गिरिजा दुधाट
भारतीय, विशेषतः हिंदू धर्म परंपरेत आणि ज्ञान परंपरेत स्त्री ही शक्तीस्वरूप मानली गेली आहे. खलप्रवृत्तीच्या विनाशासाठी आदिमायेने अनेकदा देवीरूपात अवतार घेतल्याच्या अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात.
दुर्गा, काली, चंडी, भैरवी, महिषासुरमर्दिनी अशा अनेक देवता या सशस्त्र आणि युद्धनिपुण म्हणून गणल्या गेल्या आहेत. प्राचीन भारतात दीर्घकाळ युद्धांमध्ये. शस्त्रनिर्मितीमध्ये स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही, भारतीय युद्धशास्त्रात आणि शस्त्रशास्त्रात आदिमायेच्या, पर्यायाने 'स्त्रीत्वा' च्या उपासनेची अखंडित दीर्घ परंपरा होती.
ही उपासना केवळ धार्मिक पातळीवरच नव्हे तर तात्विक, भौतिक आणि सामाजिक पातळीवरही असलेली आपल्याला दिसून येते. या उपासनेच्या अधिष्ठानाने आणि तत्वज्ञानाने भारतीय शस्त्रशास्त्राचे व्यापलेले अनेक लौकिक, तात्विक आणि सामाजिक आयाम आपल्याला अभ्यासता येतात.
भारतीय शस्त्रांची अर्थगर्भ नावे व त्यामागील सखोल वैचारिक, तात्विक आणि अध्यात्मिक बैठक हा त्यातील एक अत्यंत महत्वाचा, तरीही दुर्लक्षित पैलू आहे.
प्राचीन भारतात 'तलवार' हे शस्त्र 'असि', 'खडग', 'निस्त्रिंश', 'करवाल', 'कृपाण' अशा विविध नावांनी ओळखले जात होते. अमरकोश, वैजयंतीकोश, हलायुधकोश यांसारखे प्राचीन कोश, हेमचंद्रासारख्या विद्वानांचे ग्रंथ, अशा विविध नावांची त्यांच्या व्याकरणासहित स्पष्टीकरण देतात. संस्कृत भाषेत प्रत्येक शस्त्राला स्वतःचे निर्धारित लिंग आहे.
उदाहरणार्थ, 'तो' भाला (पुल्लिंगी) 'ती' ढाल (स्त्रीलिंगी) त्याचप्रमाणे संस्कृत व्याकरणात प्रत्येक ठिकाणी तलवारीला 'स्त्रीलिंगी' म्हणून संबोधले आहे. पण, तलवार शस्त्राचे निर्धारित स्त्रीलिंग हा केवळ व्याकरणच्छल होता का? मुळीच नाही!
प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेला तलवार ही केवळ स्त्रीलिंगी' म्हणून नव्हे तर 'स्त्रीत्वा'ची वाहक म्हणून अधोरेखित करायची होती. भारतीय तलवारीशी संबंधित विविध तात्विक, वैचारिक पैलू सखोलपणे अभ्यासले तर भारतीय तलवारीचे हे अधोरेखित 'स्त्रीत्व' अधिक सखोलपणे जाणून घेता येते.
तलवार' आणि 'चाकू-सुरे हे प्रकारांनुसार, कार्यपद्धतीनुसार एकाच शस्त्रकुळीतील आहेत आणि भारतीय ज्ञानपरंपरेत तलवारीच्या स्वत्वाच्या पैलूंची सुरुवात येथूनच होते. प्राचीन भारतीय ग्रंथ हे जसे तलवारीला विविध नावे सुचवतात त्याचप्रमाणे चाकू-सुऱ्यांनाही सुचवतात. आणि ही नावे कोणकोणती आहेत?
तर 'असिपुत्रिका', 'खडगपुत्रिका', 'कृपाणपुत्र', 'शस्त्रिका', 'करवालिका' इ. हे प्राचीन ग्रंथ चाकू-सुऱ्यांना 'पुत्रिका' / 'पुत्री' म्हणजेच 'मुलगी' म्हणून संबोधतात, कोणाच्या? तर, "असि, खडग, कृपाण म्हणजे तलवारीच्या तलवारीची मुलगी म्हणजे सुरी, लहान तलवारी चाकू-सुऱ्यांना तलवारींच्या मुलीचे स्थान देवून भारतीय ज्ञान परंपरेने आपसूक तलवारीला 'मातृत्व' आणि पर्यायाने 'स्त्रीत्व' बहाल केले.
'एखाद्या शस्त्राला 'मूल' असणे' ही संकल्पना म्हणूनच मुळात थक्क करणारी आहे. निर्जीव शस्त्रांना मानवी समाजव्यवस्थेचे, नातेसंबंधांचे आयाम देणे यातून शस्त्रांना प्रतीकात्मक चेतनत्व देण्याचा प्राचीन भारतीय शस्त्रकर्त्याचा, विद्वानांचा प्रयत्न होता.
आजच्या आधुनिक जीवशास्त्रामध्ये, वनस्पतीशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे प्राणी, वनस्पती यांचे कुटुंबानुसार (family & class) वर्गीकरण केले जाते तत्सम काही वर्गीकरणाची काही पद्धत प्राचीन भारतीय शस्त्रशास्त्रामध्ये होती का? हाही संशोधनाचा मुद्दा आहे.
विचार करण्याजोगी बाब म्हणजे, या नामकरणांमध्ये असलेले नाते हे 'आई-मुलगी' आहे. असि पुत्रिका' च का? 'पुत्र' का नाही? असा प्रश्न आपसूक अशी नावे वाचल्यावर पडतो.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडेसे प्रतीक संकल्पना (symbolism) आणि लोकसंस्कृतीमध्ये डोकवावे लागते. तलवारीला 'आई' मानणं, तिच्यामध्ये 'स्त्रीत्व' बघणं हा मानवी संस्कृती, संकल्पना, समाजव्यवस्था या अमूर्त रचनांचा आजूबाजूच्या स्थूल आणि मूर्त मानवनिर्मित जगावर होणाऱ्या परिणामांचा भाग होता.
केवळ भारतातच नाही तर अन्य देशातील संस्कृतींमध्येही स्त्री ही परंपरेचे प्रतीक मानली जाते. परंपरा आणि संस्कृतीजन्य गोष्टी या आईकडून मुलीकडे हस्तांतरित होतात ही लोकधारणा आहे. याच धर्तीवर 'संहार', 'विनाश' ही जिची (शस्त्र) संस्कृती आहे ती प्रतीकात्मक रुपात तिच्याशी रूप गुण साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या वस्तूकडे (पुरिकेकडे हस्तांतरित होत होती म्हणून तलवार आणि सुरी मध्ये 'मातृ-पुत्रिका' बंध निर्माण केला गेला असावा अशीही शक्यता आहे.
याच विविध नावांमध्ये एके ठिकाणी मध्यम आकाराच्या तलवारीला 'हुलमात्रिका' म्हटलेलं आहे. 'हुल' याचा संस्कृतमध्ये एक अर्थ 'ठार मारणे' असा होतो. 'मात्रिका' हे 'मातृका' चेच एक रूप आहे. एकाअर्थी, युद्धामध्ये जी विनाश घडवते ती 'संहारमाता' असे काही प्रतीकात्मक बंधदेखील यांमागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्त्रीचे मातृत्व' हा प्राचीन मानवासाठी दीर्घकाळ चमत्काराचा आणि कुतूहलाचा विषय होता. स्त्री सृजनाबद्दलची कृतज्ञता आणि कुतूहल प्राचीन काळापासून अनेक प्रतीकात्मक रूपात वस्तू, धारणा, संकल्पना यांमध्ये प्रकटलेले दिसून येते.
भारतीय संस्कृतीमध्ये पूर्णकुंभ, विहिर, गुहा, नारळ इ. ही स्त्रीच्या गर्भाशयाची परंपरागत प्रतीके मानली गेली आहेत. या प्रतीकांचा ओघ आणि प्रभाव काळानुरूप माणसाचे प्राचीन साथीदार असणाऱ्या शस्त्रांकडे आला नसता तर नवलच.
अमरसिंहाच्या अमरकोशामध्ये सुरीला चक्क 'स्त्रीकोश' म्हणजे 'स्त्रीचे गर्भाशय' म्हटलेले आहे! तलवार ही सुरीची 'माता' आहे. तलवारीच्या 'कोशातून' म्हणजे 'गर्भातून' जी जन्माला येते ती 'स्त्रीकोश' ! ज्याप्रमाणे गर्भाचे पोषण मातेच्या रक्तावर होते तसे या 'स्त्रीकोशा' चे पोषण मानवी रक्तावर होत होते.
मुळातच, एखादे शस्त्र 'गर्भस्थ' असणे आणि त्यातून नवीन शस्त्र जन्माला येणे ही संकल्पना मानवी जगातील धारणा आणि विश्वास यांच्या मानवनिर्मित कृत्रिम वस्तूंवर होणाऱ्या परिणामांचा आणि सांकल्पनिक हस्तांतरणाचा उत्कृष्ट आविष्कार आहे. सुरीला स्त्रीच्या गर्भाशयाची उपमा देवून भारतीय शस्त्र परंपरेने तलवारीच्या 'स्त्रीत्वा'च्या संकल्पनेचे जणू आवर्तनच पूर्ण केले
भारतीय तलवारीच्या स्त्रीत्वाची संकल्पना, त्यामागील प्रतीकात्मकता आणि धारणा या एवढ्यावरच थांबत नाहीत, मानवी समाजव्यवस्थेत, परस्परसंबंधांमध्ये (नैसर्गिक ते मानवनिर्मित) प्रत्येक वस्तूच्या वापराशी विशिष्ट 'तत्व' जोडले गेलेले आहे (उदा. घट हे सृजनतत्व तर चूल हे अग्नितत्व इ.). त्याचप्रमाणे 'तलवार' म्हणजेच 'शस्त्र' या वस्तूशी पूर्वापार 'लयतत्व' जोडले गेलेले आहे.
या वस्तूच्या वापराशी विनाश, संहार, मृत्यू संकल्पना संलग्न आहेत. अशा लयतत्वाच्या प्रतीकाला एकाच वेळी स्त्रीत्वाच्या माध्यमातून सृजन आणि सर्जन तत्वही बहाल करावं ही विचारांची झेप थक्क करणारी आहे.
भारतीय तलवारीची ही प्रतीके दूरस्थपणे आदिमायेच्या अधिष्ठानाशी जोडली गेलेली होती. प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये आदिमायेचे स्वरूप वर्णन करताना आदिमाया उत्पती-स्थिती-लय या सर्व तत्वांची स्वामिनी मानली आहे. या वर्णनांमध्ये आदिमायेकडे सृजनशक्ती आहे, तिच्याकडे संगोपन म्हणजेच सर्जनही आहे आणि ती विनाशही करू शकते.
आदिमायेची ही तीनही गुणतत्वे भौतिक आणि लौकिक पातळीवर विविध अंगांनी तलवारीला जोडण्याचा अफाट प्रयोग प्राचीन भारतीय शस्त्र परंपरेने (यशस्वी) केला होता!
भारतीय शस्त्र परंपरेतील तलवारीला दिलेले स्त्रीत्वाचे स्थान हे केवळ त्यांच्या नावांमधून नव्हे तर अन्यही शस्त्रधारणांमधून प्रतिबिंबित होताना दिसून येते.
अग्निपुराणामध्ये शस्त्रांचा जन्म आणि त्यांचे वर्गीकरण याची रंजक कथा आहे. यामध्ये सर्व शस्त्रांचे पालकत्व आणि संगोपन दक्ष प्रजापतीच्या मुली 'जया' आणि 'सुप्रभा' या देवतांकडे सोपवलेले आहे.
अर्थातच, सर्जन आणि पालकत्व हे स्त्रीत्वाशी जोडल्या गेलेल्या संकल्पना अशा शस्त्रकथांमधून डोकावताना आपल्याला दिसतात. अपराजितपृच्छा सारखे बाराव्या शतकातले ग्रंथ चाकू-सुऱ्यांचे शंखिनी, कौमारी, तुंडका, सुभंगा असे एकूण आठ प्रकार सांगतात.
यातील चाकू-सुऱ्यांना दिलेली नावे या विविध पुराणांमध्ये, हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये युद्धदेवतांच्या प्रमुख शक्ती अथवा युद्धदेवींच्या मुख्य सहाय्यक म्हणून गणल्या गेल्या आहेत.
तीच नावे सुऱ्यासाठी वापरून त्या त्या स्त्री शक्तींच्या, देवतांच्या गुण- तत्वांचा थेट संबंध शस्त्राशी जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
तलवार आणि चाकू-सुऱ्यांशी प्राचीन काळी जोडल्या गेलेल्या स्त्रीत्वाच्या संकल्पनेचे सातत्य मध्ययुगीन भारतातीलही काही शस्त्रधारणांमधून दिसून येते.
मध्ययुगीन भारतात जेवढी शस्त्रे वापरात होती, त्यांमध्ये केवळ तलवार आणि सुरे या दोनच प्रकारच्या शस्त्रांना 'नाळ' (शस्त्राच्या मध्यभागी असलेली खोलगट रेष) हा भाग अस्तित्वात होता.
मानवी शरीराचा 'नाळ' / 'वार' हा अवयव 'आई आणि मूल यांच्याशी थेटपणे जोडलेला आहे. केवळ तलवार आणि सुरी यांनाच 'नाळ' हा भाग विकसित करून प्राचीन भारतीय शस्त्र परंपरेतील 'असिपुत्रिका' बंध प्रतीकात्मक रित्या दाखवण्याचा मध्ययुगीन शस्त्रकर्त्याचा प्रयत्न होता का? शक्यता नाकारता येत नाही.
मध्ययुगात भारतीय तलवारींचा जसजसा रचनात्मक विकास (structural development) होत होता त्यामध्ये तलवारीमध्ये काही रंजक भाग दिसू लागले होते. मध्ययुगीन भारतीय तलवारीवर नयनी, बिंदी', 'कांकण' / 'कंगन' अशा नक्षीकामयुक्त भागांची झालेली वाढ हे तलवारीचे परंपरागत प्रतीकात्मक स्त्रीत्व अधोरेखित करत होते.
माणूस दीर्घकाळ ज्या वस्तू विविध काळामध्ये, रूपांमध्ये आणि पद्धतींमध्ये वापरतो त्यानुसार त्या वस्तूंभोवती मानवी संकल्पना, रूढी, प्रतीके प्रतिमा यांचे अदृश्य थर चढत जातात.
या वयानुसार वस्तूचे मानवी भौतिक जगात असलेले अस्तित्व, मानवी जगताशी असलेले परस्पर संबंध, रूप-गुण- तत्वे यांवर होणारा परिणाम अशा अनेक घडामोडी घडत असतात.
मानव आणि मानवनिर्मित वस्तू यांचे परस्परसंबंध आणि परस्परावलंबन यांमध्ये वस्तूंची सामूहिक उपयोगिता, सामाजिक व व्यक्तिगत आठवणी, वस्तूंच्या कार्यपद्धतीचे कालानुरूप सातत्य इ. अनेक घटकांचा परिणाम होत असतो.
मानवी समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, सांस्कृतिक बंध यांच्या माध्यमातून माणसाने कृत्रिमरित्या तयार केलेल्या वस्तू, गोष्टी यांची एक सामाजिक, सांस्कृतिक ओळख निर्माण होत असते. अशा प्रदीर्घ प्रभाव आणि परिणामांनंतर या वस्तूंची, मानवी जगाला समांतर अशी एक अदृश्य कार्य व्यवस्था (operating system) तयार होते.
एका दीर्घ आणि सातत्यपूर्ण आदान-प्रदानानंतर या दोन्हीही व्यवस्थांच्या वैशिष्ट्यांचे परिणाम दोन्ही व्यवस्थांच्या कार्यप्रणालीमध्ये प्रतिबिंबित होताना दिसतात. या दोन्ही व्यवस्थांमध्ये प्रतीके' (symbols) हे महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
'शस्त्रे' ही माणसाची उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनची साथीदार आहेत. काळानुरूप शस्त्रांचे स्वरूप, उपयोगिता, वापर हे मोठ्या प्रमाणात बदलत गेल्याने माणसाचे शस्त्रांसोबतचे सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध अत्यंत गुंतागुंतीचे तरीही गहिरे आहेत.
भारतीय तलवारींच्या प्रतीकात्मक रूपाचा अभ्यासलेला हा पैलू याच दीर्घ आदान-प्रदानाचा एक भाग आहे.
स्त्रिया आणि युद्धे हे परंपरागत दूरस्थ विषय मानले गेले आहेत. युद्ध, शस्त्रे, प्रत्यक्ष लढाया या सर्वामध्ये प्रदीर्घ काळ स्त्रियांचा सक्रिय सहभाग नगण्य आहे.
प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेने मात्र, प्रत्यक्ष युद्धातील शस्त्रांनाच 'स्त्रीत्व' बहाल करून भारतीय शस्त्र परंपरा आणि ज्ञान परंपरेचा एक आगळाच आयाम अधोरेखित केला आहे.
भारतीय ज्ञान परंपरेने शस्त्रासारख्या अनवट वस्तूलाही स्त्रीत्व देवू केल्याने एकप्रकारे आदिमायेची चराचरात व्यापलेली चेतना शस्त्ररूपातही स्थिरावली होती.
हिंदू संस्कृतीमधील धार्मिक संकल्पना, लोकधारणा, समाजव्यवस्था इ. चा थेट परिणाम भारतीय तलवारींच्या प्रतीकात्मक अस्तित्व (symbolic existence) निर्मितीवर झालेला होता.
भारतीय शस्त्रांना असणाऱ्या या अध्यात्मिक आणि वैचारिक पार्श्वभूमीमुळेच भारतीय शस्त्रे ही अन्य संस्कृतीतील शस्त्रांहून लौकिक आणि तात्विक पातळीवर वेगळी ठरतात.
आदिमायेचे गुण सांगणारी तलवार स्वतःमधूनच स्वतःला जन्म देते आणि विनाशही घडवून आणते.
भारतीय तलवारीचे हे स्त्रीत्व आकळून घेताना तुकोबांचा अभंग मनात रुंजी घालत राहतो,
'मीचि मज व्यालो । पोटा आपुलिया आलो ।।'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.