Bird Sanctuary of Nandurmadhyameshwar Nashik Marathi News esakal
साप्ताहिक

Bird Sanctuary : सुमारे २९ देशांतून दीडशेच्यावर प्रजातींचे विविध प्रकारचे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून भारतात येतात

लाखोंच्या संख्येनं आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी ठिकठिकाणची पक्षी तीर्थं गजबजू लागतात, त्यांच्या सोबतीला स्थानिक पक्ष्यांची मैफलही रंगलेली असतेच.

सकाळ डिजिटल टीम

पक्ष्यांच्या वार्षिक स्थलांतराचे दोन प्रमुख हवाई मार्ग आपल्या देशातून जातात आणि उत्तर युरोप आणि सायबेरिया यांच्यासारख्या दूरस्थ आणि दुर्गम प्रदेशातील मनोहारी पक्ष्यांचे दर्शन घडवतात.

पक्ष्यांचा हा प्रवास अत्यंत प्रयासप्रद असला तरी आपण मग फारसे प्रयास न घेता त्यांचे दर्शन वढवाणासारख्या सरोवरावर घेऊ शकतो आणि त्यांच्या अनोख्या विश्वात काही वेळ स्वतःला विसरून रमू शकतो!

भूषण तळवलकर

हिवाळ्याच्या पाऊलखुणा उमटू लागल्या की चराचरामध्ये बदल होऊ लागतात. निसर्गाचं रूप पालटतं, अल्हाददायक गारवा जाणवू लागतो, आणि लाखोंच्या संख्येनं आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी ठिकठिकाणची पक्षी तीर्थं गजबजू लागतात, त्यांच्या सोबतीला स्थानिक पक्ष्यांची मैफलही रंगलेली असतेच. निसर्गाचं, पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा, त्यांना जवळून अनुभवण्याचा हा सर्वोत्तम काळ!

हा काळ उलगडणारी तीन निसर्गप्रेमी निरीक्षकांची ही निसर्ग सफर...

उत्तर गोलार्धातील कर्कवृत्ताच्याही वरच्या बाजूस सुमारे २७-२८ अंश अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात ऑक्टोबरच्या सुमारास पडू लागलेल्या थंडीचा आणि कमी वेळ राहणाऱ्या सूर्यप्रकाशाचा तेथील जीवसृष्टीवर परिणाम होतो आणि अन्नाचा तुटवडा निर्माण होतो.

बर्फवृष्टी होणाऱ्या प्रदेशांत तर निसर्ग गोठून जातो. मग तेथे राहणाऱ्या पक्ष्यांना अन्नासाठी, जगण्यासाठी दक्षिणेकडे म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेशांकडे किंवा दक्षिण गोलार्धाकडे यावे लागते.

अक्षरशः हजारो किलोमीटर उड्डाण करून हे पक्षी उबदार प्रदेशांत येतात आणि हिवाळ्याचे चार-पाच महिने व्यतीत करतात.

आपल्या देशाचा मध्य आणि दक्षिण भाग

समशितोष्ण कटिबंधात येत असल्याने तिथे कडक हिवाळा नसतो. लांबरुंद विस्तार असलेल्या भारतात अनेक नद्या, तळी, सरोवरे असल्याने अनेक प्रकारचे मासे, कीटक, अळ्या, शैवाल असे मुबलक अन्न पक्ष्यांना उपलब्ध असते.

या पाणवठ्याच्या जागांच्या प्रदेशांत भरपूर शेती होत असल्याने तिथेही बरेच कीटक वावरत असतात. पक्ष्यांना हे ज्ञान नैसर्गिकरित्या असल्याने ते स्थलांतर करून दक्षिणेकडे झेपावतात.

सुमारे २९ देशांतून दीडशेच्यावर प्रजातींचे विविध प्रकारचे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून भारतात येतात आणि आपल्या मनोहर लीलांनी तळी, सरोवरे आणखी जिवंत करतात.

यांच्याबरोबरच या पाणथळ जागांमधले कायमस्वरूपी निवासी पक्षीही मिसळून जातात आणि मग अशा सरोवरांवर विविध रंगरूपाच्या पक्ष्यांची गर्दी उसळते. त्यांच्या चित्रविचित्र आवाजांनी आणि हालचाली, उड्डाणे यांनी अशा पाणथळ जागांना वेगळेच सौंदर्य प्राप्त होते.

गुजरातमधील बडोद्यापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावरील वढवाणा वेटलँड ही अशीच एक सुंदर जागा. निळ्याशार आणि प्रशांत सरोवराबरोबरच दलदलीचे भाग, शेते आदी सर्व निसर्गसंपन्नता असल्याने स्थलांतरित पक्षी इथे बऱ्याच विविधतेने आणि संख्येने हिवाळी मुक्कामाला येतात.

गेल्या काही वर्षांत इथे हिवाळ्यात स्थानिक आणि स्थलांतरित अशा सुमारे २६० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. या वैविध्यामुळे २०२१ मध्ये या सरोवराला जगद्विख्यात ‘रामसर’ मानांकनही मिळाले आहे!

मागच्या हिवाळ्यातल्या एका बडोदा-अहमदाबाद दौऱ्यात या सुंदर जागेला भेट देण्याचा योग आला. पक्षी निरीक्षणासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयापासून ते सकाळी सुमारे १० वाजेपर्यंतची असते. हवेतून उडताना पक्ष्यांना खूप ऊर्जेची आवश्यकता असते.

त्यामुळे त्यांची पचनक्रिया प्राण्यांपेक्षा बरीच झटपट पूर्ण होते. यासाठी त्यांना अन्नाची सारखी गरज असते. रात्रभर अन्न न मिळाल्यामुळे ते उपाशी राहतात आणि सूर्योदयाची वेळ येताच अन्नाच्या शोधात फिरू लागतात, दर्शनसुलभ होतात.

त्यामुळे अशा जागेला भेट द्यायची तर तिथे सूर्योदयाच्या सुमारास दाखल होणे गरजेचे असते. बडोद्याहून पहाटे लवकर निघून सातच्या आत वढवाणाला पोहोचणे जरा कठीण वाटल्यामुळे आम्ही सरोवराजवळच्या निवासी जागेचा शोध सुरू केला आणि गुजरात सरकार संचालित ‘इको टुरिझम’ या एकमेव निवासी संकुलाचा पर्याय समोर आला.

इतर निवासी पर्याय सरोवरापासून कमीतकमी ८ किलोमीटरवर होते. कधीही न ऐकलेल्या आणि सरकार-संचालित निवासाबाबत मन शंकित झाले होते.

त्यातून चेकआऊट वेळ सकाळी नऊची दिलेली. त्याच्या आत सकाळचे सत्र कसे संपणार हा विचारही समोर आला. मग दिलेल्या फोननंबरवर संपर्क केला तर तेथील संचालिका सरला यांनी आत्मीयतेने आमच्या सर्व शंकांचे निरसन तर केलेच, पण ‘नेटवर बुकिंग करून रात्री कितीही उशिरा या, मी वॉचमनला सांगून ठेवते, तसेच सकाळी थोडा उशिरा चेकआऊट केलात तरी चालेल,’ हा विश्वासही दिला.

जेवण, नाश्ता धरून एक दिवसाची रक्कम ऑनलाइन भरून लगेच बुकिंग केले. निर्मनुष्य, अंधारे, कच्चे रस्ते गाडीतून कापण्याचा थरार अनुभवत रात्री दहानंतर तिथे पोहोचलो आणि सुमारे दोन एकर जागेत पसरलेल्या निसर्गसंपन्न इको टुरिझम रिसॉर्टमध्ये दाखल झालो.

वॉचमनने उघडून दिलेली आमची खोली बांबूच्या फर्निचरने संपन्न होती! थोडा वेळ बाहेरच्या मधल्या मोकळ्या जागेतील हिरवळीवर असलेल्या बाकांचा आणि झोपाळ्याचा आनंद घेतल्यावर परत खोलीत येऊन निद्राधीन झालो.

पहाटे जाग आल्यावर खोलीचे दार उघडताच पक्ष्यांच्या किलबिलाटाने कान धन्य झाले. उत्साहात आवरून रिकाम्या पोटीच बाहेर पडताना लक्षात आले की पुण्याहून दुर्बीण आणायचे विसरून गेले आहे! आता फक्त कॅमेऱ्याच्या टेलीलेन्सवर भागवायचे होते. नाश्ताही नऊ वाजता मिळणार होता. तोपर्यंत फक्त पाण्यावरच वेळ काढायचा होता.

शतपावलीइतक्या अंतरावर असलेल्या सरोवराकाठचा थोडासा चढ चढताच सरोवराच्या नितळ पाण्याच्या निळ्याशार नजाऱ्यावरून नजर हटेना. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्याने मावळतीकडे आलेल्या चंद्रबिंबाने या देखाव्याला स्वर्गीय परिमाण लाभले होते.

तुरळक पक्षी निरीक्षक दाखल होऊ लागले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पक्षी फारसे दिसत नव्हते. काठाकाठाने चालत शेदीडशे मीटर पुढे गेलो तरी परिस्थितीत फरक पडेना. काय चुकतंय काहीच लक्षात येईना.

एवढ्यात एक छोटेखानी हॉटेल नजरेस पडले. चहाच्या अपेक्षेने आत गेलो तर तिथे कांदाभजी तळण्याचीही तयारी होत होती.

गरमागरम भजी-चहा यांचा आस्वाद घेत असतानाच तिथे एका काटकुळ्या माणसाचा प्रवेश झाला. त्याच्या हातातल्या दुर्बिणीवरून तो जाणकार पक्षी निरीक्षक वाटल्याने त्याला पक्ष्यांची संख्या कमी असल्याचे कारण विचारले.

तो म्हणाला ‘अगदी सकाळी पाणपक्षीदेखील जवळच्या शेतांमध्ये किडे, टोळ टिपण्यासाठी जातात. मग नऊनंतर शेतकरी शेतांमध्ये आले की ते उडून तलावात येतात आणि आपला खाद्यप्रपंच चालू ठेवतात. थोडा वेळ थांबा. मग सरोवर पक्ष्यांनी कसं भरून जातं ते पाहा!’

अधिक माहिती घेताना कळले, की तो काटकुळा माणूस म्हणजे रमणलाल -वढवाणातील अधिकृत वनरक्षक. आणि सरोवरावर गस्त घालण्याबरोबरच आलेल्या पक्षी निरीक्षकांना योग्य माहिती देणे, दुर्बिणीतून पक्षी दाखवणे हीदेखील त्यांची कामे आहेत.

‘आम्ही दुर्बीण आणायचं विसरलो त्यामुळे थोडावेळ तुमची दुर्बीण वापरू शकतो का?’ असं विचारल्यावर रमणलाल निःशंकपणे म्हणाले, ‘जरूर. पाहिजे तेवढा वेळ वापरा. जाताना मला परत द्या. मी इकडेच कुठेतरी असेन.

’ पोटपूजा झाली होतीच. आता निकॉनची उत्तम दर्जाची १०×३० दुर्बीण हातात आल्यावर आमचा उत्साह दुणावला आणि दुप्पट उत्साहात आम्ही रपेट चालू केली!

१९१०च्या सुमारास बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी पंचक्रोशीतील गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बांधून घेतलेल्या जवळजवळ १२ किलोमीटर क्षेत्रफळाच्या या सरोवराचा स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांनाही खूप उपयोग होतो.

मधेच बेटांसारखी वर आलेली जमीन आणि काही मोठाले वृक्ष यांमुळे सरोवराचे सौंदर्य आणखी खुलते. सरोवराच्या काठाने सुमारे दहा फूट रुंदीचा कच्चा रस्ता केलेला असल्याने पक्षीनिरीक्षकांना त्यावर सहजपणे चालत फिरता येते.

आम्ही प्रथम उजव्या बाजूला चालायला सुरुवात केली. आता आठ वाजून गेले होते. मधेच वर आलेल्या एका छोट्या टेकाडावर बरेच काळेशार पाणकावळे, एक पांढराशुभ्र लहान बगळा आणि, या दोन टोकांच्या रंगांचा समतोल राखण्यासाठी जणू, एक राखी करकोचा असे सगळे आपापल्या नाश्त्याचा पहिला हप्ता आटोपून पिसे वाळवण्याच्या, साफ करण्याच्या कामात व्यग्र होते.

इतक्यात आकाशात ‘आंग आंग, गँ गँ’ असा आवाज आल्याने वर बघितले तर राखाडी रंगाच्या, गुलाबी चोचीच्या गुबगुबीत कलहंसाचा एक थवा उडत चालला होता. दूरवर काही कलहंस मधेच वर आलेल्या जमिनीवर बसून किडे टिपत होते.

अचानक त्यांच्यात खळबळ माजली. ते सर्वजण गडबडीत उठले आणि जोरदारपणे पंख फडफडवत सरोवराच्या दुसऱ्या काठाकडे उडत निघाले.

एक दलदल ससाणा शिकारीसाठी त्यांच्या मागावर आला होता. त्याचा रुबाब आणि लयबद्ध भरारी त्याचे वेगळेपण दाखवत होते. शिकार हाती न आल्याने एक फेरी मारून तो दूर एका उंच झाडावर टेहळणीला बसला.

पुढे काही अंतरावर उंच गुलाबी पायांच्या, काळ्यापांढऱ्या रंगाच्या शेकाट्यांचा एक थवा सरोवराच्या उथळ भागात उभा राहून पाणकीटक, मृदुकाय शंखजीव टिपत होता.

एका जागेवरचे खाद्य कमी झाल्यावर ते एकजुटीने पाण्यात चालत जागा बदलत होते. मधेच एक पांढराशुभ्र बगळा पाण्याला समांतर उडत आला आणि काठाच्या दलदलीत उतरला.

उडताना, उतरताना त्याच्या पंखांच्या पिसांच्या कडा नाजूकपणे कातरलेल्या करंजीसारख्या नक्षीदार दिसल्या. शांत निळ्या पाण्यात पडलेले त्याचे प्रतिबिंब फार मोहक वाटले.

आता आमचे लक्ष सरोवराकाठच्या झाडांवरच्या काही छोट्या पक्ष्यांकडे गेले. फिकट तांबूस रंगाचा, पांढऱ्या भुवईचा वटवट्या बाभळीच्या टोकदार काटेरी झाडात बसला होता. थोड्याथोड्या वेळाने सरोवराकाठच्या मातीमध्ये उतरून एखादा किडा टिपून तो परत बाभळीच्या झाडात जाऊन बसत होता.

जरा वेळाने आमच्या डोक्यात प्रकाश पडला. वरून दलदल ससाणा घिरट्या घालत असल्याने तो दूर गेला की वटवट्या उघड्या जमिनीवर उतरून किडा टिपून संरक्षणासाठी पुन्हा बाभळीच्या तीक्ष्ण काटेदार झाडात जात होता. ससाण्याला त्या काटेरी झाडावर येणे शक्यच नव्हते. निसर्गाची अशी ढाल करून वटवट्या केवढी हुशारी दाखवत होता!

सरोवराच्या काठावर अशीच किडेमारी करणारा पिवळ्या पोटाचा राखी धोबीसुद्धा हीच क्लृप्ती वापरत होता. फरक एवढाच की तो सतत जमिनीवर वावरत असल्याने बाभळीच्या जमिनीवर टेकलेल्या फांद्यांखाली आसरा घेत होता.

तांबूस पाठीच्या खाटीक पक्ष्याला मात्र संरक्षणाबरोबरच जास्तीचे खाद्य टोचून ठेवण्यासाठीही बाभळीच्या काट्यांचा उपयोग होत होता. एकंदरीत तिथली निसर्गसृष्टी फारच परस्परपूरक होती!

नऊ वाजेपर्यंत आम्ही सुमारे एक किलोमीटर पुढे आलो होतो. आता भूक पुन्हा चाळवली. इको टुरिझममधल्या नाश्त्याची वेळ झाली होती. उलटे वळून, वाटेत रमणलालना दुर्बीण परत करून रिसॉर्टमध्ये आलो तर स्वादिष्ट गरमागरम पोहे, शेव, चहा आदी तयारच होते. त्यावर ताव मारून पुन्हा बाहेर पडताना सरोवराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या दलदलीच्या पाणथळ प्रदेशाकडे लक्ष गेले.

काही पांढरे बगळे आणि वंचक तिथे शिकार साधत होते. वंचक पक्ष्याचे भेदक पिवळे डोळे आणि लांब कडक चोच पाहूनच भक्ष्य अर्धमेले होत असेल असा गमतीदार विचार मनात आला! भक्ष्य दिसताच वंचक मान एकदम लांब करून दलदलीत चोच खुपसून क्षणार्धात ते टिपत होते.

जरा नजर वर गेली तर जवळच्याच एका निष्पर्ण झाडावर खंड्या आपली करडी नजर रोखून दलदलीत फिरणारे किडे, चतुर आदी न्याहाळत होता. एका भरारीत खाद्य टिपून मग तो जवळच्या एका भिंतीवर बसायचा आणि चोचीने भिंतीवर आपटून तो जीव मरण पावल्यावर सावकाश त्याला गिळंकृत करायचा. खाद्य सारखेच असले तरी प्रत्येकाच्या भक्षणपद्धती मात्र वेगवेगळ्या!

परत सरोवराकाठचा चढ चढून आम्ही डावी दिशा धरली. थोड्या अंतरावर निळा रंग दिलेला एक मोठा लोखंडी सांगाडा उभा केला होता. बहुधा सोलर पॅनेल्स बसवण्याची तयारी चालू असावी. त्यावर काही काळे शराटी स्वतःची साफसफाई करण्यात व्यग्र होते.

त्यांच्या जवळून जावेच लागणार होते. जवळ जाताजाता त्यांचे फोटो घेतले. आम्ही विशिष्ट अंतरावर येताच ते उडाले तेव्हा त्यांच्यापैकी एकाचे सरोवराच्या निळ्याशार पाण्यावरून उडतानाचे छान फोटो मिळाले!

या बाजूला लोक येत‌ नसल्यामुळे काही अंतरावरच खूप मोठ्या संख्येने चक्रवाक बदके पोहतपोहत उदरभरण करत होती. निळ्या पाण्यावर त्यांची गुबगुबीत तपकिरी-नारिंगी शरीरे आणि पांढरी डोकी इतकी खुलून दिसत होती की त्यांच्या खर्जातल्या ‘आंग आंग’ अशा आवाजाने अंग अंग तव अनंग खुलवी मदन मंजिरी... या नाट्यगीताची आठवण आली!

त्यांचे रंगरूप होतेच त्या गीताच्या शब्दांइतके डौलदार. मधेच उडताना चक्रवाक बदकांचे पंख उघडल्याने मागच्या भागातली हिरव्या रंगाची पिसे दिसल्याने त्यांची रंगसंगती आणखी सुंदर दिसत होती. जवळच काळे शरीर आणि पांढरे कपाळ असलेली वारकरी बदके शांतपणे पोहत आपले नाव सार्थ करत होती.

आणखी थोडे पुढे आलो तर चमकदार शराटी, टिटव्या, जांभळ्या पाणकोंबड्या यांच्याबरोबरच एक एकांडा कमलपक्षीही फिरत फिरत खाद्यभक्षण करत असलेला दिसला. मधेच, आमची चाहूल लागल्यामुळे असेल कदाचित, हे सर्व द्विजगण पाण्यावर पाय मारत उडायचे आणि आकाशात काही घिरट्या घालून परत पाण्यावर अवतरायचे.

अनिमिष नेत्रांनी हे पक्षी संमेलन पाहतापाहता बारा कधी वाजून गेले ते कळलेच नाही. आता परत फिरायला हवे होते. तशा विचारात असतानाच एक माणूस मोटारसायकलवरून आला आणि स्वतःची ओळख सांगून, आमची चौकशी करून आपल्या न्यूजचॅनेलसाठी काही बाईट्स द्या अशी विनंती करू लागला.

एका प्रसिद्ध गुजराती टीव्ही चॅनेलचा तो सांखेडा गावातील प्रतिनिधी होता आणि वढवाणा सरोवराची बातमी देण्यासाठी आमच्यासारख्या (अति)उत्साही पर्यटकांच्या शोधात होता! त्याने एका मिनिटात आपल्या उपकरणांची मांडामांड केली आणि आयुष्यात पहिल्यांदा मला एखाद्या टीव्ही चॅनेलवर दीड-दोन मिनिटे झळकण्याचा मान दिला!

एकमेकांना धन्यवाद दिल्यानंतर पुन्हा एकदीड किलोमीटर चालत आम्ही मागे आलो आणि त्या रमणीय सरोवराला मनोमन नमस्कार करत त्याचा निरोप घेतला!

इको टुरिझम रिसॉर्टमध्ये परत आल्यावर ताजेतवाने होऊन गरमागरम स्वादिष्ट गुजराती ग्रामीण जेवणावर ताव मारला आणि सामान आवरून बडोद्याचा रस्ता धरला.

जरा पुढे येताच एका वठलेल्या वृक्षावर नजर गेली तर मघाशी सरोवरावर घिरट्या मारून इतर पक्ष्यांच्या काळजात धडकी भरवणारा दलदल ससाणा दुपारच्या विश्रांतीसाठी वृक्षाच्या शेंड्यावर दिमाखात बसला होता.

त्याचा चेहरा बाजूला वळला की दिसणारी त्याची अणकुचीदार, बाकदार चोच आणि चेहरा समोर आला की आमच्यावर रोखलेले तांबूस पिवळे डोळे आमचाही थरकाप उडवत होते.

आणखी जरा पुढे एका पाणथळ शेतात गुलाबी लांबसडक पाय, पांढरे पोट, काळे पंख आणि चोच आणि गडद हिरवी-किरमिजी मान अशी अद्‌भुत रंगसंगती लाभलेला काळ्या मानेचा करकोचा एकटाच कीटकभक्षणात मग्न होता.

त्याच्या बाजूला बऱ्याच संख्येने असलेल्या पांढऱ्या बगळ्यांमुळे तो जणू पांढरीशुभ्र वस्त्रे नेसलेल्या गोपींमधे रमून गेलेला श्यामलवर्णी कृष्ण वाटत होता! पक्ष्यांच्या या रासलीलेसारख्या वाटणाऱ्या दृश्याने आमच्या पक्षी यात्रेची दिव्य सांगता झाली!

शीत कटिबंध आणि विषुववृत्त यांच्या दरम्यान होणाऱ्या पक्ष्यांच्या वार्षिक स्थलांतराचे दोन प्रमुख हवाई मार्ग आपल्या देशातून जातात आणि उत्तर युरोप आणि सायबेरिया यांच्यासारख्या दूरस्थ आणि दुर्गम प्रदेशातील मनोहारी पक्ष्यांचे दर्शन घडवतात

पक्ष्यांचा हा प्रवास अत्यंत प्रयासप्रद असला तरी आपण मग फारसे प्रयास न घेता त्यांचे दर्शन वढवाणा सारख्या सरोवरावर घेऊ शकतो आणि त्यांच्या अनोख्या विश्वात काही वेळ स्वतःला विसरून रमू शकतो!

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT