- सुनील तांबे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
जलचक्र, शेतीचं चक्र—खरीप आणि रब्बी हंगाम, पिकं, स्थलांतराचं चक्र अशी अनेक चक्र पावसाळ्याशी म्हणजे मॉन्सूनशी संबंधीत आहेत. खंडोबा आणि विठोबा या महाराष्ट्रातल्या दोन दैवतांचा संबंध मॉन्सूनशी वा मोसमी वार्यांशी आहे..काय आहे यामागचे शास्त्र....
मोसमी वार्यांमुळे पावसाळा येतो ही बाब दर्यावर्दी म्हणजे व्यापारासाठी शिडांची जहाजं घेऊन अथांग समुद्रात (Ocean) जाणार्या लोकांना आधी कळली. हे होते अरब. अरबी भाषेमध्ये मौसिम म्हणजे वर्षातून एकदा नियमीतपणे येणारा काळ. दरवर्षी हिवाळ्याची (Winter) चाहूल लागते ती मोसमी वार्यांमुळे. नैत्रत्येकडून येणारे मोसमी वारे शिडात भरून जहाजं वेगाने कूच करायची. परतीचे वारे म्हणजे ईशान्येकडून येणारे वारे तुलनेने कमी वेगाने वाहतात त्यामुळे जहाजांचा वेग मंदावतो. मोसमी वार्यांवर स्वार होऊन, अरबांची जहाजं भारताला वळसा घालून पार चीनपर्यंत जायची आणि परतायची. मोसमी वार्यांमुळे पाऊस येतो. (Maharashtra Festive Season Relation of Monsoon with Dasara and Diwali)
भारतीयांना पावसाळा (Monsoon) माहीत होता पण त्याचा वार्यांशी असलेला संबंध उशीरा ध्यानी आला. जे काही आकाशात आहे त्याचा संबंध त्यांनी नक्षत्रांशी जोडला. जलचक्र, शेतीचं चक्र—खरीप आणि रब्बी हंगाम, पिकं, स्थलांतराचं चक्र अशी अनेक चक्र पावसाळ्याशी म्हणजे मॉन्सूनशी संबंधीत आहेत. खंडोबा आणि विठोबा या महाराष्ट्रातल्या दोन दैवतांचा संबंध मॉन्सूनशी वा मोसमी वार्यांशी आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) नावाचा मराठी भाषकांचा एकसंघ प्रदेश १९६० साली निर्माण झाला. त्यापूर्वी कधीही महाराष्ट्र नावाचं एकसंघ राज्य वा राष्ट्र नव्हतं. भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्राची विभागणी चार उपविभागांमध्ये केली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. यापैकी कोकण आणि गोवा वगळला तर उरलेले तिन्ही उपविभाग दख्खनच्या पठाराचा भाग आहेत.
आजचा कर्नाटक, तामीळनाडू, रायलसीमा हा आंध्र प्रदेशाचा (Andhra Pradesh) भाग, तेलंगण आणि कर्नाटकाचा काही प्रदेश दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. अतिप्राचीन काळी ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्यातून निघालेल्या लाव्हा रसाच्या थरांनी दख्खनचं पठार बनलं. परिणामी या पठारावरील मातीचा थर पातळ आहे. कृष्णा, गोदावरी, तापी, कावेरी इत्यादी नद्यांची खोरी वगळता दख्खनचं पठार सुपीक नाही. वर्षाला सामान्यतः ६००-७०० मिलीलीटर पाऊस दख्खनच्या पठारावर पडतो. त्यामुळे दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, तेलबिया, डाळी अशी पिकं घेतली जात.
त्याशिवाय पशुपालन. दख्खनच्या पठाराला वेढणार्या पर्वतरांगांमध्ये खंडोबाची (Lord Khandoba) सर्व प्रमुख देवस्थानं आहेत. खंडोबा हा पशुपालकांचा देव समजला जातो. पावसाळा सुरू होण्याच्या आधी मेंढ्यांचे कळप घेऊन धनगर आपआपल्या गावी परतात कारण कोकण वा घाटातला पाऊस जित्राबांना सोसणारा नसतो. खरीपाचं पीक हाती आल्यावर मेंढ्यांचे कळप घेऊन धनगर घाटामध्ये जात. तेथील गवत आणि वनस्पतींवर शेळ्यामेंढ्या चरत. पावसाने धुपून गेलेल्या शेतजमिनींना शेळ्यामेंढ्याच्या मलमूत्राचं खत मिळत असे. त्यामुळे या कळपांचं शेतकरीही स्वागत करत.
मेंढ्याची लोकर, मांस, गाई-म्हशींच्या दुधापासून बनवलेलं लोणी, तूप इत्यादी पदार्थांची विक्री यावर धनगरांची उपजिवीका चालत असे. गुंथर सोन्मायथर या जर्मन अभ्यासकाने धनगरांच्या जीवनाचा गाढा अभ्यास केला. त्यावरून असं दिसतं की धनगरांकडे असणार्या जमिनीमध्ये केवळ खरीपाचं पिक घेता येत असे. म्हणजे त्या जमीनी हलक्या असव्यात आणि त्यांना संरक्षक पाण्याची व्यवस्था नसावी.
महाराष्ट्रात धनगर, कर्नाटकात कुरमाव तर आंध्र आणि तेलंगणात गोला या जमातीचे लोक पशुपालक आहेत. धनगर आणि कुरमाव हे मेंढ्या पाळतात तर गोला वा गोलकर हे गाई आणि म्हशी पाळतात. ह्या सर्वांचं मुख्य दैवत आहे खंडोबा. कोल्हाटी, कैकाडी वा अन्य भटक्या जमातीही खंडोबाला दैवत मानतात.
विठोबा (Lord Vithoba) हे दैवतही पशुपालकांचं होतं. मात्र पुढे कधीतरी वैष्णव संप्रदायाने त्याला आपलंसं केलं. वैष्णव संप्रदाय प्रामुख्याने शेतकरी जाती वा कुणबी वा गावात स्थायिक झालेल्या बारा बलुतेदारांचा आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला वार्या, दिंड्या जातात. आषाढी एकादशीला चातुर्मास म्हणजे पावसाळा सुरू होतो. या दिवशी विष्णू पाताळात जाऊन दूध सागरामध्ये शेषाच्या शय्येवर निद्राधीन होतो अशी समजूत आहे.
कार्तिकी एकादशीला विष्णू निद्रेतून जागा होतो अशीही समजूत आहे. या दोन दिवशी वैष्णव उपवास करतात. चातुर्मासाचे चार महिने विष्णू आणि म्हणून अन्य देव विश्रांती घेत असल्याने या काळात दैत्यांचं राज्य असतं. म्हणून व्रतवैकल्यं, उपासतपास या काळात केले जातात. पावसामुळे प्रवास करणं जिकीरीचं असतं. परिणामी या काळात साधू-संन्यासी नगरात मुक्काम करतात. प्रवचन, कीर्तन इत्यादी कार्यक्रमांद्वारे सामान्य लोकांना धर्मोपदेश करतात.
आषाढामध्ये पाऊस गंगेच्या खोर्यात पोचतो. त्यामुळे या काळात काशी (बनारस) इथे मोठ्या प्रमाणावर साधू, महंत वगैरे मुक्कामाला येतात. जैन धर्मीयांचं पर्यूषण पर्व म्हणजे चातुर्मास. बौद्ध साधूही चातुर्मासात एका नगरात मुक्काम करत असत. महाराष्ट्रामध्ये पाऊस आषाढी एकादशीच्या अगोदर सुरू होतो. पेरण्या झाल्यानंतर आषाढी एकादशी येते. त्यावेळी शेतात काम नसतं त्यामुळे वैष्णव वारीला जातात.
खरीपाच्या पिकाची कापणी दसर्याच्या आधी होते. त्यानंतर दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात राजे वा सरदार वा संस्थानिक यांचा सण दसरा कारण राजाच्या घरी रोज गोडधोड म्हणजे दिवाळी असते. दसर्याला सीमोल्लंघनाला जायचं म्हणजे कर वा उत्पन्नाची वसूली करायची. म्हणून सोनं लुटणं याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात महत्व आहे. पुणे, कोल्हापूर अशा अनेक शहरात दसरा चौक म्हणून आहेत.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा. या दिवशी विष्णूने बळीराजाला पाताळात धाडलं. महाराष्ट्रात या दिवशी बायका नवर्याला ओवाळताना म्हणतात, इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो. आपल्याकडची दिवाळी कार्तिक शुद्ध प्रतिपदेस होते, केरळचा ओणम हा सण आश्विन शुद्ध प्रतिपदेस साजरा केला जातो. केरळमध्ये आपल्या आधी पावसाळा सुरू होतो साहजिकच तिथे धानाची कापणीही आपल्या आधी होते. ओणम साजरा करण्यामागील समजूत अशी की या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळातून पृथ्वीवर येतो.
बळीराजा हे महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचं प्रतीक आहे. मात्र बळीराजाचा संबंध पावसाळा आणि खरीपाच्या पिकांच्या काढणीशी दिसतो. बळीचं राज्य म्हणजे पावसाळा असावा या काळात देव निद्राधीन असतात. पावसाळ्याच्या समाप्तीनंतर पृथ्वीवर देवांचं राज्य सुरू होतो असा तर्क पारंपारिक समजुतींमधून हाती लागतो. पावसाळ्यात जीवन आणि मृत्यू या दोन प्रदेशांमधील सीमारेषा धूसर झालेली असते. त्यामुळे असेल कदाचित पण आश्विन महिन्याचा दुसरा पंधरवडा पितृपक्ष म्हणून पाळला जातो. या काळात मृतात्मे पृथ्वीवर आलेले असतात अशी समजूत आहे.
दिवाळीतही भाऊबीज हा यमाचा सण आहे. यम म्हणजे मृत्यू. दिवाळीमध्ये जुगार खेळण्याची पद्धत आहे. कारण जुगार राक्षसांचा खेळ मानला जातो. दिवाळी चातुर्मासात येते. या काळात राक्षसांचं राज्य असतं. या समजुती उत्तर भारतातील पावसाळ्यावर आधारित असाव्यात. कारण बहुतेक सर्व संस्कृत धार्मिक ग्रंथाच्या निर्मिती त्या प्रदेशात झाली.
कार्तिकी एकादशीला वैष्णव पंढरपूरला जातात. खरीप पिकाची काढणी झालेली असते आणि रब्बीच्या पेरण्या करण्याची वेळ आलेली असते. चातुर्मासाची सुरुवात आणि समाप्ती पंढरपूरच्या वारीने होते. आषाढीच्या वारीत, बारामतीमध्ये मेंढ्यांचं रिंगण असतं. पंढरपूरला गेल्यावर घोंगडीची खरेदी केली जाते. काळ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनलेली ही घोंगडी शेतकर्यांच्या गणवेशाचा भाग होती. जोतिराव फुले ही घोंगडी खांद्यावर टाकूनच इंग्लडच्या युवराजापुढे शेतकर्यांचं गार्हाणं मांडायला उभे राह्यले होते.
आषाढीची म्हणजे पहिली वारी पाऊसपाणी चांगलं झालं यासाठी देवाचे आभार मानायला, तर कार्तिकी एकादशीची वारी सुगी चांगली झाली यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला काढण्याची प्रथा प्राचीन काळात कधीतरी सुरू झाली असावी.
आज दख्खनचं पठार हे शेतकरी आत्महत्यांसाठी वर्तमानपत्रांतून गाजत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या चार राज्यांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये सर्वाधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात ही समस्या अधिक गंभीर आहे. सलग दोन वर्षं दुष्काळाची गेल्यानेही परिस्थिती अधिक खडतर झाली. शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या कारणांची सविस्तर चर्चा झाली आहे. टाटा समाजविज्ञान संस्था, यशदा अशा अनेक संस्थांनी यासंबंधात तपशीलवार अभ्यास आणि निष्कर्ष सादर केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीने यासंबंधात अनेक शिफारसीही केल्या आहेत. महात्मा फुलेंची साक्ष काढली तर महाराष्ट्रात शेतकरी जाती तीन—कुणबी, माळी आणि धनगर. त्यानंतर बहुधा वंजारी असावेत. वंजार्यांचा समावेश बंजार्यांमध्ये ९० च्या दशकात झाला आणि त्यांना राखीव जागांमध्ये प्रवर्ग मिळाला. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे माळी समूहाचा समावेश अन्य मागासवर्गीयांमध्ये झाला. त्यामुळे मराठा समाजामध्ये राखीव जागांच्या मागणीने जोर पकडला. त्यांच्या पाठोपाठ धनगरांसाठीही स्वतंत्र प्रवर्ग असावा अशी मागणी सुरू झाली आहे.
बारकाईने पाह्यलं तर कुणबी-मराठा, माळी, धनगर या अस्मिता प्रामुख्याने मॉन्सून आणि भूप्रदेशाची जडण-घडण यांच्याशी संबंधीत आहेत. लोकशाही व्यवस्थेत हे समूह परस्परांचे स्पर्धक बनले आहेत. शेती वा पशुपालन (विकेंद्रीत अर्थव्यवस्था) किफायतशीर राह्यलेलं नाही त्यामुळे राखीव जागांद्वारे केंद्रीय अर्थव्यवस्थेत आपल्याला स्थान मिळावं अशी विविध समूहांची धारणा होऊ लागली आहे.
पावसाळ्याच्या जलचक्रामुळे शेती, पिकं, पशुपालन, स्थलांतर इत्यादी एकमेकांत गुंतलेल्या चक्रांमध्ये होणारे बदल आणि केंद्रीय अर्थव्यवस्थेत (औद्योगिकरण) न मिळणारं स्थान यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणालाही वेगळी दिशा मिळू लागली आहे. परिणामी खंडोबा आणि विठोबा यांच्या भक्तांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.