किती होते यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या होत्या.
याविषयी रवी साठ्ये (नाव बदलले आहे) म्हणाले, मी जेव्हा स्थळ बघत होतो. त्यावेळी मला वयाने मोठ्या असणाऱ्या मुलीचं स्थळ आलं. बाकी सर्व गोष्टी जुळत होत्या केवळ ती मोठी होती. पण या मुद्द्यावरून हे स्थळ नाकारावं असं मला वाटलं नाही.
आमच्या वयात एकाच वर्षांचं अंतर आहे. एरव्ही आमच्यातील ही बाब कोणाच्या लक्षात येत नाही पण मला या मुद्द्याला जितकं नकारात्मक महत्व दिलं गेलंय तेवढा महत्वाचा मुद्दा वाटत नाही.
केवळ परंपरा म्हणून आपण वयातल्या अंतराचा एवढा बाऊ करतो असे मला वाटते. यामागे काही अंशी शास्त्रीय करणे असतीलही. परंतु प्रत्येकाने त्याच्या वैयक्तिक पातळीवर अभ्यास केलेला असतोच.
आस्ट्रेलियातील डेकिन विद्यापीठातील अभ्यासात काय म्हंटले?
२०१८ साली ऑस्ट्रेलियामधील डेकिन विद्यापीठात झालेल्या अभ्यासात असे दिसून आले होते की, पाश्चिमात्य देशात १० पेक्षा जास्त वयात अंतर असलेल्या जोडप्यांना सामाजिक नकाराचा (social disapproval ) सामना करावा लागतो.
पाश्चिमात्य देशात महिला मोठी आणि पुरुष लहान असे प्रमाण साधारण एक टक्के आहे. तर महिला लहान आणि पुरुष मोठे हे प्रमाण तुलनेने अधिक आहे. प्रत्येक संस्कृतीनुसार हे प्रमाण बदलताना दिसते आहे.
अनुरूप विवाह संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. गौरी कानिटकर म्हणाल्या, " काही जोडपी आम्ही असे लग्न करावे का अशी विचारणा करण्यासाठी येतात त्यावेळी आम्ही त्यांना सर्वंकष विचार करायला सांगतो. निर्णय त्यांनीच घ्यायचा असतो आम्ही फक्त चांगल्या वाईटाची जाणीव करून देतो.
डॉक्टर सांगतात की, मॅच्युरिटी लेव्हलचा अभ्यास करून दोघांच्या वयातील अंतरात साधारण साडेतीन ते चार वर्षाचं असावं .
पुरुषापेक्षा साडेतीन ते चार वर्षाने लहान असावी असे म्हणले जरी तरी वयाचे अंतर असूनही अनेक जोडपी चांगल्या रीतीने राहिलेली उदाहरणे आहेत. मुद्दा तुमची त्याविषयीची समज किती आहे यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
अनेकदा समज नसताना उत्साहाच्या किंवा प्रेमाच्या भरात असे निर्णय घेतले जातात आणि नंतर निभावता येणं कठीण होतं.
पण जोडीदारांनी एकमेकांची निवड ही विचार करून सर्व शक्यतांचा, सामाजिक नकाराचा अभ्यास करून केले तर काहीही यातून ते नातं अधिक छान होतं. त्यामुळे अशा जोडप्यांनी समाजापेक्षा स्वतःच्या नात्यावर लक्ष देणे अधिक फायदेशीर ठरते. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.