Christopher Nolan esakal
साप्ताहिक

'ख्रिस्तोफर नोलन' या दिग्दर्शकाच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?

डोके बाजूला ठेवून आपण त्याचे चित्रपट बघूच शकत नाही, इतकेच नव्हे तर पूर्वतयारीशिवाय त्याचे चित्रपट बघितले तर ते डोक्यावरून जातात. तरीही ख्रिस्तोफर नोलनचा एवढा चाहता वर्ग का?

सुहास किर्लोस्कर

सुहास किर्लोस्कर

ख्रिस्तोफर नोलनचे चित्रपट समजून बघणे हा चित्रपट कलेची समज वाढवणारा उपक्रम आहे, पण त्यासाठी वेगळ्या क्रमाने त्याचे चित्रपट बघितल्यास त्यातले गुंते पचवणे अधिक सोईस्कर असते.

ओपनहायमर रिलीज होण्यापूर्वी आठ दिवस त्याचे बुकिंग सुरू झाले आणि पहिल्या तीन-चार दिवसांचे शो हाउसफुल होण्यास सुरुवात झाली. पुण्यात एका रविवारी सकाळी आठ वाजता बाराशे रुपयांचे तिकीट काढून आयमॅक्स थिएटरमध्ये गेल्यानंतर तिथे बघितलेली गर्दी अचंबित करणारी होती.

समस्त युवावर्ग चित्रपटाबद्दल माहिती घेऊन, नोलनचे इंटरव्ह्यू बघून आला होता. प्रेक्षकांना थिएटरला खेचण्यासाठी असे काहीतरी वेगळे असले, तर प्रेक्षक आवर्जून वेळ काढून येतो हे पुनःश्च सिद्ध झाले.

त्यातील बऱ्याच प्रेक्षकांना चित्रपट बघण्यापूर्वी किंवा त्याची चर्चा सुरू होण्यापूर्वी ओपनहायमर माहीत नव्हता. मग त्यांना उत्सुकता ओपनहायमरबद्दल होती? नाही.

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन नावाचे गारुड त्यांच्या मनावर राज्य करत असल्यामुळे हा विषय आता हा दिग्दर्शक कसा मांडणार याबद्दल त्यांना विशेष आस्था होती.

नोलनने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते, की ओपनहायमर बघताना शक्यतो आयमॅक्सच्या मोठ्या पडद्यावर मध्यभागी असलेल्या खुर्चीवर बसून बघा. ओपनहायमरचे बुकिंग सुरू होताच पहिल्या चार दिवसांत पहिल्या तीन दिवसांच्या सर्व शोंमधील मधल्या रांगांची तिकिटे हातोहात खपली होती.

ख्रिस्तोफर नोलन या दिग्दर्शकाच्या अशा लोकप्रियतेचे रहस्य काय? त्याचे चित्रपट रंजक असण्यापेक्षा उत्कंठावर्धक असतात? त्याच्या चित्रपटात यशस्वी होण्यासाठीचा फॉर्म्युला असतो का? नाही. त्याचे चित्रपट समजायला सोपे असतात का? नक्कीच नाही.

डोके बाजूला ठेवून आपण त्याचे चित्रपट बघूच शकत नाही, इतकेच नव्हे तर पूर्वतयारीशिवाय त्याचे चित्रपट बघितले तर ते डोक्यावरून जातात. तरीही ख्रिस्तोफर नोलनचा एवढा चाहता वर्ग का?

चित्रपट हे दृश्यमाध्यम असल्यामुळे चित्रपटाची कथा काय आहे, यापेक्षा ती कथा कोणत्या पद्धतीने सांगितली आहे, हे महत्त्वाचे असते आणि तेच ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे.

गुंगवून टाकणारी गुंतागुंतीची पटकथा, ‘एक होता राजा’ अशी एकरेषीय पद्धतीने सरळसोट कथा न सांगता प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या शैलीने (Non-linear) पटकथा लिहिण्याचे प्रयोग, प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळा विचार, घटना अतर्क्य वाटल्या तरी त्याला दिलेली तर्कसंगती आणि विज्ञानाची जोड, एकदा बघितल्यावर न समजल्यास प्रेक्षक दुसऱ्या वेळी मांडणी समजून घेण्यासाठी पुन्हा चित्रपट बघेल अशी केलेली व्यवस्था, विज्ञानाची प्रगती आणि मानवी स्वभाव यामधील संघर्ष, अशा अनेक कारणांमुळे ख्रिस्तोफर नोलनचा एक चाहता वर्ग तयार झाला आहे.

टेरंटेला (Tarantella, १९८९), लार्सेनी (Larceny, १९९६), डूडलबग (Doodlebug, १९९७) या उमेदवारीच्या काळात तयार केलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये ख्रिस्तोफर नोलन या युवकाच्या अनवट विचार प्रक्रियेची झलक दिसते.

त्यानंतर १९९८ साली फॉलोइंग (Following) हा पहिला चित्रपट दिग्दर्शित करताना ख्रिस्तोफर नोलन यांनी एका लेखकाची मानसिकता दाखवली आहे. एक लेखक एक प्रयोग म्हणून रस्त्यावरील अनोळख्या व्यक्तींचा पाठलाग करून ती लोकं काय करतात, कुठे जातात याचा मागोवा घेत असतो.

कालांतराने त्याला असा पाठलाग करण्यामध्ये विलक्षण थरार वाटू लागतो. अशाच एका व्यक्तीचा पाठलाग करत असताना एक व्यक्ती त्याला रंगेहाथ पकडते. विशेष म्हणजे ती व्यक्ती नवाच प्रस्ताव मांडते आणि दोघे मिळून एक नियोजन करतात.

चित्रपटाच्या कथेमधील गुंतागुंत काळाच्या पुढे-मागे जाऊन (Back & Forth) पद्धतीने दाखवताना कथेच्या पुढील काही भाग आपल्याला तुकड्यातुकड्यांमध्ये दिसत राहतो आणि प्रेक्षक ख्रिस्तोफर नोलनच्या जाळ्यात अडकतात.

या दिग्दर्शकाला खरी ओळख मिळाली यानंतरच्या मेमेंटो (Memento, २०००) चित्रपटाने.

पटकथा

एकदा ख्रिस्तोफर नोलनच्या भावाने त्याला एक स्व-लिखित कथा सांगितली. नायकाची स्मरणशक्ती जरा विचित्र आहे, त्यामुळे त्याला नवीन काहीही लक्षात राहात नाही आणि त्याच्या पत्नीचा खून झाल्याचे त्याला आठवत राहते, त्या खुनाचा बदला घेण्याच्या भावनेने तो अनेक प्रयत्न करत राहतो परंतु ठरावीक काळानंतर त्याला पुन्हा विस्मरण होत असते.

त्यावर उपाय म्हणून तो आपल्याच शरीरावर ठळक प्रसंग लिहून ठेवतो, जे लक्षात आहे त्याचे फोटो जमवतो, त्यावर काही लिहितो. याचा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी ख्रिस्तोफरने मेमेंटो चित्रपटाची पटकथा लिहिताना नायकाला जसे तुकड्यातुकड्यात आठवत राहते तसाच चित्रपट करण्याचे ठरवले.

घडलेली घटना आणि नायकाला जे आठवते (जसे आठवते) ते, असे या कथेचे दोन भाग आहेत. नायकाला काय आठवते ते सत्य असू शकते किंवा असत्य असू शकते किंवा त्याच्या मनाचे खेळ असू शकतात, हा यामध्ये महत्त्वाचा भाग.

त्यामुळे चित्रपटामध्ये व्यक्तिनिष्ठ, म्हणजे नायकाच्या दृष्टिकोनातून -आत्ताच्या काळात घडणाऱ्या घटना रंगीत दिसतात आणि पूर्वी घडलेल्या घटना फ्लॅशबॅकमध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगात दिसतात. फ्लॅशबॅकमध्ये कोणालाही कोणत्याही घटना कोणत्याही क्रमाने आठवू शकतात. आपल्याही आयुष्यात असेच घडत असते.

पटकथा लिहिताना नोलनने चित्रपटाचे दहा भाग केले आणि त्यातील ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगात दिसणारे प्रसंग क्रमाने घडतात परंतु रंगीत दिसणारे प्रसंग उलट्या क्रमाने घडतात. त्यामुळे चित्रपट बघताना आपल्याला १०, १, ९, २, ८, ३, ७, ४, ६, ५ या क्रमाने दिसतो.

चित्रपट पुढे सरकत जातो त्याप्रमाणे खरे काय आहे आणि आठवते ते काय आहे यांमधील सीमारेषा धूसर होत राहते आणि आपण हा चित्रपट वारंवार बघत राहतो. चित्रपट बघताना ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ची अनुभूती प्रेक्षक घेतात याचे श्रेय अनवट पद्धतीने पटकथेची मांडणी करण्याला जाते. गजनी चित्रपटावरून मेमेंटोची पारख करणे म्हणजे फिरोज खानच्या धर्मात्मावरून गॉडफादर कसा असेल याचे इमले बांधणे होय.

दिग्दर्शन

मेमेंटो चित्रपटाच्या सुरुवातीला एका हातामध्ये धरलेला फोटो आपल्याला दिसतो. त्या फोटोमध्ये रक्ताने माखलेली भिंत आहे. टायटल्स पुढे सरकतात त्याचवेळी हातातला फोटो झाडून पुनःपुन्हा बघितला जातो आणि हळूहळू त्या फोटोमधील रंग उडाल्याचे आपल्याला जाणवत राहते.

नोलन सहसा चित्रपटात पुढे काय वाढून ठेवले आहे याचे सूतोवाच पहिल्या दोन मिनिटांत करत असतो. त्यानंतर फोटो काढणाऱ्या नायकाच्या चेहऱ्यावर रक्त उडाल्याचे दिसते. या नायकाने (?) दुसऱ्या व्यक्तीचा खून केला आहे? या संभ्रमात प्रेक्षक असतात त्याचवेळी रंगीत चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाइट होतो आणि नायक स्वतःशी बोलतो आहे, हे आपण बघतो.

‘मी कोण आहे, कुठे आहे?’ असे प्रश्न नायक स्वतःला विचारतो त्याचवेळी प्रेक्षक स्वतःला विचारतात, काय चालले असेल? त्याक्षणी चित्रपट पुन्हा रंगीत होतो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला समजते, की नायकाला काही वेळापूर्वी काय घडले हे नीटसे आठवत नाही.

कमीतकमी शब्दांमध्ये एका मागोमाग एक दृश्यामधून अर्थ लावण्यास भाग पाडणारा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन इथेच दिसतो.

नोलनच्या प्रत्येक चित्रपटाबरोबर पटकथेमधील गुंतागुंत वाढत गेली पण टेनेट (Tenet, २०२०) चित्रपटामध्ये नोलन गुंतागुंतीची पटकथा तयार करण्याच्या स्वतःच्या शैलीच्या प्रेमात पडल्यामुळे हरवल्यासारखा वाटला. स्वतःची पटकथा नसलेला एकमेव चित्रपट त्याने २००२ साली दिग्दर्शित केला, ज्यामध्ये एक दिग्दर्शक रिमेक करताना काय प्रभाव पाडू शकतो याचे प्रत्यंतर येते.

इन्सोम्निया (Insomnia, २००२) चित्रपट सुरू होतो त्यावेळी चित्रपटाची टायटल्स आपल्याला अस्पष्ट दिसतात, नावे स्पष्ट दिसतात आणि पुन्हा चित्र धूसर दिसू लागते. राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचे डाग दिसू लागतात आणि त्यावर चित्रपटाचे नाव स्पष्ट-अस्पष्ट दिसू लागते. बर्फाळ प्रदेशाकडे आपण विमानातून बघतो तेवढ्यात ते चित्र अस्पष्ट दिसू लागते.

पांढऱ्या कापडावर पडणारे रक्ताचे डाग स्पष्ट दिसतात. ते डाग घालवण्याचा प्रयत्न दिसतो त्याचवेळी विमानामध्ये बसलेल्या विल डॉर्मरचे (अल पचिनो) पेंगुळलेले डोळे बघताच आपल्या लक्षात येते की याला झोप आली आहे पण झोप लागत नाही. यालाच इन्सोम्निया म्हणतात आणि त्याची अनुभूती प्रेक्षकांना पहिल्या तीन मिनिटांत येते.

१९९८ साली रिलीज झालेल्या याच नावाच्या नॉर्वेजियन सिनेमाचा रिमेक दिग्दर्शित करताना ख्रिस्तोफर नोलनने रॉबिन विल्यम्स, अल पचिनो, हिलरी स्वँक यांच्यामधील संवाद क्लोज-अपमधून दाखवताना दिग्दर्शकाने प्रत्येकाच्या मनातील द्वंद्व संवादाशिवाय दाखवण्यावर भर दिला.

अल पचिनोने साकार केलेल्या डिटेक्टिव्हमधील खलप्रवृत्ती प्रकर्षाने न दाखवता त्याला ‘ग्रे शेड’ दाखवणे चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे ठरते.

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. द डार्क नाईट (The Dark Knight, २००८) चित्रपट सुपरहिरोचा आहे की जोकरचा आहे? जोकर असा का वागतो? नायक कोण आणि खलनायक कोण? आपण कोणाच्या बाजूचे? अशा प्रश्नांची मालिका प्रेक्षकांच्या मनात सुरू करण्यात नोलन यशस्वी होतो त्यामुळे बॅटमॅन चित्रपटत्रयी -बॅटमॅन बिगिन्स (Batman Begins, २००५), द डार्क नाईट आणि द डार्क नाईट राईझेस (The Dark Knight Rises, २०१२) – फक्त सुपरहिरोची न राहता त्यापलीकडे जाऊन विचार करायला लावते.

डोके बाजूला ठेवून बघण्याच्या सुपरहिरो चित्रपटांच्या भाऊगर्दीत ख्रिस्तोफर नोलनने आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध केले. सुपरहिरोच्या हाती असणाऱ्या आयुधांना विज्ञान आणि तार्किक विचारांची जोड केवळ याच चित्रपटांमध्ये दिसते. ‘जोकर’ या खलनायकाच्या मानसिकतेचा वेध नोलनच्या चित्रपटात जसा घेतला आहे तशी विचारांची बैठक अन्य कोणत्याही सुपरहिरोच्या चित्रपटांमध्ये दिसून येत नाही.

सुष्ट आणि दुष्ट यामधील द्वंद्व बाहेरून दिसते तसेच दोघांच्या मानसिकतेमधूनही दिसते, हे या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. चित्रपट बघितल्यावर आपण प्रेक्षक या नात्याने जोकरच्या मानसिकतेचा अधिक विचार करतो.

ख्रिस्तोफरच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये द प्रेस्टीज (Prestige, २००६) चित्रपटाचा वरचा नंबर लागतो.

चित्रपटाचा विषय आणि आशय दोन जादूगारांची एकमेकावर कुरघोडी एवढाच मर्यादित नाही. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेममध्ये झाडाखाली पडलेल्या अनेक काळ्या टोप्या (हॅट) दिसतात आणि एक वाक्य आपण ऐकतो, “Are you watching closely?” ख्रिस्तोफर नोलनचे चित्रपट कसे बघावेत याबद्दल भाष्य या वाक्यात आहे.

हेच वाक्य आपण चित्रपटात अनेकवेळा ऐकतो पण कोणताही चित्रपट बघताना आपण इतके सजग असतो का? हॅटनंतर पिंजऱ्यात ठेवलेले दोन पक्षी दिसतात आणि त्यानंतरचे वाक्य हेच द प्रेस्टीज चित्रपटाचे सार आहे.

Every magic trick contains three parts or acts. First half is called ‘the pledge’. Second part is called ‘the turn’. The magician shows something ordinary. Making something disappear isn’t enough. You have to bring it back. Third part is called ‘the prestige’.

नोलन चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भूतकाळ-वर्तमानकाळ या टाइमलाइनमध्ये मागे-पुढे घेऊन जातो. हा गुंता सोडवताना नोलनने पटकथा लिहिताना जादूचा खेळ केला आहे, परंतु त्याला विज्ञानाची डूब दिली आहे. चित्रपटामध्ये अतर्क्य काहीच नाही.

एका जादूगाराने दुसऱ्या जादूगारावर केलेली कुरघोडी सुरुवातीच्या प्रसंगामध्ये बघूनही प्रेक्षक चित्रपट बघताबघता कोडे सोडवत राहतात, हे विशेष. दुसऱ्या वेळेस चित्रपट बघताना चित्रपटातील पहिल्या वाक्याचा गर्भितार्थ लक्षात येतो.

बायोपिक

बायोपिकमध्ये नेमका भर कशावर द्यावा हे पटकथाकार आणि दिग्दर्शक यांनी ठरवणे कसे महत्त्वाचे असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डंकर्क (Dunkirk, २०१७) आणि ओपनहायमर (Oppenheimer, २०२३) हे चित्रपट.

डंकर्क तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवला आहे. प्रत्येक दृष्टिकोनाच्या (Point of view) वेळा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. जमिनीवर जे घडते ते पांढऱ्या रंगामध्ये, समुद्रामध्ये जे घडते ते गडद निळ्या रंगामध्ये आणि आकाशात जे घडते ते आकाशी निळ्या रंगात.

जरी या घटना थोड्याफार फरकाने एकमेकांत गुंतलेल्या असल्या, या रंगामध्ये गडद रेषा ओढलेली नसली तरीही प्रत्येक टाइमलाइन बारकाईने बघितल्यास फरक जाणवतो.

बंदरावर एक आठवडा वाट बघणारे सैनिक असले तरी समुद्रामध्ये जे घडते त्याचा कालावधी एक दिवसाचा आहे आणि हवेत उडणाऱ्या विमानाचा कालावधी एक तासाचा आहे. ख्रिस्तोफर नोलनचे चित्रपट पॉपकॉर्न खाताना बघता येत नाहीत, कारण थोडेसे लक्ष विचलित झाल्यास आपली वेळ चुकते आणि चित्रपटातील अनेक संदर्भ लागत नाहीत.

इन्सेप्शन (Inception, २०१०) चित्रपट फक्त स्वप्नामधील स्वप्नांचा आविष्कार नाही, आव्हानात्मक पटकथेबरोबरच दिग्दर्शक नोलनने तो दृश्य स्वरूपामध्ये पाच वेगवेगळ्या पातळ्यांवर कसा सादर केला आहे, हे तितकेच महत्त्वाचे आहे. स्वप्नातीत संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडण्यापूर्वी त्याचे चित्र दिग्दर्शकाला दिसते हे लक्षात घेतल्यावर चित्रपटाच्या दृश्य भाषेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या नोलनचे वेगळेपण नोंद घेण्यासारखे आहे.

विज्ञान

विज्ञानामधील विविध संकल्पनांचा अभ्यासपूर्ण वापर ही ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची खासियत आहे. इंटरस्टेलरमध्ये (Interstellar, २०१४) ब्लॅक होल संकल्पना, टेनेटमध्ये टाइम ट्रॅव्हल, ओपनहायमरमध्ये क्वांटम फिजिक्स –ट्रिनिटी टेस्ट, द प्रेस्टीजमध्ये एडिसन आणि टेस्ला या शास्त्रज्ञांमधील तीव्र स्पर्धा, इन्सेप्शनमधील न्यूरो सायन्स अशा वैज्ञानिक संकल्पनांचा अभ्यासपूर्ण वापर झाला आहे.

नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ किप थॉर्न म्हणतात, नोलनला मदत करणे मला आवडते कारण विज्ञानामधील अवघड संकल्पनांवर चित्रपटातील प्रसंग, चर्चा लिहिण्यापूर्वीच नोलन त्या विषयाचा सखोल अभ्यास करतो. ट्रिनिटी ही अणुबॉम्ब बनवण्याची टेस्ट अणुबॉम्बचे जनक ओपनहायमर यांनी १६ जुलै १९४५ रोजी अमेरिकन आर्मीकरिता केली.

हा बॉम्ब ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर आणि तीन दिवसांनी नागासाकीवर टाकण्यात आला, त्यामुळे २ लाख २० हजारांवर बळी गेले त्याला जबाबदार कोण? शास्त्रज्ञ की त्या अणुबॉम्बचा वापर करणारे युद्धखोर नेते? माणसाच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची शरम वाटावी असा हा प्रसंग आहे, परंतु याची चाचणी केली तेव्हा याच्या परिणामांची चर्चा झाली का? ज्यावेळी ट्रिनिटी टेस्ट झाली त्यावेळी नेमके काय झाले? अणुबॉम्ब बनवला त्यावेळी त्याचा वापर कसा होईल याची कल्पना बॉम्बच्या निर्मात्याला होती का?

अशा अनेक प्रश्नांची उकल ओपनहायमर या चित्रपटामधून करण्याचा घाट ख्रिस्तोफर नोलन यांनी घातला.

खरेतर अणुबॉम्बचा शोध हिटलरच्या जर्मनीचा नाश करण्यासाठी लागला. जर्मनीविरुद्ध वापरण्याची वेळ न आल्यामुळे आता लावलेल्या शोधाचे करायचे काय, असा (अ)विचार करून त्याचा वापर हिरोशिमा-नागासाकी उद्ध्वस्त करण्यासाठी केला गेला.

ही अणुचाचणी यशस्वी झाल्याबद्दल आनंद मानावा की खेद, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या शोधामुळे पृथ्वीच नष्ट करून सत्यानाश करण्यास मानव निघाला, अशी परिस्थिती निर्माण झाली.

ख्रिस्तोफर नोलन यांनी चित्रपट अशा पद्धतीने सादर केला आहे, की ट्रिनिटी टेस्ट ज्यावेळी यशस्वी होते त्यावेळी ती चाचणी यशस्वी झाल्याबद्दल ओपनहायमर यांच्या या चाचणीमध्ये सहभागी झालेली सर्व टीम टाळ्या वाजवते, ओपनहायमर यांचे अभिनंदन करते आणि चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक हताशपणे हा ‘समारंभ’ बघत बसतो.

बर्ड आणि शेरविन लिखित American Prometheus – The Triumph And Tragedy of J Robert Oppenheimer या पुलित्झर पुरस्कारप्राप्त चरित्रावर आधारित पटकथा ख्रिस्तोफर नोलन यांनी लिहिली आहे. अर्थात, कथा ज्या पद्धतीने सांगण्यात आली आहे त्यामुळे चित्रपट आवर्जून बघणे क्रमप्राप्त ठरते.

ओपनहायमर या शास्त्रज्ञाने घेतलेले शिक्षण, त्याची अल्बर्ट आइनस्टाईन बरोबर झालेली भेट, ट्रिनिटी टेस्ट, त्यानंतर त्याचा झालेला वापर, त्यानंतर ओपनहायमर यांची १९५४ साली झालेली ‘ट्रायल’, उलटतपासणी, इतरांनी दिलेल्या साक्षी, त्यामधील खरे-खोटे वक्तव्य अशा अनेक घटनांचा मागोवा चित्रपटामधून घेताना प्रसंग एकमेकात गुंतवून दाखवले आहेत.

एका कथानक ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये दाखवले आहे, दुसऱ्या कथानकामध्ये टंगस्टन रंगाची प्रकाशयोजना तर तिसऱ्या कथानकामध्ये पांढऱ्या रंगाची प्रकाश योजना असा फरक केल्यामुळे आपण कोणत्या काळात आहोत याची कल्पना येते.

ख्रिस्तोफर नोलनच्या चाहत्यांनी डंकर्क चित्रपटामधील तीन कथानके अशीच वेगळ्या रंगामध्ये बघितली आहेत. एक्स्पोझिशन (Exposition) म्हणजेच केव्हा काय सांगायचे नाही आणि त्यामधला तपशील केव्हा दाखवायचा, हे तंत्र या चित्रपटात प्रभावीपणे वापरले आहे.

त्यामुळे बॉम्बस्फोट झाला आहे आणि ट्रिनिटी टेस्ट यशस्वी झाली आहे, हे माहीत असूनही प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतो. ट्रिनिटी चाचणी झाल्यावर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. हिरोशिमा-नागासाकी बॉम्बस्फोट झाल्यावर ओपनहायमरचे कौतुक झाले, त्याचा सत्कार झाला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

हे सर्व आपण प्रेक्षक म्हणून बघताना अचंबित होतो. गर्दीला डोके चालवण्याची शुद्ध नसते याचे प्रत्यंतर ते प्रसंग बघताना वारंवार येत राहते. जमावाच्या बरोबर आपण कुठे वाहत गेलो नाही ना? अशा प्रकारे आपण कुणाला उगाच टाळ्या वाजवल्या नाहीत ना? असे प्रश्न आपल्याला पडतात. चित्रपटगृहातील गर्दी टाळीबाज दृश्याला टाळ्यांनी प्रतिसाद देत नाही, हे दिग्दर्शकाचे कौशल्य.

साउंड

नोलनच्या चित्रपटातील पार्श्वसंगीत हा वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. द डार्क नाईट या विलक्षण चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन जेम्स न्यूटन होवार्ड आणि हन्स झिमर यांनी केले. दर्जेदार साउंड डिझायनिंगमुळे चित्रपटात संगीत सतत वर जाते असा भास होतो – त्याला शेपार्ड टोन म्हणतात – खरेतर ते आहे तिथंच गोलाकार फिरत असते.

तीन सप्तकामध्ये वाजवलेल्या या संगीत तुकड्यामध्ये वरच्या सप्तकात वाजवलेले संगीत मंद होत राहते, मधल्या सप्तकामधील संगीताचा आवाज वाढलेलाच राहतो आणि मंद सप्तकातील संगीताचा आवाज वाढतो, ज्याचा एकत्रित परिणाम विलक्षण असतो.

हॅन्स झिमर यांनी पार्श्वसंगीतामध्ये ऑडिओ इल्युजनचा वापर डंकर्क, इंटरस्टेलर चित्रपटामध्ये परिणामकारकरित्या साधल्यामुळे शेपार्ड टोन आपल्याला चित्रपटामधील तणावपूर्ण प्रसंगामध्ये अधिक गुंतवतो. डंकर्क चित्रपटात घड्याळाची टिकटिक ऐकू येते त्यावेळी वेळ पुढे सरकल्याचे दडपण प्रेक्षकांवर येत राहते.

दुसऱ्या-तिसऱ्या वेळी चित्रपट बघताना पार्श्वसंगीताकडे आवर्जून लक्ष दिल्यावर आपण चित्रपटात गुंतण्याचे आणखी एक कारण समजते.

एकूणच ख्रिस्तोफर नोलनचे चित्रपट समजून बघणे हा चित्रपट कलेची समज वाढवणारा उपक्रम आहे पण त्यासाठी वेगळ्या क्रमाने त्याचे चित्रपट बघितल्यास त्यातले गुंते पचवणे अधिक सोईस्कर असते. इन्सोम्नियापासून सुरुवात करावी कारण त्याची पटकथा एकाच क्रमाने पुढे जाते. बॅटमॅन बिगिन्स, द डार्क नाईट, डंकर्क अशा मार्गाने आगेकूच करून द प्रेस्टीजला हात घालावा. त्यामधले विज्ञान आणि काळाच्या पुढे-मागे जाण्याची सवय झाल्यावर फॉलोइंग बघावा.

मेमेंटो बघण्याची आता मनाची तयारी होते, कारण नॉन-लिनिअर पटकथा असलेल्या चित्रपटातील दोन कथा /दृष्टिकोन बघण्याला आपण सरावतो. वर्तमानकाळ,भविष्यकाळ आणि भूतकाळामध्ये लीलया प्रवास करण्याचा सराव करून पटकथालेखक दिग्दर्शक नोलनची दृष्टी लाभल्यावर ओपनहायमर बघून त्यामधील अनेक रंगांचे वेगवेगळे अर्थ लावू शकतो.

इंटरस्टेलर रिचवल्यानंतर आपल्याला विज्ञानामधील बारकावे समजून घेता येतात, ज्यामध्ये आपण वर्तमानकाळातून भविष्यकाळात जातो आणि पुन्हा भूतकाळात येतो. तीनही काळामध्ये विहार केल्यानंतर आपण इन्सेप्शनमधील स्वप्नातीत स्वप्नांचे अर्थ उलगडण्यास समर्थ होतो.

चित्रपट दिग्दर्शक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे दिग्दर्शक प्रेक्षकांना मूर्ख समजतात. या दिग्दर्शकांना प्रेक्षकांना काय आवडतं त्याची इत्थंभूत माहिती असते असा त्यांचा समज असतो. त्यामुळे अमुक विषय इथे चालणार नाहीत, प्रेक्षकांना हे समजणार नाही अशा ठाम समजुतीने चित्रपट तयार करतात.

अशा चित्रपटांमुळे प्रेक्षक दहा वर्षे मागे जातो. दुसऱ्या प्रकारचे दिग्दर्शक नेहमीच नावीन्यपूर्ण काही देण्याचा विचार करतात, वेगवेगळ्या – अनवट विषयांवर चित्रपट काढतात. हे दिग्दर्शक प्रेक्षकांना हुशार समजतात. अवघड विषय मांडला तरीही प्रेक्षक विचार करतील आणि न समजल्यास पुन्हा चित्रपट बघायला येतील असा त्यांना ठाम विश्वास असतो.

असे दिग्दर्शक कोणताही ठोस निर्णय चित्रपटांमधून सांगत नाहीत. ख्रिस्तोफर नोलन दुसऱ्या गटातला दिग्दर्शक आहे. आर्ट आणि कमर्शिअलमधील सीमारेषा धूसर होत आहे कारण विचार करायला लावणारे चित्रपट असूनही दर्दी आणि गर्दी या दोघांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात नोलन यशस्वी झाला आहे.

चित्रपट कलेचे भवितव्य अशा दिग्दर्शकाच्या हातात सुरक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT