birthday emotion esakal
प्रीमियम महाराष्ट्र

Birthday Wish :वाढदिवसाला स्टेटसवर फोटो शेअर करणं हे ओझं होतंय का?

Shraddha Kolekar

"माझी बहीण जेव्हा माझ्याशी अचानक तुटक वागू लागली तेव्हा ती अशी का वागतेय याचं कारण मला कळत नव्हतं. मी खूप विचार केला की नेमकं माझ्याकडून अशी काय चूक झालीये की ही माझ्याशी अशी वागतीये. मला अनेक दिवस याचा शोधच लागला नव्हता आणि परवा आमचा जेव्हा एका गोष्टीवरून वाद झाला तेव्हा चिडून ती मला म्हणाली की, “बरोबर तुझ्यासाठी मी महत्वाची नाहीचे.. तुझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त जवळचे तुझे मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या वाढदिवसाला तू स्टेटस ठेव, रात्रीच विश कर...”

तेव्हा कुठे इतके दिवस माझ्या डोक्यात जे तुटक वागण्याचं कोडं पडलेलं ते सुटलं." स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मनाली तिची बहीण वृषालीबद्दल सांगत होती.

बर्थडे स्टेटस ठेवण्याचा ट्रेंड..

तुमच्या आजूबाजूला असे एक दोन तरी मित्रमैत्रीण किंवा नातेवाईक असतीलच जे आपल्या परिचितांपैकी कोणाचा वाढदिवस असला की जण त्या परिचितांचे फोटो स्टेटसला ठेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. फोटो ठेवत त्यावर क्राऊन लावला जातो. वेगवेगळ्या ईमोजी वापरून त्यांना विश केलं जातं. जेणेकरून वाढदिवस असणाऱ्या त्या व्यक्तीला एकदम स्पेशल फील करून दिले जाईल. त्यावर रिप्लाय म्हणून वाढदिवस असणारी व्यक्ती शुभेच्छांच्या स्टेस्टसचा स्क्रीनशॉट घेत पुन्हा एकदा प्रत्येकाला नावानिशी 'थँक यू' चा स्टेटस ठेवते. हल्ली दर दहा जणांच्या मागे किमान दोन ते तीन जण तरी अशा प्रकारे स्टेटस ठेवताना दिसतात.

संबंध जपण्यासाठी विश करणे आवश्यक

आयटी मध्ये काम करणारा प्रशांत जाधव (नाव बदलले आहे ) सांगतो, “मी रोज ऑफिस मध्ये गेलो की आधी नोटिफिकेशन पाहतो. ज्यांचे ज्यांचे त्या दिवशी वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना त्यांना विश करतो. यात माझी रोजची पंधरा ते वीस मिनिटं जातात. पण याकडे मी थोडं प्रोफेशनली पाहतो. एक रिलेशन ठेवण्यासाठी हे करणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपल्याला अनेकदा अनेक माणसांची गरज लागते त्यामुळे वाढदिवस विश करणे मला एक गुंतवणूक वाटते. फेसबुकवर तर माझे असे मित्र आहेत ज्यांना मी व्यक्तिशः ओळखत देखील नाही. पण मी सर्वांना विश करतो”

हल्ली सॉरी, थँक यू सारखं Happy Birthday देखील कोरडं वाटतं

याविषयी संपदा म्हणते की, मला अजिबातच आवडत नाही माझ्या वाढदिवसाची जाहिरात झालेली. जसा सगळ्यांचा असतो तसा माझाही वाढदिवस आहे. त्यासाठी कधी समोरासमोर येऊन साधी स्माईल देखील न देणारे आपले फोटो बिटो टाकून विश करतात. तर काही जण ग्रुपवर विश करतात जेणेकरून सगळ्या गावभराला समजते वाढदिवसाची बातमी. आणि अनेक लोक तर अगदी जीवावर आल्यासारखं HBD असं लिहितात. मला असं होतं की इतकं टाईप करायचं जीवावर येत तर कश्यासाठी करता विश तरी ? मला हा सगळा प्रकारच भंपक फक्त एकमेकांना दाखविण्यासाठी केलेला प्रकार वाटतो. त्या विश करण्यामध्ये भावनेचा ओलावा कमी आणि कृत्रिमता जास्त वाटते. सॉरी, थँक यू या वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दांसारखाच कोरडेपणा मला त्या बर्थ दे विश मध्ये जाणवतो.

मित्राने माझे बर्थ डे स्टेटस ठेवले की मलाही प्रेशर येतं..

पत्रकार म्हणून काम करणारा राहुल म्हणाला, माझ्या एखाद्या मित्राने माझ्या वाढदिवसाला त्याच्या मोबाईलवर स्टेट्स ठेवलं अप्रत्यक्षपणे माझ्यावरही त्याच्या वाढदिवसाला स्टेटस ठेवण्याचं इनडायरेक्ट प्रेशर येतं. असं वाटतं की यार, त्याला काय वाटेल? त्याने आपल्या वाढदिवशी स्टेटस ठेवलं होतं आपणही ठेवायला हवं. खरेतर मला मनापासून असलं काहीही करायची इच्छा नसते. मला अनेकदा वाटतं की यातून अनेकांना माझा जनसंपर्क किती दांडगा आहे, माझ्या ओळखीत किती मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत हा दाखविण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती इतकी क्लोज नसते पण ती खूप क्लोज आहे हे दाखविण्याचा तो प्रयत्न असतो.

सुरुवातीला हौस म्हणून सुरु केलेला प्रकार आता ओझं वाटू लागलाय..

मनाली म्हणाली, खरे तर मैत्रिणींचे स्टेटस ठेवताना मी इतका बारीक विचार केला नव्हता. माझे मित्र मैत्रीण एकमेकांचे फोटो ठेवतात तसे मी देखील ठेवले. पण हळूहळू मला सवयच लागत गेली आणि मी सगळ्या मित्र मैत्रिणींचे फोटो त्यांच्या वाढदिवशी माझ्या व्हाट्स अ‍ॅप स्टेटसला ठेऊ लागले. पण याचा परिमाण माझ्याच नातेवाईकांवर होईल आणि त्यातून रुसवे फुगवे निर्माण होतील एवढे असे होईल असे मला वाटले नव्हते. पण आता मी माझ्या परिचितांपैकी कोणाचाही वाढदिवस आहे असे मला समजले की मी स्टेटस ठेवते. यातून हेतू एवढाच की, आता अजून कोणी माझ्या स्टेटस न ठेवण्याने दुखावले जाऊ नये. पण आता सगळ्याचं ओझं वाटायला लागलंय. प्रत्येक दिवशी माझी मानसिक स्थिती चांगली असतेच असे नाही नाही पण कितीही मूड खराब असला, कितीही इच्छा नसली तरी हे एक कामच झालंय माझ्यासाठी..

हौसेचं ओझं होतंय का?

याविषयी रेस्पॉन्सिबल नेटिजमच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली पाटणकर म्हणाल्या, हे बर्थडे विषला नाही तर गुड मॉर्निंग, गुड नाईट च्या मेसेजना रिप्लाय नाही दिला तरीही होतं. फॅमिली ग्रुपवर देखील अनेकदा हे होताना दिसतं. कोणीतरी आपल्याला अशा पद्धतीने विश करावं ही इच्छा मुळात नात्यांमधल्या अपेक्षेतून निर्माण होते. पण या अपेक्षा आपल्याला आपल्याच लोकांकडून वाटतायत की बाहेरच्या लोकांकडून देखील असं वाटतंय याचा विचार आपण करायला हवा. जवळच्या लोकांकडून होत असतील तर त्या वेळीच सोडवायला हव्यात आणि बाहेरच्या लोकांकडून अपेक्षा केल्या जात असतील तर मात्र याचं कारण बाहेर न शोधता आपल्या आत शोधायला हवं. या न्यूनगंडातून, असुरक्षिततेतून अशा गोष्टी अनेकदा होतात. अनेकदा त्याचा परिणाम आपल्या सम्पूर्ण व्यक्तिमत्वावर होतो. आणि कोणाला तरी विश करायचं प्रेशर येत असेल तरीही ते किती घ्यायचं याचाही विचार करायला हवा.

ट्रेंड नातेसंबंधांवर ताण आणत असेल तर वेळीच थांबण्याची गरज..

याविषयी मानसशास्त्रज्ञ आणि रेस्पॉन्सिबल नेटीझन संस्थेत समुपदेशक म्हणून काम करणारे स्वप्नील पागे म्हणाले, अनेकदा कंपन्या जेव्हा नवीन फीचर बाजारात आणतात तेव्हा त्याचे उद्देश ठरलेले असतात. अनेक जण जेव्हा ते वापरतात तेव्हा त्याचा ट्रेंड तयार होतो. हा ट्रेंड हौसेपोटी आपण तो फोलो करतो पण त्यातून जर नात्यातली गुंतागुंत निर्माण होणार असेल तर त्याबाबत आपण विचार करणे गरजेचे आहे. आमच्याकडे समुपदेशनासाठी जेव्हा काही जण येतात तेव्हा नातेसंबंध बिघडण्याच्या कारणांमध्ये हे कारण असते की त्याने किंवा तिने 'बर्थ डे' साठी माझे स्टेटस असे ठेवले होते आणि अमुक तमुक व्यक्तीच्या वाढदिवसाला तसे ठेवले होते.

हेही करून पहा..

१) कोणताही ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा स्वतःची अशी एक पद्धत निर्माण करा ज्याने समोरच्याला चांगले वाटू शकेल.

२) व्यक्तिपरत्वे तुम्ही तुमची कृती बदलू शकता. एखाद्याला स्टेटस ठेवलेले आवडत नसेल तर तसे करणे टाळा

३) केवळ तुम्ही कोणाच्या तरी जवळ आहे असे दाखविण्यासाठी फोटो टाकू नका. त्यापेक्षा त्या व्यक्तीला व्यक्तिशः तो फोटो पाठवून आठवण सांगा

४) HBD सारखे शॉर्ट कट, केकचे भरपूर फोटो, अशा गोष्टी करण्यापेक्षा चार शब्द त्या व्यक्ती विषयी तुम्हाला आवडलेल्या त्यानिमित्ताने सांगा.

५) तयार कोट वापरण्यापेक्षा स्वतः कोट तयार करा. तुमच्या त्या व्यक्तीबाबतच्या चांगल्या आठवणी, तुम्हाला त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भावना जरूर या निमित्ताने त्यांना लिहून पाठवा.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT