diwali work esakal
प्रीमियम महाराष्ट्र

Diwali :सणांच्या कामांचं 'स्ट्रेस मॅनेजमेंट' कसं कराल?

Shraddha Kolekar

पुणे - घर साफ करायचं आहे, मांडणीतील भांडी घासायची आहेत, माळे साफ करायचेत, घराला लायटिंग करायची आहे, फराळ बनवायचा आहे, हार तोरणं करायची आहेत, पार्लरला जाऊन यायचं आहे आणि ऑफिसने दिवाळीची सुटी फक्त तीन दिवस देणारे असे जाहीर केलं की अशा वेळी ऑफीसचं काम करत असतानाही माझ्या डोळ्यासमोर कामाच्या याद्याच फिरत राहतात असे सातारा येथील चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्नेहल अनपट सांगतात.

मी चांगली सून नाहीये का, हा प्रश्न माझा मलाच खात राहतो.

स्नेहल म्हणतात, रिटर्न फाईल करायच्या तारखा या अनेकदा दिवाळीतच असतात, त्यामुळे अनेकदा या काळात काम जास्त असते. अशात ही सगळी कामे करणे अवघड होते. खरे तर आपल्या कामाचा आवाका पाहून आपल्या घरचे आपल्याकडून घरच्या कामाची अपेक्षा करणार देखील नाहीत पण ती अपराधीपणाची भावना आपल्याला सतत अस्वस्थ करत राहते. मी चांगली सून नाहीये का, हा प्रश्न माझा मलाच खात राहतो.

पण फराळ आपल्यालाच करावा लागतो तो पुरुष माणसांना जमेलच असे नाही.

सोलापूर येथे जिल्हा परिषदेत अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षीय सीमा लोखंडे म्हणतात, दिवाळसणाचे काम मी एकटी नाही करत. घरातले देखील मदत करतात. हार तोरण करण्यापर्यंत ठीक पण फराळ आपल्यालाच करावा लागतो तो पुरुष माणसांना जमेलच असे नाही. आमच्याकडे सुट्या असतात पण याच दरम्यान काही मोठे कार्यक्रम आले तर मात्र घरचं आणि ऑफिसचं करून थकायला होतं. चिडचिड होते.

मी सणवार माझ्या पद्धतीने आणि मला होईल तेवढेच करते.

लातूरच्या दीपाली भोसले म्हणतात मी सध्या बाळ लहान असल्याने घरीच आहे. पण बाळाला सांभाळून सणवार करायचं टेन्शन आहेच. मी सणवार माझ्या पद्धतीने साजरे करते आणि मला होईल तेवढेच करते. यातही मी माझ्या नवऱ्याची मदत घेते. तेही आनंदाने त्याला जॉब सांभाळून जे जे शक्य आहे ते ते करतात त्यामुळे मला कोणत्याच सणाचा फारसा ताण वाटत नाही.

घरच्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू की नाही याचं टेन्शन असतं.

तर हिंदी भाषिक असणाऱ्या आणि पुण्यातल्या आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम करणाऱ्या सुकन्या शर्मा - दामा म्हणतात, माझे नवीनच लग्न झाले आहे. त्यामुळे खूप उत्साह आहे. पण जेव्हा एकत्र कुटुंबात आपण दिवाळी साजरी करणार असतो तेव्हा घरच्यांच्या काही अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण करू की नाही याचं टेन्शन असतं. त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती आपण बरोबर करू ना, याची काळजी असते.

चारचौघात उठबस करण्याचं, घरातले मोठे सांगतील त्या पद्धतीने सण साजरा करण्याचं थोडा ताण येतो. गावी जायचंय तर सुटी मिळेल का, तिकिटं मिळतील का? परत जॉबवर वेळेत जॉईन करता येईल का अशा सगळ्या गोष्टी डोक्यात सुरु असतात. यातही महिलांवर अपेक्षांचं ओझं जरा जास्त असतं

अनेक घरातील मंडळींना त्यातल्या त्यात महिलांना सणासुदीच्या काळात अशा स्ट्रेसचा सामना करावा लागतो. घर आणि ऑफिस सांभाळताना अनेकदा महिलांची मानसिक ओढाताण होते. याचा परिणाम त्यांच्या शरीरावरही होताना दिसतो. मात्र हे सण साजरे करताना ते अधिक साजरे व्हावे यासाठी प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या प्रश्नावर आपणच उत्तरे काढणे आवश्यक ठरते.

डॉ. आनंद नाडकर्णी हे संस्थापक असणारी 'इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' ही संस्था ठाणे, पुणे, नाशिक व मेळघाटात समुपदेशनाचे काम करते. या संस्थेत मानसशास्त्र समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या रजनी माटे यांनी सकाळ शी बोलताना आपले अभ्यासपूर्ण मत मांडले.

१६ भाज्या, १६ कोशिंबिरी आताच्या काळात करणे योग्य आहे का?

काळाप्रमाणे सणवार साजरे करायच्या पद्धती बदलणे आवश्यक आहे. म्हणजे पूर्वी गौरी गणपतीला नैवेद्य म्हणून १६ भाज्या १६ कोशिंबिरी असत. पण आपण हा फरक समजून घ्यायला हवा की पूर्वी तेवढे पदार्थ खाणारी माणसं घरात होती. आता जर हे केलं तर त्यातले अनेक पदार्थ न खाण्यापायी वाया जाण्याची शक्यता अधिक आहे.

पूर्वी दिवाळीलाच गोड आणि फराळाचे पदार्थ व्हायचे जे हल्ली वर्षभर होतात. त्यामुळे त्यातले सगळेच पदार्थ आपण करायलाच हवेत हा अट्टाहास तरी आपण करायला हवा का?

मदत मागायला आणि ती स्वीकारायला देखील शिका..

स्वतःच्या घरातील अनुभव सांगताना रजनी माटे म्हणाल्या "माझा मुलगा हार करताना त्याने माझे ऐकावे असे मला वाटत होते. मी त्याला म्हणाले की, माझा अनुभव जास्त आहे तेव्हा तू माझ्याच पद्धतीने हार तयार कर . त्यावेळी मुलगा पटकन म्हणाला पण माझ्याकडे नावीन्य आहे."

अनेकदा घरातल्या मंडळींना सणावाराच्या निमित्ताने कामे करायची इच्छा असते. पण ही सगळी माझीच कामे आहेत आणि ती मीच करायला हवीत या विचारातून अनेक महिला बाहेरच येत नाहीत. जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात. मी म्हणेल तसेच झाले पाहिजे किंवा हे माझ्याशिवाय कोणाला जमणार नाही यातूनही बाहेर यायला हवी. कुटुंबीयांची ही मदत आपल्याला स्वीकारता देखील येणे तितकेच गरजेचे आहे.

आदर्श पत्नी किंवा सुनेच्या चौकटीत न अडकता स्वतःच्या क्षमता ओळखा

मी जर अमुक तमुक गोष्ट नाही केली तर सासूबाईंना काय वाटेल? ऑफिसमधून सुटी मिळेना पण सगळे फराळ नाही केले तर मी चांगली पत्नी नाही ठरणार. आमच्या नातेवाईकांकडे सगळे पदार्थ घरीच बनवले, मी विकत घेतले तर ते मला नावं ठेवतील का? या सगळ्या न्यूनगंडातून महिलांनी बाहेर पडणे गरजेचे आहे.

प्रत्येक महिलेच्या घरची परिस्थिती, ऑफिसमधील कामाची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे तुमच्या क्षमता ओळखा आणि झेपेल तेवढ्याच जबाबदाऱ्या घ्या. ऑफिस आणि घरच्या जबाबदाऱ्यांचं वेळेचे नियोजन करा.

स्वतःला स्पेस नाही दिलीत तर..

तरुण वयातील मुली मॅटर्निटी फेजमधून जात असतात तर मध्यम वयातील अनेक महिलांचा मोनोपॉजचा काळ असतो. उतारवयात तब्बेत साथ देत नसते . या सगळ्या फेजमधून जात असतात. त्यांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होत असतात.

अनेकदा महिलांची चिडचिड झालेली पाहायला मिळते. सणसमारंभ येतात तेव्हा त्यांच्यावरील ताण अधिक वाढतो. त्यातून शारीरिक त्रासांना देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांनी स्वतःला स्पेस देत हे सण अधिक साजरे करणे जास्त गरजेचे आहे.

------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT