artificial intelligence esakal
साप्ताहिक

माणसं मशीन्सशी संवाद करतील आणि ही आश्चर्याची गोष्ट नसेल..

सकाळ डिजिटल टीम

साधारण सात दशके आधी अल्गोरिदमचे जनक अ‍ॅलन ट्युरिंग यांनी हा दावा केला होता.. ज्या अल्गोरिदमवर आज जगाची व्यावहारिक गणितं ठरविली जातात अशा अल्गोरिदमचे जनक गणित आणि संगणक शास्त्रज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांनी काही वर्षांपूर्वीच पुढील काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे असे सांगितले होते. मानवी ज्ञानसंस्थेच्या हजारपट वेगाने काम करणारी कृत्रिम अमानवी यंत्रणा ही यामागे आहे की जगाची निर्मिती करणारी दैवी शक्ती आहे?

- डॉ. सदानंद मोरे

विचार करू शकणाऱ्या यंत्राविषयी म्हणजेच कृबुयुक्त संगणकाविषयी ॲलन ट्युरिंग केवळ आशावादीच आहे असे नाही तर त्याला त्याबद्दल आत्मविश्‍वास आहे. त्याच्या पेपरच्या समारोपाचे वाक्य खूप काही सांगून जाते. ‘We can only see a short distance ahead...’ मात्र ही काही आपोआप घडणारी गोष्ट नाही, याचीही त्याला जाणीव आहे. त्यामुळे स्वल्पविराम देऊन तो त्या वाक्याचा पुढे विस्तार करतो, ‘but we can see plenty there that needs to be done.’

यासाठी साधारण पन्नास वर्षे लागतील असा ट्युरिंगचा होरा होता. तेच ‘शॉर्ट डिस्टन्स’. “I believe that in about fifty years time it will be possible, to programme computers, with a storage capacity of about 1 0 9 10^9 109 , to make them play the imitation game so well that an average interrogator will not have more than 70 per cent chance of making the right identification after five minutes of questioning.”

वेगळ्या शब्दांत सांगायचे म्हणजे, “I believe that at the end of the century the use of words and general public opinion will have altered so much that one will be able to speak to speak of machine thinking without expecting to be contradicted.”

पन्नास वर्षांनंतरच्या म्हणजेच इ.स. २००० दरम्यानच्या काळाचा विचार केला तर ट्युरिंगच्या होरा खरा ठरला असे म्हणता येत नाही. आजमितीला म्हणजे त्याहीनंतर जवळपास पाव शतकानंतरही याबाबत मतभेद आहेतच. चर्चाही सुरू आहे.

नंतर काय होईल ते होवो, तेव्हा आपण ते बघण्यासाठी कदाचित असू किंवा नसू, कोण जाणे? मात्र समकालिनांकडून कोणते आक्षेप येऊ शकतील याची कल्पना ट्युरिंगला होती. त्यामुळे त्याने प्रत्यक्षात कोणी असे आक्षेप घेण्यापूर्वीच त्यांची कल्पना करून ते याच पेपरमध्ये नोंदविले व त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्नही केला.

आपल्याकडील भाष्य परंपरेत, भाष्य लिहिताना संभाव्य आक्षेपांची मांडणी पूर्वपक्ष म्हणून करून त्याचे निराकरण करणारा उत्तरपक्ष लिहिण्याची परंपरा फार प्राचीन आहे. तसाच काहीसा प्रकार ट्युरिंगने केला असल्याचे दिसून येते.

ट्युरिंगने पूर्वपक्ष म्हणून उपस्थित केलेले काही आक्षेप ज्यांना अलौकिक म्हणता येतील अशा स्वरूपाचे आहेत. त्याचा संबंध श्रद्धांशी आणि विश्‍वासाशी पोहोचतो.

ईश्‍वरावर श्रद्धा असलेल्या आस्तिकांकडून जो आक्षेप घेण्यात येईल तो अर्थातच मानवासह संपूर्ण सृष्टीच ईश्‍वराची निर्मिती असून माणसाने असे काही करू पाहणे म्हणजे ईश्‍वराला आव्हान देण्यासारखे; आपण प्रतिपरमेश्‍वर असल्याचा दावा करण्यासारखे होईल व ते योग्य नाही, असा असणार. त्याला दैवतशास्त्रीय (Theological) आक्षेप म्हणता येतो.

या प्रकाराच्या आक्षेपाची सीमा विशेषतः इस्लाममधील एका समजुतीत झाली असल्याचे दिसून येते. इस्लाममध्ये मानवदिकांची चित्रे काढणेही मंजूर नाही, असे मूलतत्त्ववादी म्हणतात. कारण ती एक प्रकारची निर्मितीच होय. तो ईश्‍वराच्या बरोबर केलेला सहभाग होईल.

त्याच्या सामर्थ्याचे वाटेकरी होणे ठरेल. ईश्‍वर हा एकच आहे. त्याच्यात कोणी दुसरा भागीदार मानणे यास ‘शिर्क’ असे म्हटले जाते. इंटेलिजन्ट मशिन, रोबो, क्लोन हे सर्वच वैज्ञानिक उपक्रम त्यामुळे आक्षेपार्ह ठरतील.

काही लोकांची ईश्‍वरावर श्रद्धा नसेलही पण ते माणसाला पृथ्वीवरील सर्वोच्च अस्तित्व मानतात. निर्मितीचा कळसाध्याय समजतात. जिथे इतर सजीव प्राणी त्याची बरोबरी करू शकत नाहीत तिथे बापुडी निर्जीव यंत्रे कशी काय करणार? ही मानववादी मंडळी म्हटले तर ईश्‍वरवादी मंडळींचीच दुसरी बाजू म्हणावी लागेल.

ज्या क्षमता आणि सामर्थ्ये आपण ईश्‍वराची मानतो ती खरेतर मानवाची आहेत. त्यांना आपण ईश्‍वरकल्पनेत प्रक्षेपित करतो, असे या लोकांना वाटते. मानवाचे स्थान आणि प्रतिष्ठा यांच्या अतिशयोक्त समजुतीतून असे आक्षेप घेतले जाऊ शकतील.

गोडेल (Kurt Gödel, 1906-1978) या सुप्रसिद्ध गणितज्ञाने १९३१मध्ये मांडलेल्या एका प्रमेयाच्या आधारे घेण्यात येणाऱ्या आक्षेपाला ट्युरिंग गणिती आक्षेप असे म्हणतो व त्याचाही परामर्श घेतो. ही चर्च जास्त तांत्रिक असल्याने त्याचा फक्त उल्लेख करतो.

सर्वात महत्त्वाचा आक्षेप जाणीव किंवा कॉन्शसनेसच्या (Consciousness) अंगाने घेतला जाणारा आहे. जाणीव, विशेषतः आत्मजाणीव हे खास मानवाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही यंत्राला अशी जाणीव असणे शक्यच नाही. त्यामुळे एआय व माणसाची बरोबरी होऊ शकत नाही. यंत्र जे काही करते ते मानवाच्या विचार प्रक्रियेची समकृती (Simulation) होय. एक नक्कल होय. विचार नव्हे.

पुढील काळात हाच आक्षेप सर्वात महत्त्वाचा ठरला. ट्युरिंगने आपल्या म्हणण्याच्या मांडणीसाठी ‘इमिटेशन गेम’चा जो थॉट एक्सपरिमेंट किंवा विचार प्रयोग केला तशाच प्रकारच्या विचारप्रयोगाने त्याचा प्रतिवाद होऊ शकतो. म्हणून नंतर जॉन सर्ल (John R. Searle, -1932) या तत्त्ववेत्याने ‘Chinese Room Argumant’ या विचार प्रयोगाची मांडणी केली. तिची स्वतंत्रपणे चर्चा करावी लागणार आहे. इतकेच काय पण अलीकडे कॉम्प्युटेशन लिंग्विस्टिक्स (Computational Linguistics) या ज्ञानशाखेतील तज्ज्ञ एमिली बेन्डर (Emily M. Bender, 1973) यांनी सुचविलेल्या ‘ऑक्टोपस’ विचार प्रयोगाचीही दखल घ्यावी लागणार आहे.

माणूस करू शकत असलेल्या अमुक एक गोष्टी यंत्र करू शकणार नाही. असा ‘डिसअॅबिलिटीज्’ या सदराखाली मोडणाऱ्या बाबींवरून आक्षेप घेतला येईल, याची नोंद ट्युरिंग घेतो. यातील काही गोष्टी ट्युरिंगने हा विचार मांडला तेव्हा खरोखरच यंत्राच्या कक्षेबाहेरील होत्या, हे ट्युरिंगला मान्यच आहे.

तथापि यंत्रांमध्ये जसजशी सुधारणा होत जाईल; त्यांचा जसजसा विकास होत जाईल, तसतशा आज ज्या गोष्टी करायला ती यंत्रे सक्षम नाहीत त्या गोष्टी ती भविष्यात करू शकतील याची ट्युरिंगला खात्री आहे. यंत्रांना मानवाने सूचना किंवा ‘प्रोग्रॅम’ दिल्याशिवाय यंत्रे स्वतःकडून काही करू शकत नसतील तर त्यांनी स्वतः सुधारणा घडवून आणणे, आपली क्षमता आपणच वाढवणे अतिदूर!

ट्युरिंग आत्मविश्‍वासपूर्वक आशावादी आहे. तो म्हणतो, “By observing the results of its own behaviour it can modify its own programmes so as to achieve some purpose effectively.” इतकेच नव्हे तर हे केवळ स्वप्नरंजन नाही, अशी ग्वाहीही द्यायला तो विसरत नाही. “These are possibilities of the near future, rather than Utopian dreams.”

ट्युरिंग संगणक क्षेत्रातील आणखी एका व्यक्तीच्या उल्लेख करतो जिने संगणकाची कल्पना मांडण्यात पहिल्यांदा योगदान केले. ही व्यक्ती म्हणजे ज्याचा आपण पहिल्या विज्ञान कल्पिताच्या संदर्भात उल्लेख केला आहे, (विज्ञान कल्पितांच्या जगात, सकाळ साप्ताहिक, प्रसिद्धीः ९ सप्टेंबर) त्या प्रसिद्ध कवी बायरनची मुलगी ॲडा बायरन ऊर्फ लेडी लव्हलेस (Lady Lovelace. 1815-52). अॅडाला बालपणापासून गणितात रुची होती.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तिची प्रसिद्ध ब्रिटिश गणिततज्ञ चार्ल्स बॅब्बेजशी (Charles Babbage, 1791-1871) भेट झाली. काही अभ्यासक या बॅब्बेजला कॉम्प्युटरचा पिता मानतात. संगणकीय प्रक्रियेशी निगडित असलेल्या ‘ॲनालिटिकल इंजिन’ ही कल्पना त्याचीच. ॲडाने याच कल्पनेवर अधिक काम केले.

या ॲनालिटिकल इंजिनबाबतच्या इटालियन पत्राचे इंग्रजी भाषांतर करताना तिने जोडलेल्या टीपांमुळे मूळ ग्रंथाची ज्ञानात्मक समृद्धी वाढली. ती स्वतः ट्युरिंगचे स्फूर्तिस्थान होते, असेही मानले जाते. ॲनालिटिकल इंजिन हे कॉम्प्युटरचे आद्य मूळ रूप मानले जाते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तिच्या पोएटिक सायन्सचा बायरनसारख्या महाकवीच्या या मुलीच्या जनुकातच जणू काव्य असावे. पण तिने रूढ अर्थाने कवी होण्याऐवजी विज्ञानाचा आणि त्यातही गणिताचा पाठपुरावा केला व काव्य आणि विज्ञान यांच्यातील भेदरेषाच अस्पष्ट करायचा प्रयत्न केला.

ॲनालिटिकल इंजिनचे आपल्याला अपेक्षित कार्य स्पष्ट करताना तिने वापरलेली काव्यात्म भाषा पाहा - (The Analytic Engine) ‘weaves algebric pattems, just as the Jacquard loom weaves flowers and leaves.’

मुद्दा महत्त्वाचा आहे. औद्योगिक क्रांतीचे जणू चिन्ह म्हणावे असा स्वयंचलित यंत्रमाग एकोणिसाव्या शतकात प्रचलित झाला होता. त्याचे प्रतिमान (Model) समोर ठेवूनच लेडी ॲडाने ॲनालिटिकल इंजिन साकार केले. म्हणजेच मामला केवळ काव्यात्म प्रतिमांचा न राहाता त्यांच्या अनुषंगाने वैज्ञानिक संशोधनाचा बनला. यंत्रमागात वापरण्यात येणारे पंच कार्ड सुरुवातीच्या कॉम्प्युटरमध्ये वापरण्यात येत असल्याने त्याला ‘जॅक्वर्ड कॉम्प्युटर’ (Jacquard Computer) म्हटले जाई.

कलाव्यवहार आणि ज्ञानव्यवहार यांच्यामधील द्वैत मिटविण्याचे कार्य महाराष्ट्रात ज्ञानेश्‍वरांनी केले. त्यांची ज्ञानेश्‍वरी ही गीतेवरील टीका काव्यातला ज्ञानव्यवहार आहे. रसनिर्मिती आणि ज्ञाननिष्पत्ती अशी दोन्ही उद्दिष्टे ज्ञानेश्‍वरीने साध्य केली. अशाच प्रकारची काही एक रचना काव्य आणि विज्ञान यांच्याबाबत करता येईल का असा प्रश्‍न उपस्थित झाला तर त्याची चर्चा करताना या लेडी ॲडाच्या विचारांची नक्की मदत होईल.

लेडी ॲडाला संगणक क्षेत्रातील पहिली प्रोग्रॅमर म्हणून ओळखले जाते. तिचा प्रभाव ट्युरिंगवर असणे अगदीच स्वाभाविक आहे. मात्र, प्रतिभावंत माणसे आपल्यावरील प्रभावाच्या खुणा पुसून न टाकता ओलांडून पुढे जाणे पसंत करतात.

ट्युरिंग ॲडा बायरन लव्हलेसची नोंद घेतो ती ‘लेडी लव्हलेसज्् ऑब्जेक्शन’ (Lady Lovelace`s Objection) या उपशीर्षकाने. १९५०च्या दशकात लेडी ॲडाने जगाचा निरोप घेऊन शतक लोटले असले तरी तिच्या विचारव्यूहातून आक्षेपाचा कोणता पूर्वपक्ष रचता येईल याचा विचार ट्युरिंगला करावासा वाटतो यातच या लेडी ॲडाचा मोठेपणा दिसून येतो.

आपल्या ॲनालिटिकल इंजिनच्या कामाची कक्षा केवळ आकडेमोडीच्या पलीकडे जाणार आहे, याची खात्री असलेली ॲडा म्हणते, ‘The Analytical Engine has no pretentions to originate anything. It can do whatever we know how to order it perform.’ हे ॲडाचे १९४२मधील विधान ट्युरिंग उद्धृत करतो.

पण असे करताना डग्लस हार्ट्री (Douglas Hartree, 1897-1958) या मध्यस्थाचा माध्यम म्हणून उपयोग करतो. हार्ट्रीने हे विधान नुकतेच म्हणजे १९४९ सालात उधृत करून त्यावर अशी मल्लीनाथी केली होती, “This does not imply that it may not be possible to construct electronic equipment which will ‘think for itself’.”

डग्लस हार्ट्री ट्युरिंगप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धातील अनुभवाच्या मुशीतून घडला होता. डिजिटल कॉम्प्युटरच्या रचनेशी त्याचा जवळचा संबंध आहे. ट्युरिंगने उधृत केलेले त्याचे वरील विधान कॅलक्युलेटिंग इन्स्ट्रूमेंट्स ॲण्ड मशिन्स (Calculating Instruments and Machines) या व्याखानमालेच्या पुस्तकातून घेतले आहे.

हार्ट्री हासुद्धा या क्षेत्रातील दादा माणूस मानला जात असल्याने त्याचा आधार घ्यावासा कोणाला वाटला तर ते साहजिकच आहे. दुसरे असे, की ट्युरिंगला लेडी ॲडाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडायच्या होत्या व त्यासाठी हार्ट्रीसारख्या प्रतिष्ठिताचा टेकू मिळत असेल तर तो घेण्यात काही गैरही नव्हते. लेडी ॲडाने शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मताच्या दोन समकालीन अभिव्यक्ती ट्युरिंग सादर करतो.

1) machines can ‘never do anything really new’ आणि

2) machine can never ‘take us by surprise’.

ट्युरिंगच्या मते हे दोन्ही आक्षेप फोल आहेत. आता कोठे बाळ जन्माला आले आहे आणि तुम्ही ते भविष्यात काय करू शकणार नाही, हे आता सांगताय! त्याला वाव द्या ना! अशा प्रकारची ट्युरिंगची सूचना आहे.

माणसामधील ज्ञानाची आणि विचारप्रक्रियेची यंत्रणा म्हणजे अर्थातच त्याची चेतासंस्था किंवा नर्व्हस सिस्टिम. काॅम्प्युटरमध्ये या जैविक यंत्रणेचे समरूपीकरण (Simulation) केले जाते. न्यूरॉक्सपासून (चेतापेशींपासून) सिद्ध झालेल्या व एक प्रकारची एकसंध सातत्यता अंगभूत असलेल्या मानवी इंद्रियसंस्थेची बरोबरी विलग अवस्थांनी (Discrete-states) बनलेल्या कृत्रिम सिम्युलेशनकडून कशी होईल? या आक्षेपाची दखलही ट्युरिंग घेतो.

त्याचा समाचार घेताना ट्युरिंग निदर्शनास आणतो, की Parts of modern machines which can be regarded as analogs of nerve cell work about a thousand times faster than the latter.

मानवी ज्ञानसंस्थेच्या हजारपट वेगाने काम करणारी कृत्रिम अमानवी यंत्रणा ही कल्पनाच छाती दडपून टाकणारी आहे. अशा वैज्ञानिकांना ‘धन्य’च म्हणायला हवे.

ट्युरिंग ज्याला मशिन लर्निंग म्हणतात त्याचीही चर्चा करतो. चर्चेत शिक्षणतज्ज्ञ हेलन केलरही (Helen Keller, 1880-1968) येऊन जाते.

ट्युरिंग एका अत्यंत महत्त्वाच्या बाबीचा प्रांजळपणे उल्लेख करतो. An important feature of a learning machine is that its teacher will often be very largely ignorant of quite what is going on inside, although he may still be able to some extent to predict his pupil`s behaviour. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यानंतर पाऊण शतक उलटले जात असतानाही ‘आत नेमके काय घडते’ याचा पत्ता लागलेला नाही.

आधुनिक डिजिटल कॉम्प्युटरचा जनक मानल्या गेलेल्या ट्युरिंगचा जन्म भारतातील मद्रास (आता चेन्नई) येथे झाला हे माहीत असायला हरकत नसावी. ॲलन त्याच्या आई-वडिलांचे दुसरे अपत्य. जन्मानंतर एकदा मायदेशी इंग्लंडला गेल्यावर ॲलनला जन्मदेशात परतायचा योग कधी आला नाही.

जाता जाता एका गोष्टीची नोंद घ्यायला हवी. ट्युरिंगच्या पूर्वीच्या किंवा समकालीन वैज्ञानिकांनी केलेल्या पायाभरणीच्या कामाची चर्चा करताना फॉन नॉयमनचा उल्लेख झाला होता. त्याचे काम प्रारंभिक नाही, असे संशोधन मांडणारे संशोधन अलीकडे जॉर्ज डायसनने मांडले आहे. ग्रंथाचे नाव ट्युरिंग्ज कॅथेड्रल (Turing’s Cathedral) नॉयमन ज्या प्रकल्पात कार्यरत होता त्या हायड्रोजन (H) बॉम्बच्याच प्रकल्पात ओपनहायमरही होता. त्याच्या योगदानाकडे डायसन लक्ष वेधतो.

-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT