amrita shergil sakal
साप्ताहिक

अल्पायुषी भारतीय प्रतिभावंत

मी माझी स्वतःची स्वतंत्र अशी चित्रशैली विकसित करत आहे. माझ्या चित्रशैलीचा आत्मा अस्सल भारतीय आहे.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. सुहास भास्कर जोशी

“कोणतंही चित्र ही प्रथम एक अस्सल कलाकृती असली पाहिजे. कलेचं उद्दिष्ट हे चित्रात सुंदर दिसणारे चित्रविषय रंगवणं नसून, जो विषय निवडला असेल त्याचे रंग, रेषा आकार यांच्या साहाय्यानं कलात्मक चित्रीकरण करणं हे असलं पाहिजे. मी माझी स्वतःची स्वतंत्र अशी चित्रशैली विकसित करत आहे. माझ्या चित्रशैलीचा आत्मा अस्सल भारतीय आहे. आणि माझं जीवनध्येय हे भारतातील या गरीब, दुःखी आणि सहनशील लोकांची चित्रं रंगवणं हेच आहे.”

-अमृता शेरगिल

“प्रभाव आणि वर्चस्व या संदर्भात युरोपमधील कलाक्षेत्राचा विचार करावयाचा झाला, तर तुम्हाला पिकासो, मातीस, ब्राक आणि इतरांचा विचार करावा लागेल. पण भारतीय कलेबाबत बोलणार असाल, तर तुम्हाला फक्त माझंच नाव घ्यावं लागेल.”

वयाच्या अवघ्या पंचविशीत स्वतःच्या कला कर्तृत्वाबद्दल इतका प्रखर आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या भारताच्या महान प्रतिभावंत चित्रकार अमृता शेरगिलला फक्त अठ्ठावीस वर्षांचं आयुष्य लाभावं हा मात्र दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.

असामान्य प्रतिभा लाभलेल्या अमृता शेरगिल (Amrita Sher-Gil, १९१३-१९४१) या चित्रकर्तीचं स्थान आधुनिक भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अनन्यसाधारण असंच आहे. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य, उच्छृंखलपणा आणि संतुलित विचारशक्ती, मुख्य म्हणजे चित्रकलेतील विलक्षण प्रातिभ कौशल्य आणि बंडखोर वृत्ती या सगळ्यांचा अपूर्व संगम तिच्या व्यक्तिमत्त्वात होता.

हंगेरी, फ्रान्स आणि भारत या देशांत आपलं बरचसं आयुष्य व्यतीत केलेल्या या भारतीय-हंगेरियन चित्रकर्तींनं भारतीय चित्रकलेची ओळख जागतिक पातळीवर करून दिली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जेव्हा भारतीय चित्रकार साचेबंदरितीनं पाश्चिमात्त्य चित्रकारांच्या शैलीचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानत होते, तेव्हा अमृता शेरगिलच्या अस्सल भारतीय मातीशी नातं सांगणाऱ्या स्वतंत्र शैलीतील चित्रांनी इथल्या झापडं लावून बसलेल्या चित्रकारांना खडबडून जागं केलं.

आपल्या सडेतोड आणि परखड विचारांमुळे तिनं चित्ररसिक, जाणकार आणि समीक्षक यांच्या मनामध्ये आदराचं स्थान प्राप्त केलं. अर्थातच याच्या जोडीला आक्रमक रूपसंपदेमुळं, बोहेमियन पद्धतीच्या मुक्त वर्तनामुळं आणि बोल्ड सेल्फ-पोर्ट्रेटमुळं अमृता शेरगिल सदैव जनसामान्यांच्या आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय बनली. केवळ अठ्ठावीस वर्षांचं पण तरीही नाट्यमय आयुष्य लाभलेल्या या कलाकाराची समग्र रंगीत चित्रं पाहणं हा एक जबरदस्त कलानुभव आहे, यात शंका नाही.

पंजाबमधील मजिठिया येथील सरदार उमरावसिंग हे अमृता शेरगिलचे वडील. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. त्यांना खगोलशास्त्र, उच्चारशास्त्र, सुतारकाम, छायाचित्रण अशा अनेक गोष्टींत रस होता. अमृताची आई मारी अॅंटोनेट ही हंगेरियन ऑपेरा गायिका होती. उमरावसिंग यांची ती द्वितीय पत्नी. या दोघांचं लग्न ४ फेब्रुवारी १९१२ला झालं. ३० जानेवारी १९१३ रोजी हंगेरीतील बुडापेस्ट इथं अमृताचा जन्म झाला. पाठोपाठ २८ मार्च १९१४ रोजी अमृताच्या बहिणीचा-इंदिराचा जन्म झाला.

अमृताचं बरंचसं बालपण हंगेरीत गेलं. अमृतानं लवकरच कॉन्व्हेंट स्कूल सोडून घरीच इंग्रजी भाषेचे, व्हायोलिन आणि पियानोचे धडे घेतले. लहानपणापासूनच तिला चित्रं काढण्याचं वेड होतं. १९२१ साली शेरगिल कुटुंब भारतात सिमल्यामध्ये स्थायिक झालं. पण आईच्या हट्टाखातर अमृता काही काळ इटलीतील फ्लॉरेन्सला चित्रकला- शिल्पकला शिकण्यासाठी राहिली. पण सहा महिन्यातच कंटाळून ती सिमल्याला परतली. सिमल्याच्या कॉन्व्हेंट स्कूलमधून अमृताला नास्तिक ठरवून काढून टाकलं गेलं. मग अमृता घरबसल्या चित्रं काढू लागली.

परंतु तिची चित्रकलेतील गती आणि अपूर्व प्रतिभा वेळीच लक्षात आल्यानं तिला कलानगरी पॅरिसमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं. पौगंडावस्थेतील अमृताला तिच्या डोळ्याच्या तिरळेपणाचा आणि हनुवटीवर उगवणाऱ्या केसांचा मोठा न्यूनगंड होता. वेळीच केलेल्या शस्त्रक्रियेमुळे आणि सुयोग्य उपचारांमुळे अमृताचे हे दोष तर दूर झालेच,

पण तारुण्यात पदार्पण करणाऱ्या अमृताचं आक्रमक सौंदर्य पॅरिसमधल्या वास्तव्यात बहरून आलं.पॅरिसमधील मुक्त वातावरणात अमृताचे अनेक पुरुषांशी (आणि काही स्त्रियांशीही) संबंध आले. आणि त्याचा परिणाम म्हणजे तिला गुप्तरोग झाला. मात्र याच्या जोडीला अमृताच्या चित्र कौशल्यात झपाट्याने प्रगती होत गेली.

१९३२ साली म्हणजे वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तिनं काढलेल्या ‘यंग गर्ल्स’ या तैलचित्राला पॅरिसच्या ग्रँड सलोंमध्ये (म्हणजे प्रदर्शनात) सुवर्णपदक मिळालं. वास्तववादी शैलीतील या ४ फूट ६ इंच X ५ फूट ६ इंच चित्रात डावीकडं अमृताची बहीण इंदू युरोपियन पोशाखात तर तिची मैत्रीण डेनिस अर्धअनावृत्त बसलेली दिसते आहे.

सध्या हे पेंटिंग नवी दिल्लीच्या नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे आहे.(अमृताची अनेक पेंटिंग्ज या गॅलरीत आहेत.) पॅरिसमधील वास्तव्यात अमृताने ‘स्लीप’, ‘सेल्फ-पोर्ट्रेट इन ताहितीयन स्टाइल’, ‘रिक्लायनिंग न्यूड’ अशी अनेक एकापेक्षा एक सरस पेंटिंग्ज रंगवली. यापैकी ‘स्लीप’ हे सुमारे ३ फूट १० इंच X २ फूट ८ इंच आकाराचं तैलचित्र आहे.

यामध्ये गुलाबी रंगाच्या बेडशिटवर इंदू नग्नावस्थेत आरामात झोपलेली दिसते आहे. अमृताच्या चित्र शैलीवर त्याकाळी ताहितीयन बेटावरच्या स्त्रियांच्या पेंटिंग्जसाठी प्रसिद्ध असणारा थोर चित्रकार पॉल गोगॅंचा प्रभाव होता. ‘सेल्फ-पोर्ट्रेट इन ताहितीयन स्टाइल’ यामध्ये याच शैलीत तिने स्वतःचे अर्धअनावृत्त स्व-चित्र रंगवले आहे.

अमृताला मग तहान लागली ती भारतात परतण्याची. डिसेंबर १९३४मध्ये भारतात आल्यानंतर तिनं पंजाबमधील गोरखपूर, सराया, तसंच सिमला इथं वास्तव्य केलं. अजिंठा-वेरूळसह भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना तिनं भेटी दिल्या. पॅरिसमधून भारतात येण्यामागची मानसिकता, भारतातील गरीब समाजाचं – विशेषतः स्त्रियांचं चित्रण करण्यामागची भूमिका, आणि भारतीय कलाविश्वाबाबतची स्वतःची परखड, प्रांजळ व अभ्यासपूर्ण मतं तिनं ‘हिंदू’, ‘द न्यू आउटलूक’ या नियतकालिकांमधून मांडली.

१९३५ साली रंगवलेल्या तिच्या ‘थ्री गर्ल्स’ या तैलचित्राला १९३७ साली बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात सुवर्णपदक प्राप्त झालं. या ३ फूट चार इंच X दोन फूट दोन इंच आकाराच्या या तैलचित्रात रंगीत पंजाबी ड्रेस घातलेल्या तीन तरुण स्त्रिया बसलेल्या दिसतात. नियतीचे घाव अडवण्याचं सामर्थ्य अंगात नसलं तरी चिडचिड न करता शांतपणे त्याला तोंड देण्याची शक्ती आपल्याकडे आहे,

हे दर्शविणारी त्यांची देहबोली आणि चेहरे आहेत. चित्राचा बहुतांश अवकाश या तिघींनी व्यापला असून, अनावश्यक तपशील असणारी पार्श्वभूमी इथे नाही. आकर्षक रंगसंगती, अचूक संरचना आणि चेहऱ्यावरचे शांत सोशिक भाव यामुळे हे चित्र अत्यंत वेधक बनले आहे.हंगेरीत असताना अमृताने ‘हंगेरियन मार्केट सीन’, ‘हंगेरियन पिझंट’, ‘हंगेरियन जिप्सी गर्ल’ अशी काही उत्कृष्ट तैलचित्रे केली.

भारतात आल्यावर दक्षिण भारतातील, पंजाबमधील आणि सिमला येथील गरीब ग्रामीण समाजाचं चित्रण करणारी अनेक पेंटिंग्ज अमृताने काढली. यामध्ये ‘हिल मेन’, ‘हिल विमेन’, ‘ब्रह्मचारीज्’, ‘ब्राइड’, ‘साऊथ इंडियन व्हिलेजर्स गोइंग टू मार्केट’, ‘कॅमल्स’, ‘म्युझिशियन्स’, ‘मदर इंडिया’ अशा अनेक उत्कृष्ट तैलचित्रांचा समावेश आहे. ‘मदर इंडिया’ या १९३५ साली सिमला इथे रंगवलेल्या ६५ सेंमी X ८१ सेंमी या छोटेखानी आकाराच्या पेंटिंगमध्ये एक अतिशय गरीब स्त्री आणि तिची दोन लहान मुलं यांचे दु:खाने व्याकुळलेले चेहरे दाखवले आहेत.

अमृता शेरगिलच्या चित्रांची खासियत म्हणजे तिने चित्रपार्श्वभूमीतील अनावश्यक तपशील टाळून चित्रविषयावर व त्यातील आकृतींवर लक्ष केंद्रित केलं. मोजक्या मनुष्याकृतींची संरचना, माणसांच्या चेहऱ्यावरचे सोशिक, दुःखी भाव आणि गडद रंगांचा प्रभावी वापर यातून तिनं भारतातील ग्रामीण समाजाचं, विशेषतः स्त्रियांचं अतिशय उत्कट चित्रण केलं.

तिच्या अनेक चित्रकृतींमधील संरचना (Composition) आणि मांडणीतील तोल (Balance) लक्षवेधी आहे. सुरुवातीच्या काळातील तिचं ‘ब्राइड’ हे चित्र पाहताना पॉल गोगॅंची, तर ‘हंगेरियन मार्केट सीन’ पाहताना ब्रूगेल या चित्रकाराची आठवण होते. परंतु कारकिर्दीच्या उत्तरार्धात तिनं स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. आपल्या चित्रकारकिर्दीत तिनं अनेक सेल्फ-पोर्ट्रेटसदेखील काढली.

सिमला येथील फाइन आर्ट सोसायटीने वार्षिक प्रदर्शनासाठी अमृताच्या चित्राची निवड करून पुरस्कार जाहीर केला. परंतु आपल्याच उत्कृष्ट चित्राला डावलून दुय्यम चित्राला पुरस्कार दिला, असं म्हणून अमृतानं हा बहुमान नाकारला. सिमल्यातील वास्तव्यात तिचं दिवसभर अथक चित्रं रंगवणं आणि संध्याकाळ होताच नटूनथटून रात्री उशिरापर्यंत पार्ट्या जागवणं सुरू झालं.

आकर्षक रूपसंपदा, बिनधास्त मोकळं बोलणं आणि वृत्तीतील बेफिकीर स्वैरपणा यांमुळं मेजवान्या, समारंभ यांत तिला कायम निमंत्रण तर असायचंच, पण तिच्याभोवती उच्चभ्रू तरुणांचा सतत घेरा असायचा. फेब्रुवारी १९३७मध्ये दिल्लीच्या इंपिरियल हॉटेलमध्ये तिच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. हे प्रदर्शन पाहायला आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनावर अमृताच्या चित्रांचा आणि व्यक्तिमत्वाचा जबरदस्त प्रभाव पडला होता.

जुलै १९३८मध्ये अमृतानं आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध बुडापेस्ट येथे डॉ. एगन या आपल्या मामेभावाशी लग्न केलं. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागल्यावर अमृता पतीसह भारतात परतली. सराया, गोरखपूर असं फिरल्यानंतर तिनं लाहोरमध्ये वास्तव्य करायचं ठरवलं. पण ५ डिसेंबर १९४१च्या मध्यरात्री वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अल्पशा आजारानं तिचा गूढरित्या आकस्मिक मृत्यू झाला.

कोणी म्हणालं, एगनने केलेल्या गर्भपाताच्या अयशस्वी शस्त्रक्रियेत तिचं देहावसान झालं, तर कोणी म्हणालं, की तीव्र अतिसाराच्या दुखण्यात तिचा मृत्यू झाला. काहीजण असेही म्हणाले, की तिचा जुना गुप्तरोग बळावल्याने ती मरण पावली. नक्की काय झालं ते कळलं नाही, पण भारतीय कलाविश्वात स्वयंप्रकाशाने तळपणारा हा विलक्षण तेजस्वी तारा अल्पावधीत लुप्त झाला, एवढंच खरं.

आपल्या आक्रमक सौंदर्यानं आणि बिनधास्त वागण्यानं अमृता शेरगिल कायम चर्चेत असली तरी तिच्या डायऱ्या, तिने लिहिलेली असंख्य पत्रं आणि नियतकालिकांतून लिहिलेले लेख याद्वारे तिचे कलाविषयक मूलभूत परखड विचार, प्रांजळ भूमिका आणि बहुश्रुत व्यक्तिमत्त्व प्रकट होतं. इटली, हंगेरी, फ्रान्स, इंग्लंड आणि भारतातल्या वास्तव्यात लिहिलेल्या डायऱ्यांमध्ये तिने केलेल्या नोंदींशिवाय तिनं रंगवलेली जलरंगातील चित्रंही आढळतात.

विविध ठिकाणांहून अमृताने आई, बहीण, वडील, मैत्रीण, स्नेही, समीक्षक वगैरेंना अडीचशेपेक्षा जास्त पत्रं लिहिली. वडिलांना लिहिलेल्या पत्रात ती मार्क ट्वेन, शॉ, गटे या साहित्यिकांविषयी आणि व्हॅन गॉग, पॉल गोगॅं यांच्याविषयी अभ्यासपूर्ण मतं मांडते. ‘हिंदू’ वगैरे नियतकालिकात लेख लिहिताना अमृताने तत्कालीन बॉम्बे स्कूल आणि बेंगॉल स्कूल या शैलीत चित्रं रंगविणाऱ्या भारतीय चित्रकारांविषयी अतिशय कठोर मतं व्यक्त केली होती.

आपली कलाविषयक भूमिका मांडताना अमृता शेरगिल ‘हिंदू’मधील आणखी एका लेखात म्हणते, “कोणतंही चित्र ही प्रथम एक अस्सल कलाकृती असली पाहिजे. कलेचं उद्दिष्ट हे चित्रात सुंदर दिसणारे चित्रविषय रंगवणं नसून, जो विषय निवडला असेल त्याचे रंग, रेषा आकार यांच्या साहाय्याने कलात्मक चित्रीकरण करणं हे असलं पाहिजे.

मी माझी स्वतःची स्वतंत्र अशी चित्रशैली विकसित करत आहे. माझ्या चित्रशैलीचा आत्मा अस्सल भारतीय आहे. आणि माझं जीवनध्येय हे भारतातील या गरीब, दुःखी आणि सहनशील लोकांची चित्रं रंगवणं हेच आहे.”

आपल्या स्वतंत्र शैलीतील एकापेक्षा एक अप्रतिम चित्रांनी स्वतःच्या नावाचा आणि भारतीय कलेचा झेंडा जगभर उंचावणाऱ्या या महान चित्रकर्तीला फक्त अठ्ठावीस वर्षांचं आयुष्य लाभावं, हे तिचंच नाहीतर समस्त भारतीय कलाविश्वाचं दुर्दैव, आणखी काय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT