बेलारूसमध्ये राहणारी १८ वर्षांची मुलगी... लढायचं हे आयुष्यभर लक्षात रहावं म्हणून तिने हातावर टॅटू काढून घेतले... मुलीनं टेनिसमध्ये अव्वल स्थान गाठावं असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं....
वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं.. मार्गात अडथळे आले नाहीत ते आयुष्य कसलं...रशिया- युक्रेन युद्धात तिच्या देशाच्या अध्यक्षांनी रशियाला साथ दिली..
पत्रकार परिषदांमध्ये तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला... प्रकरण इतकं चिघळलं की राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन करतानाचे तिचे फोटो व्हायरल झाले... पण ती डगमगली नाही... शनिवारी सलग दुसऱ्यांदा तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं...पण हा क्षण अनुभवण्यासाठी तिचे वडील मात्र या जगात नव्हते...
जिद्द, दरारा, वर्चस्व... हे काय असतं हे शनिवारी एका खेळाडूने जगाला दाखवलं... ही खेळाडू म्हणजे २५ वर्षांची आर्यना सबलेंका. आर्यनाने शनिवारी दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत ती एकही सेट पराभूत झाली नाही, इतके तिचे सर्व सामन्यांमध्ये वर्चस्व राहिलं.
या विजयाबरोबरच तिने तिच्या वडिलांबरोबर पाहिलेलं स्वप्नही पूर्ण झालं. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने वयाच्या २५ वर्षाच्या आधी किमान दोन ग्रँडस्लॅम जिंकावेत. तिने दोनदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत हे स्वप्न पूर्ण केले. पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, विशेषत: ती कारकिर्दीत भरारी घेत असताना घडलेल्या घटनांमुळे.
ती फक्त टेनिस कोर्टवर प्रतिस्पर्ध्यांशी लढत नव्हती, तिला गेल्या काही वर्षात बाहेरून सातत्याने दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांमुळे मानसिकताही कणखर ठेवावी लागत होती.
खरंतर २०-२५ हे वय एखाद्या खेळाडूसाठी ऐनभरातील उमेदीचं असतं. पण त्यावेळी जेव्हा खेळाबरोबरच बाहेरच्या जगातून येणाऱ्या तिरस्काराच्या प्रतिक्रियांचाही सामना करावा लागतो, तेव्हा त्या खेळाडूला फक्त मैदानात नाही, तर मनात उसळणाऱ्या कल्लोळाशी, निराशेशीही दोन हात करावे लागतात.
तेवढी मानसिक कणखरता दाखववीच लागते आणि आर्यनाने ती प्रत्येकवेळी तिच्या खेळातून दाखवली आहे. कदाचित तिचा टॅटूही तिला तेच करण्याची प्रेरणा देत असतो.
कारमधून प्रवास करताना टेनिस कोर्ट दिसले आणि....
५ मे १९९८ रोजी बेलारुसची राजधाना मिंस्क येथे जन्मलेल्या आर्यना १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये टेनिस खेळायला सुरुवात केली. तिचे वडील एकदा तिच्याबरोबर कारने प्रवास करत असताना त्यांना टेनिस कोर्ट दिसले. तिथे ते तिला घेऊन गेले. तिथेच आर्यनामधील टेनिसपटू घडण्याला सुरुवात झाली.
घरी खेळाचं वातावरण होतंच. कारण तिचे वडील सर्गी हे आईस हॉकीपटू होते. हळूहळू आर्यनाने स्पर्धा जिंकायला सुरुवात केली. ती केवळ एकेरीतच नाही, तर दुहेरीतही शानदार खेळ करत होती. तिने २०२१ मध्येच दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला होता.
तिने एलिस मॅर्टेन्सबरोबर खेळताना २०१९ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. पण नंतर तिने एकेरीवर लक्ष केंद्रित केले. एकेरीतही तिने सातत्याने चांगली कामगिरी केली असून आता ती ग्रँडस्लॅम विजेती आहे.
वडिलांचे निधन अन् आईने घातलेली समजूत
आर्यनासाठी २०१९-२० हे वर्ष फारसे चांगले नव्हते. तिच्या वडिलांचे २०१९ मध्ये वयाच्या ४३ व्या वर्षीच निधन झाले. आर्यना तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. त्यामुळे त्यांच्या निधनाचा तिच्यावर मोठा परिणाम झाला.
तिला त्यांच्यासाठी ग्रँडस्लॅम जिंकायचे होते. तिला २५ वर्षांच्याआधी दोन ग्रँडस्लॅम जिंकून त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. सातत्याने हाच विचार तिच्या डोक्यात होता.
मात्र, वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर यायला तिला तिच्या आईने मदत केली. तिच्या आईने तिला समजावलं की तिच्या जिंकलेल्या प्रत्येक सामन्याबद्दल तिच्या वडिलांना अभिमानच वाटणार आहे. त्यानंतर आर्यना स्थिरावली.
तिने नंतर २०२३ मध्ये ग्रँडस्लॅम तर जिंकलेच, पण त्याचबरोबर तीन २०२३ वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहचली, तिने अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली.
तिने जेव्हा शनिवारी दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले, तेव्हा तिने तिच्या कुटुंबाचे आभार मानताना स्पष्ट सांगितले की 'गेल्यावर्षीच्या विजयाआधी मला वडिलांसाठीच जिंकायचे होते. ते माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेत. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत. पण आत्ता माझ्याकडे माझी आई, माझी बहीण आहे. ते माझ्याबरोबर आहेत आणि मला त्यांचा विचार करायचा आहे.'
'वडिलांनी माझ्यासाठी जे केले, त्यासाठी मी कृतज्ञ आहे, ते नसते, तर मी इथे नसते. पण यावेळीचा विजय माझ्या आईसाठी, बहिणीसाठी आणि माझ्या आजीसाठी आहे.' आर्यनासाठी तिचे कुटुंब तिची सर्वात मोठी ताकद राहिली आहे.
प्रशिक्षकांचे योगदान
आर्यनाच्या यशात तिच्या टीमचाही मोठा वाटा राहिला. तिच्याकडून प्रत्येकाने करून घेतलेली तयारी महत्त्वाची होतीच. पण या तयारीवेळी तिची मानसिकताही चांगली राहिल याचा विचार करण्यात आला होता.
त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तिची तयारी करून घेतली होती. तिच्या अनोख्या ट्रेनिंगचे व्हिडिओही ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ दरम्यान व्हायरल झाले होते.
इतकेच नाही, तर या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून तिने फिटनेस ट्रेनर जेसन स्टेसी यांच्या डोक्यावर तिची स्वाक्षरी केली होती. ही परंपरा तिने अंतिम सामन्यापर्यंत चालू ठेवली, कारण ती त्यानंतर प्रत्येक सामना जिंकत होती. याबद्दल तिने गमतीने सांगितले होते की हे स्टेसीला आवडत नाही, पण जिंकण्यासाठी काहीही चालू शकते.'
लढण्याची प्रेरणा देणारा टॅटू
पॉवरफुल शॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्यनाने तिच्या डाव्या हातावर डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा टॅटू काढलेला आहे. खरंतर तर तिने टॅटू काढल्याबद्दल तिची आई तिला रागावली होती. पण तिच्यासाठी तो टॅटू लढण्याची प्रेरणा देतो .
टॅटूबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो टॅटू तिला रोज दिसतो आणि तिला लढण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते. तिला कोर्टवर कठीण प्रसंगात लढण्याची ताकद या टॅटूमुळेच मिळते. तिला ती वाघिणीसारखी आहे आणि तिला लढायचं आहे, याची आठवण तो टॅटू करून देतो.
अन् ‘ती’ने पत्रकार परिषद घेणंच बंद केलं
आर्यनासाठी सर्वात कठीण काळ राहिला तो २०२२-२३ हंगामादरम्यानचा. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात बेलारुसचीही भूमिका महत्त्वाची होती. या घटनेचा परिणाम युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. त्याचा परिणाम टेनिस स्पर्धेवरही झाला.
एप्रिल २०२२ मध्ये ऑल इंग्लंड क्लब आणि लॉन टेनिस असोसिएशनने बेलारुस आणि रशियाच्या खेळाडूंवर युके सरकारच्या आदेशामुळे युकेमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंदी घातली होती. त्यामुळे तिला त्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेत सहभागीच होता आले नव्हते.
पण २०२३ मध्ये जाहीर करण्यात आले की रशिया आणि बेलारुसचे खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, पण त्यांना तटस्थ झेंड्याखाली खेळावे लागेल, त्यांना देशाचे नाव वापरता येणार नाही.
या घटनांबद्दलही आर्यनाला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीला आर्यनानं मौन बाळगणं पसंत केलं.
तिने फ्रेंच ओपनवेळीही स्पष्ट सांगितले होते की खेळामध्ये राजकारण येऊ नये. 'खेळाडू त्यांचा खेळ खेळत असतात. जर खेळाडू काही करू शकत असते, तर त्यांनी केले असते. पण हे नियंत्रण त्यांच्या हातात नाही. विम्बल्डनमधून निलंबन करण्याचा काय परिणाम झाला, काहीच नाही. त्यांना जे करायचे आहे, ते करतच आहेत.'
वादग्रस्त प्रश्न अन् आर्यनाची उत्तरं
आर्यनासाठी फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धा खेळणे सोपे नव्हते. तिला यादरम्यान अनेकदा बेलारुस - युक्रेन यांच्यातील वादग्रस्त परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते, विशेषत: बेलारुसचे वादग्रस्त अध्यक्ष ऍलेक्झँडर लुकाशेंको यांच्याशी असलेली ‘ओळख’ तिच्यासाठी डोकेदुखी ठरलेली. तिला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते.
तिने वैतागून तिसऱ्या फेरीपासून पत्रकार परिषदेसाठी स्पष्ट नकार दिला होता. यावरून तिला दंड आकारावा, अशी मागणी युक्रेनच्या खेळाडूंनी केली होती. पत्रकार परिषदेला का अनुपस्थित होते याचा खुलासा तिने पुढे जाऊन केला. 'माझ्या मानसिक आरोग्यासाठी मी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धेच्या आयोजकांनी मला या निर्णयासाठी पाठिंबा दिला आहे.'
तिने असेही सांगितले होते की एका पत्रकार परिषदेनंतर ती झोपूही शकली नव्हती.
खरंतर लुकाशेंको यांनी अनेकदा तिच्या खेळाचे कौतुक केले आहे. तसेच तिच्या खेळाबद्दल अनेकदा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यातच २०२०-२०२१ दरम्यान बेलारुसमधील राजकीय वर्तुळात अनेक वाद निर्माण झाले होते. अनेक मोर्चे निघाले होते, त्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली होती.
तसेच एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार मिंस्कमध्ये २०२१ नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीवेळी आर्यना लुकाशेंका यांच्यासह असल्याचेही समोर आले होते. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने बेलारुसच्या मदतीने युक्रेवर हल्ला चढवला. या सर्वच गोष्टींमुळे आर्यनासाठी खेळणे आणखी कठीण झाले होते. कारण तिच्यावर याबद्दल सातत्याने प्रश्नांचा भडीमार होत होता.
तिने इंडियन वेल्स २०२२ स्पर्धेपूर्वी युक्रेनच्या नागरिकांबद्दल दु:खही व्यक्त केले होते. पण ती म्हणालेली की हे सर्व तिच्या नियंत्रणात नाही.
त्यातच २०२३ फ्रेंच ओपन स्पर्धेत तिचा सामना दोन युक्रेनच्या खेळाडूंबरोबर झाला. पहिल्या फेरीत तिने मार्टा कोस्त्युकला पराभूत केले, त्यानंतर मार्टाने तिच्याशी सामन्यानंतर हस्तांदोलनास नकार दिला होता. पण तिने याबद्दल मी समजू शकते असे म्हणत वाद टाळले होते.
त्यानंतर असेही रिपोर्ट समोर आले की २०२० मध्ये लुकाशेंकोच्या पाठिंब्यासाठी तिने स्वाक्षरी केली होती. त्यामुळे तिला दुसऱ्या फेरीनंतर याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिने या घटनांवर उत्तर देणे टाळले होते. यानंतर तिने थेट पत्रकार परिषदेसाठी न जाण्याचाच निर्णय घेतला.
याचस्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाबरोबर आर्यनाचा सामना झाला. त्यावेळीही एलिनाने तिच्याकडे सामन्यानंतर दुर्लक्ष करत हस्तांदोलन टाळले. त्यावेळी आर्यना नेटजवळ येऊन थांबली होती. यामुळे बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या सामन्यानंतर ती लुकोशेंको यांना पाठिंबा देते का याबद्दलही प्रश्न विचारले गेले, त्यावरही तिने सांगितले की 'हा कठीण प्रश्न आहे. मला वाटतं मी युद्धाला पाठिंबा देत नाही, म्हणजेच मी आता लुकाशेंकोलाही पाठिंबा देत नाही.' अवघ्या २३-२४ वर्षांच्या तरुणीनं आंतरराष्ट्रीय मंचावर अशी भूमिका मांडणं हे देखील धाडसंच म्हटले पाहिजे.
या सर्व गोष्टी चालू असतानाच आर्यनाने नंतर पुन्हा विम्बल्डन २०२३ ची उपांत्य फेरी आणि नंतर अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारत तिच्यातील मानसिक कणखरता, लढण्याची वृत्ती आणि राखेतूनही भरारी मारण्याची ताकद तिच्यात असल्याचे दाखवून दिले.
शिष्याला काही देऊ शकत नाही म्हणून गुरू सोडणार होता साथ
ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ स्पर्धा जिंकल्यानंतर आर्यनाचा प्रशिक्षक अँटोन दुब्रोव्ह आनंदाने रडताना दिसला होता. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पण त्यामागील कारणाचा आर्यनाने नंतर खुलासा केला होता.
आर्यनाने सांगितले होते की दुब्रोव्ह २०२२ मध्येच मध्ये दुबईत झालेल्या स्पर्धेतील पराभवानंतर निराश झाला होता. आता तुला देण्यासारखे काही नाही असे म्हणत दुब्रोव्ह राजीनामा द्यायला निघालेला. मात्र गुरूला चक्क शिष्याने थांबवून घेतले.
आर्यनाने त्याला सांगितले की 'तुमचं काहीच चुकलेलं नाही. माझ्याकडून काही चुका घडत होत्या. माझं काय चुकतंय हे मला लक्षात आलंय. आपण मिळून यावर काम करू.' आजही दुब्रोव्ह तिच्याबरोबर काम करत असून त्याच्याच मार्गदर्शनाखाली तिने दोनदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले.
आर्यनाने जागतिक क्रमवारीतही अव्वल क्रमांक पटकावलाय. आर्यना ज्या देशातून येते त्या बेलारुसची रशियाबाबतची भूमिका यात मतभेद असू शकतात. पण २५ वर्षांची आर्यनाने ज्या पद्धतीने कठीण परिस्थितीचा सामना करत सलग दोन स्पर्धा जिंकलीये त्याचे कौतुकचं केले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.