महुआ मोइत्रा लोकसभेतल्या एक तडफदार आणि बेधडक नेत्या म्हणून ओळखल्या जातात ई सकाळ
प्रीमियम पॉलिटिक्स

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

लोकसभेतल्या तडफदार, सडेतोड नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकीच धोक्यात आली आहे. मात्र अशाप्रकारे वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांना मुद्दाम लक्ष्य तर केलं जात नाहीये ना?

स्वाती केतकर-पंडित

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी लोकसभेच्या आचार समितीने केली आणि गुरुवारी आपल्या अहवालाचा मसुदा स्वीकारला.

त्याचबरोबर मोईत्रा यांना “अनैतिक वर्तन” केल्याबद्दल त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारसही केली.

आचार समितीने मोइत्रा यांच्या वर्तनावर कडक ताशेरे ओढले आहेत.

आचार समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटलंय की, महुत्रा मोईत्रा यांची कृती आक्षेपार्ह, अनैतिक, गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे यामध्ये गंभीर शिक्षा होणे आवश्यक आहे. या सर्व प्रकरणी त्यांच्यावर निर्धारित वेळेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले, “आचार समितीने महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांबाबत अहवाल तयार केला होता. तो अहवाल स्वीकारणे हा या बैठकीचा एकच अजेंडा होता. तो अहवाल स्वीकारण्यात आला. सहा खासदारांनी या अहवालाचे समर्थन केले असून चार जणांनी त्याच्याशी असहमती दर्शवली आहे. तशा नोट्सही त्यांनी सादर केल्या आहेत. आम्ही शिफारशींसह सविस्तर अहवाल लोकसभा अध्यक्षांना पाठवणार आहोत. जी काही कारवाई करायची ती सभापतीच करतील.

मोइत्रांवर कोणता आरोप होता?

कॅश फॉर क्वेश्चन cash for questionअर्थात प्रश्नांसाठी पैसे घेतल्याचा मोठा आणि महत्त्वाचा आरोप महुआ मोइत्रा यांच्यावर होता.

त्याचबरोबर त्यांनी त्यांचे संसदेचे लॉगिन आणि पासवर्ड उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे. याचाच अर्थ असा की, ते आवश्यकतेनुसार तिच्या वतीने प्रश्न पोस्ट करू शकतील. मोइत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत संसदेचे लॉगिन आणि पासवर्ड हिरानंदानी यांना दिल्याचे कबूल केले होते मात्र कोणतीही रोख रक्कम घेतली नव्हती.

लोकसभेच्या आचार समितीच्या अहवालात म्हटलं गेलं आहे की, इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2019 ते एप्रिल 2013 दरम्यान मोइत्रा यांचे सदस्य पोर्टल परदेशातून तब्बल ४७वेळा वापरलं गेलं होतं. गृह मंत्रालयाने याविषयी एक सूचना जारी केली होती, त्यात असं म्हटलं होतं की, मोइत्रा यांनी त्यांचे लोकसभेचे तपशील, पोर्टलचा आयडी आणि पासवर्ड लोकसभा सदस्य नसलेल्या हिरानंदानी यांच्याशी शेअर केल्याने "संवेदनशील किंवा वर्गीकृत माहिती गहाळ अथवा चोरी होऊ शकते.

हॅकिंगचे आरोप apple alert

मोइत्रा यांच्यावर आरोप व्हायच्या आधी त्यांनीच सरकारवर आरोप केले होते, त्यांचा फोन हॅक करण्याचे आरोप.

अॅपलकडून त्यांना इशारा आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं की, अॅपलने त्यांना इशारा दिला होता, की त्यांच्या मोबाइल केंद्र पुरस्कृत हॅकर्सकडून हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हे सगळं प्रकरण अॅपल अलर्ट apple alert म्हणून गाजलं. त्याविषयी सरकारने चौकशीचे आदेशही दिले पण ते फारसं वाढलं नाही.

वादविवाद आणि महुआ मोइत्रा

तसं तर मोइत्रा यांच्या नावाशी वादविवाद जोडलेच गेले आहेत. एक फायरब्रँड नेत्या म्हणून महुआ यांची ओळख आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मोइत्रा यांनी परदेशात शिक्षण घेतलं आहे. शिवाय अमेरिकेतील प्रतिष्ठीत कंपनी जे पी मॉर्गन इथे त्यांनी कॅम्पसमधूनच नोकरी पटकावली आणि तब्बल १० वर्ष तिथे नोकरी केली.

त्यानंतर आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात त्यांनी इतर मित्रमैत्रिणींना पत्रकार म्हणून काम करताना तसेच सामाजिक क्षेत्रात काही वेगळं काम करताना पाहिलं आणि त्यांना वाटलं की मॉर्गनमधील एक प्रतिष्ठीत अधिकारी म्हणून ओळख घडवायची की खरोखरच सामाजिक बदलात आपला वाटा उचलायचा? झालं!

तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या मोइत्रा यांनी मनातला आवाज ओळखला आणि अमेरिकेतल्या कामाचा राजीनामा देऊन त्या भारतात आल्या.

इथे आल्यानंतर आधी त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. राहुल गांधी यांच्यासोबत अगदी जवळून काम केलं. पण नंतर एकदा ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची भेट झाली आणि ममतादीदींच्या करिश्म्यामुळे मोइत्रा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसची कास धरली.

इथेसुद्धा त्यांचा प्रवास सोपा नव्हताच. बांगलादेशाच्या सीमेवरील मतदारसंघातून मोइत्रा लोकसभेत निवडून गेल्या.

पहिल्या भाषणातच त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची आणि हुशारीची चमक दिसली. रोखठोक, तडफदार भूमिका घेणाऱ्या मोइत्रांचे पहिले भाषण जोरदार गाजले. त्यात त्यांनी फॅसिझमच्या सात लक्षणांवर भाष्य केलं होतं. सत्ताधारी बाकांवरुन त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या अजिबात घाबरल्या नाहीत, उलट सत्ताधाऱ्यांना पुरुन उरल्या. ज्याची खूप प्रशंसा झाली होती.

मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा आणि राष्ट्रद्रोह कायद्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत.

ट्रोलर्सना बेधडक सामोऱ्या जाणाऱ्या महुआ

मोइत्रा यांच्यावरील व्यक्तिगत हल्ले काही नवीन नाहीत.

महागाईवरील चर्चेदरम्यान आपली महागडी लुई व्हिटॉन बॅग लोकसभेत लपवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महुआ मोईत्रा यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं.

त्यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये कालीमातेविषयी केलेल्या वक्तव्याबद्दलही हिंदुत्त्ववाद्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

त्याचबरोबर त्यांच्या कपड्यांबद्दल कायमच टीका होत आली आहे. आपल्या साडीविषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, "ही बांगलादेशातील सुती ढाकई साडी आहे. माझे बेकायदेशीर रोहिंग्या मित्र माझ्यासाठी तिची तस्करी करतात." अर्थात या विधानात उपहास आणि खिल्ली होती. मात्र आपल्या ट्रोल्सना अशी उत्तरं देण्यात कधीकधी सॉलिड मजा येते, अशा अर्थाचं ट्विटही त्यांनी त्यावर केलं होतं.

भाजपसोबत खटके

मोइत्रा विरोधकांत तर भाजप सत्ताधाऱ्यांत त्यामुळे भाजपबरोबर मोइत्रा यांचे अनेकदा खटके उडालेले आहेत. कधी कालीमातेविषयक वक्तव्यावरुन तर कधी आणखी कशावरुन. त्यावेळीही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं, ''हिंदुत्त्व ही भाजपची जहागिरी नाही. भाजपला मी त्यांचे हिंदुत्त्व आपल्यावर लादू देणार नाही. धर्म आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याबद्दल बोललंच पाहिजे. मी एक इंचही मागे हटायची नाही.''

सध्या त्यांच्यावर प्रश्नांसाठी पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्या निशिकांत दुबेंबरोबरही मोइत्रा यांचे वाद झालेले आहेत. दुबे यांनी संसदेतील आचार समितीकडे मोइत्रा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर मोइत्रा यांनीसुद्धा विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित असलेल्या दुबेंविषयीच्या प्रकरणांची चौकशी करावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना केली होती. शिवाय निशिकांत दुबे यांच्या एमबीए आणि पीएचडीच्या पदव्या बोगस असल्याचा आरोपही मोइत्रा यांनी केला होता. त्याचबरोबर दुबेंच्या निलंबनाची मागणी केली होती.

अर्थात दुबे यांच्यावरील आरोपांबाबत संबंधित समितीने कोणती कारवाई केली आहे, हे अजून उघड झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT