सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि पदकांच्या तालिकेत भारताचा क्रमांक तब्बल ७१ वा असल्याचे निष्पन्न झाले. २०२० च्या ऑलिंपिक स्पर्धेतील पदकसंख्येच्या तुलनेत २०२४ च्या स्पर्धेत भारताच्या वाट्याला एक पदक कमीच आले, क्रीडाप्रेमींनी काहीशी हळहळदेखील व्यक्त केली.
मात्र, एक खरंच आहे, की भारत जगात, ओळखला जातो तो शरीरसौष्ठव किंवा क्रीडासामर्थ्यापेक्षा बौद्धिक सामर्थ्यासाठी. जगभरातल्या संगणकीय विश्वात सर्वाधिक मागणी असते, ती भारतीय संगणकीय अभियंत्यांना, तज्ज्ञांना. रोबोटिक्सचे क्षेत्र हे त्याचेच विस्तारित दालन. रोबोटिक्सच्या स्पर्धेत भारत आज आहे जगभरात दहाव्या स्थानावर. रोबोटिक्स शिकण्यासाठी मात्र, ज्या देशांचा पसंतीक्रम लावला जातो, त्यात भारत आहे खालच्या क्रमांकावर... मात्र, या क्षेत्रातही सतत नवनव्या घडामोडी सुरू आहेत. त्यातल्याच एका नव्या कोऱ्या ‘स्टार्ट-अप’विषयी...
आपल्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करतात, त्यातही लांबचा प्रवास असेल, तर वातानूकुलित शयनकक्षाने जाणे पसंत करतात. या प्रवासात रात्रीच्या शयन सुविधेसाठी रेल्वेतर्फे ब्लँकेट, चादर आणि उशी या साहित्याचा एक संच प्रत्येक प्रवाशाला दिला जातो.
अनेकदा हा संच अस्वच्छ असल्याचे दिसून येते. मात्र, ते तिथल्या तिथे नाकारणे शक्य नसते, मग काही जण सेवकाला बोलावून चादर, उशा बदलून घेतात, तर काहीजण आपल्यासोबत आणलेली पातळ चादर किंवा एखादी शाल ब्लँकेटवर टाकणं किंवा त्यांच्या चादरीला आपली घरची चादर जोडून घेऊन ती अंगावर घेणं पसंत करतात.
असा अनुभव आलेल्या काही प्रवाशांनी रेल्वेमंत्र्यांना टॅग करत आपल्या तक्रारी समाज माध्यमांवर टाकल्या. परिणामी, या समस्येचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर तर त्यात सातत्यही राहिले. मळकट, डाग पडलेल्या चादरी याकडे तर प्रवासी लक्ष वेधत होतेच, परंतु पांढऱ्याच चादरी का असाही त्यांचा सवाल होता.
एका प्रवाशानं, तर गंमतीत असंही म्हटलं होतं, की मध्यरात्री एखाद्या स्टेशनवर गाडीत चढलं, तर डबाभर बाका-बाकांवर पांढऱ्या चादरी अंगावरून ओढून घेतलेली निद्राधीन माणसे दिसतात आणि अनेकदा शयनकक्षात आहोत की हॉस्पिटलच्या शवागारात आहोत, असा प्रश्न मनात उभा राहतो.
गंमतीचा भाग सोडून दिला, तरी या पांढऱ्या चादरीऐवजी रंगबिरंगी चादरी देऊन या प्रश्नावर काही तोडगा निघू शकणार नाही का, असा सवाल प्रवासी करतात दिसतात.
भारतीय रेल्वेचा अवाढव्य पसारा लक्षात घेता प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन, पांढऱ्या चादरी काढून टाकून रंगीत चादरी देणं कठीण आणि आव्हानात्मक आहे.
परंतु, तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना या समस्येवर लक्ष केंद्रित करायचं होतं आणि नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ‘बकेटलिस्ट’मध्येदेखील हा प्रश्न होताच. त्यामुळे एखाद्या नव्या स्टार्ट-अपला सांगून यावर काही तोडगा काढता येईल का, असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.
प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन वैष्णव यांनी पांढऱ्या चादरी तपासण्याचे आणि डागाळलेल्या चादरी काढून टाकण्याचे काम जलद गतीने करण्यासाठी रोबोटची मदत घेण्याचा विचार केला आणि ‘साकार रोबोटिक्स’ने हे आव्हान स्वीकारले.
‘साकार रोबोटिक्स’ आले मदतीला
नेमक्या याच टप्प्यावर पुण्यातील साकार रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक मनोज पोचट आणि ख्यातनाम रोबोटिक्स अभियंते आणि मोबाईल रोबोट या विषयातले वर्ल्डस्किल्स इंटरनॅशनल एक्स्पर्ट करण पाटील यांची रेल्वेच्या पुणे डिव्हिजनल मॅनेजर इंदू दुबे यांच्याशी भेट झाली. रेल्वेतील शयनकक्षातील चादरींच्या प्रश्नाबाबत तुम्ही काही मदत करू शकता का?
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून यावर काही मार्ग काढता येईल का, अशी विचारणा दुबे यांनी केली आणि ‘साकार रोबोटिक्स’ने रोबोटकरवी चादरींच्या स्कॅनिंगचा प्रयोग करून पाहायचे ठरवले. स्कॅनिंग मशिनमधून जाणारी चादर डाग पडलेली असेल, मळलेली असेल, अस्वच्छ झालेली असेल, तर ती वेगळी काढण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दाखवले. दुबे यांनी ते संशोधन मंत्रीमहोदयांच्या कानावर घातले.
‘साकार’चा चादरी तपासणारा रोबोट
‘साकार रोबोटिक्स’ने एका मिनिटात १५ ते २० चादरी तपासणारा रोबोट तयार केला आणि पुणे डिव्हिजनला त्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
खराब झालेल्या चादरी न चुकता बाजूला काढण्याचे रोबोटचे कसब रेल्वेमंत्र्यांना आवडले. आता ‘साकार’चा हा रोबोट देशभरातल्या सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर बसवण्याचा धोरणात्मक निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
बांधकामासाठी रोबोट
‘साकार’ने रेल्वेच्या कामासाठी जे प्रोटोटाईप (नमुना मशीन) तयार केले, ते करणे हा त्यांच्या मूळ रोबोटिक्स व्यवसायाचा प्रारंभबिंदू नव्हताच. वाढत्या शहरीकरणामुळे, नवनव्या व्यावसायिक इमारतींची किंवा गृहप्रकल्पांची निर्मिती हा आगामी काही वर्षे रोजगाराचा केंद्रबिंदू राहणार आहे, हे त्यांना दिसत होते.
तज्ज्ञ किंवा कुशल कारागिरांअभावी बांधकाम दुय्यम दर्जाचे होणार, हेही ते जाणून होते. त्यामुळेच दर्जेदार बांधकामासाठी रोबोट वापरावे अशी कल्पना मनाशी करून, तसे रोबोट बनविण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.
त्याचाही प्रोटोटाईप तयार झाला होता; पण तो ज्यांच्या उपयोगी पडणार, ते बांधकाम व्यावसायिक अजून त्याचा वापर करण्यास तयार होत नव्हते.
त्या रोबोटची उपयोगिता ध्यानी येऊन त्याचा व्यावसायिक वापर सुरु होईपर्यंत थांबून बसू नये या कल्पनेतून ‘साकार’ने लिसा (लिनन इन्स्पेक्शन अँड सॉर्टिंग असिस्टंट) नावाचा रेल्वेला उपयुक्त ठरणारा रोबोट विकसित केला.
याशिवाय मोबाईल मॅनिप्युलेटर रोबो आणि पे-लोड कॅरियर हेही त्यांचे रोबोट कार्यरत झाले आहेत, पण ‘लिसा’ रोबोट हीच सध्या तरी त्यांची ओळख बनली आहे.
‘साकार’ची वाटचाल
साकारची स्थापना झाली मे २०२३ मध्ये, म्हणजे स्थापना होऊन जेमतेम १३-१४ महिनेच आता झाले आहेत. करण पाटील, मनोज पोचट आणि ध्रुव पाटील हे ‘साकार’चे संस्थापक. करण ‘साकार’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत, तर मनोज हे अध्यक्ष आहेत.
मनोज हे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचा या क्षेत्रातला १४ वर्षांचा अनुभव मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर विक्रीपूर्व व्यवहारांसाठी होत असतो, तर ध्रुव पाटील हे प्रामुख्याने विविध उद्योगक्षेत्रातील रोबोटच्या उपयोगितेच्या संधी शोधण्याचे आणि तंत्रज्ञान विकासाचे काम पाहतात. तेही रोबोटिक्स या विषयातले तज्ज्ञ आहेत.
करण यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. केल्यानंतर पुण्याच्या ‘सीओईपी’मधून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये एम. टेक केले. सध्या पलक्कडच्या आयआयटीमधून रोबोटिक्समध्ये ते पीएचडी करताहेत. ते हुनरप्रो या कंपनीचेही व्यवस्थापकीय संचालक आहेत.
क्रीडा क्षेत्रात जशा ऑलिंपिक स्पर्धा होतात, तशाच स्किल्स क्षेत्रात वर्ल्डस्किल्स स्पर्धा होतात. त्यासाठीच्या भारताच्या संयोजन समितीवर करण सध्या कार्यरत आहेत.
फ्रान्समध्ये २०२२ मध्ये झालेल्या वर्ल्डस्किल्स स्पर्धेत करण हे चौथ्या क्रमांकाचे जागतिक तज्ज्ञ म्हणून गौरवले गेले. देशात २०१८ मध्ये झालेल्या मोबाईल रोबोटिक्स इंडियास्किल्स स्पर्धेत ते सुवर्णपदकविजेते ठरले होते.
‘साकार’ची स्थापना मोबाईल रोबोटिक्स आणि मशिन व्हिजन टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांना ऑटोमेटेड, ॲफोर्डेबल आणि एजाईल सोल्युशन्स देण्यासाठीच प्रामुख्याने झाली आहे.
मशिन व्हिजन ॲप्लिकेशन, ऑटोनॉमस मोबाईल रोबोट, ॲडव्हान्स रोबोटिक लॅबोरेटरी आणि एआय आधारित सिस्टीम इंटिग्रेशन या चार क्षेत्रात सक्रीय आहे.
प्रारंभीच्या काळात मलनिःसारण आणि बांधकाम क्षेत्रासाठी रोबोट विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.
या क्षेत्रातील आव्हाने आणि मनुष्यबळ लावूनच ही कामे करण्याकडची साधारण मानसिकता लक्षात घेऊन ‘साकार’ने अन्य क्षेत्रात रोबोटचा वापर करण्याकडे लक्ष वळवले आहे.
निवासी इमारतींच्या बांधकामात प्लॅस्टरिंग आणि रंगकाम यासाठी सफाईने काम करू शकणारा ‘व्होर्टेक्स’ नावाचा रोबोट ‘साकार’ने तयार केला, परंतु आजही त्या रोबोटचे काम या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या पचनी पडलेले नाही.
वेगवान आणि गुणवत्ताधारित रिझल्ट, ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशा किमतीत निर्मिती, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, ग्राहकाच्या विद्यमान पायाभूत साधनसुविधांशी एकात्मता आणि उत्तम सेवा हीच ‘साकार’ची वैशिष्ट्ये आहेत.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.