godhadi esakal
साप्ताहिक

विदर्भातली गोधडी थोडी वेगळी तर नंदीबैलाच्या पाठीवरून येणारी गोधडी आणखीच वेगळी..

Shraddha Kolekar

माझ्या लहानपणापासून मी गोधडी वापरतेय. त्यातली मायेची ऊब मी अनुभवली आहे. माझ्या आजीच्या नऊवारीची चौघडी करून त्यावर तिची स्वतःची काठापदराची कॉटनची साडी लावून माझी आई गोधडी शिवायची..

सुजाता थोरात

आर्टिस्ट म्हणून मी मुळात वॉटरकलरमध्ये काम करत असले तरी त्याबरोबर मी खूप वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केलंय. कॉपरमध्ये, टेराकोटामध्ये आणि कपड्यांमध्येसुद्धा. ह्या वेगवेगळ्या माध्यमांत काम करत असताना नवीन काही प्रयोगही सुरू होतेच. गोधडीची निर्मिती हा त्यातला मला खूप भावलेला प्रयोग.

गोधडीचा जन्म फार जुन्या काळातला असणार. वस्त्रनिर्मितीला सुरुवात झाल्यानंतर ती वस्त्रं जशी जुनी होत गेली असतील तसा कोणालातरी ती जुनी कापडं किंवा त्यांचे तुकडे रिसायकलिंग करण्याची कल्पना सुचली असेल. तीच गोधड्या शिवण्याची सुरुवात असावी, असा आपला माझा अंदाज.

ऐतिहासिक कथांमध्ये पुष्कळदा गोधडीचा किंवा वाकळींचा उल्लेख आलेला दिसतो, ते पाहाता गोधडी शिवणे ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली पारंपरिक कला आहे, याबद्दल मात्र दुमत होऊ नये.

काळ बदलला तशा बाकीच्या गोष्टींप्रमाणे गोधड्यांचं रूपही बदलत गेलं. आता काही ठिकाणी गोधडीचा उपयोग सजावटीचा एक भाग म्हणूनही होत असला तरी परंपरेनं गोधडीचं नातं असतं ते मायेची ऊब देणाऱ्या गोष्टींशीच.

माझ्या लहानपणापासून मी गोधडी वापरतेय. त्यातली मायेची ऊब मी अनुभवली आहे. माझ्या आजीच्या नऊवारीची चौघडी करून त्यावर तिची स्वतःची काठापदराची कॉटनची साडी लावून माझी आई गोधडी शिवायची.

आजही त्या गोधडीचा स्पर्श स्मरणात आहे, एखाद्या आठवणीसरशी तो जाणवतोही. अनेक कुटुंबांमध्ये, विशेषतः खेड्यापाड्यांमध्ये आजही पांघरूण म्हणून गोधड्यांचा वापर होतो. परंतु शहरी वातावरणातून गोधड्या आता नाहीशा होण्याच्या सीमारेषेवर पोहोचल्या आहेत. गोधड्या शिवणारे कुशल हातही आता दुर्मीळ होत चालले आहेत.

गोधडीशी असणाऱ्या माझ्या भावनिक नात्यातून, ही नाहीशी होत जाणारी कला परत नवीन रूपात सर्वांसमोर कशी आणता येईल याचा मी विचार सुरू केला आणि गोधडी आर्टची निर्मिती झाली.

चित्रकलेची आणि माझी ओळखही अगदी लहानपणापासूनची. जसजशी चित्रकलेची जाण, रंगाचे आकर्षण वाढायला लागले तसतसा माझ्यातला कलाकार जागृत व्हायला लागला. मी क्रिएटिव्ह पेंटिंगमध्ये मास्टर ऑफ फाईन आर्ट केले आहे. कॉलेजमधून बाहेर पडताना कलेच्या क्षेत्रात वेगळं काहीतरी करावं अशी इच्छा होतीच.

पण नेमकं ते केव्हा होईल, कसं होईल याचा काहीच अंदाज नव्हता. कला जशी आपल्याला आनंद देते तशीच ती दुसर्‍यांनाही आनंद देणारी असावी असा विचार ठेवून मी माझ्या कलेला रूप देत गेले. आर्टिस्ट म्हणून मी मुळात वॉटरकलरमध्ये काम करत असले तरी त्याबरोबर मी खूप वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केलंय.

कॉपरमध्ये, टेराकोटामध्ये आणि कपड्यांमध्येसुद्धा. ह्या वेगवेगळ्या माध्यमांत काम करत असताना नवीन काही प्रयोगही सुरू होतेच. गोधडीची निर्मिती हा त्यातला मला खूप भावलेला प्रयोग.

गोधडी आर्टची सुरुवात तशी अलीकडची. कोविडच्या काळातली असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्याबरोबर काम करणाऱ्या काही बायकांना त्या कोविडकाळात हातखर्चाच्या पैशांचा प्रश्न होता. दोन-तीन महिने मी त्यांना मदत करत होते. पण त्या स्वाभिमानी असल्यामुळे म्हणायला लागल्या, ताई आम्हांला काम द्या.

मग मीही त्यांना जास्तीत जास्त काम देण्याचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यांना थोडे जास्त पैसे मिळतील. त्यांना काम देण्याबरोबर मला स्वतंत्रपणे काम करता येत होतं. मग मनावर कोणतीही बंधनं न ठेवता नवीन काम सुरू केलं आणि माझ्या कल्पनेतल्या गोधडीने एक वेगळंच रूप घ्यायला सुरुवात केली.

सुरुवात झाली ती गोधडी कशी असते, कशी करतात हे समजावून घेण्यापासून. कारण गोधडी करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक तुकडा जोडताना आतमध्ये दुमडून जोडावा लागतो. जसे चित्रकलेचे काही बेसिक नियम असतात तसेच गोधडी शिवण्याचेही असतात. गोधडीचे कमीतकमी तीन थर असतात, हे गोधडी शिकताना कळलं.

कलाकार जसा निर्मिती करत असताना फ्रीडम घेतो तसंच स्वातंत्र्य मी गोधडी करताना घेतलं. फक्त एकच ठरवलं, आपली गोधडी चांगली होण्यासाठी जी पद्धत योग्य वाटेल ती निवडायची. आणि गोधडी आकार घेत गेली. आता माझी ही कला दाखवायची कुठे? मग गोधडी भिंतीवरच्या चित्ररूपात दिसायला लागली.

मी मोठ्या आकाराच्या गोधड्याही केल्या आहेत. पण प्रत्येक गोधडी फ्रेम करणं शक्य नाही. गोधडी लावायची कशी याचाही विचार करताना तिला आणखी पारंपरिक आणि आधुनिकही बनवण्याचा प्रयत्न केला. मी जे जे साहित्य वापरत गेले ते इकोफ्रेंडली असावे, असासुध्दा विचार केला. अगदी बांबूचा वापर करण्याची कल्पना करून पाहिली. मग भिंतीवरच्या चित्रांची जागा गोधडीने व्यापली. आणि माझ्या कलेनं नवीन रूप घेतलं.

चित्रकार स्वतःकरता काही करतो तेव्हाच त्याच्याकडून नवीन निर्मिती होत असते. कलाकाराने नेहमीच सृजनशील असलं पाहिजे, तरंच एखाद्या पारंपरिक कलेला तो नवीन रूपात आणू शकतो, असं मला वाटतं. गोधड्या करण्याची कला संपूर्ण भारतात आढळते. परंतु प्रत्येक प्रांतानुसार तिचं रूप बदलतं.

काही ठिकाणी पारंपरिक डिझाईन किंवा त्या त्या प्रांतानुसार रंग, प्रतीकं बदलतात. अगदी आपल्या महाराष्ट्रातील गोधडीसुद्धा अशीच बदलत जाते. विदर्भातली थोडी वेगळीच तर आपल्या इथे नंदीबैलाच्या पाठीवरून येणारी गोधडी आणखी वेगळीच आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते. मी हाच विषय माझ्या गोधडीकरिता सुरुवातीला निवडला. कारण आपण चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला घराच्या दारात शुभचिन्ह म्हणजेच चैत्रांगण काढतो. तसेच माझ्या ‘गोधडी आर्ट’ची सुरुवातही शुभचिन्ह काढून करणं योग्य वाटलं.

ही पहिलीच मोठी गोधडी करताना काही गोष्टी घडत गेल्या. मला मॉडर्न आणि पारंपरिक यांचा मेळ घालायचा होता. बघताना ती आधुनिक वाटली पाहिजे पण विषय पारंपरिक होता. तो मांडताना मी रंगसंगतीवर विशेष भर दिला.

चित्रकार ऋतूंनुसार आपल्या कामात रंगयोजना करीत असतो. म्हणून चैत्रांगण करताना मी लाल रंगाच्या बॅकग्राऊंडवर अनेक रंगाचे तुकडे पारंपरिक पद्धतीने न लावता त्यातून डिझाईन आणि लय कशी निर्माण होईल, याकडे जास्त लक्ष दिले.

विषय पारंपरिक असल्यामुळे कलाकृतीही तशीच वाटावी म्हणून बाजूंना मी लहान लहान त्रिकोण लावून पारंपरिक लुक दिला. काही ठिकाणी प्रिंट असलेला कपडासुद्धा वापरला. कालांतराने माझ्या गोधड्यांना नवीन विषय मिळत गेले.

प्रत्येक गोधडी करतानाच्या अनेकानेक आठवणी आहेत एक गोधडी लहान स्वरूपात मी आर्ट मंडईसाठी करत होते. विषय होता किटली. किटली प्रिंट असलेला अगदी थोडे कापड मला मिळाले. दोन-तीन आर्ट वर्क केले आणि कापड संपले.

खूप ठिकाणी शोधलं, प्रदर्शनं पालथी घातली पण अजूनही नाहीये मिळालेला. मग काय, किटलीचा विषय त्यावेळपुरता तरी सोडून दुसरा विषय निवडावा लागला. बऱ्याचदा ठरावीक रंग मिळाला नाही किंवा मनासारखं कापड मिळालं नाही तर काम थांबतं. काही काही गोष्टींच्या शोधात मी असे महिनेच्या महिने घालवले आहेत.

माझे विषय अगदी साधे रोजच्या जीवनातले असतात. त्यामुळे दर्शकांपर्यंत विषय सहज पोहोचू शकतो आणि दर्शकांना कलाकृतीचा आनंद घेता येतो. हळूहळू ही कला लोकांपर्यंत पोहोचते आहे. माझी ही गोधडी आर्ट बघून मला अमेरिकेतही गोधड्यांचं प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने आपली ही पारंपरिक कला नवीन रूपात सातासमुद्रापार जाऊन पोहोचली यातच मला आनंद आहे.

या कलाप्रकाराचा आणखी एक विशेष म्हणजे अलीकडेच भारतात एक कला म्हणून गोधडी आर्टच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली. हे पहिल्यांदाच होते आहे. २०२१मध्ये माझ्या कंटेम्पररी गोधडीला विशेष पुरस्कार मिळाला. यावर्षीसुद्धा नोव्हेंबरमध्ये कंटेम्पररी गोधडी आर्ट प्रदर्शन आहे, आणि माझ्या मॉडर्न गोधडीला त्यात स्थान मिळालं आहे.

आपण झाड लावतो, ते झाड मोठं होताना बघतो तेव्हा त्या झाडाचा आकार किती मोठा होणार आहे, त्याला किती फांद्या, किती पानं फुटणार आहेत, किती फळं लागणार आहेत हे आपल्याला माहीत नसतं, असं पॉल क्ली नावाच्या चित्रकारानं म्हटलं आहे. कलाकाराच्या कलेचंही असंच असतं. त्याने फक्त झाड लावायचं असतं. त्याला योग्य खत पाणी मिळालं, की त्याची आपोआप वाढ होणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT